Wednesday, May 27, 2020

Aum Namoji Vitthala ॐ नमोजी विठ्ठला

                                   

                                                    ||  श्री शंकर  ||                                                          


                             

                          नमोजी  विठ्ठला

 

सकाळची प्रसन्न वेळ.घंटेचा नाद सभागृहांत घुमतो. सूर्याची चमचमणारी कोवळी किरणे अलगद मंदिराच्या प्रवेशद्वाराशी थबकतात.बाहेर लागूनच उभा असलेला सर्वसाक्षी पिंपळ आपल्या पानांची सळसळ थांबवून सज्ज होतो आणि सर्व भाविक सभागृहात शिस्तबद्ध रीतीने आसनस्थ होतात.अगदी वेळेत ,एकसुरात प्रातःस्मरणाला सुरवात होते.गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरु असलेली हि परंपरा. नांदेड जवळील उमरी पासून काही अंतरावर असलेले गोरठा. ह्या छोट्याश्या खेडेगावांतली मंडळी बहुतांशी अक्षर ओळखही नसलेली, शाळकरी मुलं, नित्यनेमाने सकाळी इथे येऊन दासगणू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन , प्रातःस्मरणाने आपल्या दिवसाची मंगलमय सुरवात करतात आणि मगच कामाला लागतात.

आधुनिक महिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत कवी दासगणू महाराजांची हि कर्मभूमी. आणि आता महाराजांची वस्त्र समाधी तिथे आहे.ह्या खेड्याचे भाग्य थोर म्हणूनच इथे संतपरंपरा रुजली, वाढली आणि त्याचा सुगंध आजही आसमंतात दरवळतो आहे.आपल्या प्रसादमय, भक्ती रसाने चिंब भिजलेल्या काव्याने महाराजांनी जनमानसात भक्तिप्रेमाची गुढी उभारली. भक्ती- सामर्थ्याने प्रेरित असलेली हि चळवळ आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.

विठ्ठलाच्या नावाचा गजर होतो आणि महाराजांनी रचलेल्या रसाळ स्तोत्रांची मालिकाच सुरु होते. घनगंभीर आवाज सभागृहांत निनादत राहतो. आपण हि त्या प्रवाहात कधी मिसळून जातो समजत नाही.

आता पांडुरंग स्तोत्राला सुरवात होते. मंगलाचरण होऊन, सद्गुरू आणि संतसज्जनाचे आशीर्वाद घेऊन महाराज विठ्ठलाला साद घालतात.

हे चराचरव्यापक उदारा , पांडुरंगा , रुक्मिणीपती ...

महाराजांच्या डोळ्यासमोर पांडुरंग स्तोत्र रचताना पंढरपूरचा विठ्ठल तर होताच ,त्याचबरोबर परमेश्वराचे व्यापक रूप ते ह्या पांडुरंगात पाहत होते.

मत्स्य कच्छ,वराह नरहरी | वामन ,परशुराम रावणारी |

कृष्ण ,बौद्ध ,कलंकी या परी | नाना रूपे धरिलींस  ||

महाराज वर्णन करतात , भक्तांच्या रक्षणासाठी युगांनयुगे विविध अवतार धारण करून , वेगवेगळ्या  लीला करणारा तूच.

पुढे ते म्हणतात ...

नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात | परी अवघ्यांचे सार सत्य एक तूच अससी कि ||

शैव असो किंवा वैष्णव हे पंथ दिसताना वेगळे दिसले तरी त्यामध्ये सामावलेला तूच आहेस.अद्वैत सिद्धांत महाराजांनी इथे अगदी सहजपणे मांडलेला आहे.

विठ्ठल ,परमेश्वराचा हा "नववा अवतार" भक्तांचा उद्धार करण्यासाठीच झालेला आहे. तरी महाराज म्हणतात, "जगदारंभापासून भक्त तुझे गाती गुण", यातून त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजेच त्याचे सगुण रूप " पांडुरंग" अभिप्रेत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेला हा पंढरपुरी निवास करणारा चित्तचोर. ज्यांनी ज्यांनी आपल्या अनन्य भक्तीने त्या पांडुरंगावर प्रेम केले त्या भक्तांसाठी हा धावून जातो.

ह्या लडिवाळ भक्तांची नांवे तरी किती सांगावीत ? दामाजीपंत,नरसी मेहेता, बोधले बुवा किंवा जनाबाई ,कान्होपात्रा.भगवंताशी आपुलकीच्या नात्याने  जोडल्या गेलेल्या आपल्या भक्तांचा तारणहार हाच. निजभक्तांच्या रक्षणासाठी हाच कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

हा विठ्ठल आहे तरी कसा ?

 आब्रह्मस्तंबपर्यंत तूच एक रुक्मिणीकांत " चराचरांत व्यापलेला ,घटाघटांत सामावलेला विविध रूपांत वावरणारा तो हाच. आकाशासारखे  अमर्याद,विशाल असे हे परब्रह्म प्रत्यक्षात जरी निर्गुण असले तरी जडमूढ जीवांसाठी ते सगुण झाले." रूप पाहता लोचनी ,सुख झाले हो साजणी

त्याच्या रूपाचे वर्णन करताना शब्द अपुरेच पडतात,

ते हे रुपडे मनोहर | 
  गळा घवघवीत तुळसीहार ||


हा  विठ्ठल जणू मदनाचा पुतळाच.मनोमन विठ्ठलाचे हे देखणे रूप मनःपटलावर कोरले जाते.
शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध हि भुतांची तन्मात्रे.त्याचे प्रतीक म्हणजेच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला. त्या तुलसीदलांचा सुवास आसमंत भारून टाकतो.आपल्या मनाचा गाभाराही व्यापून टाकतो. मूर्तीत प्रगटलेलें चैतन्य भक्तांची चेतना जागृत करते.

आता साक्षात हा विठ्ठल समोर उभा ठाकलाय, पण त्याची पूजा करू तरी कशाने ? सगळ्या निसर्गावर मालकी तर त्याचीच. मग माझे बोलणे, हिंडणे- फिरणे सर्व काही त्याच्याच पायाशी अर्पण करतो.माझी प्रत्येक कृती हि त्याच्याच प्रेरणेने झाली आहे. विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले महाराजांचे मन सतत त्याचा धावा करतेय.माझ्या गुणदोषांसकट माझा स्वीकार कर,म्हणून महाराज त्या  विठू  माऊलीला आर्ततेने हाक मारतात. महाराज  " अक्षर रुपी" वाङ्मयसेवा " अक्षर " विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला समर्पित करतात.

अर्थात माऊलीच ती. भक्ताचा भाव जाणून इच्छित फळ त्याला देतेच.संसार तापाने पोळलेल्या सामान्य जनांना हवे असेल ते सर्व ह्या विठ्ठलाची भक्ती आणि ह्या स्तोत्राचे पठण केल्यास प्राप्त होते.फक्त हवा प्रामाणिकपणा,श्रद्धा , निष्ठा. तो परमेश्वर  मग तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो.

महाराजांनी सुमारे एकशेदहा वर्षांपूर्वी रचलेले हे पांडुरंग स्तोत्र. ह्या स्तोत्राचे मनोभावे केलेले पारायण तुमच्या देहबुद्धीचा नाश करून त्या वैकुंठनायकाची भेट नक्की घडवील असा विश्वास महाराज व्यक्त करतात .

हे स्तोत्र त्यातील शब्द जिव्हाळ्यामुळे भाविकांना आकर्षित करते.दिवसभर त्यातील शब्दांचे गुंजन मनांत चालू राहते.वेदांत तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत इथे प्रगट होते. अवीट गोडीचे हे स्तोत्र  सामान्य भक्तालाही आपले वाटते.

माझ्यासारख्या प्रापंचिक गृहिणीला महाराजांचे शब्दवैभव,तत्वज्ञान,काव्याची ओघवती भाषा,त्यातील प्रसाद गुण,लालित्य सर्वच मोहात पाडते.आजही ते स्तोत्र म्हणताना नित्यनूतनच भासते.

ह्या भक्तिरसात डुंबण्यासाठी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ….

                                       पारायण हीच वारी | करा अत्यादरे निर्धारी |

                   भक्तिपताका स्कंधावरी |  घेऊनिया भाविक हो ||

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल....

 


Sunday, May 17, 2020

HELLO...HELLO..... हॅलो ... हॅलो ...

                                  ।।      श्री   शंकर   ।।

                                         हॅलो  .... हॅलो .... 



        आज जागतिक दूरसंचार दिन.  त्या निमित्ताने काही स्मृती सचेतन झाल्या.

"STAY CONNECTED " ह्या भावनेंत  Telecommunication चे सामर्थ्य दडलेलं  आहे. आज घराबाहेर पडायची बंदी असतांना समाजांशी प्रत्यक्ष जोडण्याचे काम ह्या Communication Network मुळे शक्य झाले.
घरातला बंदिवास सुसह्य झाला. " Thanks World Telecommunication "

मुंबई महानगरावर  अधिराज्य गाजवणाऱ्या आणि संपूर्ण जगाशीं संपर्क असलेल्या M.T.N.L. ची आज प्रकर्षाने आठवण झाली. सुरवातीला बॉम्बे टेलिफोन्स ह्या नावाने असलेल्या संस्थेचे रूपांतर पुढे महानगर टेलिफोन लि .मुंबई मध्ये झाले.ते वर्षं होतं १९८६.

सुमारे १८८२  मध्ये स्थापन झालेली " पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन" च्या सेवेअंतर्गत सामावणारी टेलिफोन सेवा मुंबईच्या जडघडणीत एक महत्वाचा टप्पा ठरली. मुंबईनंतर दिल्लीत हि सेवा सुरु झाली. ब्रिटिशांनी मुंबई बंदराचे व्यापारी महत्व चाणाक्ष नजरेने केव्हाच हेरले होते. त्यामुळेच बॉम्बे टेलिफोन्स  ची घोडदौड इथे सुरु झाली. जनसंपर्क आणि अर्थातच पुढे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हे जाळे वाढू लागले.आणि पुढे त्याचे महाजालात रूपांतर कधी झाले ते समजलेच नाही. विस्तारणाऱ्या  अफाट मुंबईला सेवा पुरविण्यासाठी अनेक दूरभाष केंद्रांची स्थापना झाली. ह्या केंद्रात कामकाजासाठी असलेला ऑपरेटर आणि इतर कर्मचारी वर्ग वाढत होता. लाईनमन" फिल्ड वर्क" साठी नियुक्त केले गेले. हि संख्या हजारोंच्या घरात पोहोचली.

मला आठवतं ,मी स्वतः फोन  साठी अर्ज केला तेव्हा मला ७ वर्षे फोनची वाट बघावी लागली होती. नंबर लागल्यावर कोण आनंद झाला होता. तेव्हा मुंबई बाहेर फोन  लावायचा म्हणजे एक दिव्यच असे. परदेशात फोन करण्यासाठी मग विदेश संचार निगम ची स्थापना झाली. ह्या सगळ्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला उत्तम चालना  मिळाली.  १ Rs .ची टेलिफोन बूथची त्या वेळेला खूपच चलती  होती आणि सर्वसाधारण जनतेला ह्या फोनचा खूप आधार वाटत असे. अनेक अपंग व्यक्तींना ह्याद्वारे रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले होते.

सर्व जगांत तंत्रज्ञानाची क्रांती झाली ती २००० सालच्या आगमनाबरोबरच  . १९९५ साली संगणक अवतरले.त्या पाठोपाठ इंटरनेट .आणि आता तर मोबाईल मुळे सर्व जगच 'अपनी मुठ्ठीमें ' अशी परिस्थिती आहे.

अनेक खाजगी कम्पन्यांनी globalisation policy ला अनुसरून टेलिफोन विश्वात धडक मारली ;स्पर्धा वाढू लागली .बाहेरच्या जगांत घडणाऱ्या अफाट घडामोडीना  तोंड देण्याचे सामर्थ्य कदाचित कमी पडले असावे. ह्या आक्रमणाने  M.T.N.L.ची हळूहळू घडी विस्कटत  गेली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांचा अवलंब करूनही फारसे यश मिळाले नाही आणि हळूहळू नवरत्नांपैकी एक असलेली हि कंपनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडू लागली." कालाय तस्मै नमः "

जानेवारी २०२० मध्ये आलेल्या Compulsory  Retirment Scheme  मुळे आज अगदी अपुऱ्या मनुष्य बळावर Telephone Ex. चालवली जात आहेत.

आजवर अनेक कुटुंबाना पोसणारी  MTNL " कुणी फोन घेता का फोन" असा आर्त सवाल करतेय भारतीय अर्थव्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या निम सरकारी कंपन्यांपैकी हि एक आघाडीची कंपनी, अहोरात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांपकी एक. अवघ्या मुंबापुरीची हेल्पलाइन

परवा  कामानिमीत्त टेलिफोन केंद्रात  जायची वेळ आली.  MTNL चे  पूर्वीचं वैभव आठवून जीव कासावीस झाला. सगळी इमारत अगदी शांत ,स्तब्ध .

एकेकाळी चैतन्याने सळसळणारी  आपली" संवादिनी "आज अशी मूक झालेली  बघून मन अबॊल झालं .
पुनःश्च हरिओम ह्या न्यायाने पुन्हा एकदा ह्या सेवेला झळाळी प्राप्त होईल आणि हि केंद्रे पुन्हा नवीन जोमाने कार्यरत होतील ... मन में हैं विश्वास ,पुरा है विश्वास ...

Wednesday, May 13, 2020

Akashashi Jadale Nate....( आकाशाशी जडले नाते )

                                                         
 ll श्री  शंकर  ll

आकाशाशी जडले नाते

                  

                 नीले गगन के तले ,धरती का प्यार पले ..... 


अगदी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपली कायम सोबत कोण करतं ? एक जमीन (पृथ्वी) आणि दुसरे आकाश  आपल्या  सर्वांना कायमच  साथ देणारं, छाया देणारं, माया देणारं.  

माणसाला नेहेमीच भव्य- दिव्य आवडते. अमर्याद, विशाल वस्तूंचे त्याला आकर्षण असते. अथांग समुद्राच्या किनारी जाऊन त्याच्या खोलीचा वेध घेणे त्याला आवडते तसेच विस्तीर्ण आकाश त्याला भुरळ घालते. ह्या निसर्ग रूपांत त्याला एक वेगळीच अनुभूती मिळते आणि काही क्षण शांतता लाभते. 


जगाच्या कोणत्याही टोकाला आपण असलो तरीं आकाश तेच, One & Only One. आपल्या जन्मांपासूनच ह्या आकाशाशी आपले नाते जोडले जाते. सध्याच्या शांत, निवांत वातावरणांत आकाशाचे अनेक विभ्रम मला न्याहाळता आले आणि आकाशाशी असलेले  हे नाते अधिक दृढ झाले. 

आकाश हि एक पोकळी आहे. ते स्थिर (अचल) विशाल, अनंत, अमर्याद आणि अलिप्त आहे. त्याच्यावर पसरणारे सर्व रंग सूर्य चंद्र,नक्षत्र चांदण्यांना आपल्यात विनातक्रार सामावून घेणारे.      

         घट घट मैं पंछी बोलता ..... प्रत्येक घटात हे आकाश स्थित असतं. अगदी आपल्या आजूबाजूला, घरांत सगळया पोकळींत हे आकाश तत्व भरून राहिलेलं असतं फक्त अतिपरिचयात अवज्ञा, ह्या न्यायाने आपल्याला त्याची जाणीव होत नाही.आपण उच्चारतो तो शब्दं ह्या आकाशाचाच गुण. त्यामुळे तो शब्द ह्या आकाशाच्या पोकळीत जाऊन, मग प्रतिध्वनीत होतो. आपलं शरीर हाही पंचतत्वांनी भरलेला एक घटच आहे. हा घट जेव्हा फुटतो तेव्हा तो आकाश तत्वाशी एकरूप होतो. 

आकाश आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत असले, तरीही ती एक अमूर्त कल्पना (Abstract)आहे. आकाश आणि धरणीचे मिलन होते असे आपण म्हणतो. ह्यालाच आपण क्षितिज म्हणतो. पण तीही  केवळ एक कल्पनाच आहे.

" आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ,स्वयंवर झाले सीतेचे , स्वयंवर झाले सीतेचे ।। "

  
     हे दृढ नाते रामायणांत दिसून येते. 

ह्या आकाशाची किती विविध रूपे आपण पाहतो?

     गगन सदन तेजोमय , तिमिर हरुनी दे प्रकाश, देई अभय .... 

रोजच्या दिनक्रमानुसार वेगवेगळ्या प्रहरांत, विविध रूपांचे, रंगछटांचे दर्शन आपल्याला आकाशांत  घडते. निसर्गचक्रानुसार, ऋतुमानाप्रमाणे हे आकाश विविध साज चढवते. 

पृथ्वी दिवसभर फिरून दमून जाते, पण आभाळ मात्र लांबूनच, स्थिर राहून, तिची गम्मत तटस्थ पणे बघत असते. हे नभ स्थितप्रज्ञ वाटले तरी मायाळू असते हं. सगळ्या जगावर त्यानें आपल्या मायेचे पांघरूण आच्छादलेले असते. 
        
       आकाश पांघरोनी,जग शांत झोपले हे । घेऊन एकतारी गातो कबीर दोहे ।।

पावसाळ्यात  ह्या नभाची आणखी विलोभनीय रूपे आपल्याला भुरळ घालतात. 

नभ मेघांनी आक्रमिले  किंवा घनघन माला नभी दाटल्या , आकाशातून पडणाऱ्या जलधारांचा वर्षांव सुखविणारा, तर कधीतरी बिजलीचा चमचमाट आकाश उजळवून टाकणारा.  पण जेंव्हा पाऊस दडी  मारून बसतो तेव्हा सगळ्यांचेच डोळे, विशेषतः शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात आणि पावसाची चातकाप्रमाणे वाट बघतात. आपल्या पूर्वजांची स्मृती जागृत होते तेव्हा आपली नजर आकाशातच त्यांचा शोध घेते आणि तिथूनच  ते आपल्यावर मायेचा वर्षाव करतायत असे जाणवत राहते. आणि नकळत त्या आकाशाकडे बघून हात जोडले जातात. 

कवी कल्पनेने तर हे आभाळ इतकं भरून येतं, अगदी मायेचा पाझरचं फुटतो त्याला.. आभाळमाया .. आपली आई सुद्धा अशीच आभाळागत माया करणारी ... 

 पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूते क्रमाने अधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जातात. ह्या पांच भुतांचा परस्पर संबंध निसर्गाचा उत्तम समतोल साधत असतो. पंचमहाभूतांच्या संयोगातूनच सर्व वस्तुजात निर्माण होते. आणि आपले दैनंदिन जीवन ह्या रचनेमुळेच सुरळीत चालू असते आणि त्याही पुढे ह्या सर्व सृष्टीचा निर्माता, जो ह्या पंचमहाभूतांनाही नियंत्रित करतो, त्याचा शोध घेणे अनिवार्य आहे असे वाटते. 

आकाशांत पतितं तोयं ,यथा गच्छति सागरं... हे सर्व निसर्गचक्र अव्याहतपणे चालू राहते, ते परमेश्वराच्या अस्तित्वामुळे. तो परमेश्वर आहे कसा? तर अगदी आकाशसारखा, निळा, अनंत, अमर्याद ,अमूर्त . 

   मनाच्या श्लोकांत समर्थ रामदास म्हणतात  " नभासारिखे रूप ह्या राघवाचे " सर्वांना व्यापून असणारे हे ब्रह्म आकाशसारखेच व्यापक, आधारभूत. तिथे दुजाभाव नाहीच. विष्णूचे एक नांव  'विहायगती ' असं आहे. आकाश हेच ज्याचे आश्रय स्थान आहे किंवा आकाशही ज्याच्या मध्ये लिन होते असा तो. 

अशा परमात्म्याने आकाश निर्माण तरी कसं केलंय ? " स्तंभावांचूनि हे उभे नभ असे "

आकाश स्वतः कोणत्याही आधाराशिवाय उभे आहे, पण तरीही सर्वाना आधारभूत मात्र आहे. 

गरुड आकाशांत उंच भरारी मारतो. झाडें उंचच उंच आकाशात झेपावतात. हिमालयासारखें ऊत्तुंग पर्वत नभाला स्पर्श करतात. आपण जेव्हा ह्या पर्वतावर असतो तेव्हा आकाशाच्या अगदी जवळ गेल्याचा भास होतो. विमानांत बसून जेव्हा आपण आकाशात उड्डाण करतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. 

अनेक संत महात्म्यांचे चरित्र आपण वाचतो तेव्हा त्यांच्या कार्याचा विस्तार आपल्याला आकाशासारखा विशाल भासतो. ।। अणू रेणूहूनि थोकडा , तुका आकाशाएवढा ।।


निसर्गापेक्षा माणसाची क्षमता कमी असली तरी त्याच्या बुद्धीने तो आकाशालाही  गवसणी घालतो. अनेक थोर व्यक्तींचा आदर्श ठेऊन त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले तर नक्कीच तो आकाशापलीकडे (Beyond The Skies) पोहोचू शकतो हे अनेकांनी सिध्द केले आहे. त्यासाठी ध्येय मात्र उत्तुंग हवे.  

आकाशांत सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य आपल्याला दिसते. त्याचे दर्शन आपल्याला नेत्रसुख देते, आनंदीत करते. पुनःपुन्हा ते दृश्य आपल्याला बघावेसे वाटते. 
    
निसर्गातील सर्वच घटकांचे शुद्ध सात्विक निर्मल रूप जपले तरच पंचमहाभूतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील . आणि इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्याही जीवनांत सप्तरंगांची उधळण होईल ,नाही का ? 




स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com 








































Tuesday, April 28, 2020

|| Jai Jai, Jai Shankar ||



                                                      
           ll   श्री शंकर  ll

                                              
|| जय जयजय शंकर ||


आज वैशाख शुद्ध पंचमी. आत्ताच श्री शंकराचार्य चरित्र पोथीच्या पारायणाची समाप्ती झाली.सद्गदित होऊन मी नमस्कार केला आणि आचार्यांचा जीवनपट डोळ्यासमोर साकार झाला.  
                   

आचार्यांचे सर्व चरित्र अतिशय अद्भुत आहे, साधारण बाराशे वर्षांपूर्वी केरळ राज्यांत, कालडी ग्रामांत, पूर्णा नदीच्या तटावर आचार्यांचा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकर महादेवच जणू शिवमणी आणि अंबा मातेच्या पोटी जन्माला आले. तत्कालीन परिस्थतीत ऐहिक सुखाला हपापलेल्या समाजामध्ये कर्मकांडाला महत्व प्राप्त झाले होते, नास्तिकतेचा पुरस्कार याच कालावधीत अतिशय प्रभावीपणे केला गेला. नाना पंथ धर्म या काळात उदयाला आले, या सर्वांचे तत्वज्ञान वैदिक धर्माविरुद्ध होते. वैदिक धर्माचा ऱ्हास होत होता आणि समाज अवनतीच्या मार्गाने चालला होता. आणि म्हणूनच शंकराने हा अवतार घेतला असे मानले जाते. त्यांचे नामकरणही "शंकर" असेच करण्यात आले. पुढे आद्य शंकराचार्य म्हणून सर्व जगामध्ये ते मान्यता पावले.

लहान वयातच शंकरला पितृवियोगाला सामोरे जावे लागले. शंकर
चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं 
अगदी जात्याच बुद्धिमान होता.
त्यामुळे सर्व शास्त्रांचे  अध्ययन लहान वयातच झाले. ते मातृभक्त होते. मातृसेवेहून दुसरे मोठे पुण्य नाही असे ते मानीत असतआईसाठी त्यांनी पूर्णा नदीचा प्रवाह वळवून अगदी घराजवळ आणला असं म्हणतात.

श्री शंकराचार्यांचा जन्म वैदिक धर्माची पुनर्स्थापना करून त्याचे गतवैभव त्याला प्राप्त करून देणे आणि त्यायोगे जगदोध्दार करणे यासाठी झाला होता. त्यासाठीच वयाच्या आठव्या वर्षी आईला राजी करुन संन्यास घेण्यासाठी ते घराबाहेर पडले. नर्मदातीरावर त्यांना त्यांचे गुरु गुरुगोविंदपद भेटले आणि त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. गुरूंनी त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली आणि पुढील आयुष्याची दिशा दाखवली.

त्यानंतर आचार्य भारत भ्रमणासाठी सज्ज झाले.काश्मीर पासून अगदी दक्षिणेपर्यंत त्यांनी वैदिक धर्माचा प्रसार आणि विकास व्हावा म्हणून सर्व आयुष्य खर्ची घातले. चार दिशांना चार मठांची स्थापना केली. ह्या  मठांच्या स्थापनेमुळे सामाजिक समरसता संपादून, भारताला एका तत्वात एकत्र जोडता आले. संसारापासून पूर्ण अलिप्त राहून त्यांनी वैदिक धर्म प्रसारासाठी स्वतःला  वाहून घेतले. स्वतःचे अद्वैत मत प्रतिपादन केले. ब्रह्मसूत्र, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, दर्शने ह्यासारखे विदवत्तापूर्ण ग्रंथ लिहिले.

आचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाला ( अहं ब्रम्हास्मि ) आणि  ( ब्रह्म सत्यंजगत मिथ्या ) मायावादाला समाजातील इतर प्रवाहांकडून खूप विरोध झाला. बौद्ध ,जैन,मीमांसक,सांख्य ह्या प्रतिपक्षांनी त्यांच्या मतावर जोरदार टीका केली. त्यांच्यात वारंवार शाब्दिक लढाया झाल्या. पण आचार्यांनी सर्व वैदिक धर्म विरोधी मतांचे खंडन करून वैचारिक क्रांती घडवून आणली.

आचार्यांच्या पूर्ण जीवन चरित्रात अनेक चमत्कार घडलेले दिसून येतात. लोकांना त्यांच्या महानतेची जाणीव झाली. जनमानसात त्यांचा दबदबा वाढला , त्यातूनच आचार्यांना धर्मप्रसार करणे शक्य झाले. ते धर्मयोद्धा होते. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या ह्या कार्याचा अनुभव घेता येतो.

आचार्यांचा जीवनकाल अवघा ३२ वर्षांचा आहे. ३२ व्या वर्षी केदारनाथ येथे कैलासगमन केले . 

Life of Shankaracharya - The Adventures of a Poet Philosopher
Four Shakti Peethas 
by Adi Shankaracharya
आपल्यासारख्या सामान्य लोकांना आदी शंकराचार्यांची ओळख त्यांच्या अनेक श्लोक / स्तोत्रांमुळे झालेली आहेच. त्यांनी अनेक अष्टके रचली. भज गोविन्दम, चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं, कनकधारा स्तोत्र, पांडुरंगाष्टक अशी अनेक स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत. ही सर्व स्तोत्रे प्रवाही, रसाळ, अर्थगर्भ तर आहेतच पण त्याला गेयताही आहे. त्यामुळे म्हणतांना एक वेगळाच आनंद मिळतो. अगदी सामान्य लोकांनाही परमार्थाचा शुद्ध, सोपा मार्ग समजावा म्हणून म्हणूनच ह्या स्तोत्रांद्वारे भक्तिभाव, श्रद्धा जनमानसांत रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला त्यांच्याकडून मिळालेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंचायतन पूजा. विविध पंथांमुळे निर्माण झालेला उपासनाभेद टाळता यावा आणि त्यातून निर्माण होणारे तंटे सोडवावेत म्हणून त्यांनी पंचायतन पूजा सुरु करण्यास लोकांना प्रवृत्त केले. हाच समन्वय त्यांनी अनेक ठिकाणी साधला आहे.

साधनेच्या बळावर सत्य सिद्धांत शोधून काढणारे, लोकांना ज्ञान देणारे, सदाचार, सन्नीती ह्यांचा आदर्श असणारे हे प्रेरणादायी चरित्र. 


माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की पिढ्यानपिढ्या हे गुण गात राहावे. सर्व विश्वाचे मंगल करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतार घेतलेले सर्व संत मायेच्या वात्सल्याने समाज घडवीत असतात. आचार्यांप्रमाणेच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास ह्या सर्व संतांनी आजवर केलेल्या तपश्चर्येवरच आज आपण सुसह्य जीवन जगत आहोत.

आचार्यांच्या जयंती दिनानिमित्ताने, आधुनिक महिपती संतकवी दासगणू महाराज ह्यांनी लिहिलेल्या रसाळ, प्रासादिक शंकराचार्य चरित्रामुळे एका अलौकिक, अद्भुत योग्याचा जीवन परिचय करून घेता आला. इतक्या वर्षांनंतरही   शंकराचार्यांचे कार्य अजूनही कसे टिकून आहे या उत्सुकतेपोटी त्यांचे चरित्र आणि वाङ् मय अभ्यासले तर आत्मानंदाची अनुभूती नक्कीच येईल.



स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com


















Monday, April 27, 2020

CHAND HACH RE DIVAS- YAMINI ( छंद हाच रे दिवस - यामिनी



                           ll श्री शंकर ll          

                                                                              
        ll   छंद हाच रे दिवस  - यामिनी  ll


धडधडत Deccan  Queen पुण्याकडे निघून गेली. नक्की सहा वाजले असणार. घरी जायलाच हवेनाईलाजानेच रंगात आलेला खेळ आवरता घेतला. सवंगड्यांचा निरोप घेऊन घराकडे धूम ठोकली, हो नाहीतर मार मिळेल. हातपाय धुवून काकाआजोबांच्या खोलीत गेले.
करड्या नजरेने आजोबानी माझ्याकडे बघितले. नावाप्रमाणेच नरसिंह आजोबा कडक शिस्तीचे होते. "हं, चला करा सुरुवात" परवचा म्हणायला सुरवात झाली. शुभंकरोती कल्याणम पासून रामरक्षेपर्यंत ओळीने सर्व स्तोत्रे ते म्हणून घेत. आजोबा स्वतः विद्वान पंडित होतेसर्व स्तोत्रे मुखोद्गत होती. त्यांच्यामुळे अगदी लहान वयातच आमची बरीचशी स्तोत्रे पाठ झाली होती. ह्या पाठांतराचा शाळेत मला फायदाच होई. कधी ऑफ पीरेडला वर्गात मला हि स्तोत्रे म्हणायची संधी मिळत असे आणि त्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप पडली कि अस्मादिकांची कॉलर एकदम ताठ.

वचनं मधुरं चरितं मधुरं ll
 मधुराधिपते l  अखिलं मधुरं ll
बाबा देवपूजा करताना अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, रुद्र म्हणत. कानावर पडून पडून हि स्तोत्रे पण पाठ झाली. त्या वयात त्याचे महत्व कधी जाणलेच नाही. नुसते तोंडावाटे शब्द बाहेर पडत इतकेच. त्यांत भावनेचा ओलावा नव्हता. परंतु त्या  लहान वयातल्या संस्कारांचं पांतर छंदात कधी झालं ते कळलंच नाही. संस्कृत स्तोत्रे मला आवडू लागली.

यथावकाश मुलींना पार्ल्यातच भिडे बाईंच्या संस्कार वर्गात घातले. तिथे त्यांनी संस्कृत संभाषण आणि विविध स्तोत्रे मुलींना शिकवली. माझ्या वाढत्या वयाबरोबर ह्या स्तोत्रांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. स्तोत्रांचे अर्थ, त्यातील भावोत्कटता आणि रोजच्या व्यवहाराशी त्यांची सांगड ह्याकडे मी विशेष लक्ष द्यायला सुरवात केली. दैनंदिन जीवनात हि स्तोत्रे कशी आचरणात आणता येतात  ह्याचा प्रत्यय येऊ लागला.

पुढे फळणीकर बाईंची भेट झाली. त्या चौथी पर्यंतच शिकल्या होत्या, पण गीतेवर मात्र त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्याकडे  मी भगवद - गीतेची  संथा  घेतली. आपल्या संस्कृतीचा हा अमृततुल्य ठेवा, त्याच्या पठणात आता मी स्वतःला हरवून बसले. सतत तोच छंद लागला. गीतेच्या पाठांतराबरोबरच त्याच्या तत्वज्ञानाचीही गोडी लागली आणि मग वेळ कमीच पडू लागला.

१९९४ सालं तर आमच्या साठी विशेष महत्वाचे ठरले. सद्गुरू वरदानंद भारतींची भेट झाली. त्यांचा भर विष्णुसहस्र नाम स्तोत्रावर होता. त्याचे महत्व खूप होते आणि आता नित्य पठणात त्याचा समावेश होता. दिवसभर तुम्ही कितीही,  कधीही, कुठेही हे स्तोत्रं  म्हणा. त्याला बंधन कुठलेच नाही. पण आम्ही मात्र त्याच्या बंधनात इतके अडकलो कि आता तो आमचा श्वास झालाय. त्यामुळे कधीच एकटेपणा वाटत नाही कि कसला कंटाळा येत नाही. नारायणाचे सतत स्मरण राहते. सहस्रनामाचे उच्चारण म्हणजे चौरस आहार,  जीवनाचा भक्कम आधारच..

काही बायका श्रीसूक्त म्हणताना ऐकले आणि आपल्याला हे यायला हवे, असे मनोमन वाटले. शिवमहिम्न स्तोत्रं हि असेच ऐकून छान वाटले, पण ते हि खूप कठीण असल्यामुळे कोणीतरी शिकवायला पाहिजे होते. माझी हि इच्छा उशिरा का होईना पूर्ण झाली. बाबांनी त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसांत आम्हांला आयुष्यभर पुरेल अशी हि शिदोरी दिली.

असा माझा छंद मला दिवस रात्र वेड लावतो आहे. त्या नित्य पठणाबरोबरच मी सतत नवीन काही शिकण्याचा ध्यास घेते. सध्या सूर्य मंडळ ह्या स्तोत्राने मला झपाटले आहे. मी अगदी त्याच्या प्रेमातच आहे इतके मला ते आवडलंय.शंकराचार्याचीही अशी अनेक स्तोत्रे मनाला भुरळ घालतात. म्हणायला, पाठ करायला अतिशय कठीण असलेली हि स्तोत्रे खूप आशयगर्भ आहेत. आचार्यांनी इतक्या लहान वयात हि कशी रचली असतील ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांत विविधताही खूप आहे.

Study says that meditation can help you stay stressfreeकालानुरूप ह्या माझ्या छंदाला एक नवा आयाम लाभला आहे. कल्पवृक्ष आपल्या सर्व मागण्या पूर्ण करतो त्याप्रमाणे you Tube  वर हवे ते स्तोत्रं उपलब्ध असते. सुब्बालक्ष्मींनी गायलेली विविध स्तोत्रे कधीही डोळे मिटून शांतपणे ऐकताना स्वतःचे अस्तित्व विसरायला होते, इतकी शक्ती ह्यात आहे. संसारातील दुःखे कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताची स्तुती. हि स्तुती  स्तोत्र पठाणाने करता येते.स्तोत्र / श्लोक पठणाने मन शुद्ध होते, एकाग्र होते. भगवंताजवळ पोहोचणे सोपे होते.भक्ती भाव वाढतो. स्तोत्रं पठणामागे जसा भाव असेल त्यानुसार तुम्हाला लाभ होतो.
मन चिंतेत असेल, अस्वस्थ असेल तेव्हा हि ठेव आपल्याला आश्वस्त करते. आज बाहेरच्या भीषण परिस्थितीत मनाचा समतोल साधता येतो तो ह्यामुळेच. हा कठीण काळ स्तोत्रं पठणात कधी आणि केव्हा संपून जातो ते समजतही नाही.

पुढे उतार वयात बाकी सगळी इंद्रिये अकार्यक्षम झाली, तरी मनोमन सामावलेले हे नाम, आपत्काळात आपल्याला उपयोगी ठरेल हा विश्वास नक्कीच आहे.

भवभय हरण करणारा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा दुसरा छंद असू शकेल का ?


Sneha Bhatawadekar
sneha8562@gmail.com