Wednesday, May 27, 2020

Aum Namoji Vitthala ॐ नमोजी विठ्ठला

                                   

                                                    ||  श्री शंकर  ||                                                          


                             

                          नमोजी  विठ्ठला

 

सकाळची प्रसन्न वेळ.घंटेचा नाद सभागृहांत घुमतो. सूर्याची चमचमणारी कोवळी किरणे अलगद मंदिराच्या प्रवेशद्वाराशी थबकतात.बाहेर लागूनच उभा असलेला सर्वसाक्षी पिंपळ आपल्या पानांची सळसळ थांबवून सज्ज होतो आणि सर्व भाविक सभागृहात शिस्तबद्ध रीतीने आसनस्थ होतात.अगदी वेळेत ,एकसुरात प्रातःस्मरणाला सुरवात होते.गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरु असलेली हि परंपरा. नांदेड जवळील उमरी पासून काही अंतरावर असलेले गोरठा. ह्या छोट्याश्या खेडेगावांतली मंडळी बहुतांशी अक्षर ओळखही नसलेली, शाळकरी मुलं, नित्यनेमाने सकाळी इथे येऊन दासगणू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन , प्रातःस्मरणाने आपल्या दिवसाची मंगलमय सुरवात करतात आणि मगच कामाला लागतात.

आधुनिक महिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत कवी दासगणू महाराजांची हि कर्मभूमी. आणि आता महाराजांची वस्त्र समाधी तिथे आहे.ह्या खेड्याचे भाग्य थोर म्हणूनच इथे संतपरंपरा रुजली, वाढली आणि त्याचा सुगंध आजही आसमंतात दरवळतो आहे.आपल्या प्रसादमय, भक्ती रसाने चिंब भिजलेल्या काव्याने महाराजांनी जनमानसात भक्तिप्रेमाची गुढी उभारली. भक्ती- सामर्थ्याने प्रेरित असलेली हि चळवळ आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.

विठ्ठलाच्या नावाचा गजर होतो आणि महाराजांनी रचलेल्या रसाळ स्तोत्रांची मालिकाच सुरु होते. घनगंभीर आवाज सभागृहांत निनादत राहतो. आपण हि त्या प्रवाहात कधी मिसळून जातो समजत नाही.

आता पांडुरंग स्तोत्राला सुरवात होते. मंगलाचरण होऊन, सद्गुरू आणि संतसज्जनाचे आशीर्वाद घेऊन महाराज विठ्ठलाला साद घालतात.

हे चराचरव्यापक उदारा , पांडुरंगा , रुक्मिणीपती ...

महाराजांच्या डोळ्यासमोर पांडुरंग स्तोत्र रचताना पंढरपूरचा विठ्ठल तर होताच ,त्याचबरोबर परमेश्वराचे व्यापक रूप ते ह्या पांडुरंगात पाहत होते.

मत्स्य कच्छ,वराह नरहरी | वामन ,परशुराम रावणारी |

कृष्ण ,बौद्ध ,कलंकी या परी | नाना रूपे धरिलींस  ||

महाराज वर्णन करतात , भक्तांच्या रक्षणासाठी युगांनयुगे विविध अवतार धारण करून , वेगवेगळ्या  लीला करणारा तूच.

पुढे ते म्हणतात ...

नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात | परी अवघ्यांचे सार सत्य एक तूच अससी कि ||

शैव असो किंवा वैष्णव हे पंथ दिसताना वेगळे दिसले तरी त्यामध्ये सामावलेला तूच आहेस.अद्वैत सिद्धांत महाराजांनी इथे अगदी सहजपणे मांडलेला आहे.

विठ्ठल ,परमेश्वराचा हा "नववा अवतार" भक्तांचा उद्धार करण्यासाठीच झालेला आहे. तरी महाराज म्हणतात, "जगदारंभापासून भक्त तुझे गाती गुण", यातून त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजेच त्याचे सगुण रूप " पांडुरंग" अभिप्रेत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेला हा पंढरपुरी निवास करणारा चित्तचोर. ज्यांनी ज्यांनी आपल्या अनन्य भक्तीने त्या पांडुरंगावर प्रेम केले त्या भक्तांसाठी हा धावून जातो.

ह्या लडिवाळ भक्तांची नांवे तरी किती सांगावीत ? दामाजीपंत,नरसी मेहेता, बोधले बुवा किंवा जनाबाई ,कान्होपात्रा.भगवंताशी आपुलकीच्या नात्याने  जोडल्या गेलेल्या आपल्या भक्तांचा तारणहार हाच. निजभक्तांच्या रक्षणासाठी हाच कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

हा विठ्ठल आहे तरी कसा ?

 आब्रह्मस्तंबपर्यंत तूच एक रुक्मिणीकांत " चराचरांत व्यापलेला ,घटाघटांत सामावलेला विविध रूपांत वावरणारा तो हाच. आकाशासारखे  अमर्याद,विशाल असे हे परब्रह्म प्रत्यक्षात जरी निर्गुण असले तरी जडमूढ जीवांसाठी ते सगुण झाले." रूप पाहता लोचनी ,सुख झाले हो साजणी

त्याच्या रूपाचे वर्णन करताना शब्द अपुरेच पडतात,

ते हे रुपडे मनोहर | 
  गळा घवघवीत तुळसीहार ||


हा  विठ्ठल जणू मदनाचा पुतळाच.मनोमन विठ्ठलाचे हे देखणे रूप मनःपटलावर कोरले जाते.
शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध हि भुतांची तन्मात्रे.त्याचे प्रतीक म्हणजेच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला. त्या तुलसीदलांचा सुवास आसमंत भारून टाकतो.आपल्या मनाचा गाभाराही व्यापून टाकतो. मूर्तीत प्रगटलेलें चैतन्य भक्तांची चेतना जागृत करते.

आता साक्षात हा विठ्ठल समोर उभा ठाकलाय, पण त्याची पूजा करू तरी कशाने ? सगळ्या निसर्गावर मालकी तर त्याचीच. मग माझे बोलणे, हिंडणे- फिरणे सर्व काही त्याच्याच पायाशी अर्पण करतो.माझी प्रत्येक कृती हि त्याच्याच प्रेरणेने झाली आहे. विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले महाराजांचे मन सतत त्याचा धावा करतेय.माझ्या गुणदोषांसकट माझा स्वीकार कर,म्हणून महाराज त्या  विठू  माऊलीला आर्ततेने हाक मारतात. महाराज  " अक्षर रुपी" वाङ्मयसेवा " अक्षर " विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला समर्पित करतात.

अर्थात माऊलीच ती. भक्ताचा भाव जाणून इच्छित फळ त्याला देतेच.संसार तापाने पोळलेल्या सामान्य जनांना हवे असेल ते सर्व ह्या विठ्ठलाची भक्ती आणि ह्या स्तोत्राचे पठण केल्यास प्राप्त होते.फक्त हवा प्रामाणिकपणा,श्रद्धा , निष्ठा. तो परमेश्वर  मग तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो.

महाराजांनी सुमारे एकशेदहा वर्षांपूर्वी रचलेले हे पांडुरंग स्तोत्र. ह्या स्तोत्राचे मनोभावे केलेले पारायण तुमच्या देहबुद्धीचा नाश करून त्या वैकुंठनायकाची भेट नक्की घडवील असा विश्वास महाराज व्यक्त करतात .

हे स्तोत्र त्यातील शब्द जिव्हाळ्यामुळे भाविकांना आकर्षित करते.दिवसभर त्यातील शब्दांचे गुंजन मनांत चालू राहते.वेदांत तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत इथे प्रगट होते. अवीट गोडीचे हे स्तोत्र  सामान्य भक्तालाही आपले वाटते.

माझ्यासारख्या प्रापंचिक गृहिणीला महाराजांचे शब्दवैभव,तत्वज्ञान,काव्याची ओघवती भाषा,त्यातील प्रसाद गुण,लालित्य सर्वच मोहात पाडते.आजही ते स्तोत्र म्हणताना नित्यनूतनच भासते.

ह्या भक्तिरसात डुंबण्यासाठी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ….

                                       पारायण हीच वारी | करा अत्यादरे निर्धारी |

                   भक्तिपताका स्कंधावरी |  घेऊनिया भाविक हो ||

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल....

 


No comments:

Post a Comment