Monday, July 20, 2020

आला श्रावण आला ... ( Ala Shravan Ala ...)

                                                                        ।। श्री शंकर ।।

आला श्रावण आला 


आषाढी एकादशीनंतर टाळ मृदुगांचें बोल आसमंतात  दुमदुमत असतांनाच गुरुपौर्णिमा साजरी होते.

जगद्गुरू व्यासांना वंदन करून, आपल्या सद्गुरुंकडे तिमिररुपी अज्ञान दूर करून ज्ञानाच्या शलाकेने जीवन उजळविण्यासाठी प्रार्थना करतो. जणू काही सद्गुरू आपल्याला पुढील मार्ग दाखवतात आणि " तमसो मा ज्योतिर्गमय " म्हणून दिव्यांच्या अमावास्येला तेजाची पूजा आपण करतो आणि मनोभावे जीवनातला अंधःकार दूर व्हावा म्हणून " दीपज्योती नमोस्तुते " अशी  प्रार्थना करतो  आणि खरोखरच दुसऱ्याच दिवसापासून  एका  उत्साही, चैतन्यमय  पर्वाची धामधूम सुरु होते. 

" रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात "... अहो तो मराठी महिन्यांचा  राजा" श्रावण "हासत- नाचत, आनंदाची लयलुट करत अवतीर्ण होतो. त्याला साथ असते ती पावसाची आणि उन -पावसाच्या खेळाची. पावसात भिजून चमचमणाऱ्या उन्हाची. आकाश आणि पृथ्वीचा सुंदर मिलाफ घडविणाऱ्या इंद्रधनूची. मनभावन हा श्रावण, प्रिय साजण हा श्रावण, अशीच भावना श्रावणाविषयी प्रत्येकाच्या मनांत असते.

  ह्या पवित्र महिन्याचा प्रत्येक दिवसच एक आगळंवेगळं महत्व घेऊन येतो. अनेक सणवार, व्रतवैकल्य, रीतिरिवाज, परंपरा ह्यांचा सुंदर मेळ  साधून तनामनाला रिझवणारा, आनंदाची उभारी देऊन पावसाळी वातावरणाने  आलेली मरगळ दूर करणारा हा नटखट श्रावण.  

श्रवण नक्षत्रांवर सुरु होणारा आणि मुख्यत्वे  शिव आराधनेसाठी समर्पित असा हा श्रावण . 


समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली. त्यातली तेरा रत्ने सर्वानी आपसांत वाटून घेतली. चौदावे हलाहाल { विष }कोण घेणार ? मग ते भगवान शंकरानी प्राशन  केले आणि त्यांच्या कंठाचा दाह होऊ लागला. तो कशानेही शमेना. मग गंगाजलाने त्यांच्यावर अभिषेक केला आणि त्यांचा दाह कमी झाला. श्रावणी सोमवारी हा अभिषेक भक्तगण शिवलिंगावर करतात. बिल्वपत्र वाहतात, शिवपूजा करतात. उपवास करून, शंकराची विविध स्तोत्रे म्हणून त्याला प्रसन्न करून घेतात. नवविवाहिता शिवामूठ वाहतात.
 

"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे  चोहीकडे, क्षणांत येते सरसर  शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे ".... 

पावसाच्या धारांनी सलज्ज पृथ्वी हिरव्यागार पाचूने वेढली जाते. हिरवे हिरवे गार गालिचे डोळ्यांना तृप्त करतात.  पाण्याच्या थेंबांनी तयार झालेल्या महिरपि मनांत मोर पिसारा फुलवतात. स्वप्नांचे पक्षी घिरट्या घालू लागतात आणि नवविवाहितांना एक नवा सूर साद घालू लागतो. सासरच्या नवीन वातावरणांत रुळतानाच  माहेरची ओढ दाटून येते 
आणि मग नागपंचमी, मंगळागौर, जिवतीपूजन अशी सणांची शृंखलाच सुरु होते. हे सर्व स्त्रीत्व जपणारे खास स्त्रियांचे सण. तळहातावरच्या मेंदीबरोबरच जीवनातले रंगही चढू लागतात आणि हा हिरवा ऋतू , ऋतू बरवा होतो. फुलं पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने निसर्गाशी जवळीक साधली जाते. त्या सुगंधाने मनातला दरवळ तृप्त होतो. सख्यांच्या सोबतीने झिम्मा फुगडी खेळली जाते. फेर धरले जातात. गोफ विणले जातात. मनमोकळे सुख दुःखाचे पदर मैत्रिणीसोबत  उलगडले जातात. 
 
मानवी नात्यांतील पूल बांधण्याचा, संवाद साधण्याचा, भावबंध जपण्याचा प्रयत्न नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने केला जातो.
 
" यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ,अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं "
हिंदुधर्मातील दशावतारातील आठवा  अवतार धर्म रक्षणासाठी श्रावण वद्य अष्टमीला मथुरेत जन्म घेतो. 
पूर्णावतार श्रीकृष्णाचा जन्म ऐन मध्यरात्री बारा वाजतां आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. भजन, कीर्तनांना उधाण येते. " कृष्ण गोविंद गोपाल  गाते चले ,मनको विषयोंके विषसे हटाते चले" अशी धून मनामनांत गुंजत राहते. दुसऱ्या दिवशी सगळे गोपजन " गोविंदा आला रे आला " म्हणून  दहीहंडीचा उत्सव थाटात  साजरा करतात. 

घरोघरी श्रावणांत सत्यनारायण पूजाही करण्याचा प्रघात आहे. शैव आणि वैष्णव पंथामध्ये एक प्रकारचा समन्वय ह्यामुळे साधला जातो. 

पावसाळी हवेमुळे पचनशक्तीला आलेलं जडत्व दूर करण्यासाठी अनेक उपवासांचे प्रयोजन ह्याच महिन्यांत आणि सणासुदीचे म्हणून विशेष गोडधोड पदार्थांची रेलचेल पण इथेच. सुग्रास भोजनाचा स्वाद अनेकांची जिव्हा तृप्त करतो. हि चव जिभेवर दीर्घ काळ रेंगाळत राहते.

भारतीय स्वातंत्र्याचा उत्सवही साधारण ह्या श्रावणाच्या आसपासच साजरा होतो. देव- देश आणि धर्माचा हातात हात घालून साजरा केलेला उत्सव आपल्या आनंदात आणखी भर घालतो. देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांना मानवंदना देऊन १५ ऑगस्ट साजरा केला जातो.  

एकंदरच सगळ्यांची मने रिझवणारा हा मधुमास. आधुनिक जीवनशैली हि खरंतर धावपळीची. आज कोणालाही कोणासाठी  वेळ नाही. निसर्ग हा तशाही परिस्थितीत स्वतःच अस्तित्व जपत स्वतः बहरत असतो आणि आजूबाजूच्या लोकांनाही आनंद देत असतो.आपलं मन प्रसन्न करतो. हा आनंद आपणही ह्या परंपरांत सामील होऊन अबाधित ठेऊ शकतो. फक्त आवश्यक असतं मनातल्या भावनांची आणि संवेदनांची जपणूक. 

उतू नको, मातु नको, घेतला वास टाकू नको, अशी शिकवण देणारी आपली भारतीय परंपरा. हि परंपरा जपली कि 
इंद्रधनूचा आसमंतातील गोफ आपल्या आयुष्यात हि सप्तरंगांची उधळण नक्कीच करेल ... 

हासरा नाचरा ,जरासा लाजरा ,श्रावण आला ,श्रावण आला... 




स्नेहा भाटवडेकर 
sneha8562@gmail.com





Wednesday, July 15, 2020

ॐ काराचा महिमा ( Omkar Mahima )

                                                           ।। श्री शंकर ।।


                                                 ॐ काराचा  महिमा


श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात " गिरमसम्येकमक्षरं "... 

गिरा म्हणजे वचन, वाणी किंवा बोलणे. वाणीचे एक अक्षर . हे अक्षर प्रत्यक्ष माझेच म्हणजे विष्णू /कृष्णाचे रूप आहे. उपनिषदे आणि गीतेमध्ये ओंकाराचे सत्वरूप उलगडून तोच परमात्मा आहे असे सांगितले आहे. 

ज्ञानेश्वर माउलींनी  कार रूपांत गणेशाची प्रचिती घेतली. शंकराला ओंकारेश्वर ह्या नावाने संबोधित करतात. 

विश्वाच्या अणुरेणूंत भरलेले आत्मतत्व वेदांनी ओंकारातच प्रतिपादित केलेले आहे. म्हणजे एकाक्षरी ब्रह्म. सर्व ब्रह्माण्डाचे सार. प्रणवाचे स्फुरण. सृष्टीचा प्रारंभ ह्या अक्षरानेच झाला. 

संपूर्ण ब्रह्माण्डात हाच नाद / ध्वनी सतत गुंजत असतो.

अ ,उ ,म ह्या तीन मात्रा आणि चंद्रकोर आणि बिंदू हि अर्धी मात्रा मिळून हा महामंत्र / बीजमंत्र  तयार होतो. 
अ हे स्थूल जगाचे प्रतीक, उ हे सूक्ष्म जगाचे प्रतीक आणि म हे कारण जगताचे प्रतीक आणि बिंदू मनाचे प्रतीक.  तीन जगांचे प्रतीक (भू, भुवः, स्व:), तीन अवस्थांचे प्रतीक (जागृत, स्वप्न, सुषुप्ती), त्रिकालाचे प्रतीक (भूत, भवत, वर्तमान) आहे.

"ॐ कार रुपी धनुष्यावर आत्मरुपी बाण चढवून परब्रहम परमेश्वरालाच लक्ष्य करावे. "असे उपनिषदात म्हटले आहे. सामगान ,मंत्रपठण,अध्ययन,ब्रह्मप्राप्ती साठी  काराचा उपयोग होतो. 

ॐ स्वयंभू  आहे. पवित्र आणि शक्तिशाली आहे. 

आपल्या संस्कृतीत आणि हिंदू धर्मात प्रणवरूपी  काराचा विशेष महिमा कथन केला आहे. मोक्ष हाच इथे अंतिम पुरुषार्थ. म्हणूनच  कार साधनेने हे ध्येय निश्चित गाठता येते. कार्यसिद्धी होते. 
त्याचे स्मरण, चिंतन, ध्यान, जप करणारा मनुष्य परमात्म्याची प्राप्ती करतो. त्याच्या रुपांत मिसळून जातो.
 
ध्यान करतांना परमतत्वाचे प्रतीक म्हणून ॐचा वापर करतात

 कार जपाचा विशेष फायदा होतो. जपयज्ञामुळे सर्व दोषांपासून मुक्ती होते. तो सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. 

 कारात जीभ आणि ओठांची हालचाल होत नाहीं. त्याचा उच्चार गळ्यातून होतो आणि संबंध थेट हृदयाशी असतो. त्यामुळे ईश्वराशी अनुसंधान लवकर साधले जाते. एकांत स्थळी, सहजासनात बसून वैखरी वाणीने प्रणवाचा दीर्घ उच्चार करावा. हा उच्चार कानांनी ऐकावा. मनाने चिंतन करावे. अशा तीन गोष्टी साध्य होतात. जपाचे अनुष्ठान केल्यामुळे शोक, दुःख नाहीसे होते. आसक्तीचा नाश होतो. संकल्प विकल्पातील दोलायमान अवस्था नाहीशी होऊन  मन शांत स्थिर होते. आत्मस्फुरण उरते. 

वेदांनी जो नाममंत्र शोधून काढला त्याचा  हा राजा आहे. नुसत्या ॐ व्यतिरिक्त ॐ नमः शिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय अश्या मंत्राचेही पठण करता येते. गायत्री मंत्र, महामृत्युन्जय मंत्र म्हणताना प्रारंभी  म्हणतात. अनेक स्तोत्रांची सुरवात  ने करतात. 

संगीत हा  ह्या दिव्य मूलध्वनीचा अविष्कार आहे. ह्या नादब्रह्माचा परिणाम माणसाच्या मनावर, मज्जातंतू वर आणि अंतर्मनावरहि होतो. त्यामुळे आत्म्याचे संगीत ऐकू येते. आनंदप्राप्ती होते. त्यामुळे संगीत साधनेतही  काराचा अंतर्भाव करतात. 

शरीरस्वास्थ्यासाठी आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हाही ॐ चा उच्चार करतो.

स्त्रियांनी मात्र हि ओंकार साधना करू नये असा संकेत आहे. त्याच्या कंपनांचे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होतात.
 
असा हा . आपले दैनंदिन जीवन ओंकारमय आहे. त्याच्या साधनेने आपणा सर्वांना इप्सित यश प्राप्त होवो हीच प्रार्थना ... 

संदर्भ : गीतासागर ( विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर )


सौ .स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई ४०००५७
ई मेल : sneha8562@gmail.com

 





Sunday, July 5, 2020

भक्ति मार्ग प्रणेतारं ( Bhakti Marg Pranetaram... )

                                                                       Image result for swami vardanand bharti image
                                                                               ।। श्री शंकर ।।

                                                     
भक्ति मार्ग प्रणेतारं 





भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।

आज गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंना वंदन करून हि" अक्षर सेवा " त्यांच्या चरणाशी अर्पण करते. 

परमेश्वर प्राप्तीचे चार मार्ग सांगितले आहेत : कर्म,भक्ती,ज्ञान ,योग ... 
भक्तिमार्ग हा आपल्या सारख्या सर्वसामान्य साधकांसाठी सर्वांत सोपा मार्ग
.संतकवि दासगणु म .म्हणतात :
                         कलियुगाचे ठायीं । भक्तीस प्राधान्य आहे पाहीं ।
                         या भक्तीनेंच अवघे कांहीं । होय प्राप्त मानवा ।।
दासबोधांत समर्थ रामदास स्वामींनी भक्तिमार्गावर विस्तृत भाष्य केले आहे. भक्ती म्हणजे काय आणि विविध मार्गांचा अवलंब करून भक्ती कशी करावी ?

श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं । अर्चनं वंदनं दास्यम सांख्यमात्मनिवेदनं ।।

नवविधा भक्तीचे हे नऊ प्रकार ज्यायोगे परमेश्वराची भक्ती करून त्याला आपलेसे करून घेता येते. 

आमचे सद्गुरु अप्पा म्हणजेच प. पू . स्वामी वरदानंद  भारती ( पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले ) हे ह्या नवविधा भक्तीच्या आचरणातील आमचे आदर्श.चारही आश्रमांत त्यांनी  यथार्थपणे वास्तव्य केले .  भक्तिमार्गाचा अवलंब  केला.त्यांच्या उत्कट भक्तीने   प्रत्यक्ष  वरद  नारायणाने त्यांना दर्शन दिले.  ,शेवटी स्वेच्छा समाधी घेऊन जीवन कृतार्थ केले. जे फारच विरळा असते आणि त्यांच्या  शिष्य परिवाराला अनुकरणीय मार्ग दाखविला. 

अप्पांचा नवविधा भक्ती सोपान थोडक्यांत मांडायचा हा प्रयत्न. 
१) श्रवण भक्ति  : 
                        नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे  महिमे 
                         नाना दानांचे  महिमे । ऐकत जावे ।।
वयाच्या विशीत असतांना अप्पा नास्तिक होते . दासगणु  महाराजांशी सनातन धर्मावर अनेक वाद विवाद होत. पुढे मात्र त्यांचे मतपरिवर्तन झाले. विचारांची आणि वाचनाची दिशा बदलली. दादांनाच त्यांनी गुरुस्थानी मानले. पुढे 
आजोबा ते प्रत्यक्ष सद्गुरू हे दादांशी ( प.पू. दासगणू महाराज ) असलेले आपुलकीचे आणि सर्वस्वाचे नाते दृढ झाले.  अप्पानी दादांची अनेक रसाळ कीर्तने ऐकली. तरुण वयातच त्यांना श्रवण ,वाचनाचा नाद लागला. अप्पांचा ग्रंथसंग्रह सुद्धा प्रचंड मोठा होता. आणि प्रत्येक ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता. 
पारमार्थिक वाटचालीत वैचारिक बैठक पक्की  होण्याची  श्रवण भक्ति हि पहिली पण महत्वाची पायरी. 
 स्वा. सावरकर ह्यांच्या  विचारांचा,व्याख्यानांचा  पगडा त्यांच्या तरुण मनावर पडला  आणि देशप्रेमाची तळमळ त्यांना लागली.
  
२) कीर्तन भक्ति : 
                         सगुण  हरिकथा करावी । भग्वत्कीर्ती वाढवावी 
                         अखंड वैखरी वदवावी । यथायोग्य ।।
अध्यात्म मार्गांत ईश्वराचे भक्ती युक्त कीर्तन करणे याइतके महत्वाचे कार्य दुसरे नाही असे अप्पा म्हणत. 
तरुण वयांत अप्पानी कीर्तने करायला सुरवात केली. कीर्तनांत भक्तिरसाला उधाण येई. निरूपणात ते राजकीय ,सामाजिक,नैतिक ,धार्मिक,अध्यात्मिक विषयांवर परखड विवेचन करीत. 
अप्पांची तत्त्वमीमांसेची बैठक पक्की असल्यामुळे त्यांची कीर्तने विद्वत्ता प्रचुर असत. दादांची आख्याने ते करीतच पण लोकमान्य टिळक,राजा दाहीर अशी अनेक कीर्तने स्वतः रचून तीन चार तास श्रोत्यांना ते ह्या भक्तिरसात चिंब भिजवून टाकत आणि स्वतः हि हरिस्मरणांत एकरूप होत असत. 
                           भगवंतांस  कीर्तन प्रिय । कीर्तने समाधान होय 
                            बहुत जनासी उपाय     । हरिकीर्तनें कलियुगी ।। 
ह्याचा प्रत्यय त्यांच्या कीर्तनभक्तिने दिला. 
३) विष्णोस्मरणं :
                            स्मरण देवाचे करावे । अखंड नाम जपत जावे 
                            नामस्मरणाने पावावे । समाधान  ।।
नामस्मरण करून परमेश्वराचे स्तवन करावे अशी हि म्हटलं तर भक्तिमार्गातील सहज सोपी पायरी. पण पूर्व संचित असेल तरच हे साधते हा आपला अनुभव." भक्तीचें मुख्य लक्षण । श्रीहरीचें नामस्मरण ।।"
विष्णुसहस्रनाम स्तोत्रावर अप्पांचे अतोनात प्रेम. सतत मुखांत हे स्तोत्र असे.  विष्णुसहस्र नामाचे महत्व ओळखून त्याचे अखंड  पाठ केले. त्यांनी स्वतः नमूद केले आहे कि विष्णुसहस्र नाम स्तोत्राला त्यांच्या साधनेत प्राधान्य होते आणि  केवळ ह्या स्तोत्र पठणानेच  त्यांना त्यांचे ध्येय गाठता आले. 
वेळोवेळी त्यांच्या शिष्य परिवारालाही ह्या स्तोत्राचे  दिवसांतून १२ पाठ करावेत  हाच उपदेश मुख्यत्वाने  केला. 
४) पादसेवन  :
                          पादसेवन तेचि जाणावे । कायावाचा मनोभावे 
                           सद्गुरूंचे पाय सेवावे    । सद्गती कारणे  ।।
सद्गुरुपदी अनन्यपण असेल तरच हि भक्ती साधते. गुरूंचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याप्रमाणे यथाशक्ती आचरण म्हणजेच  पादसेवन. परमेश्वर आणि सद्गुरू ह्यांच्यासाठी तन,मन,धन वेचणे हीच खरी सेवा.  . 
प.पु. दासगणु  महाराज हेच अप्पांचे गुरु. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच अप्पांनी परमार्थ मार्गातील प्रवास केला. त्यांच्या वरील  निष्ठेमुळेच परमार्थ मार्गातील अत्त्युच्च शिखर त्यांना गाठता आले.छात्रबोध ह्या प्रकरणांत दादांनी अप्पाना घडविण्यासाठी उपदेश केलेला आहे. जो सर्वानाच ह्या परमार्थ वाटचालीत उपयुक्त आहे. 
दादांविषयी अप्पा  म्हणतात ... सन्मार्गदीपकं नाथं प्रसन्न पावनं शुभं । अनंत वरदं नित्यं वंदे दासगणूम गुरुं ... 
५) अर्चन भक्ति : 
                          कुळधर्म सोडू नये ।उत्तम अथवा मध्यम करीत जावे ।।
अप्पांनी वैयक्तिक कौटुंबिक परंपरा , कुळधर्म ,कुळाचाराचे यथायोग्य पालन केले. वैदिक ब्राह्मणांना योग्य दक्षिणा देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार केला.  इतकेच नाही तर दासगणू परिवारात त्यांनी अनेक उत्सव ,महोत्सव उत्साहाने सुरु केले आणि उत्तम नियोजनाने ते यथासांगपणे  पार पाडले .
साधकावस्थेत स्वतःच्या परोत्कर्षासाठी जे जे आवश्यक ते सर्व त्यांनी आचरिले. अनेक तीर्थयात्रा केल्या. आसेतु हिमाचल भारतभ्रमण केलेच,नेपाळला जाऊन पशुपतिनाथाचे दर्शन घेतले.गंगा आणि गोदावरी ह्या नद्यांना त्यांनी मातेसमान मानले. त्यांच्या तटाकी वास्तव्य केले. गोदा  परिक्रमा केली.  सिंधू नदीविषयी त्यांना आत्यंतिक जिव्हाळा होता. सिंधुस्नानाने ते अतिशय हर्षित  झाले.मानस सरोवराची खडतर यात्रा केली. आत्यंतिक प्रेमाने भारतमातेचे दर्शन घेतले. 
                          नाना तीर्थक्षेत्रांस जावे । तेथे त्या देवाचे पूजन करावे 
                            नाना उपचार अर्चावे । परमेश्वरासी  ।।

६) वंदन भक्ति  :
                             करावे देवासी नमन । संत साधू सज्जन नमस्कारित जावे ।।
संत सत्पुरुषांविषयी विमम्र भाव अप्पांच्या अंतःकरणात सदैव होता. हा भाव असला कि नमस्काराचे महत्व पटते.परमेश्वराच्या चरणाशी सदैव नत तर ते असतंच पण  आपल्या पेक्षा वयाने, ज्ञानाने जेष्ठ व्यक्तींना वंदन करण्यात ,लिन होण्यात ,त्यांचे आशीर्वाद घेण्यास अप्पा नेहमीच उत्सुक असत.अतिथीं विषयी आत्यंतिक आदर त्यांच्या मनांत असे .  हिमालय यात्रेत अशा अनेक साधू सत्पुरुषांना वेळोवेळी मुद्दाम  भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वंदन अप्पानी केलेले आहे. फलाहारी बाबांचा उल्लेख त्यांनी अनेक ठिकाणी केला आहे. नमस्कार श्रेष्ठ आहे आणि नमस्काराने वरिष्ठाना आपलेसे करून घेता येते हे ते जाणून होते. 
७) दास्य भक्ति : 
                           ऐसे दास्य करावे देवाचे । येणेंचि प्रकारे सद्गुरूंचे ।।
अप्पा नेहमीच स्वतःचा उल्लेख गणूदासदास असा करत असत. वरद  नारायण आणि दादा ह्यांची दास्यत्व पत्करून उत्कट सेवा त्यांनी केली. दादांच्या निधनानंतर गोरट्याला आश्रमाची स्थापना केली आणि त्यांचे कार्य पुढे चालू ठेवलेच आणि ते वृद्धिंगत केले.दासगणु प्रतिष्ठान स्थापन केले.  आजही ती परंपरा टिकून आहे ह्याचे श्रेय अर्थातच अप्पांच्या योग्य  नियोजनात आहे. 
८)  सख्य भक्ति :
                           देवाच्या सख्यत्वाकारणे । आपुले सौख्य सोडून देणे 
                            अनन्य जीवेंप्राणें । शरीर तेही वेचावे ।।
अप्पानी स्वतःचा प्रपंच नेटका केला.त्यांच्या गरजा  अतिशय कमी होत्या. चैनीला स्थान नव्हतें .  प्रपंचातील सर्व जबाबदारी पार पाडल्यावर त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला.सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला. उत्तरकाशीला गंगा नदीच्या तटावर वास्तव्य केले." पडाव्या जिवलगांसी तुटि " ह्या उक्तीनुसार एकांतवासात राहून पूर्ण वेळ त्यांनी भगवद्भभजन पूजनात मन रमविले .अंतरंगात परमेश्वराविषयी निस्सीम ओढ होती. वरद  नारायणाने त्यांना दर्शन दिले .  त्यांचे जीवन कृतार्थ झाले.  पुढे अप्पानी संन्यास  दीक्षा सुद्धा घेतली. 
                             देवासी जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावे तेणे रीती 
                              येणे करता भगवंती । सख्य घडे नेमस्त ।।
इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांच्या सख्याची  तीव्रतेने आठवण येते. वरद नारायणाशी अप्पांची अशीच सख्य भक्ती दृढ झाली होती.  
९) आत्मनिवेदन : 
                              आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी । नवविधामध्ये विशेष भक्ती नववी ।।
हि भक्तीची शेवटची पायरी आणि अंतिम ठिकाण. हि भक्ति घडली तर जन्म - मरण चुकते. अढळ ,अविनाशी अशी सायुज्य मुक्ती प्राप्त होते. 
अप्पा नारायणाशी मनांतील सर्व भाव व्यक्त करीत.त्याचाशी संवाद साधीत .  सर्व वैभव भोगून आता त्यांचे डोळे नारायणाकडे लागले आहेत. त्याने त्यांना हृदयाशी धरावे म्हणून त्यांचा जीव व्याकुळ जाहला आहे. अशावेळी ते आर्तपणे नारायणाला हाक मारीत आहेत. आता चित्त जडो सदा तव पदी हे नाथ नारायणा .... 
आपला देह व्याधीने क्षीण झाला आहे ह्याची जाणीव होताच त्यांनी नारायणाला प्रार्थना करून देह्त्यागासाठी अनुमती मागितली. 
अप्पानी अनेक उत्तमोत्तम ग्रंथ साधकांना मार्गदर्शन व्हावे ह्या हेतूने लिहिले.अखेरच्या काळांत  त्यांच्या शिष्य परिवाराला एका पत्राद्वारे बोध केला.. 
मी म्हणजे ना शरीर । मी मद -ग्रंथांचा संभार 
त्याचे वाचन चिंतन । यथाशक्ती आचरण  ।।
शेवटच्या क्षणापर्यंत अप्पानी स्वतःचा देह धर्मकार्यासाठी वेचला,राष्ट्रभक्तिही साधली  आणि समाधी अवस्था सिद्ध केली. हा प्रसंग अलौकिक होता. जो साधणे हे केवळ विभूतिमत्वांनाच साधते. 
आधी केले मग सांगितले ह्या उक्तीनुसार स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजविला . साधकापासून ते साध्यापर्यंत प्रवास करून मोक्षत्वापर्यंत कसे पोचता येते ह्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे अप्पांचे जीवन चरित्र. 
ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ..मी सद्गुरुंना मागणे मागते ... 
आता पदी एक विनती ... 
तुम्ही दाविल्या ,पथी  त्या भल्या  अनुसरुनिया । जडावे चित्त हरीपायी  रहावे  सदा तुम्ही हृदयीं .... 

Image result for swami vardanand bharti image