Sunday, August 15, 2021

मधुर - माधुरी ( Madhur - Madhuri )

।। श्री शंकर ।। 

मधुर  - माधुरी 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. भारतीय मनामनांत स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळांतील कडू गोड आठवणी ह्या निमित्ताने जाग्या होत असतील. अनेक व्यक्तींच्या बलिदानाने देशाला मिळालेले  हे स्वातंत्र्य  ७५ वर्षं अबाधित ठेवण्यात भारतीय लष्कराचे महत्वाचे योगदान आहे.  ही  गोष्ट अतिशय अवघड. आपले भारतीय जवान कर्तव्यपूर्ती साठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. ही अवघड जबाबदारी पार पाडताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. घरादाराचा त्याग करावा लागतो. पण देशप्रेमाच्या भावनेने हे कर्तव्य ते लीलया पार पाडतात . 

भारतीय वीरांबरोबरच अनेक वीरांगना  सैन्यांत त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःची प्रापंचिक कर्तव्ये पार पाडत असतानाच,देशसेवेचे व्रत ही मोठ्या जबाबदारीने निभावून नेत  आहेत. आपल्या सर्वासाठी ही कौतुकाची अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब  आहे.

अशाच एका कर्तृत्वशालीन लष्करी उच्च पदाधिकारी महिलेचा हा अल्प परिचय ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्याचा हा छोटासा  प्रयत्न. 

आधी AFMC मधे वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सेनेचे खडतर प्रशिक्षण, पदव्युत्तर शिक्षण घेऊन  M .D . ( बालरोगतज्ञ ) ही  पदवी संपादन. मग Nephrology तील  विशेष प्रशिक्षणासाठी परदेशांत वास्तव्य.  हा दीर्घ, कठीण प्रवास अतिशय जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केला. त्याच कॉलेज मधे विद्यार्थी प्रिय  प्राध्यापक , संशोधक, डीन हा प्रवास आणि मग लेफ्टनंट जनरल ह्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास. गेली ४० वर्षं सातत्याने हा खडतर प्रवास करूनही चेहेऱ्यावर असलेले मधुर हास्य तसेच जपणाऱ्या.  आज सेनेतून निवृत्त झाल्यावरही पुढच्या कारकिर्दीसाठी तेव्हढ्याच उत्साहाने सज्ज असणाऱ्या नावाप्रमाणेच मधु -मधुर   ले. जनरल माधुरी कानिटकरांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.  ह्या सर्वोच्च पदापर्यंत पोचणाऱ्या त्या भारतांतील तिसऱ्या महिला तर महाराष्ट्रातील हा मान  मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. त्यांना मिळालेले तीन स्टार्स दिमाखात मिरवणाऱ्या, ह्या माधुरीताईंच्या कर्तृत्वाने आकाशातील स्टार्स चे तेजही फिके पडावे.  

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नुकत्याच आभासी माध्यमांतून झालेल्या एका गप्पांच्या मैफिलीत ह्या "तेजस्विनी" ला जवळून ऐकता आले. तिचे विचार ,अनुभवविश्व समजून घेता  आले. तिच्या हिंमतीचे , जिद्दीचे दर्शन घडले.

 आपल्या आजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील आजीच्या  कर्तृत्वाचा त्या अगदी अभिमानाने उल्लेख करतात. 

ह्या गप्पांच्या निमित्ताने त्यांच्या सहजीवनाचा, मातृत्वाचा, कर्तव्यकठोर लष्करी अधिकाराचा, एक शिक्षिका  म्हणून विद्यार्थ्यांबरोबर असलेल्या नात्याचा उलगडत गेलेला प्रवास खूप काही शिकवून गेला. हुशारी,सौन्दर्य,शालीनता ह्या मृदू व्यक्तिमत्वामागे असलेला एक अतिशय धाडसी, सेवाभावी, देशभक्ताचा चेहरा, ह्या दोन्ही गोष्टीचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वाला खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेला. उच्च पदावर असूनही पाय भक्कमपणे जमिनीवर रोवलेले, दिलखुलास आणि सदाबहार अशा ह्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे प्रकाशमान झाले. ह्या यंग आजीच्या स्मितहास्याने गप्पांचा सर्व माहोल अगदी जिवंत झाला. 

त्यांच्या बरोबर झालेल्या संवादातून त्यांचे फुललेले परिपक्व सहजीवन खूप काही सांगून गेले. आर्मी मधेच त्यांचे पती कार्यरत असूनही दोघांची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे फार कमी काळ एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. पण राजीवजींच्या पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे, प्रोत्साहनामुळे त्याही विकसित होत राहिल्या आणि राजीवजींच्या पावलावर पाऊल  ठेऊन ले. जनरल झाल्या. त्यावेळी  राजीवजींची लष्करी कॅप  परिधान करताना झालेला आनंद आत्ताही  त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत होता. राजीवजीं विषयी बोलताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारे स्नेहभाव त्यांच्या नात्यातील मार्दवाची साक्ष देतात. भारतीय सैन्यात ह्या पदावर पोचलेले हे एकमेव जोडपे. त्यांचे साहचर्य आम्हांला आदर्शभूत असणारे  .

जीवनांत अनेक कठीण प्रसंग आले पण आहे त्या परिस्थितीचा हसत हसत स्वीकार करायच्या वृत्तीमुळे त्यांचे निर्मळ हसू कायम फुललेले राहिले.जिथे पोस्टिंग असेल तिथे नवनवीन कलागुण त्या आत्मसात करत राहिल्या. मग ते नृत्य असेल.सायकलिंग किंवा horse riding . सुखोई विमानातून प्रवास असेल. एकदा त्या जिद्दीला पेटल्या कि मग माघार नाही.   मुलांना त्यांच्या वाढत्या वयांत पाहिजे तेव्हा वेळ देता आला नाही हे सांगताना त्यांच्यातली माता संवेदनाशील होते.पण त्याच वेळी लष्करांतील जोडल्या गेलेल्या विस्तारित परिवाराचा , त्यांच्या सहकार्याचा  त्या आवर्जून उल्लेखही  करतात. किती,किती गोष्टी ? त्यांची रोमहर्षक  जीवनकहाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.

कोणत्याही उच्च ध्येयाप्रती तुमच्या मनांत आस्था असेल तर जिद्दीने आणि चिकाटीने तुम्ही त्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकता हा आत्मविश्वास माधुरीताईंमुळे आपल्या मनांत जागृत होतो.  

मनात येतं ,आपण खरंतर किती आरामशीर ,सुरक्षित आयुष्य जगतो ! तरीही परिस्थिति वर सतत करवादत राहतो. आनंदाचे क्षण उपभोगायचे सोडूनआपलेच दुःख कुरवाळत बसतो. अशा कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट नजरेसमोर ठेवून, एखादे पाऊल  तरीआपल्या देशाप्रती  पुढे पडले तर ह्या महिलांच्या कार्याला आमच्या सिव्हिलिअन्स कडून केलेला खरा  सलाम असेल. 

मॅडम आता MUHS ( Maharashtra University of Health Science ) ह्या संस्थेच्या डीन म्हणून सूत्रे हाती घेत आहेत. ही "सौदामिनी" ज्या क्षेत्रांत पाय  ठेवेल तिथे विजेसारखी तळपेल ह्यांत शंका नाही. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी अनंत शुभेच्छा .


Courtsey : डॉ .उपेंद्र किंजवडेकर ( M.D.Peditrician )


स्नेहा भाटवडेकर ( snaha8562@gmail.com)

१५ ऑगस्ट २०२१