Sunday, December 20, 2020

कृष्णमाय ( गीताव्रती सुलभताई फळणीकर )

                                                                          ।। श्री शंकर ।।             

                                                                                                                   गीताजयंती २५/१२/२०२०


                                                                       कृष्णमाय  


" आधी आई मधे मी कृष्णाला पाहत होते, आता मला त्या कृष्णामधे माझ्या आईचाच भास होतो " भावुक होऊन सुषमाताई माझ्या जवळ त्यांच्या आईचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होत्या. सुषमाताई पुढे म्हणाल्या "आई गेली आणि हा दुःखावेग सहन करण कठीण  झालं. पण एकाएकी एक गुपित मला समजलं आणि माझं मन मोकळं झालं. कृष्ण रूपांत पूर्णपणे एकरूप झालेली आई आता कृष्ण रूपाने आमच्या सर्वांच्या पाठीशी उभी आहे. आईच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीत मला जीवनाचा खरा अर्थ उलगडला. गीता हि अनेकांना जीवनाधार देते ".  

सुषमाताईंची आई गीताव्रती होती. संपूर्ण आयुष्य त्यांनी गीतेला वाहून घेतले होते. 

" सुलभाताई  फळणीकर "......माहेरच्या प्रभुदेसाई. कोकणात राजापूर जवळ तळवडे  येथे राहणाऱ्या.  त्यांचा जन्म १९ ऑगस्ट, १९२७ चा. शालेय शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंत. सुरवातीला काही वर्षे त्यांच्या मोठ्या बहिणीकडे शिपोशीला राहत होत्या आणि नंतर मामांकडे .  मामांचा त्यांना मोठा आधार लाभला. मामा मुंबईत दादरला राहत होते. अशा रितीने सुलभाताई मुंबईत दाखल झाल्या. 

लग्नानंतर सुलभाताई बॉम्बे सेंट्रलला रिझर्व्ह बँक स्टाफ कॉलनीत  स्थायिक झाल्या. संसारात स्थिरस्थावर होऊन मुले मोठी झाल्यावर त्या गिरगाव येथील ब्राह्मण सभेच्या सभासद झाल्या. सुलभाताईंचा पिंड मुळातच खूप हौशी. उत्साहाचा झरा त्यांच्यात कायमच वाहत असे. त्यामुळेच ब्राह्मण सभेच्या विविध स्पर्धात त्यांचा सहभाग असायचा. विविध पाककला स्पर्धात त्या भाग घेत. शिवणकाम करताकरता त्यांना बाहुल्या बनवण्याचा छंद जडला. ह्या निमित्ताने दूरदर्शन वर त्यांची मुलाखत प्रक्षेपित झाली होती. 

संसारी जीवनांत विविध छंद जोपासत असतानाच त्यांना भगवद्गीतेच्या पठणाचा छंद जडला. मैत्रिणीबरोबर त्या ललिताबाई गोडबोले ह्यांच्याकडे जाऊन गीतेची संथा घेऊ लागल्या. त्यासुमाराला त्यांचे वय होते ४५. तेव्हा त्यांना गीतेचा ध्यास लागला तो अगदी अखेरचा  श्वास घेईपर्यंत कायम होता.संपूर्ण गीता त्यांना पाठ होती.  गीतेच्या विविध  पाठांतर स्पर्धात त्या भाग घेत आणि त्यांचे  स्पष्ट शब्दोचार, म्हणण्याची पद्धत आणि गीतेला साजेसे त्यांचे सोज्वळ रूप ह्याची मोहिनी परीक्षकांवर न पडली तरच नवल. सलग तीन वर्ष ह्या स्पर्धेत बक्षिस म्हणून मिळालेली ट्रॉफी, म्हणजेच अर्जुनाचे सारथ्य करताना, गीतेचा उपदेश करताना रथारूढ असलेली श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या घरात विराजमान होती . मुंबईत अनेक ठिकाणी तसेच पुण्यात  गीतेच्या स्पर्धेच्या निमित्ताने जाऊन त्या बक्षिस घेऊन येत असत. यजमानांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता आणि त्यांची हि आवड जोपासायला कुटुंबातील सभासद तत्पर असत.आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा गीतेचा वारसा पुढे चालवत आहेत.त्यांची कन्या श्रीमती इला जठार ह्याही आई प्रमाणेच विविध कलांमध्ये प्रवीण आहेत.   

यजमान निवृत्त झाले आणि कायमस्वरूपी सुलभाताई  पार्ल्यात " स्नेहधारा  " मध्ये राहायला आल्या. स्नेहधारातील स्नेह त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वात उतरला आणि त्यांचे जीवन अधिक बहरले. अनेक जणांना त्यांनी  हसत हसत गीता शिकवली. कोणी गीता शिकायची इच्छा प्रकट केली कि बाई अगदी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मनापासून शिकवीत. पार्ले टिळक शाळेतील मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. हे सर्व अगदी आनंदाने आणि निरपेक्षपणे. कोणताही मोबदला न घेता. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन" उत्तम वरिष्ठ नागरिक " ( Best Senior Citizen ) हा पुरस्कार त्यांना मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातर्फे देण्यात आला. त्यावेळचे तत्कालीन आयुक्त श्री. शरद काळे ह्यांनी बाईंच्या निःस्वार्थी  कार्याचा खूप गौरव केला. शालेय शिक्षण कमी आहे, म्हणून कुठेही मागे न राहता बाईंनी धडाडीने, आत्मविश्वासाने गीता प्रसाराचे महनीय कार्य केले ह्याचे त्यांनी कौतुक केले. 


पार्ल्यातील नामांकित जुनी संस्था म्हणजे " टिळक मंदिर ". ह्या संस्थेत त्यांनी गीतापठणाचे वर्ग सुरु केले. अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने चालू होता. साधी नऊवारी साडी, कपाळावर मोठे कुंकू आणि गळ्यात   काळ्या मण्यांची पोत. दर शनिवारी बरोबर पाच वाजता बाईची  प्रसन्नवदना  मूर्ती क्लास मध्ये हजार झाली कि वेगळेच चैतन्य प्रगट होत असे. सुषमाताईंशी बोलताना त्या म्हणाल्या " कृष्ण आपली वाट बघत असतो आणि आपल्याला मार्ग दाखवत असतो ". ह्या त्यांच्या शब्दांचा प्रत्यय म्हणजेच बाईंशी झालेली माझी भेट. त्यांच्यामुळेच मी तिशीतच गीता शिकले आणि आजही त्यांची हि शिकवण मला जीवनात मिळालेली  मोठी  ठेव आहे असे मी समजते .  बाईंच्या मृदू ,निगर्वी  स्वभावाची, साधेपणाची, त्यांच्या गीता प्रेमाची माझ्या  मनावर मोहिनी कायम आहे. रोज गीता वाचताना मला बाईंची खूप आठवण  येते. 

गेले काही वर्षे बाई आजारी आहेत, उठू  शकत नाही असे ऐकून होते. दुखण्याने त्या त्रस्त  होत्या कंटाळला होत्या. पण मुखात , कानात आणि मनांत सतत गीताचं होती. अनेक दिवसात त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही. मध्यंतरी  सुषमाताईकडून  बातमी समजली आणि मन बेचैन झाले. १५ ऑगस्ट २०२०, स्वातंत्र्यदिन आणि अजा  एकादशीच्या दिवशीच बाई  देहबंधनातून स्वतंत्र होऊन कृष्ण रूपात एकरूप झाल्या. 

गीताव्रती सुलभाताई नुसत्याच गीता शिकवत नव्हत्या तर गीता प्रत्यक्ष जगत होत्या. मुक्तहस्ते हे देणं समाजात वाटून स्वतःबरोबर दुसर्यांनाही आनंद देत होत्या. सदोदित प्रसन्न राहून, हसतमुखाने माणसांना जोडून ठेवत होत्या. अशा काही व्यक्तींच्या कार्यामुळेच समाजधारणा होत असते. समाजाचे उन्नयन होते. 

गीतेतील एक श्लोक त्यांच्या कार्याची  ओळख करून द्यायला पुरेसा आहे. 

                             कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफल  हेतुर्भूर्मा  ते संगोSस्त्व कर्मणी ।। 

आपल्या कामाची कोणतीही वाच्यता न करता ,फळाची अपेक्षा न ठेवता कार्यरत असणारी जुनी- जाणती पिढी स्वतःच्या पाऊलखुणा पायवाटेवर ठसवत अस्तंगत होत आहे. आज प्रत्येक गोष्ट सोशल  मीडियावर शेअर  करणाऱ्या भावी पिढीला ह्या पिढीकडून खूप शिकण्यासारखे आहे. 

बाई !! अखेरच्या दिवसात तुमची भेट झाली नाही तरी हि शब्दरूपी भेट तुमच्या पर्यंत पोचवावी म्हणून मी  लिहिती झाले.गीताजयंतीच्या निमित्ताने  श्रद्धांजली अर्पण करून तुमच्या कार्याची थोडक्यात ओळख करून द्यायचा हा अल्पसा प्रयत्न.  टिळकमंदिरात अनेक वर्षे मी तुमच्यासोबत संपूर्ण १८ अध्याय दर एकादशी आणि गीताजयंतीला म्हणत आले आहे. मी तो परिपाठ आजही चालू ठेवलाय बाई. आणि हो ! तुमचे कार्य थोडक्या अंशाने का होईना सुरु ठेवलेय.   
हे सगळं जरी असलं तरी संपूर्ण गीता कंठस्थ व्हावी हे माझं स्वप्नं आहे पण आजही ते पुरे करू शकले नाही. तुमच्या आशीर्वादाने माझं हे स्वप्न पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. 

श्रीकृष्णार्पणमस्तु .... 


सौ .. स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com





Saturday, December 12, 2020

Gruha Saukhya (गृहसौख्य )......

                                                                       ।। श्री  शंकर  ।।

गृहसौख्य 

कॅलेंडर वर्ष  २०२० मध्ये तुम्हाला अनपेक्षित  गृहसौख्याचा लाभ होणार आहे असे कोणी ज्योतिषाने सांगितले  असते तर तुम्ही विश्वास ठेवला असता का ? अहो, आपल्या वास्तूच्या चार भिंतींचे महत्व किती अनन्य साधारण आहे  हे कळावं, म्हणूनच करोना  विषाणूचा फ़ैलाव एवढ्या वेगाने झाला असावा. ह्या साथीने  संपूर्ण जग हादरलं. स्तब्ध झालं. ह्या संकटाचा सामना करण्यासाठी सुरवातीला काही महिने स्वतःच्या घरीच राहा. अगदी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा संदेश अगदी पंतप्रधानांपासून अनेकांनी  दिला. आपापल्या घरामध्येच मग सर्वजण बंदिवान झाले. ऑफिसच्या कामापासून  शक्य  तेव्हढे  सर्व जीवनव्यवहार  घरातूनच व्हायला सुरवात झाली . 


सुरवातीला मर्यादित  काळापुरताच lockdown असेल असं वाटत असताना हा कालावधी  खूप वाढत गेला. त्यामुळे वास्तूचे सुख आम्ही अनुभवले आणि आमच्या सहवासाने वास्तू  आनंदीत झाली. घराला घरपण देणारी सर्व माणसे पूर्ण वेळ घरातच होती ना? ह्या सर्व काळांत वास्तूचं अंतरंग अनुभवलं. ऑफिसच्या धावपळीमुळे घरातील वास्तव्य अनुभवता येत नव्हते ह्या काळांत ते उपभोगता आले.                                                                                                                                           
भरपूर वेळ मिळाल्यामुळे  स्वैपाकघरांत अनेकानेक प्रयोग करून बघितले. बैठकीच्या खोलीचा वापर तर फिरत्या रंगमंचासारखा झाला. ऑफिसचे काम ,मिटींग्स ,घरच्या मंडळींसोबत गप्पाटप्पा तर कधी योगासने, व्यायाम, शतपावली हाच हॉल कधी नाटकाचा रंगमंच तर कधी सिनेमा हॉल. हळूहळू ऑनलाईन कार्यक्रम सुरु झाले. मग  गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वादही  घेतला. भजन, कीर्तन रसांत मनसोक्त डुंबलो. 

गुढीपाडव्यापासून सुरु होणारे अनेक सण घरातंच  साजरे झाले. रामनवमीला बारा तास अखंड रामनामाचा नाद  ह्याच वास्तूत घुमला. अनेक स्तोत्रांच्या पठणाने वास्तूचेही कान तृप्त झाले. घरातच मंदिराचा अनुभव घेतला. ह्या सगळ्यांत वेळ कसा तो पुरतच नव्हता.

मनातल्या भावना व्यक्त करण्याची प्रेरणा मला माझ्या वास्तुतच मिळाली आणि त्यानुसार ब्लॉग लिहिणे चालू झाले.  Bucket list मधील अनेक स्वप्नांची पूर्तता अशा रितीने  ह्या काळात झाली. 

मुंबई सारख्या शहरांत एवढी  असीम शान्तता प्रथमच अनुभवायला  मिळाली. स्वतःच्या मनांत डोकावून बघायला हाच उत्तम काळ होता. " If you cannot go outside, go inside " ह्या tagline ने लक्ष वेधून घेतले. वाचन, मनन, चिंतन  ह्यासाठी वेळ देता आला. भीषण आपत्तीच्या काळांत  मानसिक बळ मिळाले ते ह्यामुळेच.
 
मनांत दाटलेले कारुण्य मोकळे झाले ह्याच वास्तूत. सकाळी गच्चीवर फेऱ्या मारतांना चराचर  उजळवून टाकणारा सूर्यप्रकाश मनावर आलेले निराशेचे मळभ क्षणार्धात दूर करत असे. घराभोवतालचा निसर्ग सुद्धा मनाची मरगळ घालवून मनाच्या प्रसन्नतेत भर घाले.    

शरीर आणि मनाला विसावा देणारं हे आपलं घर. बाहेरच्या कठीण परिस्थितीत ह्या वास्तूचा आधार मनाला खूप  दिलासा देणारा होता. करोनाच्या विषाणूंना घराबाहेरच थांबवण्याचे सामर्थ्य ह्या भक्कम वास्तुतच आहे ह्याची जाणीव खूपच सुखावणारी होती. ही वास्तू अशीच कायम आनंदी राहावी, सौख्यदायी व्हावी अशी मनोभावे प्रार्थना केली.  ... वास्तूदेवतेनेही आशीर्वाद दिले ...  तथास्तु ...  तथास्तु... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 
sneha8562@gmail.com