Sunday, June 28, 2020

Ye Dil Mange More...( ये दिल मांगे मोअर )

                                                                   ।। श्री  शंकर  ।।


                                                       ये  दिल  मांगे  मोअर 


मंडळी , आज  सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ...रसना  ... 

कालपासून  चातुर्मासाची सुरवात झाली  ...  आता चार महिने रीतिरिवाज, उपवास , व्रतवैकल्य.  ह्या सर्वांना आपल्या परंपरेत महत्वाचे स्थान आहे. . त्यानिमित्ताने आपल्या आहाराचे आणि उपवासाचे महत्व अधोरेखित केलं आहे. 

तर मंडळी, आपल्या मूलभूत गरजांपैकी एक " अन्न  ". देहधारणेसाठी आपल्याला अन्न पाण्याची स्वाभाविक गरज असतेच. व्यक्तीनुसार  आणि वयोमानानुसार  प्रत्येकाची रुचि भिन्न भिन्न . गरज वेगवेगळी. घरांतल्या स्त्रीचा बराचसा वेळ हा स्वयंपाक घरांत विविध पदार्थ बनवण्यातच जात असतो . जात असे...  असे म्हणायला हरकत नाही.  ह्या गरजेचाच पुढे विस्तार किती होतो हे आपल्याला माहितीच आहे . सध्याच्या  काळांत हॉटेल्स, फूड मॉल्स, जॉईंट्स,ऑनलाईन रेसिपि ह्या सगळ्यांच प्रकारांना खूप महत्व आले आहे. एकंदर जीवनशैली खूप बदलली आहे आणि ह्याचे परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर होत आहेत.  

ह्या रसनेची तृप्ती सहजासहजी  होणे कठीणच ,म्हणूनच " दिल मांगे मोर " असं म्हणत आहारावर  नियंत्रण न ठेवता सेवन करतच राहतो.       

एका सुभाषितकाराने म्हटले आहे ,
जामाता जठरम जाया जातवेदो जलाशयः ।पुरिता नैव   पूर्यन्ते जकारः पंचदुर्भर : ।।
जावई ,जठर ,पत्नी,अग्नि  आणि पाणी  ह्यांची तृप्ती कधीच होत नाही.

आपल्या संस्कृतीत अन्नाला परब्रह्म म्हटले आहे. ।। जीवन करी जीवित्वा ,अन्न हे पूर्णब्रह्म ।।                               
अन्नग्रहण करणे हा  एक यज्ञ आहे. 
भगवद्गीतेत  आहारविहाराविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ।। युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टयस्य कर्मसु ।।
आहार  योग्य वेळी, योग्य मात्रेत, नियमितपणे सेवन करावा.

केवळ जिभेला रुचकर ते आरोग्याला चांगले असतेच असे नाही. जीवनाचा रस टिकवणारे, देहाचे आणि मनाचे पोषण करणारे अन्न सेवन करावे.

सात्विक श्रद्धा निर्माण होण्यासाठी सात्विक आहाराचे महत्व सांगितले आहे. आहारानुसार माणसाचा  स्व-भाव बनत असतो. मनुष्य ज्याप्रमाणे सत्व, रज, तम गुणांनी युक्त असेल त्याप्रमाणे त्याची रुची असते. सत्वगुणी लोकांना आयुष्य, बुद्धी, बळ वाढवणारा रसयुक्त ,स्निग्ध, ताजा आहारचं प्रिय असतो. रजोगुणी लोकांना चमचमीत पदार्थ आवडतात तर तमोगुणी अर्धवट शिजलेले, शिळे पदार्थ सेवन करतात. त्याप्रमाणेच आचार विचार, मनोवृत्ती घडत असते. 

आषाढ महिना सुरु झाला कि वेध लागतात ते चातुर्मासाचे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे चार महिने म्हणजे सणवार, उत्सव, व्रतवैकल्य  जोरात सुरु . बदललेले पावसाळी ऋतुमान आणि त्याला अनुसरुन आहार विहार आणि   उपासतापास. 

आपल्या पचनसंस्थेलाअधूनमधून  विश्रांती मिळावी म्हणून उपवासाची योजना आपल्या पूर्वजांनी केली असावी. ह्या चार महिन्यांत अनेक व्रतांसाठी उपवास  करावे असे सुचवले आहे. ह्या विशिष्ट काळांत काय खावं काय नको ह्याचे नियम आहेत. प्रत्येक प्रांतानुसार ते वेगवेगळेही आहेत. पण मूळ उद्देश बाजूला राहून त्याचेही बरेच स्तोम माजलेलं आपण बघतो. आणि त्यातलं पावित्र्य नष्ट होऊन त्याची खिल्लीच जास्त उडविली जाते. पु.ल. च्या पाठयपुस्तकांत समाविष्ट असलेल्या " उपवास " ह्या लघुनिबंधाची आठवण येते. 

काहीजण खाऊन पिऊन उपास करतात तर काही हलका आहार घेणं पसंत करतात. प्रत्येकाच्या सवयीनुसार, झेपेल तसं हे उपासाचं स्वरूप असतं. काहींना अजिबात उपवास झेपतच नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. 

भगवान शंकरांची प्राप्ती व्हावी ह्या हेतूने पार्वतीने वनांत राहून  केवळ पिकलेली झाडाची पाने चाटून व्रत केले आणि  तिच्या  तपःश्चर्येने  शंकर प्रसन्न झाले. असे अनुष्ठान फार विरळाच.
 
उपवासाचे सामान्य माणसाला होणारे फायदेही बरेच आहेत. वजन नियंत्रित  राहते हा तर मोठा फायदा आहेच. वजन कमी करण्यासाठी आज अनेक diatician  सल्ला देत असतात.   Weight Control प्रस्थ सध्या जोरात आहे. त्यासाठी भरमसाठ फी सुद्धा आकारली जाते. प्रत्यक्षांत आपले स्वतःच्या आहारावर नियंत्रण असेल तरच हे साधते. उपवासामुळे भूक सुधारते, हार्मोन्सचे कार्य चांगले होते, एकंदरच रोग कमी होऊन आरोग्यात चांगली सुधारणा होते. कमी खाण्याने ऊर्जा वाढते, उत्साह वाढतो, मन संतुलित होते. मेंदूची गती वाढते.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात , देही आरोग्य नांदते , भाग्य नाही  ह्यापरते ... 


उपवास म्हणजे उप + वास . ह्या काळांत परमेश्वराच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहाणे असा ह्याचा अर्थ. आहारावर नियंत्रण ठेवून मिळालेला वेळ हा उपासनेसाठी वापरणे. हे एक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक तपचं आहे हा ईश्वराप्रत पोचण्याचा एक मार्ग. उपवासामुळे पापक्षालन होते असाही समज आहे. 
श्रद्धेने केलेल्या उपवासाने मन शुद्ध  होऊन आचार विचार सदाचाराने प्रेरित होतात . 
उपास करणे आणि उपास घडणे हा अनुभव ज्यांनी घेतला असेल आणि आहार घेणे आणि आहारी जाणे ह्यातील मर्म ज्यांनी जाणले असेल त्यांना जीवनातील समतोल साधणे अवघड नाही. 

केवळ आहारचं नाही तर हिंडणे फिरणे, झोप सर्व गोष्टीतच जर वक्तशीरपणा, शिस्त पाळली गेली तर व्यक्तीचे शारीरिक आरोग्य नीट राहीलच पण  रूप .स्पर्श , शब्द , गंध ह्या बाकीच्या विषयांवरही  नियंत्रण ठेवणे  सोपे जाईल.   
 
आज मोबाइल, फेसबुक, आदि समाज माध्यमांचे वाढते आकर्षण हाही चिंतेचा विषय आहे. एखादा दिवस तरी त्या जंजाळातून स्वतःची सुटका करणे हाही उपवास ह्या निमित्ताने करून त्याचा अनुभव घ्यायला  काय हरकत आहे ? 

अनेक संतमाहात्म्यांनी आणि थोर राष्ट्रपुरुषांनी उपोषणाचा मार्ग राष्ट्रसेवेसाठी स्वीकारला. जेव्हा राष्ट्रावर अवर्षण किंवा युद्ध यासारखी आपत्ती येते तेव्हा ह्या मार्गाने देशसेवा घडू शकते. लालबहादूर शास्त्री ह्यांची  एक गोष्ट आठवते. त्यांनी आठवड्यातील एक दिवस , एक वेळ देशासाठी उपास पाळण्याचे देशवासियांना आवाहन केले होते आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा देऊन त्याचे आचरण केले. 
थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच असे वाटते की  केवळ प्रवृत्तिपर भोगसाधनांचा उपभोग न घेता , निवृत्ती साधण्यासाठी जी साधने आहेत ती प्राप्त व्हावीत ह्यासाठी प्रयत्न करायला हवे ..  ह्या साधनांसाठी  ये दिल मांगे मोअर असे म्हणायला हवे .... . 


Sneha Bhatawadekar
sneha8562@gmail.com









 
 



Saturday, June 20, 2020

Prasid Mam Bhaskar ( प्रसीद मम भास्कर )

                                                                 ।। श्री शंकर ।।
                              
                                                             प्रसीद  मम भास्कर 

आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर | दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते || 

    आज २१ जून, वर्षांतला सर्वांत मोठ्ठा दिवस. मित्रा, आज तुझा सहवास आम्हाला जास्त वेळ लाभणारया दिवसाचे हे महत्व लक्षांत घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय योगदिवस जगभर साजरा करतो. 

उद्यापासून तू दक्षिणायनात प्रवेश करणार. दिवस लहान आणि रात्र मोठी होणार. सहा महिन्यांनी तू पुनः उत्तरायणांत प्रवेश करशील. त्यावेळी आम्ही संक्रांत आणि रथसप्तमीचा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो.

हे नारायणातुझे तेजोबिंब सकाळच्या प्रहरी दश-दिशांना उजळवीत क्षितिजाची सीमा पार करून वर येते तेव्हा होणारा  आनंद आगळाच असतो. जणू काही मायेचं ( तिमिर ) अस्तित्व लोप पावते आणि परमेश्वराचे सत्य स्वरूप याची देहीयाची डोळा पाहता येतं.

खरं तर आपली भेट रोज ठरलेली. पण तरीही रामप्रहरी तू येण्याची चाहूल लागताच डोळे तुझ्या आगमनाकडे लागतात. किती तुझ्या स्वागताचा थाट! भूपाळीओव्या... माऊली सकाळी सकाळी जात्यावर बसून ह्या ओव्या गात असत... ह्या गोड ओव्या सकाळच्या प्रसन्नतेत भर घालत.  

सात घोड्यांच्या रथांवर बसून स्वारी अवतीर्ण होतेतेव्हा मन प्रसन्न होते. ह्या रथाला एकच चाक आहे. रथाचा सारथी पांगुळा आहे. ह्या रथाला कोणताही आधार नाही. भूमी नाही आणि आकाशही नाही. अधांतरीच हा रथ धावत असतो. "केयूरवान मकरकुंडलवान किरिटी हारी हिरण्मय वपुरधृत शंखचक्र:" असे तुझे रूप. सहस्र किरणांच्यासहस्र शाखांमधून तू प्रगट  होतोस.

अरुणोदय होताच रुबाबदार पावलं टाकत अवघे आकाश पादाक्रांत करतोस  तेव्हा हे आरक्तवर्णीआल्हाददायी रूप मन प्रसन्न करते. तिमिर हरुनी देई प्रकाशदेई अभय... ते कोवळंलडिवाळ रूप नजरेत बंदिस्त करे करे पर्यंतच किती रंग -रूप पालटतोस. दिवसभरात वेगवेगळी रूपं धारण करतोस, आणि संध्याकाळी परत एकदा आरक्तवर्ण. त्यावेळचं तुझं रूप बघायलाही सगळ्यांनाच आवडतं. पण सकाळी तुझ्याकडे बघून वाटणारा उत्साह संध्याकाळी मात्र मन उदास करतो. कातरवेळी मन जुन्या आठवणींनी भरून येते.  मधल्या वेळेत तुझं रूप कर्तव्य प्रखरसन्मार्गाचा मार्ग दाखवणारं. पण दुपारी तेजाच्या उग्र रुपापुढे मात्र कोणी डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही तुझ्या. तुझा प्रकाश इतका निर्मळपावनपारदर्शी, आम्ही सत्याला ही तुझ्या प्रकाशाची उपमा देतो. 

    


विधात्याने सृष्टी निर्माण केली तेव्हाच ह्या नभामध्ये तुझं आणि चंद्राचे सुबक झुंबर छताला लावले. ज्यायोगे तुझ्यामुळे दिवसा प्रकाशमान झालेले जग रात्री शांतपणे चंद्राच्या निळ्या प्रकाशात विश्रांती घेऊ शकेल.   

चंद्रसूर्याना केवळ ग्रह न मानता मानवाने त्यांना देवत्व ही बहाल केलेआहे. "आदित्य" हिंदू धर्माची मुख्य देवता. जणू ब्रह्माचे चैतन्यरुपी मूर्त स्वरूप. नवग्रहांपैकी हा स्वयंप्रकाशी ग्रह आपल्याला आकाशांत सहज बघता येतो. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका आहे त्यांना हे परमेश्वराचे  सगुण रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येते. सूर्यालाही जगाचा डोळा म्हटले आहे. " नमः सवित्रे जगदेकचक्षुषे ". एवढेच नाही तर जगाची उत्पत्तीस्थितीलय करणाराब्रह्मविष्णूमहेश रूपांत असणारा हा सूर्यच आहे.

सौर सूक्तसूर्यमंडल स्तोत्रांत तुझ्या ह्या दीप्तिमानसतेज रूपाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. 

ह्या विशालतेजस्वी प्रभामंडल असणाऱ्या रत्नमंडित रूपाची पूजा आम्ही करतो. तुझं श्रेष्ठ तेज प्राप्त व्हावे अशी इच्छा करतो. देवब्राह्मणसंतमहात्मे तुझ्या पूजनात दंग असतात. तू ज्ञानाने परिपूर्ण आहेसअनादी आहेस आणि अगम्य आहेस हे ज्ञानी जाणतात. भू, भुवः आणि स्व: ह्या तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझ्या तेजामुळे हे तिन्ही लोक प्रकाशित होतात. 

हे सूर्या तुझ्या उपासनेमुळे ज्ञान प्राप्त होते. पापांचा, व्याधींचा नाश होतो. शरीरसंपदा आणि ऐहिक वैभव प्राप्त होते. सूर्य नमस्कार ही प्राचीन भारतीय परंपरा आजही टिकून आहे. अकाल मृत्यू हरणं, सर्वव्याधी विनाशनंअशी ह्या सूर्यनमस्काराची महती सांगितली आहे. 

तुझी १२ नांवे ही अर्थपूर्ण आहेत.ही विष्णुंचीच विविध रूपे आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने विभूती योगांतमी स्वतः ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य आहेअसे सांगितले आहे."आदित्यनामहं विष्णुरज्योतिषां रविरंशुमान" सर्व प्रकाशमान वस्तूत  भगवंताचे हे  रूप सर्वश्रेष्ठ आहे. .

अशा तेजस्वी रूपाची उपासना सकाळच्या वेळी केली तर पूर्ण दिवस आनंदातउत्साहात पार पडतो. काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. नकारात्मक विचार नाहीसे होतात. आणि अर्थातच व्यक्तीचे जीवनमान सुधारतेत्याला मान सन्मान, यश प्राप्त होते. म्हणूनच तुला मित्र हे नाव असावे. 

सूर्यवंशात जन्माला आलेल्या श्री रामांचे चरित्र तुझ्यासारखे  तेजस्वी आहे.

समर्थ रामदास स्वामींनी सूर्य उपासना, गायत्री पुरश्चरण अविरत बारा वर्षे केले. त्या अनुष्ठानामुळे झालेले त्यांचे तेज:पुंजशक्तिशाली रूप मनावर प्रभाव टाकते. जनसामान्यांचा उद्धार करणारे त्यांचे कार्य डोळे दीपवून टाकते.   

शंकराचार्य म्हणतात: आत्मस्वरूप तेजाचे स्मरण केल्यामुळे अज्ञानरूपी अंधार नाहीसा होऊनज्ञानरूपी  सूर्यप्रकाशामुळे स्वस्वरूपाचे ज्ञान होईल आणि बुद्धी आनंदी राहील सूर्याला उदय-अस्त आहे, त्यालाही ग्रहण लागतेपण ज्ञानसूर्याला उदय अस्त नाही. उपासनेमुळे आत्मज्ञान होणे हीच खरी पहाट. 

सद्गुरूंचे प्रखर रूपही सूर्याप्रमाणेच असते. ज्ञानाचे अंजन शिष्याच्या डोळ्यांत घालून सद्गुरू अज्ञानाचा नाश करतात. सद्गुरूंना सूर्याची यथार्थ उपमा दिली आहे. 

सूर्याची उगवती दिशा, पूर्व दिशेला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या,ही जगाची रीत आहे. हे जाणून व्यवहार केले तर दुःख पदरात पडत नाही. 

सूर्यप्रकाशाचे वरदान लाभल्यामुळे आपले जीवन आनंदी झाले आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे सौर ऊर्जेचा (Solar Energy)  वापर दैनंदिन जीवनांत मोठ्या प्रमाणांवर केला जाऊ लागला आहे.

पृथ्वीआपतेज, वायूआकाश ह्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीवर मिळणाऱ्या तेजाचा आणि प्रकाशाचा मुख्य स्रोत "सूर्य" म्हणजे तूच. अग्नितत्वामुळे आपले जीवन विकसित होते, वनस्पतीप्राणिमात्र ह्या सर्वांनाच ही ऊर्जा आवश्यक असते. सर्व चराचराचा  हा अन्नदाता. सृष्टीचे जीवनचक्र सूर्यामुळेच अखंड चालू राहते.

रविवार हा तुझा वार. नवीन सप्ताहासाठी लागणारी ऊर्जा सूर्य उपासना करून मिळवावी म्हणूनच रविवारच्या सुट्टीचे प्रयोजन असावे. प्रत्यक्षांत मात्र हा दिवस आळसातउशिरा उठूनच वाया जातो. 

अंधःकार रुपी दुःखाचा विनाश होऊन प्रकाश रुपी सुखाचा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो म्हणूनच तुझी प्रार्थना ……. 

असतो मा सद्गमयतमसो मा ज्योतिर्गमय ।।

 

  

स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ( पूर्व ) , मुंबई 

sneha8562@gmail.com 

Monday, June 8, 2020

Jewel Of Mysore ( Visit to Heritage Site )

                                                    ।।     श्री    शंकर   ।।
                              
                                               Jewel  of  Mysore


 मे महिना … पर्यटनाचा  हा महिना सलग दोन वर्ष अगदीच बंदिस्त चौकटीत , आपापल्या घरातच पार पडला. सुट्टीच्या केलेल्या विविध प्लॅन्स चा अगदी फज्जा उडाला. 

वैशाख वणव्याने पेटलेला गुलमोहोर आपली टपोरी रक्तवर्णी फुलं मिरवीत दिमाखात उभा आहे. माझ्या  घरातूनच मी त्याचे हे रूप न्याहाळतेय. हा गुलमोहोर  मला सारखा हिणवतोय. मे महिना,सुट्टी आणि छोटा मोठा प्रवास हे आज अनेक वर्षांचं समीकरण. सुट्टीचं आयोजन करायला अगदी जानेवारी पासून सुरवात. प्रवासाची तयारी मग, कॅलेंडरची पाने अधीर होऊन उलटवत प्रवासाला राहिलेले दिवस मोजत राहायचे. कधी कौटुंबिक तर कधी Travel Company बरोबर सहल ठरायची. अश्या ह्या  प्रवासांत साथ असायची ती त्या लालचुटुक गुलमोहोराची. 

अरे हो , हा गुलमोहोर मला दोन वर्षं मागे घेऊन गेला. ... 

विमानाने आकाशात उड्डाण केले, सहप्रवाशांबरोबर बेंगळुरूला कधी येऊन पोचलो कळलंच नाही. दुपारच्या रणरणत्या उन्हांत मिनी बस मधून आमचा प्रवास म्हैसूरच्या दिशेने सुरु झाला. 

वाटेत स्पेशल मधुर वड्याचा आस्वाद घेऊन म्हैसूर मुक्कामी पोहोचलो. थोड्याच वेळांत गडगडाटांसह जोरदार पाऊस आमच्या स्वागताला हजर. त्याच्या आगमनाने आनंद तर झालाच पण पुढच्या स्थळदर्शनाबद्द्ल मन साशंक झालं. हा पाऊस आपल्या ट्रीपमध्ये  विघ्न तर आणणार नाही ना ?

सकाळी हवेतल्या गारव्याने लवकरच जाग आली . नेहमीच्या सवयीने प्रभात फेरीला बाहेर पडलो.म्हैसूर 
Heritage City असल्याने त्याविषयी मनांत उत्सुकताही होतीच. हॉटेलच्या समोरच असलेला कोर्टाचा विस्तीर्ण परिसर मोठमोठ्या  हिरव्या वृक्षांनी वेढलेला होता. नवीन शहराचे दर्शन घेत पुढे जात असतांना अहाहा ... गुलमोहोर आमची वाट पाहत उभाच होता. मातीचा लालभडक  रंग आणि वेगळ्या लाल छटेचा गुलमोहोर. गर्द हिरवी पाने. वळणदार काळभोर रस्ते. वाट इथे स्वप्नातील ... रस्त्याच्या दुतर्फा अदबीने उभे असलेले ते गुलमोहोर. हे वृक्ष हि ह्या शहराची विशेष ओळख. .ते दृश्य आजही नजरेसमोरून हटत नाही. म्हैसूर शहराचा हा भाग खूपच आवडला. 

लवकरच तयार होऊन sight seeing साठी बाहेर पडलो. आजचा आकर्षण बिंदू होता " Heritage Site - Mysore Palace "  म्हैसूरच्या वाडियार साम्राज्याचा राजमहाल. कर्नाटक राज्याचा महत्वाचा मानबिंदू. हिंदू यदुवंशीय साम्राज्याची राजधानी. सन १३९९ ते अगदी भारताच्या स्वातंत्र्यानंतर सन १९५० पर्यंत यादवांनी इथे राज्य केले. म्हैसूर त्यावेळी कर्नाटकचे सांस्कृतिक केन्द्र म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. गायक, वादक, नर्तक तसेच लेखक, चित्रकार ह्या सारख्या विविध कलाकारांना  राजाचा उदार आश्रय लाभला होता. 

अगदी थोड्या वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या  एका शानदार, भव्य  राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो.Security check formalities  नंतर गाईड बरोबर आम्ही त्या महालाशी येऊन त्याचे बाह्य सौन्दर्य न्याहाळू लागलो.             

विस्तीर्ण पटांगणावर उभ्या असलेल्या ह्या तीन मजली महालाची वास्तुशैली हिंदू, मुघल, राजपूत आणि गॉथिक ह्या सर्व पद्धतीचे एकत्र संमिश्रण आहे. ह्या महालाच्या बांधकामात ग्रे ग्रेनाईटचा वापर केलेला आहे आणि जवळजवळ पांच मजले इतकी उंची असलेल्या मनोऱ्यांसाठी गुलाबी संगमरावरचा उपयोग केलेला आहे. आजूबाजूचा सर्व परिसर सुंदर बगीच्यांनी सजला आहे. सर्व परिसर स्वच्छ आणि टापटीप आहे. त्याची देखभाल उत्तम रीतीने केली आहे. मन त्यामुळे एकदम प्रसन्न होते. उजव्या बाजूला चामुंडा देवीचे मंदिर आहे. चामुंडा हिल समोर हा महाल दिमाखांत उभा आहे. 

देश विदेशातील अनेक पर्यटक ह्या महालाला भेट देतात. ताजमहाल खालोखाल ह्या महालाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतांत ह्या बाबतीत ह्या महालाचा दुसरा क्रमांक लागतो. 

मुघल आक्रमणानंतर काही काळ हा महाल  टिपू सुलतानाच्या साम्राज्याची राजधानी होता.  हि जागा नंतर परत   वाडियार राजाकडे आली आणि त्याने ह्या महालाचा कायापालट केला.वाडियार साम्राज्याच्या मालकीचा, ऐतिहासिक महत्व असलेला हा राजवाडा १९१२ साली बांधून पूर्ण झाला. अंदाजे तेरा वर्षं हे बांधकाम सुरु होते आणि त्यावेळी अंदाजे ४२ लाख रु. खर्च  आला होता. आजही महालाच्या काही भागांत राजपरिवाराचे वास्तव्य आहे . 
 
आता आम्ही महालांत प्रवेश केला. सुरवातीलाच समईंच्या ज्योतींच्या प्रकाशांत उजळलेल्या चामुंडा देवीचे दर्शन घेतले. नंतर एकेका दालनांत फेरफटका मारला. भूतकाळात राजपरिवाराने वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय (Museum ) इथे  पाहायला मिळते. 

महालांत पूर्वी वास्तव्य केलेल्या  राजांचे फोटो, पेन्टिंग्ज  त्या राजांच्या वैभवाची साक्ष देतात. काही पेन्टिंग्ज  त्यांच्या Three -D Effect मुळे खूप जिवंत वाटतात. राजांचे पोशाख, जडजवाहीर, विविध वस्तू बघून डोळ्यांचे पारणे फिटते. विविध दालनांत मांडलेली सर्व स्मृतिचिन्ह चित्ताकर्षक आहेत. सर्व दालने प्रशस्त हवेशीर आहेत. stained ग्लासचा वापर खिडक्या, तावदाने आणि छतासाठी केलेला आहे. महालांतील रंगसंगती, कोरीवकाम, हस्तिदंताचा वापर करून चितारलेल्या ऐतिहासिक कथा, त्यातही शेषशायी विष्णूची छतावरील कोरीव मूर्ती, सगळेच विलोभनीय आहे. तिथल्या जवळपासच्या जंगलांत हत्तींचा भरपूर वावर असल्याने त्यांच्या संपूर्ण  सुळ्यांचा वापर सजावटीत अनेक ठिकाणी केलेला दिसतो. शिकारीत मारलेले प्राणी  इथे ठेवलेले आहेत. शिकार करून मारलेल्या हत्तीची तोंडे मुखवट्यासारखी इथे भिंतीवर लावलेली आहेत.. 

चांदीच्या खुर्च्यांबरोबरच, ८५ किलो सोन्याचा वापर करून  महाराजांना बसण्यासाठी केलेली " Elephant  Seat " पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे . राजेरजवाड्यांच्या विवाह समारंभासाठी खास  बनविलेला stained  glass  चा रंगीबेरंगी " कल्याण मंडप " सुद्धा प्रेक्षणीय आहे. एखादा लग्नसोहळा तिथे आत्ता सुरु आहे असा भास होतो.   त्याबरोबरच दरबार हॉल, कुस्तीचा आखाडा सुद्धा खूपच प्रशस्त आणि  विशेष दर्शनीय आहेत. प्रेक्षकांना उपस्थित राहून बघण्यासाठी मोठी गॅलरी आहे . 

विविध कमानी, संगमरवरी खांब, छतावर लटकलेली झुंबरं ह्यामुळे महालाचा सगळा look एकदम भारदस्त वाटतो. 

हा महाल ज्या कारागिरांनी निर्माण केला त्यांच्या कलेचं कसब त्यांनी पणाला लावलं आहे. ह्या महालाचे  ऐतिहासिक महत्व ही तेव्हढेच मोठे आहे.त्यामुळेच ह्या वास्तूचे  रूप  मनांत दीर्घकाळ रेंगाळत राहते. मर्यादित वेळेत एवढ्या सगळ्या गोष्टी बघणे कठीणच. त्यामुळे  काहीशा अनिच्छेनेच आपण  ह्या महालाबाहेर पडतो. बाहेरच्या मोकळ्या विस्तीर्ण मैदानांतून  सलग ( २४५ ft. ) ह्या भव्य राजमहालाचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
 
 दसरा पूजेनिमित्त प्रतिवर्षी इथे होणारी  भव्य मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. हा एक प्रेक्षणीय  सोहोळा असतो. अनेक पर्यटक देश-विदेशातून ह्या सोहोळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. दसऱ्यानिमित्त चामुंडा देवीची पालखी निघते.  राजघराण्यातील व्यक्ती ह्या मिरवणुकीत सहभागी होतात.  अनेक हत्ती ह्या मिरवणुकीत विविध  अलंकारांनी सुशोभित  होऊन हजेरी लावतात.  आम्हांला  प्रत्यक्ष हा अनुभव घेता आला नाही पण महालात लावलेल्या मिरवणुकीच्या पैंटिंग्स वरून ह्या शाही सोहोळ्याची थोडीशी झलक अनुभवता आली . जगभरातून ह्या मिरवणुकीला लाखोंची उपस्थिती असते. ह्या वेळी करण्यात येणाऱ्या  विद्युत रोषणाईने  डोळ्यांचे  पारणे फिटते.  . 
रोज  संध्याकाळी  विद्युत रोषणाईचा आणि लाईट साऊंड शो चा आनंद पर्यटकांना घेता येतो. पर्यटकांसाठी काही विशेष  सोयी इथे उपलब्ध आहेत.  विशेषतःअंध  व्यक्तींसाठी brail guide ची सोय आहे.  
भारतीय संस्कृतीच्या वैभवाला उजाळा देणारी अशी अनेक स्थळे आपल्या देशांत  आपला वारसा दिमाखाने जपत आहेत. पर्यटनाच्या निमित्ताने आपला पूर्वेतिहास पुन्हा आठविता येतो. तो जागविण्याचा थोडासा प्रयत्न करता येतो. 
एखाद्या वास्तूचे सांस्कृतिक ,सामाजिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याची योग्य देखभाल व्हावी आणि हा वारसा पिढ्यांपिढ्या अबाधित राहावा म्हणून  वारसा स्थळाची घोषणा सरकारतर्फे  केली जाते. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता  अशा वास्तूंचे योग्य प्रकारे जतन  करणे आणि आपला समृद्ध वारसा जोपासणे हे नागरिक/पर्यटक  म्हणून आपलेही  सर्वांचे उत्तरदायित्व आहे.  मानवी अतिक्रमणांपासून ह्या वास्तूंचे  योग्य सरंक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. ह्या वास्तूंची लोकप्रियता लक्षांत घेऊन पर्यटकांची प्रचंड वर्दळ इथे असते. त्याचा विपरित  परिणाम ह्या ठिकाणांच्या सौन्दर्यावर होऊ नये म्हणूनही काही उपाय योजावे लागतात. त्या नियमांचे पालन आपण सर्वानीच करायला हवे. 

प्रेरणादायी इतिहास जिथे घडला,अशी स्थळे भावी पिढीला  दाखवून भविष्यात गौरवशाली  इतिहास निर्माण करण्यासाठी तरुणांना  प्रोत्साहित करणे हे सद्यस्थतीत आपले महत्वाचे कर्तव्य आहे सर्वानी मिळून ते  पुढे न्यायला  हवे. 

म्हैसूर चंदनासाठी सुप्रसिद्व आहे. चंदनाचे खोड  सुवासिक आणि पवित्र असते . त्याचा दरवळ कायम रेंगाळत राहतो. जिभेवर स्वादिष्ट म्हैसूर वडीची  चव आणि चंदनाचा हा परिमळ मनांत ओतप्रोत भरून घेतला... 

घरासमोरच्या गुलमोहोरावर बसून  तार  स्वरांत गाणाऱ्या कोकिळेच्या तानांनी मी  स्वप्नरंजनातून जागी झाले आणि  माझ्या  घरट्यांत परतले .... 

Sneha Bhatawadekar 
Vileparle , Mumbai


Monday, June 1, 2020

Soubhagya Dayini Ganga ( सौभाग्यदायिनी गंगा )

                                                             ।।  श्री  शंकर  ।।

                                                         सौभाग्यदायिनी  गंगा 

भारतातील  सर्वात पूज्य मानली  जाणारी नदी....गंगानदी...आपण तिला वत्सल मातेच्या रूपात बघतो. म्हणूनच तिला गंगामैया म्हणून संबोधतो. 
.
"स्रोतसामस्मि  जान्हवी " असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. सर्व नद्यांमध्ये भागीरथी गंगा हे माझेच रूप आहे असे भगवान सांगतात.
 " गंगेसारखे तीर्थ नाही" ह्या उक्तीनुसार जे कोणी जीव ह्या गंगेत स्नान करतात त्यांचे पापक्षालन हि मातृवत गंगा नदी करते, वामन अवतारांत  गंगा नदी  निर्माण झाली ती विष्णूच्या पायापासून. म्हणून तिला " विष्णुपदी " असेही म्हणतात. मोक्ष मिळवण्यासाठी धडपडणारे जीव गंगेकडेच आकर्षित होतात. तिच्या तटावर बसून ते साधना करतात आणि मोक्षपदाला प्राप्त होतात. " गमयति भगवत्पदमीती गंगा "...  हीच गंगा मनुष्याला भगवत  पदापर्यंत पोचवते.

गंगेला भागीरथी ह्या नावानेही संबोधतात. सगरपुत्रांच्या उद्धारासाठी कपिल मुनींनी दिलीपचा पुत्र भगीरथ ह्याला तपाचरण करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यास सांगितले. घोर तप करून भगीरथाने  शंकरांना प्रसन्न करून घेतले.  भगीरथाने स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी शंकरांना विनंती केली. शंकराने गंगेला स्वतःच्या जटेत धारण करून मग तिचा प्रवाह पृथ्वीवर आणला. मधेच तिला जन्हु ऋषींनी अडविले आणि मग परत एकदा भगीरथाने तप करून तिला परत आणले. जन्हु ऋषींच्या कानातून निघालेली हि पुढे जान्हवी म्हणून ओळखली जाऊ लागली. गंगा नदी स्वर्गांतून उतरून पृथ्वीवर येते आणि मग पाताळात जाते म्हणून तिला त्रिपथगामिनी असेही म्हणतात. पृथ्वीवर  उतरतांना हिमालयात गोमुख ( गंगोत्री ) येथे ती अवतीर्ण झाली. 

गंगा हि हिमालयाची कन्या आणि शंकराची पत्नी. शंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केल्यामुळे पार्वतीचा सवतीमत्सर उफाळून आला. 
गंगा हि शंतनू राजाची पत्नी आणि भीष्माचार्यांची आई  असा हि  उल्लेख पुराणकथांत आढळतो . 

गौतम मुनींनी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले. आणि शंकराच्या जटेतून दुसरा प्रवाह निघाला. गौतम ऋषींना गोहत्येचे जे पाप लागले होते ते ह्या पुण्य तीर्थातील  स्नानाने नाहीसे झाले. 

अशा अनेक आख्यायिका गंगेच्या अवतरणावर प्रसिध्द आहेत.   

लोकांचा उद्धार  करण्यासाठीच ह्या नद्या अवतीर्ण होतात. गंगा नदीच्या  स्नानाने दहा प्रकारच्या पातकांचा  नाश होतो. म्हणूनच सर्व भारतात हिची पूजा केली जाते.. प्रत्यक्ष दत्तगुरु सुद्धा नित्य जान्हवीचे स्नान करतात असा उल्लेख आहे. 

सर्व दृष्टीने आपल्या देशांत  ह्या नदीचा प्रथम क्रमांक आहे. 
 गंगेचा विस्तार खूप मोठा आहे. १५५० कि .मी. प्रवास करून ती शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेत तिला अलकनंदा, मंदाकिनी अश्या नावांनीही ओळखतात. आपल्या देशाला सुजलां ,सुफलां करणारी ही महत्वाची नदी. 

गंगाजल हे शुद्धी करणारे तसेच शरीर शक्ती वाढवणारे आहे. ह्या पाण्यात जंतू टिकत नाहीत. त्यामुळे औषध म्हणूनही ह्या जलाचा वापर करतात. तसेच अनेक वर्षं हे पाणी खराब होत नाही. 

अनेक साहित्यकांना  हि नदी साहित्य  निर्मितीसाठी  प्रेरणा देते. ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीत गंगेचे अनेक दृष्टांत दिले आहेत. जगन्नाथ पंडितांची इथे आठवण होणे स्वाभाविकच आहे. त्यांनी  रचलेले अतीव मधुर, गंगेवरील प्रेम व्यक्त करणारे," गंगालहरी" स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यांनी रचलेल्या प्रत्येक श्लोकाबरोबर गंगामाई एकेक पायरीने वर चढत होती  आणि शेवटी तिनेजगन्नाथ पंडिताला  प्रत्यक्ष दर्शन दिले. 
गंगालहरीत ते गंगेची स्तुती करताना  म्हणतात, पृथ्वीच्या कपाळावरील कुंकुम तिलक ( सौभाग्य) तूच आहेस. ह्या वसुधेला तुझ्या मुळेच समृद्धी प्राप्त झाली आहे. सर्व अमंगल आणि अशुभाचा नाश करून पुन्हा पावन  करणारी तूच  आहेस. 
अशा जीवनदायिनी गंगेचा पृथ्वीवरील अवतरण दिवस म्हणजे जेष्ठ महिन्यातील दशमी.
म्हणजेच गंगा दशहरा.   हा दिवस पुण्यकारक समजला जातो. 
 गंगा दशहरा हा उत्सव अनेक ठिकणी साजरा करून गंगेची पूजा ,आरती केली जाते.ह्या दिवशी गंगेत किंवा अन्य तीर्थात स्नान करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर दानाचेही महत्व सांगितले आहे. हरिद्वारला संध्याकाळी होणारी गंगेची आरती बघण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येतात. 

आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद  भारती ह्यांना गंगेची विलक्षण ओढ होती. तिच्या तटावरच  त्यांनी साधना करून नारायणाला आपलेसे करून घेतले. आणि शेवटी आपला देह सुद्धा गंगेतच विसर्जित केला. 
त्यांच्या कृपा प्रसादाने आम्हालाही गंगेच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. तिच्या शुभ्र धवल ,निर्मळ जलाचा स्पर्श अनुभवता आला. हिमालयातील चारधाम यात्रेत गंगेचे भव्य स्वरूप पाहता येते. काही ठिकाणी मंजुळ कलरव करणारे  तर काही ठिकाणी वेगाने गर्जत जाणारे नदीचे हे रूप आपल्याला दिसते .  

 नदीकिनारे हि आपली तीर्थक्षेत्रं आहेत. अनेक संतमाहात्मे ह्या नदीतीरावर राहिले आणि समाजाच्या उद्धाराचे व्रत अंगिकारले. ह्या नद्यांनीच आपली संस्कृती घडवली. आपल्याला समृद्ध जीवन दिले.

गंगेला आपण माता म्हणतो. देवी म्हणून तिची पूजा करतो. तिची स्तोत्राद्वारे स्तुती करतो. मग ती मलिन होणार नाही अशी काळजी आपण घ्यायला नको का ?
परमपावन अशा ह्या गंगेने एकदा खंत व्यक्त केली कि सर्व पापाचरणी लोक येऊन माझ्या प्रवाहात अंघोळ करतात आणि मला मलिन करतात. ह्या वेळी भगवंतांनी तिचे सांत्वन केले. ते म्हणतात जेव्हा जेव्हा संत महात्मे तुझ्या पात्रांत स्नान करतात तेव्हा तेव्हा हे पाप आपोपाप धुतले जाते आणि तू पुन्हा पवित्र होतेस. भागवतांत असा उल्लेख आहे.
 आपल्याला गंगामातेने  जे भरभरून जीवनसौख्य  दिले आहे त्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरेच आहेत.  . 

आज ह्या गंगा मातेकडे  सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करूया.
 
नमामि गंगे तव पादपङ्कजं । सुरासुरै वंदित दिव्य रूपं ।।
भुक्तीचं मुक्तीचं दधासी नित्यं । भावानुसारे सदा नराणां  ।।

जय जय गंगे , भागीरथी...