Wednesday, October 21, 2020

गोंधळाला या ...(Gondhalala Ya....)

                                                         ।। श्री शंकर ।।

                                                       गोंधळाला या ...

षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो I घेऊन दिवट्या हस्ते गोंधळ घातला हो II 

उदे अंबे उदे   उदे अंबे उदे ।। ... 

हे शब्द कानावर पडले कि वातावरणांत  एक वेगळाच उत्साह संचारतो.. हृदयात मावणाऱ्या भक्तिरसाचा उदय  होतो... भवानी मातारेणुकादेवीकरवीरनिवासिनी अंबामाता ... देवींची विविध रूपे डोळ्यासमोर उभी राहतात. वात्सल्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेली हि देवीची रूपे म्हणजे जगन्मातेचीच रूपे..

नवरात्रांत ह्या विविध रूपांची आराधना करून त्या आदिशक्तीला आपण प्रसन्न करून घेतो. बहुजन समाजात भूमातेचा/ निसर्गाची पूजा म्हणून  साजरा केला  जाणारा हा उत्सव आता अधिक व्यापक झालाय. देवी म्हणजेच प्रकृती / आदिमाया / आदिशक्ती. विविध अंगाने केली जाणारी तिची  उपासना . पूजे -अर्चेबरोबरच, नामजप , स्तोत्रपठण, होमहवन ह्या साधनांनी हि उपासना अधिकच बहरते . 

महाराष्ट्राला लोककलांची  समृद्ध परंपरा लाभली आहे. वासुदेव, भारूड, जोगवा, गोंधळ असे अनेक प्रकार देवदेवतांच्या उपासनेसाठी योजिले जातात. त्या देवतेला प्रसन्न करून घेतले जाते. ह्यातीलच एक प्रकार " गोंधळ "

ग्रामीण भागांत आजही प्रचलित आणि लोकप्रिय असलेला गोंधळ. अंगात लांब घोळदार अंगरखा, गळ्यांत कवड्यांची माळ, डोक्यावर पगडी, साथीला हातात तुणतुणे, जवळ प्रकाशाची वाट दाखवणारी दिवटी. देवीचे उपासक असणारे हे गोंधळी, देवीची स्तुती, स्तवन करतात. कुलदेवीच्या उपासनेसाठी हा गोंधळ प्रामुख्याने असला तरी इतर देवतानाही आमंत्रित केले जाते.  साथीदारांबरोबर घातलेला हा गोंधळ खूप रंजक असतो. अनेक घरांमध्ये प्रथेप्रमाणे, कुलाचार म्हणून किंवा कार्य समाप्तीनंतर ह्या कार्यक्रमाचे आयोजन  केले जाते. गोंधळाचा बाज एकंदरच भारदस्त असतो. भक्तिरसाबरोबरच वीररसाचा परिपोष इथे दिसतो. ऐकताना आपण ह्या कथानाट्यात  बुडून  जातो. त्यामुळे स्फूर्ती मिळते, उत्साह वाढतो. 

लहान मूल दुसऱ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी गोंधळ घालते. स्वतःच्या मागण्या पुऱ्या व्हाव्या म्हणून आईकडेच हट्ट करते. तीच गोष्ट भक्तांची. त्यांना आईचे वात्सल्य हवे तर ते गोंधळ घालतात. मग त्यांचे लाड पुरवले नाही तर ती आई कसली ?

मनामनांत असलेला गोंधळ, अस्थिरता  कमी होऊन संसारातील नश्वरता जाणून, परमार्थातील शाश्वत मार्गाकडे नेणारा  ... संसार आणि परमार्थाची सांगड घालणारा  ... अंबेचा  गोंधळ ... भक्तिमार्गातील गोंधळ 


असाच भक्तीचा गोंधळ संतकवी दासगणु महाराजानी घातलाय. त्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठोबालाच मातेच्या रूपांत बघून गोंधळाच्या माध्यमांतून तिची आळवणी केली आहे. मातेच्या वत्सलतेचा वर्षाव व्हावा म्हणून तिची स्तुती केली आहे. 

महाराज म्हणतात, ह्या बयेने  त्रिभुवनांत  ठाण  मांडले  आहे, आपल्या  त्रितापांचें  हरण करण्यासाठीतिला शरण जाऊन तिच्या भक्तिरसात रंगून जायला हवे. पंढरपूरस्थित हि बया सगुणरूपाने विटेवर उभी राहून, कटीवर हात ठेवून आपल्या भक्तवरांची वाट पाहत युगानुयुगे उभी आहे.

ह्या बयेनेच  महाराजाना नरसिंह रूपांत दर्शन दिले त्या उग्र रूपाचे  वर्णन इथे केले आहे. " सवा हात लळलळे जीभ तो वन्ही तृतीय लोचनी " ते अक्राळविक्राळ  रूप  प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर   प्रगट होते.

भक्त प्रल्हादने स्तवन करून आपल्या उत्कट भक्तीने  त्या नरसिंहाला शांत केले ह्या पुराणकथेचा उल्लेख केला आहे . 

दशावतारातील वामन अवतार, राम अवतार आणि कृष्णावतारांतील विविध कथांमधून ब्रह्माच्या  सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन महाराजांनी  केले आहे. " ती हि विठाई मनी इच्छी शबरीच्याउष्ट्या फळा " अगदी मोजक्या शब्दात महाराज त्यांच्या  काव्यातून कथांचा हा  विस्तृत पट आपल्या समोर उभा करतात. महाराजांच्या लेखणीचे हे  सामर्थ्य त्यांच्या सर्व वाङ्मयांत प्रत्ययाला येते. 

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वर्णन करताना दासगणु  महाराज म्हणतात "संत शिरोमणी साधू देहूकर, अहो तुकाराम महाराज! तयाचे गुण वानू कुठवर ? "अनेकविध संतांनी आपल्या दैवी गुणांनी ह्या मातेचा गोंधळ घालून तिची कृपा संपादन केली आहे.. तिला आपल्या हृदय मंदिरात बंदिस्त केले आहे.  त्यांच्या  चरित्रात  हि अनन्य भक्ती पहायला  मिळते . 

आपल्यासारख्या साधकांना अतिशय वात्सल्याने महाराजांनी पारमार्थिक वाटचाल कशी करावी , त्याचे   मार्गदर्शन केले आहे. सुंदर रूपकाच्या माध्यमांतून हा भक्तिमार्ग कसा अनुसरावा त्याचे वर्णन केले आहे. षड्रिपूंचा बळी द्यायला हवा. दृढ निश्चयाचा अंगरखा, सद्गुणांचे तुणतुणे, आशेचे तेल, वैराग्याचा पोत, किर्तीरुपी संबळ, पायात निरिच्छेची घुंगुरे बांधून हि वाटचाल केली तर परमशांतीचा लाभ होईल. 

विठूमाऊलीने दृढ आलिंगन द्यावे म्हणून महाराजांचा जीव व्याकुळ झाला आहे ती आस त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होते. .त्यासाठी मातृहृदयातील वत्सलतेला त्यांनी आवाहन केले आहे. तिच्याच कृपेने  मायेचा पट  दूर सारून ह्या प्रकृतीच्या पल्याड असलेल्या एकमेवाव्दितीय पुरुषाचे दर्शन व्हावे म्हणून महाराज गोंधळ घालत आहेत. 

नवरात्रीच्या निमित्ताने ह्या तेजाची/शक्तीची  उपासना घडावी, ऊर्जा मिळावी, कृपा संपादन व्हावी म्हणून  --चला चला ...आईचा गोंधळ घालूया .. भक्तिरसात रंगून जाऊया .. .. उदे अंबे उदे.. उदे अंबे उदे.

 

स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com