Friday, January 2, 2026

 ।।  श्री शंकर ।। 


माझा देश माझा धर्म  


कॅलेंडर नूतन वर्ष २०२६ च्या सर्वांना शुभेच्छा . नवीन वर्ष सुरु झाले की प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतोच. काही वैयक्तिक तर काही समाजासाठी. कुटुंबातील व्यक्ती , मित्रपरिवार ह्यांच्यावर प्रेम करायला, त्यांची काळजी घ्यायला कोणाला सांगावे लागत नाही. पण समाजातील विविध घटक ,समाजाला सुस्थितीत ठेवणाऱ्या निसर्ग , प्राणी ,परिसराची स्वच्छता ह्या गोष्टींवर पण प्रत्यकाने आपले योगदान देणे हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे . तोच संकल्प ह्या वर्षासाठी केला तर ? 

प्रत्येक समाजाचा, राष्ट्राचा  महत्वाचा घटक म्हणजे नागरिक . समाज  किंवा राष्ट्राचा विकास / उत्कर्ष साधायचा असेल , राज्य सुस्थितीत चालवायचे असेल तर काही नियमांची / कायद्यांची  आवश्यकता असते. ह्या नियमांचे पालन करणे म्हणजेच नागरिक धर्माचे पालन. 

धर्माची व्याख्या काय ? ... धारण करतो तो धर्म. धर्माचे पालन केल्याने समाजाची धारणा होते. विशिष्ट परिस्थितीत  वैयक्तिक आणि समाजाचे हित  राखले जावे म्हणून जे नियम , कायदे केलेले असतात त्यांचे पालन करणे म्हणजे धर्म. व्यष्टि धर्मापेक्षा ( व्यक्ति ) - समष्टी धर्म ( समाज ) अधिक व्यापक  असतो. पण नीती-- नियम तेच. ज्या समाजांत , गावांत , देशांत आपण राहतो त्या समाजातील नागरिक म्हणून त्या देशाच्या घटनेचे पालन करणे आणि इतरांनाही तसे वागायला प्रवृत्त करणे , त्यासाठी समाज जागृती करणे आवश्यक आहे. 

नागरिक धर्माचे पालन  रोजच्या जीवनांत सुद्धा आपण करतच असतो.आणि ते करायलाच हवे.  

 उदाहरणच  द्यायचे तर ..  आपल्या  रोजच्या व्यवहारांतील जगण्यासाठी आवश्यक घटक  ...  अन्न ,वस्त्र,निवारा ... ह्या  मूलभूत गरजा. आपण लहानपणी शाळेत हे  शिकलोय   ... जसजसे वयाने मोठे होतो , तेव्हा जाणवते ते ह्या मूलभूत गरजांमागे असलेले सृष्टी रचनेचे महान तत्व. आपला जीवनाचा आधार म्हणजे   पांच  तत्वे. म्हणजेच पंचमहाभूते. निसर्गाने आपल्याला  बहाल केलेली ही  तत्वे .  त्याचे महत्व प्रत्येक व्यक्तीने / भूतमात्राने जाणायला हवे. 

पंचमहाभूते म्हणजे ... 
१ ) पृथ्वी--स्थिरता   २ ) आप -- पाणी ३ ) तेज - प्रकाश ४ ) वायू -- हालचाल, चैतन्य ५ ) आकाश -- पोकळी ,शब्द 

 पंचमहाभूते आपल्याला  रोजचे जीवन जगण्यासाठी  साहाय्य करतात.ह्यांच्या शिवाय आपले जगणे अगदी अशक्य आहे.  ही पंचतत्वे  म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेले  वरदान.तेही  अगदी मुबलक प्रमाणांत आणि विनामूल्य.  ह्या पंचतत्वांचा  समतोल राखला तरच सृष्टीचे चक्र अव्याहतपणे सुरळीत  चालू राहील. 

ही  जी  पांच तत्वे आहेत  त्यांचा योग्य वापर ,त्यांचे रक्षण , संवर्धन  ही  सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आपले कर्म हे सुयोग्य म्हणजे धर्माच्या सुविहीत चौकटीत बांधलेले असावे आणि त्यासाठी विवेक बुद्धीचा वापर करणे गरजेचे असते. .   

वसुंधरेला आपण धरणीमाता म्हणतो .तिला वंदन करून  तिची पूजा करतो. तिला  सुजलाम , सुफलाम बनवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे , प्लास्टिक चा अतिवापर टाळणे आणि प्रदूषणापासून तिला मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. 

नद्यांना पण आपण मातृस्वरूप मानतो. जल म्हणजेच जीवन. जलाचा वापरण्यायोग्य  साठा  मर्यादित आहे. जलाअभावी मानवसृष्टीचा अंत होईल. आपल्या आवश्यकतेनुसार काटकसरीने  पाणी वापरणे, त्याचे प्रदूषण थांबवणे हे गरजेचे आहे.  आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा स्वच्छ ,शुद्ध  पाणी मिळणे  महत्वाचे आहे. 

सद्य परिस्थितीत राहणीमान उंचावले आहे. विषयोपभोगांत वाढ झाली आहे. चंगळवादाचा पुरस्कार वाढला आहे.त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला आणि तरुण पिढीला भोगावे लागणार आहेत. दासबोधांत समर्थांनी सांगितले आहे ... " वाया दवडणे हा धर्म नव्हे " ... हे नैसर्गिक साठे  काळजीपूर्वक वापरायला हवेत.  

ऐहिक विकास साधतांना नैतिक मूल्यांचे पालन ही  आपली सर्वांची नागरिक म्हणून जबाबदारी आहे. ईश्वराकडून फक्त माणसालाच  मन ,बुद्धी आणि विचारांची देणगी लाभली आहे.त्याचा वापर धर्मपालनासाठी करायला हवा.  उत्तम संस्कारांच्या बळावर मानवता धर्माचे पालन करणे आणि " खरा माणूस " बनणे  हा आपला धर्म आहे. 

देशांवर कोणतीही आपत्ती आली तर ह्या धर्माचे पालन अधिक  जागरूकतेने व्हायला  हवे. पांच वर्षांपूर्वी केवळ आपल्या देशांवर नाही तर सर्व जगावर आलेल्या महामारीच्या काळांत , अतिशय बिकट परिस्थितीत आपण नागरिकांनी अतिशय धैर्याने ह्या संकटाचा सामना केला ही  अभिनास्पद घटना आहे. 

लोकशाही मध्ये आपल्याला सर्व गोष्टी करण्याचे  " स्वातंत्र्य " मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला.  आपल्या मर्यादा सांभाळून ह्या स्वातंत्र्याचा  उपभोग स्वविकास आणि देशाच्या प्रगतीसाठी होणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षांत असे घडते का ? नागरिकशास्त्र आपण शाळेत शिकतो पण प्रत्यक्ष  जीवन व्यवहारांत ते शास्त्र आचरणांत आणले जात नाही. रस्त्यावरील रहदारीचे नियम हे सर्वांच्या फायद्यासाठीच केले असले तरी त्याचे योग्य रितीने पालन होते नाही आणि अनेकांना अपघाताला  सामोरे जावे लागते. 

प्रत्येक  नागरिकाला सुख ,शांतीपूर्ण जीवन जगावे असे वाटत असते.  आपले कर्तव्य प्रत्येकाने चोख बजावले तर समाजांत / देशांत आनंदी वातावरण राहील. ' सबका साथ ... सबका विकास ' ... साधायचा तर नागरिक म्हणून हा विश्वास आपण सार्थ  करायला हवा. घटना , कायदे कितीही केले तरी जोपर्यंत आपल्या मनांत आपल्या देशाविषयी प्रेमभावना निर्माण होत नाही आणि देशबांधवांसाठी करूणा  उत्पन्न होत नाही तोपर्यंत कवियत्री बहिणाबाईंच्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकणार नाही.बहिणाबाई त्यांच्या कवितेत म्हणतात ..... 

 " मानसा ! मानसा ! कधी व्हशील मानूस ? ? "

एक नागरिक म्हणून मानवता धर्माचे पालन करणे  हा आपला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सर्वतोपरी त्याचे पालन आपण  सर्वजण  करूया. 


सौ . स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई.. 

मोबाईल नं . ९८३३०१७०७४

०२/०१/२०२६







No comments:

Post a Comment