Sunday, December 20, 2020

कृष्णमाय ( गीताव्रती सुलभताई फळणीकर )

                                                                          ।। श्री शंकर ।।             

                                                                                                                   गीताजयंती २५/१२/२०२०


                                                                       कृष्णमाय  


" आधी आई मधे मी कृष्णाला पाहत होते, आता मला त्या कृष्णामधे माझ्या आईचाच भास होतो " भावुक होऊन सुषमाताई माझ्या जवळ त्यांच्या आईचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होत्या. सुषमाताई पुढे म्हणाल्या "आई गेली आणि हा दुःखावेग सहन करण कठीण  झालं. पण एकाएकी एक गुपित मला समजलं आणि माझं मन मोकळं झालं. कृष्ण रूपांत पूर्णपणे एकरूप झालेली आई आता कृष्ण रूपाने आमच्या सर्वांच्या पाठीशी उभी आहे. आईच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीत मला जीवनाचा खरा अर्थ उलगडला. गीता हि अनेकांना जीवनाधार देते ".  

सुषमाताईंची आई गीताव्रती होती. संपूर्ण आयुष्य त्यांनी गीतेला वाहून घेतले होते. 

" सुलभाताई  फळणीकर "......माहेरच्या प्रभुदेसाई. कोकणात राजापूर जवळ तळवडे  येथे राहणाऱ्या.  त्यांचा जन्म १९ ऑगस्ट, १९२७ चा. शालेय शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंत. सुरवातीला काही वर्षे त्यांच्या मोठ्या बहिणीकडे शिपोशीला राहत होत्या आणि नंतर मामांकडे .  मामांचा त्यांना मोठा आधार लाभला. मामा मुंबईत दादरला राहत होते. अशा रितीने सुलभाताई मुंबईत दाखल झाल्या. 

लग्नानंतर सुलभाताई बॉम्बे सेंट्रलला रिझर्व्ह बँक स्टाफ कॉलनीत  स्थायिक झाल्या. संसारात स्थिरस्थावर होऊन मुले मोठी झाल्यावर त्या गिरगाव येथील ब्राह्मण सभेच्या सभासद झाल्या. सुलभाताईंचा पिंड मुळातच खूप हौशी. उत्साहाचा झरा त्यांच्यात कायमच वाहत असे. त्यामुळेच ब्राह्मण सभेच्या विविध स्पर्धात त्यांचा सहभाग असायचा. विविध पाककला स्पर्धात त्या भाग घेत. शिवणकाम करताकरता त्यांना बाहुल्या बनवण्याचा छंद जडला. ह्या निमित्ताने दूरदर्शन वर त्यांची मुलाखत प्रक्षेपित झाली होती. 

संसारी जीवनांत विविध छंद जोपासत असतानाच त्यांना भगवद्गीतेच्या पठणाचा छंद जडला. मैत्रिणीबरोबर त्या ललिताबाई गोडबोले ह्यांच्याकडे जाऊन गीतेची संथा घेऊ लागल्या. त्यासुमाराला त्यांचे वय होते ४५. तेव्हा त्यांना गीतेचा ध्यास लागला तो अगदी अखेरचा  श्वास घेईपर्यंत कायम होता.संपूर्ण गीता त्यांना पाठ होती.  गीतेच्या विविध  पाठांतर स्पर्धात त्या भाग घेत आणि त्यांचे  स्पष्ट शब्दोचार, म्हणण्याची पद्धत आणि गीतेला साजेसे त्यांचे सोज्वळ रूप ह्याची मोहिनी परीक्षकांवर न पडली तरच नवल. सलग तीन वर्ष ह्या स्पर्धेत बक्षिस म्हणून मिळालेली ट्रॉफी, म्हणजेच अर्जुनाचे सारथ्य करताना, गीतेचा उपदेश करताना रथारूढ असलेली श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या घरात विराजमान होती . मुंबईत अनेक ठिकाणी तसेच पुण्यात  गीतेच्या स्पर्धेच्या निमित्ताने जाऊन त्या बक्षिस घेऊन येत असत. यजमानांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता आणि त्यांची हि आवड जोपासायला कुटुंबातील सभासद तत्पर असत.आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा गीतेचा वारसा पुढे चालवत आहेत.त्यांची कन्या श्रीमती इला जठार ह्याही आई प्रमाणेच विविध कलांमध्ये प्रवीण आहेत.   

यजमान निवृत्त झाले आणि कायमस्वरूपी सुलभाताई  पार्ल्यात " स्नेहधारा  " मध्ये राहायला आल्या. स्नेहधारातील स्नेह त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वात उतरला आणि त्यांचे जीवन अधिक बहरले. अनेक जणांना त्यांनी  हसत हसत गीता शिकवली. कोणी गीता शिकायची इच्छा प्रकट केली कि बाई अगदी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मनापासून शिकवीत. पार्ले टिळक शाळेतील मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. हे सर्व अगदी आनंदाने आणि निरपेक्षपणे. कोणताही मोबदला न घेता. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन" उत्तम वरिष्ठ नागरिक " ( Best Senior Citizen ) हा पुरस्कार त्यांना मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातर्फे देण्यात आला. त्यावेळचे तत्कालीन आयुक्त श्री. शरद काळे ह्यांनी बाईंच्या निःस्वार्थी  कार्याचा खूप गौरव केला. शालेय शिक्षण कमी आहे, म्हणून कुठेही मागे न राहता बाईंनी धडाडीने, आत्मविश्वासाने गीता प्रसाराचे महनीय कार्य केले ह्याचे त्यांनी कौतुक केले. 


पार्ल्यातील नामांकित जुनी संस्था म्हणजे " टिळक मंदिर ". ह्या संस्थेत त्यांनी गीतापठणाचे वर्ग सुरु केले. अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने चालू होता. साधी नऊवारी साडी, कपाळावर मोठे कुंकू आणि गळ्यात   काळ्या मण्यांची पोत. दर शनिवारी बरोबर पाच वाजता बाईची  प्रसन्नवदना  मूर्ती क्लास मध्ये हजार झाली कि वेगळेच चैतन्य प्रगट होत असे. सुषमाताईंशी बोलताना त्या म्हणाल्या " कृष्ण आपली वाट बघत असतो आणि आपल्याला मार्ग दाखवत असतो ". ह्या त्यांच्या शब्दांचा प्रत्यय म्हणजेच बाईंशी झालेली माझी भेट. त्यांच्यामुळेच मी तिशीतच गीता शिकले आणि आजही त्यांची हि शिकवण मला जीवनात मिळालेली  मोठी  ठेव आहे असे मी समजते .  बाईंच्या मृदू ,निगर्वी  स्वभावाची, साधेपणाची, त्यांच्या गीता प्रेमाची माझ्या  मनावर मोहिनी कायम आहे. रोज गीता वाचताना मला बाईंची खूप आठवण  येते. 

गेले काही वर्षे बाई आजारी आहेत, उठू  शकत नाही असे ऐकून होते. दुखण्याने त्या त्रस्त  होत्या कंटाळला होत्या. पण मुखात , कानात आणि मनांत सतत गीताचं होती. अनेक दिवसात त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही. मध्यंतरी  सुषमाताईकडून  बातमी समजली आणि मन बेचैन झाले. १५ ऑगस्ट २०२०, स्वातंत्र्यदिन आणि अजा  एकादशीच्या दिवशीच बाई  देहबंधनातून स्वतंत्र होऊन कृष्ण रूपात एकरूप झाल्या. 

गीताव्रती सुलभाताई नुसत्याच गीता शिकवत नव्हत्या तर गीता प्रत्यक्ष जगत होत्या. मुक्तहस्ते हे देणं समाजात वाटून स्वतःबरोबर दुसर्यांनाही आनंद देत होत्या. सदोदित प्रसन्न राहून, हसतमुखाने माणसांना जोडून ठेवत होत्या. अशा काही व्यक्तींच्या कार्यामुळेच समाजधारणा होत असते. समाजाचे उन्नयन होते. 

गीतेतील एक श्लोक त्यांच्या कार्याची  ओळख करून द्यायला पुरेसा आहे. 

                             कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफल  हेतुर्भूर्मा  ते संगोSस्त्व कर्मणी ।। 

आपल्या कामाची कोणतीही वाच्यता न करता ,फळाची अपेक्षा न ठेवता कार्यरत असणारी जुनी- जाणती पिढी स्वतःच्या पाऊलखुणा पायवाटेवर ठसवत अस्तंगत होत आहे. आज प्रत्येक गोष्ट सोशल  मीडियावर शेअर  करणाऱ्या भावी पिढीला ह्या पिढीकडून खूप शिकण्यासारखे आहे. 

बाई !! अखेरच्या दिवसात तुमची भेट झाली नाही तरी हि शब्दरूपी भेट तुमच्या पर्यंत पोचवावी म्हणून मी  लिहिती झाले.गीताजयंतीच्या निमित्ताने  श्रद्धांजली अर्पण करून तुमच्या कार्याची थोडक्यात ओळख करून द्यायचा हा अल्पसा प्रयत्न.  टिळकमंदिरात अनेक वर्षे मी तुमच्यासोबत संपूर्ण १८ अध्याय दर एकादशी आणि गीताजयंतीला म्हणत आले आहे. मी तो परिपाठ आजही चालू ठेवलाय बाई. आणि हो ! तुमचे कार्य थोडक्या अंशाने का होईना सुरु ठेवलेय.   
हे सगळं जरी असलं तरी संपूर्ण गीता कंठस्थ व्हावी हे माझं स्वप्नं आहे पण आजही ते पुरे करू शकले नाही. तुमच्या आशीर्वादाने माझं हे स्वप्न पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. 

श्रीकृष्णार्पणमस्तु .... 


सौ .. स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com





Saturday, December 12, 2020

Gruha Saukhya (गृहसौख्य )......

                                                                       ।। श्री  शंकर  ।।

गृहसौख्य 

कॅलेंडर वर्ष  २०२० मध्ये तुम्हाला अनपेक्षित  गृहसौख्याचा लाभ होणार आहे असे कोणी ज्योतिषाने सांगितले  असते तर तुम्ही विश्वास ठेवला असता का ? अहो, आपल्या वास्तूच्या चार भिंतींचे महत्व किती अनन्य साधारण आहे  हे कळावं, म्हणूनच करोना  विषाणूचा फ़ैलाव एवढ्या वेगाने झाला असावा. ह्या साथीने  संपूर्ण जग हादरलं. स्तब्ध झालं. ह्या संकटाचा सामना करण्यासाठी सुरवातीला काही महिने स्वतःच्या घरीच राहा. अगदी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा संदेश अगदी पंतप्रधानांपासून अनेकांनी  दिला. आपापल्या घरामध्येच मग सर्वजण बंदिवान झाले. ऑफिसच्या कामापासून  शक्य  तेव्हढे  सर्व जीवनव्यवहार  घरातूनच व्हायला सुरवात झाली . 


सुरवातीला मर्यादित  काळापुरताच lockdown असेल असं वाटत असताना हा कालावधी  खूप वाढत गेला. त्यामुळे वास्तूचे सुख आम्ही अनुभवले आणि आमच्या सहवासाने वास्तू  आनंदीत झाली. घराला घरपण देणारी सर्व माणसे पूर्ण वेळ घरातच होती ना? ह्या सर्व काळांत वास्तूचं अंतरंग अनुभवलं. ऑफिसच्या धावपळीमुळे घरातील वास्तव्य अनुभवता येत नव्हते ह्या काळांत ते उपभोगता आले.                                                                                                                                           
भरपूर वेळ मिळाल्यामुळे  स्वैपाकघरांत अनेकानेक प्रयोग करून बघितले. बैठकीच्या खोलीचा वापर तर फिरत्या रंगमंचासारखा झाला. ऑफिसचे काम ,मिटींग्स ,घरच्या मंडळींसोबत गप्पाटप्पा तर कधी योगासने, व्यायाम, शतपावली हाच हॉल कधी नाटकाचा रंगमंच तर कधी सिनेमा हॉल. हळूहळू ऑनलाईन कार्यक्रम सुरु झाले. मग  गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वादही  घेतला. भजन, कीर्तन रसांत मनसोक्त डुंबलो. 

गुढीपाडव्यापासून सुरु होणारे अनेक सण घरातंच  साजरे झाले. रामनवमीला बारा तास अखंड रामनामाचा नाद  ह्याच वास्तूत घुमला. अनेक स्तोत्रांच्या पठणाने वास्तूचेही कान तृप्त झाले. घरातच मंदिराचा अनुभव घेतला. ह्या सगळ्यांत वेळ कसा तो पुरतच नव्हता.

मनातल्या भावना व्यक्त करण्याची प्रेरणा मला माझ्या वास्तुतच मिळाली आणि त्यानुसार ब्लॉग लिहिणे चालू झाले.  Bucket list मधील अनेक स्वप्नांची पूर्तता अशा रितीने  ह्या काळात झाली. 

मुंबई सारख्या शहरांत एवढी  असीम शान्तता प्रथमच अनुभवायला  मिळाली. स्वतःच्या मनांत डोकावून बघायला हाच उत्तम काळ होता. " If you cannot go outside, go inside " ह्या tagline ने लक्ष वेधून घेतले. वाचन, मनन, चिंतन  ह्यासाठी वेळ देता आला. भीषण आपत्तीच्या काळांत  मानसिक बळ मिळाले ते ह्यामुळेच.
 
मनांत दाटलेले कारुण्य मोकळे झाले ह्याच वास्तूत. सकाळी गच्चीवर फेऱ्या मारतांना चराचर  उजळवून टाकणारा सूर्यप्रकाश मनावर आलेले निराशेचे मळभ क्षणार्धात दूर करत असे. घराभोवतालचा निसर्ग सुद्धा मनाची मरगळ घालवून मनाच्या प्रसन्नतेत भर घाले.    

शरीर आणि मनाला विसावा देणारं हे आपलं घर. बाहेरच्या कठीण परिस्थितीत ह्या वास्तूचा आधार मनाला खूप  दिलासा देणारा होता. करोनाच्या विषाणूंना घराबाहेरच थांबवण्याचे सामर्थ्य ह्या भक्कम वास्तुतच आहे ह्याची जाणीव खूपच सुखावणारी होती. ही वास्तू अशीच कायम आनंदी राहावी, सौख्यदायी व्हावी अशी मनोभावे प्रार्थना केली.  ... वास्तूदेवतेनेही आशीर्वाद दिले ...  तथास्तु ...  तथास्तु... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 
sneha8562@gmail.com

Friday, November 13, 2020

Jyotis Milalya Jyoti ( ज्योतीस मिळाल्या ज्योती )

                                                       ।। श्री शंकर ।।

                                           ज्योतीस मिळाल्या ज्योती 

लीस ग बाई तू ... यावर्षी थोड्या उशीरानेच आलीस खरी ...आम्हां सर्वांच्या अंतःकरणात लावायला आशेचा दीप घेऊनच आलीस ... घनतमी मनामनांत प्रकाशाची ज्योत उजळायचे सामर्थ्य तुझेच ... आबालवृद्ध सर्वांचीच तर तू लाडकी.. सर्वावर तुझी मोहिनी स्वार  होते ... अशी तू मनमोहिनी .. सर्वानाच  रिझवणारी  !

ह्यावर्षी खरं तर सगळी जीवनघडी पार विस्कटलेली ! त्यामुळे तुझं स्वागत कसं होतयं ह्याची खरं तर चिंताच होती .पण आम्ही सर्व उत्सवप्रिय. सणवार ,परंपरा उत्साहाने सांभाळतो . तो उत्साह आता वातावरणांत  जाणवतोय . हे उत्फुल्ल वातावरण पाहिलं कि जगायला एक वेगळच बळ मिळतं .  

अगं केव्हढं तुझं ते जोरदार स्वागत !आम्ही  घराघराचा कोपरा आणि कोपरा झाडून पुसून लखलखीत करतो. दुकानांत हिsss गर्दी करून खरेदी. वेगवेगळे गोड तिखटाचे फराळाचे  पदार्थ. केव्हढी हौसेने सगळी तयारी . घराच्या सारवलेल्या अंगणात नक्षीदार रंगीबेरंगी रांगोळीचे ठिपके. नाजूक हाताने काढलेल्या रेषा आणि भरलेले रंग ,जणू नात्यातलेच  मधुर भावबंध.सुगंधी अत्तर ,तेल उटणे लावून केलेली अंघोळ सगळा  शीण  घालवणारी  , मला माझ्या आजीची तीव्रतेने आठवण करून देणारी हि पहाटेची अंघोळ. अगदी थरथरता  हात कसा मायेने फिरायचा  अंगावर ,तेल उटणं लावताना.  ह्या सणाच्या दिवसांत  पाहुण्यांची उठबस ,गोडधोड पक्वानांचे जेवण ,भेटवस्तूंची देवाणघेवाण . 

नरकासुराचा वध  करून आनंद साजरा करायचा,सुगृहिणीच्या पाककौशल्याचा आस्वाद घ्यायचा .  घरीदारी वसणाऱ्या वैभवाची ,धनाची पूजा करून, अलक्ष्मीला दूर लोटायचे. हे करताना मनाला हि निर्मळ करायचे . नवरा बायकोतला स्नेह वाढवायचा आणि भाऊ- बहिणीच्या मायेचा गोडवा गायचा हि करामत तूच करू शकतेस बाई .. चार दिवस कसे आनंदाचे , मौजमजेचे .. चिंता, क्लेश ,दुःख सारे काही  विसरायचे ,जीवनातली लौकिक आणि पारलौकिक कसरत सांभाळणारी तर तूच. 

लवकर पडणाऱ्या गडद अंधाराच्या पार्श्वभूमीवर आकाशांत हळुवार ,मंद हेलकावे खाणारा आकाशदिवा आपल्या मनातही आनंदाचे कितीतरी तरंग उमटवीत असतो नाही. आणि त्याच्या जोडीला काळोखाचा छेद घेणारी तेजाची ज्योत , पणत्या ,मेणबत्या , त्यातही आता किती नाविन्य ..रंगीबेरंगी दारूकाम ..  हौसेला मोल नाही हेच अगदी खरं ... एकेका ज्योतीने दुसरी ज्योत लावून ओळीने लावलेले दिवे हीच तर तुझी खासियत . दिपावली ... 


आत्ता मला कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आठवली. आकाशातल्या चांदण्या हि परमेश्वराचीच पाऊलचिन्ह आहेत. तो सतत फिरणारा प्रवासी. दिवाळीच्या दिवसांत पृथ्वीवरील सौन्दर्य टिपण्यासाठी दिवे बनून हि प्रकाशाची वाट दाखवायला तर तो येत  नसेल ना ?  तुझी भुरळ त्यालाही पडतेच तर !मग आम्हां सामान्यांची काय कथा ! 

ऋतूबदलामुळे वातावरणांत होणारे बदल,सुखावणारा गारवा आणि अश्या पहाटेच्या वेळी कानावर पडणारे मैफिलीतले सूर... अहाहा .. कलावंतांची कला अशा वेळी बहरते . कलाकारांना जसं प्रोत्सहन मिळतं तसंच अनेक उद्योग व्यवसायांना तुझ्या आगमनाने उर्जितावस्था येते. थोडक्यात काय सगळ्यांना अगदी भरभरून आनंद देतेस. आपलं मन ,वृत्ती तरल असली कि अगदी मनसोक्त हा आनंद लुटता येतो .

 हीच वृत्ती भगवंतापाशी स्थिरावली कि मग काय बारा महिने दिवाळीच. त्या आनंदाला ओहोटी लागतच नाही. त्यासाठी अंतरात्म्यांत दीप प्रज्वलीत करायचा सकारात्मतेचा . आणि ह्या ज्ञानदीपाने अज्ञानाचा अंधःकार दूर करायचा . देहाचा दीप करून तोच परमेश्वराच्या भक्तिसाठी जाळणाऱ्या आणि "क्षणभर उघड नयन देवा " अशी त्याची आळवणी करणाऱ्या साधिकेची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली बघ .  

इतकी वर्ष सातत्याने येतेस . तुझ्या  भरपूर आठवणी, भेटीदाखल मिळालेल्या वस्तूंचा,  खजिना जमा होतो    ह्या खजिन्याच्या मालकीच्या  भावनेनेच (  ( Pleasure of  possession ) आम्ही  सुखी, आनंदी होतो. एक प्रसंग आठवला बघ  ह्यावरून.... 

दिवाळीच्या  निमित्ताने काकासाहेब दीक्षित ह्यांच्या घरचं वातावरण आनंदाने फुलले होते. बरीच पाहुणे मंडळी त्यांच्याकडे आली होती. दासगणु  महाराज सुद्धा त्यांच्याच घरी उतरले होते. साईबाबांविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे , गुरुप्रेमाच्या ओढीने यांच्यात अनोखे स्नेहबंध निर्माण झाले होते. 

दिवाळीचा सण असल्यामुळे काकासाहेबांच्या  घरातील सर्व बायका नवे वस्त्र -अलंकार घालून मिरवित होत्या.  अंगावर जुनेर कसबसं गुंडाळलेली त्या घरांत काम करणारी पोरसवदा मुलगी कारुण्यपूर्ण आवाजात कोणतेतरी गाणे गुणगुणत होती. तिच्या स्वरातील कारुण्याने दासगणू महाराज अस्वस्थ झाले. महाराजांनी  त्या मुलींसाठी नवे कपडे आणवले आणि  दिवाळीची भेट म्हणून तिला दिले. . 

दुसऱ्या दिवशी ती मुलगी मोठ्या आनंदात कामाला  आली.अंगावर जुनीच वस्त्रे होती पण काल  मिळालेल्या भेटीचा आनंद आज  तिच्या गाण्यातून ओसंडून वाहत होता. आपल्याजवळ असलेल्या वस्तूच्या मालकीचा हा आनंद होता.   कालचा करूण  रस कुठच्याकुठे पळाला होता. 

आजूबाजूला असणाऱ्या आपल्याच बांधवांच्या आयुष्यात असाच तेजाचा एखादा दीप आपणही लावला तर त्या  छोट्याश्या कृतीने तुलाही आनंदच होईल ... जाता  जाता  तुही  मोहरून जाशील ... 

. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम कि गंगा बहाते चलो ... ह्याचा प्रत्यय घ्यायला मग  काय हरकत आहे ? 

दीपावली आणि नूतन वर्षाचे अभिष्टचिंतन ... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर

sneha8562@gmail.com 




Thursday, November 5, 2020

                                                                ।।  श्री शंकर  ।।


                                                      परिस्थितीचे जरा भान ठेवा  


" जल्लोष  आहे आता उधाणलेला ! " ह्या मथळ्याची बातमी महाराष्ट्र टाइम्स च्या ५ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली. करोनाच्या वैश्विक  संकटाने  संपूर्ण देशाचे प्रकृतीमान  बिघडले आहे आणि अशा परिस्थितीत "जिवाची मुंबई" करण्यासाठी तरुण, तरुणींनी पर्यटनासाठी मुंबई बाहेर धाव घेतली आहे, ह्या  बातमीने मन विषण्ण झाले.  

करोनाचा प्रादुर्भाव होऊन निर्बंध लागू झाले त्याला आता  सहा महिने होऊन गेले. पायरीपायरीने लॉक डाउन  शिथिल होत आहे, जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण आगीची धग अजूनही जाणवतेय. अनेकांची उपजीविकेची साधनेच हिरावली गेली आहेत. त्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली आहे. अनेक उदयोगधंद्यांची वाताहत झाली आहे. . 

पर्यटन व्यवसायालाही अर्थातच मोठ्ठा फटका बसला आहे. त्यांचा सुगीचा काळ लॉक डाउनने हिरावला. राज्य शासनाने हॉटेल, रेस्टॉरंट्सना परवानगी दिल्यामुळे आता ह्या व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्पन्नाचे त्यांचे साधन चालू होणे अगदी गरजेचे आहे. त्या एका उद्योगावर बाकी अनेक लहान मोठे व्यावसायिक अवलंबून असतात. 

पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या कुटुंबीयांनी चेंज म्हणून घराबाहेर  पडताना सर्व परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.स्वतःचे आणि  कुटुंबाचे आरोग्य, सरकारी व्यवस्थेवर येणारा ताण, आर्थिक बाबींचा  विचार, मुलांची शाळा  (ऑनलाईन  असली तरी ), त्यांचे झालेले  शैक्षणिक नुकसान, ह्याचा जबाबदार पालक म्हणून विचार करणे गरजेचे  आहे. 

हॉटेलमालक स्वतःचा बुडलेला धंदा सावरण्यासाठी पर्यटकांना विविध प्रलोभनांचे आमिष दाखवत आहेत. ह्या प्रलोभनांना आपण बळी पडणार नाही ह्यासाठी पर्यटकांनी (ग्राहकांनी ) सतर्क राहणे गरजेचे आहे. 

तरुण, तरुणींचा पर्यटनाचा उत्साह ह्यावर काय बोलावे ? आजची  तरुण मंडळी ( काही अपवाद वगळता ) फारच बिंदास्त वावरत आहेत. विकेंड ला अनेक हॉटेल्स/ रिसॉर्ट्स फुल्ल असतात. आजचे  नकारात्मक वातावरण  केवळ पर्यटनाने दूर  होईल असा भाबडा विचार ते करतात का ? त्यांच्या  सळसळत्या उत्साही जीवनांत  विधायक कामे करून सकारात्मकता आणता  येणार नाही का ? ज्याची आज समाजाला खरी गरज आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव खाजगी वाहनाने प्रवास करण्याला पर्यटक पसंती देत आहेत. पण रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे  आधीच  प्रचंड ताण  असणाऱ्या पोलिसांवर/ आस्थापनांवर  अतिरिक्त कामाचा बोजा आपण टाकत तर नाही ना ह्याचा सुजाण पर्यटक विचार करतील का ? उपासमारीच्या संकटामुळे गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यांत  अनेकांना लुटल्याचे प्रकार वाचनात  येतात. तीही खबरदारी प्रवास करताना घेणे आवश्यक आहे.  

  अलीकडे  बातम्यांची शीर्षकं, नवनवीन तयार करण्यात येणारे शब्द, वाचकांच्या हळूहळू पचनी पडू लागले आहेत. ."उधाणलेला " शब्द त्याचेच छापील  उदाहरण.  बातम्या प्रसारित करताना भाषा शुद्ध असावी ह्याचा  विचार वार्ताहर करतील का ?

 नागरिकांनो तुमच्या उत्साहामुळे " आमचा जीव जातो " असे म्हणण्याची वेळ आणू नका.  बिघडलेल्या परिस्थितीचे  गांभीर्य ओळखून जरा जबाबदारीने वागा .... . 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर 

मेल : sneha8562@gmail.com

09/10/2020


Wednesday, October 21, 2020

गोंधळाला या ...(Gondhalala Ya....)

                                                         ।। श्री शंकर ।।

                                                       गोंधळाला या ...

षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो I घेऊन दिवट्या हस्ते गोंधळ घातला हो II 

उदे अंबे उदे   उदे अंबे उदे ।। ... 

हे शब्द कानावर पडले कि वातावरणांत  एक वेगळाच उत्साह संचारतो.. हृदयात मावणाऱ्या भक्तिरसाचा उदय  होतो... भवानी मातारेणुकादेवीकरवीरनिवासिनी अंबामाता ... देवींची विविध रूपे डोळ्यासमोर उभी राहतात. वात्सल्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेली हि देवीची रूपे म्हणजे जगन्मातेचीच रूपे..

नवरात्रांत ह्या विविध रूपांची आराधना करून त्या आदिशक्तीला आपण प्रसन्न करून घेतो. बहुजन समाजात भूमातेचा/ निसर्गाची पूजा म्हणून  साजरा केला  जाणारा हा उत्सव आता अधिक व्यापक झालाय. देवी म्हणजेच प्रकृती / आदिमाया / आदिशक्ती. विविध अंगाने केली जाणारी तिची  उपासना . पूजे -अर्चेबरोबरच, नामजप , स्तोत्रपठण, होमहवन ह्या साधनांनी हि उपासना अधिकच बहरते . 

महाराष्ट्राला लोककलांची  समृद्ध परंपरा लाभली आहे. वासुदेव, भारूड, जोगवा, गोंधळ असे अनेक प्रकार देवदेवतांच्या उपासनेसाठी योजिले जातात. त्या देवतेला प्रसन्न करून घेतले जाते. ह्यातीलच एक प्रकार " गोंधळ "

ग्रामीण भागांत आजही प्रचलित आणि लोकप्रिय असलेला गोंधळ. अंगात लांब घोळदार अंगरखा, गळ्यांत कवड्यांची माळ, डोक्यावर पगडी, साथीला हातात तुणतुणे, जवळ प्रकाशाची वाट दाखवणारी दिवटी. देवीचे उपासक असणारे हे गोंधळी, देवीची स्तुती, स्तवन करतात. कुलदेवीच्या उपासनेसाठी हा गोंधळ प्रामुख्याने असला तरी इतर देवतानाही आमंत्रित केले जाते.  साथीदारांबरोबर घातलेला हा गोंधळ खूप रंजक असतो. अनेक घरांमध्ये प्रथेप्रमाणे, कुलाचार म्हणून किंवा कार्य समाप्तीनंतर ह्या कार्यक्रमाचे आयोजन  केले जाते. गोंधळाचा बाज एकंदरच भारदस्त असतो. भक्तिरसाबरोबरच वीररसाचा परिपोष इथे दिसतो. ऐकताना आपण ह्या कथानाट्यात  बुडून  जातो. त्यामुळे स्फूर्ती मिळते, उत्साह वाढतो. 

लहान मूल दुसऱ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी गोंधळ घालते. स्वतःच्या मागण्या पुऱ्या व्हाव्या म्हणून आईकडेच हट्ट करते. तीच गोष्ट भक्तांची. त्यांना आईचे वात्सल्य हवे तर ते गोंधळ घालतात. मग त्यांचे लाड पुरवले नाही तर ती आई कसली ?

मनामनांत असलेला गोंधळ, अस्थिरता  कमी होऊन संसारातील नश्वरता जाणून, परमार्थातील शाश्वत मार्गाकडे नेणारा  ... संसार आणि परमार्थाची सांगड घालणारा  ... अंबेचा  गोंधळ ... भक्तिमार्गातील गोंधळ 


असाच भक्तीचा गोंधळ संतकवी दासगणु महाराजानी घातलाय. त्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठोबालाच मातेच्या रूपांत बघून गोंधळाच्या माध्यमांतून तिची आळवणी केली आहे. मातेच्या वत्सलतेचा वर्षाव व्हावा म्हणून तिची स्तुती केली आहे. 

महाराज म्हणतात, ह्या बयेने  त्रिभुवनांत  ठाण  मांडले  आहे, आपल्या  त्रितापांचें  हरण करण्यासाठीतिला शरण जाऊन तिच्या भक्तिरसात रंगून जायला हवे. पंढरपूरस्थित हि बया सगुणरूपाने विटेवर उभी राहून, कटीवर हात ठेवून आपल्या भक्तवरांची वाट पाहत युगानुयुगे उभी आहे.

ह्या बयेनेच  महाराजाना नरसिंह रूपांत दर्शन दिले त्या उग्र रूपाचे  वर्णन इथे केले आहे. " सवा हात लळलळे जीभ तो वन्ही तृतीय लोचनी " ते अक्राळविक्राळ  रूप  प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर   प्रगट होते.

भक्त प्रल्हादने स्तवन करून आपल्या उत्कट भक्तीने  त्या नरसिंहाला शांत केले ह्या पुराणकथेचा उल्लेख केला आहे . 

दशावतारातील वामन अवतार, राम अवतार आणि कृष्णावतारांतील विविध कथांमधून ब्रह्माच्या  सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन महाराजांनी  केले आहे. " ती हि विठाई मनी इच्छी शबरीच्याउष्ट्या फळा " अगदी मोजक्या शब्दात महाराज त्यांच्या  काव्यातून कथांचा हा  विस्तृत पट आपल्या समोर उभा करतात. महाराजांच्या लेखणीचे हे  सामर्थ्य त्यांच्या सर्व वाङ्मयांत प्रत्ययाला येते. 

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वर्णन करताना दासगणु  महाराज म्हणतात "संत शिरोमणी साधू देहूकर, अहो तुकाराम महाराज! तयाचे गुण वानू कुठवर ? "अनेकविध संतांनी आपल्या दैवी गुणांनी ह्या मातेचा गोंधळ घालून तिची कृपा संपादन केली आहे.. तिला आपल्या हृदय मंदिरात बंदिस्त केले आहे.  त्यांच्या  चरित्रात  हि अनन्य भक्ती पहायला  मिळते . 

आपल्यासारख्या साधकांना अतिशय वात्सल्याने महाराजांनी पारमार्थिक वाटचाल कशी करावी , त्याचे   मार्गदर्शन केले आहे. सुंदर रूपकाच्या माध्यमांतून हा भक्तिमार्ग कसा अनुसरावा त्याचे वर्णन केले आहे. षड्रिपूंचा बळी द्यायला हवा. दृढ निश्चयाचा अंगरखा, सद्गुणांचे तुणतुणे, आशेचे तेल, वैराग्याचा पोत, किर्तीरुपी संबळ, पायात निरिच्छेची घुंगुरे बांधून हि वाटचाल केली तर परमशांतीचा लाभ होईल. 

विठूमाऊलीने दृढ आलिंगन द्यावे म्हणून महाराजांचा जीव व्याकुळ झाला आहे ती आस त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होते. .त्यासाठी मातृहृदयातील वत्सलतेला त्यांनी आवाहन केले आहे. तिच्याच कृपेने  मायेचा पट  दूर सारून ह्या प्रकृतीच्या पल्याड असलेल्या एकमेवाव्दितीय पुरुषाचे दर्शन व्हावे म्हणून महाराज गोंधळ घालत आहेत. 

नवरात्रीच्या निमित्ताने ह्या तेजाची/शक्तीची  उपासना घडावी, ऊर्जा मिळावी, कृपा संपादन व्हावी म्हणून  --चला चला ...आईचा गोंधळ घालूया .. भक्तिरसात रंगून जाऊया .. .. उदे अंबे उदे.. उदे अंबे उदे.

 

स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com