Wednesday, January 26, 2022


                                                                         ।। श्री शंकर ।। 

प्रिय आई ,

न सांगता ,सवरता   अचानक निघून जाताना ,मनाला चटका लावून गेलीस. मनातल्या तुझ्या आठवणी .प्राजक्ताच्या फुलांसारख्या टपटप पडतायत सभोवार ... हळुवार काव्यांत गुंफून  साधतेय तुझ्याशी संवाद . पोचतील  का ग माझे भाव  आता तुझ्या अंतःकरणात   ?

***************************************************************************

                                                                                          श्रीमती सुलेखा विष्णु किंजवडेकर 
' थकलीस गे माय ? ' एकदम आभाळात जाऊन विसावलीस ?

मातृत्वाची शाल तिथून आता आमच्यावर पांघरलीस ।।

सासर - माहेर वत्सलतेच्या धाग्याने तू जोडलेस ,

संसारातील कुलधर्म ,कुलाचार कसोशीने सांभाळलेस ।।

अव्यक्तातून व्यक्त झालीस ,शांतपणे बरसत राहिलीस ,

हिमालयाच्या सावलीत स्वतःचे अस्तित्वही विसरलीस ।।

पतीसमवेत कुटुंबाची / गुरूंची सेवा मनोभावे केलीस ,

' पतिव्रता " धर्माने पुण्याई तू जोडलीस ।।

ना कोणी परके ,सगळ्यांनाच मानलेस  आपले ,

सर्वांच्या आवडीनिवडीचे मर्म चाणाक्षपणे हेरलेस ।।

' सुगरण ' तू ! तुझ्या हातच्या चवीला काय  देऊ उपमा  ?

पाककौशल्याने तुझ्या तृप्त केलीस सर्वांचीच रसना  ।।

उतारवयांत नाम ,जप ,साधनेत , मनापासून  रमलीस 

मुलांच्या संसारातून ' अलगद ' निवृत्तही  झालीस ।।

शांत ,संयत ,समाधानाने व्यतीत केलेस जीवन ,

योग्य वेळी गुरुचरणी समर्पिलेस तन- मन ।।

चंद्रासम  तुझे  अस्तित्वही शीतल ,मनोहर !

चंद्रभागेच्या जलौघासम ,आता  मन झाले   अनावर ।।

' माय -बाप ' विठ्ठल ! माऊली च्या रूपांत विटेवर ! 

आतुरतेने डोळे भरून वाट पाहिलीस का रे भक्तवर ?

माझे माहेर पंढरी ! पंढरी ! ओढ उरांत दाटली ,

माऊलीची आर्त हाक ,खोल डोहांत उमटली ,खोल डोहांत उमटली .... 


तुझीच ताई .... 


स्नेहा भाटवडेकर 

२८/०१/२०२२

sneha8562@gmail.com