Wednesday, August 24, 2022

Sarata Shravan सरता श्रावण

                                                                   ।। श्री   शंकर  ।।

   सरता श्रावण 

" निघतो गं " तो जवळ येऊन हळूच कानाशी कुजबुजला. 

" अरे इतकी कसली ती निघायची घाई ? " मी काकुळतीने विचारले. 

थांबायचं ना थोडं , अजून पुरती गळाभेट झाली तरी कुठे ?

मन अजून भरलं नाही , तुझं रूप हृदयांत पुरतं ठसलं हि नाही !

नटखट कृष्णासारखा तुही असा फसवशील ,नव्हतं रे वाटलं. 

तू असता तो ही जवळ आहे  असं वाटायचं .. त्याच्या भक्तिरसात मन गुंतून जायचं .. 

" अगं वेडे ! विसरलीस एवढ्यात आपल्या भेटीगाठी ? "

शिव मंदिरातील सोमवारी होणाऱ्या रुद्राभिषेकात भेटतच होतो की आपण ... 

मंगळवारी फुगड्या एकत्रच खेळलो आपण ... 


शुक्रवारी जिवतीची पूजा पूजिली आपण ,

नागोबाला दूध पाजताना, नारळीपौर्णिमा साजरी करतांना ,भावाच्या हातावर राखी  बांधताना...

जन्माष्टमी साजरी होताना भक्तिप्रेमात गुंतलो ,कृष्णाच्या बाललीलांत हरवूनही गेलो ... 

सण ,व्रतं ,वैकल्यं साजरी करताना आपली सांस्कृतिक परंपरा जपताना विविध रूपं दाखवली मी तुला. त्या निमित्ताने नातेवाईक ,मित्रमंडळी एकत्र जमतात. नाहीतरी हल्ली पूर्वी सारख्या भेटी-गाठी राहिल्यात कुठे ?

निसर्गाच्या  हिरव्याकंच विलोभनीय रुपांतूनही भेटलो ना मी तुला कैकवेळा ...इंद्रधनुष्यातील सप्तरंग दाखविले मी तुला ... हीच तर माझी विविध रूपे ... भाळलीस माझ्या रुपावर कित्ती वेळा ? 

अरे पण ह्या सगळ्याची ओढ दाटते ना मनांत ? जिव्हाळा लावून आता का ही  परतीची भाषा ? "श्रावणमासीं हर्ष मानसीं " म्हणत गुंतलो ना आम्ही तुझ्यात ..... तुझ्या सरसरणाऱ्या धारांत अनुभवले चार सुखाचे क्षण ,भक्तिप्रेमात निवांत झाले मन... 

 पाणावलेल्या माझ्या पापण्यांवर अलगद मोरपीस फिरवताना, माझी समजूत घालताना म्हणाला,

आता आलाय मातृदिन. तेही माझेच तर रूप. " न परं मातृदैवतं  " खरं ना ! सारे सण उत्सव  तिच्या पायाशीच तर  नांदतात .... आणि ती तर सदैव अवती भोवतीच असते की लेकरांच्या... 

अगं ! तो बघ  " तो "  यायला निघालाच आहे.  तुम्ही त्याच्या सेवेत गुंतलात की माझ्याकडे लक्षं कोणाचं ?ऊन पावसाच्या खेळांत ,रिमझिम बरसणाऱ्या धारात तो मिश्कीलपणे हसत होता .

टाळ -मृदूंग ,ढोल ताशे ह्यांचा  आवाज आसमंतात निनादू लागला ... 

सरता श्रावण जाता जाता क्षितिजांवर गुलाल  उधळीत होता... 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com