Wednesday, September 9, 2020

जीवन साधना ( Jeevan Sadhana )

                                                                ।।श्री शंकर ।।

                                                                 जीवन साधना 

 छोटा - मोठा ,जवळचा -लांबचा किंवा देश- परदेशातला, प्रवासाला निघताना आपल्याला तयारी करावीच लागते. जिथे जायचे त्या ठिकाणाची  पूर्ण माहिती करून घ्यावी लागते. 

नेहेमी लागणाऱ्या सर्व वस्तुंबरोबरच,औषधें, जिथे जायचे त्यानुसार काही विशिष्ट गोष्टी हि घ्याव्या लागतात. तिकीट, परवाना ( Passport , Visa ),वेळेचे नियोजन ... सर्व आखणी व्यवस्थित झाली कि प्रवासाचा आनंद मिळतो. ज्या मुक्कामी जाणार ते वास्तव्य हि छान होते आणि आनंदात भर पडते. 

एकदा गंमत झाली. मी प्रवासांत कंगवाच घ्यायला विसरले. तशी साधीशीच गोष्ट. प्रवासांत मला कुठेही कंगवा मिळाला नाही. जिथे गेले तेही अगदी खेडेगाव. त्यामुळे "ना धड वेणी, ना धड फणी", अशा अवस्थेतच दिवस काढावा लागला. सांगितलं एवढ्याचसाठी कि अगदी छोट्याशा गोष्टीने सुद्धा किती अडचण होते ह्याचा अनुभव आला.  पुढच्या वाटचालीच्या  दृष्टीने हे असे प्रसंग खूप  काही शिकवून जातात. 

आपला जीवन प्रवास अगदी असाच असतो. छोटा प्रवास करताना आपण सगळी काळजी घेतो , मग हा तर दीर्घ प्रवास. किती काळजीपूर्वक हे सर्व नियोजन व्हायला हवं, की नाही ?आणि कुठे पोचायचे हे ध्येय ठरवावे लागते.  प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. कठीण प्रसंग आल्यावर अगदी ऐनवेळी धावपळ होते. कोणतेही कर्म करायचे तर त्यासाठी योग्यता, पात्रता असावी लागते. असलेली योग्यता वेळोवेळी मिळवावी लागते, त्यात वाढ करावी लागते. प्रत्यक्ष जीवन व्यवहार करताना जर काही तत्वांचे पालन केले, जीवनशैलीचा योग्य अंगिकार केला, तर पश्चाताप करायची वेळ फार कमी येते. हे सर्व  जीवनसूत्र ,भगवद्गीतेत सापडते. अभ्यासाने ते उलगडत जाते. 

श्रीमदभगवद्गीता हा भारतीय तत्वज्ञानातील एक अद्वितीय ग्रंथ. त्यामधील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश अलौकिक आहे. 

योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणभूमीवर हा उपदेश केला आहे. मोह्ग्रस्त होऊन अर्जुन स्वतःचे कर्तव्य विसरला. किंकर्तव्यमूढ अर्जुनाला श्रीकृष्णांनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली." करिष्ये वचनं तव " म्हणून  अर्जुन पुन्हा सामर्थ्याने युद्धभूमीवर उभा ठाकला. विजयश्री त्याच्या बाजूने खेचून आणली. धर्माचे राज्य प्रस्थापित केले. आणि अधर्माचा नाश केला. 

अर्जुनाला रणभूमीवर युद्ध करायचे होते. आपल्याला मात्र दैनंदिन जीवनात अनेक युद्धप्रसंगांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात," रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " घरांत किंवा समाजात वावरताना मनामध्ये  द्वंद्व चाललेले असते.हे करू का ते करू, योग्य काय अयोग्य काय, ह्याचा निर्णय पटकन घेता येत नाही.  ह्या सर्व प्रसंगात गीतेतील तत्वज्ञान आपल्याला मदत करते, मार्ग दाखवते. जीवनातील ध्येय गाठायला मदत करते. आपल्यासारख्या संसारी लोकांना अचूक मार्गदर्शन गीतेत मिळते. ह्या तत्वज्ञानाचे आचरण केले कि जीवन उन्नत होते. 

त्यासाठी अर्थातच गीतेचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. ज्याला संसारात सुखस्वास्थ्य हवे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे तर मग गीता हवीच. आणि हि ओळख सुद्धा शक्य तितक्या लवकर तरुण वयातच व्हायला हवी. चांगले संस्कार जितक्या लहान वयांत होतील, तेवढे ते लाभदायक ठरतात. त्या वयात ते महत्व कळत नाही, पण नंतर मात्र, अरे हे आपल्याला आधीच कळलं असतं तर, अशी रुखरुख वाटत राहते. 

देह आहे तोपर्यंत कर्म करावेच लागते. कोणीही ह्यातून सुटलेले नाही. ते कर्म नित्य नैमित्तिक असते, विहित असते किंवा प्रासंगिक असते. आपले रोजचे जीवन व्यवहार सोडून काही कर्तव्यकर्म संसार म्हटलं कि आलीच. सणवार , कुळाचार, कुळधर्म हि काही विशेष कर्म, हे सर्व करावं लागतं. हे  करताना जेव्हढी शास्त्रसंमत कर्म करता येतील तेव्हढी  केली तर ते कर्म यथासांग पार पडते. स्वामी चिन्मयानंद म्हणतात " Living the right values of Life is like building a dam across a  river". आचार विचार, नीतिमूल्य ह्यांचं योग्य पालन करावं लागतं. तरच कर्म यथासांग घडतं आणि त्याचे फळंही गोड असतं. 

अर्थात गीतेने फक्त तुमचं कर्म योग्य करा, हेच सांगितलंय ." दैवं चैवात्र पंचमम "तुम्हाला मिळणारे फळ हे तुमच्या दैवावर किंवा प्रारब्धावर अवलंबून असतं. फळाची आसक्ती न ठेवता कर्म करा असा उपदेश भगवंतांनी केला आहे. कर्म करण्यापूर्वी त्या कर्माची योग्य जाणीव निर्माण होणं आणि त्यानुसार आपल्याकडे उपलब्ध साधने कोणती आहेत, आपण कोणत्या दिशेने, कसे प्रयत्न करावेत, ह्या सर्वांचा विचार करावा. 

अगदी आपल्या घरातलं रोजचं उदाहरण घेतलं तरी हे स्पष्ट होईल. स्वयंपाक करताना आपण वेळ, हेतू, उपलब्ध साधनं, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न ह्या सगळ्याचा विचार करतो. अर्थात वर्षानुवर्षे केल्यामुळे हे सगळं अंगवळणी पडलेलं असतं, त्यामुळे त्याची जाणीव होत नाही इतकंच. हे सर्व नियोजन  करून केलेला पदार्थ सगळ्यांच्या पसंतीला पडेल का नाही हे पूर्णतः दैवाधीन असतं. सर्व घटकांचा  उत्तम समतोल साधला गेला कि पदार्थ चांगला बनतोच. त्यातही स्वकर्म काय हे समजून आपण स्वतः ते काम केलं तर सोने पे सुहागा. ज्ञानेश्वर माउलींनी स्वकर्माने केलेली पूजा ईश्वराला फार प्रिय आहे असं सांगितलंच आहे.  स्वकर्म हीच खरी पूजा, वेगळी पूजा करण्याचीही आवश्यकता नाही. 

हे स्वकर्म कसे  : " योगः कर्मसु कौशलम ", कोणतेही कर्म मनापासून, पूर्ण एकाग्र होऊन, निष्ठेने करावे. जमेल तेव्हढ्या कौशल्याचा वापर करावा. म्हणजे ते कर्म उत्तम होते आणि ईश्वरार्पण होते. हि सुद्धा एक साधनाच आहे. 

आपल्या बुद्धीचा प्रभाव कर्मावर होत असतो. आधी केलेल्या कर्मानुसार बुद्धी आचरण करते आणि शुद्ध बुद्धीने चांगले कर्म घडते असे चक्र चालू असते. जन्मजात सत्व, रज आणि तमाचा प्रभाव आपल्यावर असतो. त्यानुसार आपले कर्म घडते. कर्म करताना वाईटाकडून, चांगल्याकडे आणि चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे होणारा प्रवास म्हणजे" साधना " बुद्धी सुसंस्कारीत  झाली कि योग्य वाटचाल होते. म्हणजेच तमोगुणांचा, रजोगुणांचा  प्रभाव कमी होऊन सत्वगुण वाढीला लागतो. बुद्धी सुसंस्कारीत होण्यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, सत्पुरुषांचा सहवास, नामजप इ. साधनांचा वापर उपयुक्त ठरतो. सज्जन व्यक्तींचा आदर्श संसार हाच पुढे परमार्थात परिणत होतो. अशा घरातच वेदांत खरा उमगतो. परमार्थ करायचा म्हणजे संसाराचा त्याग करायचा असं अजिबातच नाही बरं ! तर तो नेटका करायचा. 

उपासनेमुळे बुद्धी हळूहळू स्थिरावत जाते. रागद्वेष, हवे नको, मानापमान, अहंकार हे सर्व लयाला जाण्यास सुरवात होते. अंतःकरणाची प्रसन्नता लाभते. साधनामार्गावरील हा टप्पा गाठला कि आलेल्या निवांतपणामुळे कृतकृत्यता येते. 

श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे : सर्वभावाने ईश्वराला शरण गेले कि ईश्वरी प्रसादाचा लाभ होतो आणि आत्यंतिक शांतता मिळून शाश्वत पद प्राप्त होते. 

आपले जीवन हि एक साधना बनून हि अवस्था प्राप्त व्हावी हि श्रीचरणीं प्रार्थना ... 


संदर्भ : जीवन साधना . ( गीता १८ वा अध्याय )

विवेचन : सद्गुरू स्वामी वरदानंद भारती  ( अनन्त दामोदर आठवले )