Friday, February 26, 2021

मराठी असे आमुची मायबोली ( Marathi Ase Amuchi Mayboli )

।। श्री  शंकर  ।।

मराठी असे आमुची मायबोली 

२७ फेब्रुवारी हा" मराठी राजभाषा दिवस "

परवा एका शाळेत ह्या निमित्ताने  कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. पहिली ते चौथी ह्या वर्गांसाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. मराठी आणि अमराठी  माध्यमांत शिकणाऱ्या  मुलांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.  मुलांचे निरागस बोलणे, हावभाव, कथेत रंगून जाणे आणि मनमोकळा वावर , ह्यामुळे मीही ४ तास त्या वातावरणात अगदी रममाण झाले. मुलांना काही बोध करणे अपेक्षित होते. एवढ्या छोट्या दोस्ताना काय सांगायचे ? एका अर्थी हा मलाच बोध होता. आत्मपरीक्षणाची एक संधीच. 

विचार करताना भाषेचा  एकेक पैलू उलगडू लागला. अतिशय गोड, वळणदार अशी हि आपली मराठी राज्यभाषा आणि मातृभाषा. संस्कृत हि जग्ग्जननि असली तरी मराठी हि आपली माय. आणि मायच्या कुशीतच तर लेकरू निवांत असतं . 

 कोणतीही भाषा आत्मसात करायची म्हणजे सर्वसाधारण चार प्रक्रिया आवश्यक असतात. श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण. ह्या प्रक्रिया ज्या प्रमाणांत आत्मसात होतील तेव्हढी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. ह्या भाषेचा प्राण  म्हणजे" शब्द ."...                                               

कुठेतरी वाचनात आलं, " शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे, शब्द अक्षय्य आहे, शब्द निःशब्द पण आहे " ... 

  आपल्या भाषेचे महत्व म्हणजे त्यातील " शब्द भांडार " अक्षरांपासून शब्द ! अनेक शब्द एकत्रित करून तयार झालेली लडी म्हणजे वाक्य. संगीतात केवळ सात सुरांपासून अनेकविध सुंदर सुंदर राग तयार होतात. मनाला मोहवून टाकतात. तसेच शब्दांचे. शब्द कसे गुंफले जातात त्यावरून त्या लेखकाची श्रीमंती कळते. त्यामागे अर्थात साहित्यिकांची प्रतिभा असते. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ह्यांचा वापर करून चिरकाळ टिकणारी अशी साहित्यलेणी तयार होतात. अर्थगर्भ, रसाळ कविता कमीतकमी शब्दांत मनाचा ठाव घेतात. चिरंतन असणारी ही आपली साहित्य संस्कृती. वाचनामुळे समृद्ध होणारे आपले जीवन. 

ह्याच अनुषंगाने "  कथा " ..ह्या साहित्य प्रकाराचा घेतलेला शोध ... ह्या शोधातून  झालेला बोध  मांडण्याचा अल्पसा  प्रयत्न. 

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हि एक स्वतंत्र कथाच असते. जोपर्यंत  तीरावर असतो तोपर्यंत आपल्याला खोलीचा अंदाज येत नाही पण सहवासाने  प्रत्येक आयुष्याची कथा वेगवेगळं वळण घेते. कधी ह्या कथांच्या मागे लपलेल्या व्यथा दुःखी करतात तर कधी आदर्श जीवनपट नजरेसमोर साकारतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण चरित्रच उदात्ततेचे पैलू दर्शविणारे. काही काल्पनिक व्यक्तिमत्व सुद्धा अजरामर होतात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात साहित्यिक  वि .वा .शिरवाडकरांच्या" नटसम्राट " मधील अप्पा बेलवलकर  हे असेच एक अतिशय गाजलेले पात्र.  

.कथा , गोष्ट ... प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग ...   आबालवृद्धांना भुरळ घालणारी गोष्ट. अगदी जन्मालाआल्यापासून काऊ- चिऊ च्या गोष्टीपासून  आपण ह्या गोष्टीत रमतो ते अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत.  गोष्टीच्या स्वरूपात पालट होतो एवढाच काय तो फरक. कथांचे तरी किती विविध प्रकार. ऐतिहासिक, बोध कथा, नीतिकथा, चातुर्य कथा, शौर्यकथा, युद्ध कथा, प्रेमकथा, रहस्य कथा...  आपल्या वयानुसार आपली कथेविषयीची रुची बदलत जाते. मोठेपणी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब स्टोरी अशी कथांची वर्गवारी होते. पण मूळ कथा तीच. ह्या कथा काही विचार देणाऱ्या, बोध करणाऱ्या. त्यांतील अगदी आजचा पर्यावरण जागृती सारखा विषय सुद्दा ह्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचविता येतो. ह्या कथांतून सांगितलेले सार, तात्पर्य आचरणांत आणण्यासाठीच ह्या कथांचे प्रयोजन. जगण्याचे धडे देणाऱ्या ह्या कथा. अगदी लहान वयात ऐकलेली लाकूडतोड्याची गोष्ट जर आयुष्यभर  अंमलात आणली तरीही पुरे. जी वस्तू आपली नाही त्याचा प्रामाणिकपणे त्याग करायचा ह्यात हि खूप मोठे मूल्य आहे. 

 कथांमधून भाषा विकास साधता येतो. संवादाचे एक उत्कृष्ट साधन म्हणजे  कथा. मुलाप्रमाणेच मोठ्याना  खिळवून ठेवणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या. अनादी काळापासून सांगितल्या जाणाऱ्या रामायण - महाभारतातील कथा ह्या जीवन मूल्यांचे संवर्धन करतात. आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे दर्शन घडवितात. जिजाऊसाहेबांनी शिवबाना घडवले ते ह्या नीतिकथांतूनच. 

 भागवतात श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी वर्णन आहे.पुराणांत अनेक कथांचा समावेश आहे. कीर्तनातून समाज जागृती व्हावी ह्या उद्देशाने तत्वज्ञान सोप्या भाषेत कथांच्या माध्यमांतून पोचवले जाते. सद्गुरू दासगणू महाराज हे अलीकडील संतकवी. त्यांनी अनेक  रसाळ कीर्तनाची निर्मिती केली आणि त्यातून समाजाला बोध केला. त्यांचीच परंपरा  त्यांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद  भारतीनी सुद्धा पुढे चालू ठेवली. 

पूर्वी घरातील मोठी माणसे आजी-आजोबा, ताई-दादा गोष्ट सांगायचे. पुढे हि जागा कॅसेट ने घेतली. छान छान गोष्टीच्या अनेक ऑडिओ कॅसेट मुलांसाठी उपलब्ध होत्या. अगदी घरातील मंडळीच  गोष्टी सांगत आहेत असा भास व्हायचा. काही संस्कार वर्गातून गोष्टी सांगण्याचे उपक्रम सुरु झाले. आधुनिक काळांत छोट्या कुटुंब पध्दतीत  पालक मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ह्या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. साधने बदलली तरीही गोष्टींची आवड मात्र कायम आहे. 

दूरदर्शनवर  लागणाऱ्या कार्टून कथाही अशाच मुलांना वेड लावणाऱ्या. आता मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब इ. विविध आधुनिक साधने अगदी बालगोपाळांच्या हातात सामावलेली असतात कि त्यांना त्याचे व्यसनच लागते. त्यापासून दूर करणे कठीण जाते. अगदी दोन वर्षांपासूनची बालके सुद्धा सतत मोबाईल हातात धरून बसलेली असतात. 

काही वर्षांपूर्वी व.पु.काळे, गिरीजा कीर, माडगुळकर, मिरासदार ह्यांच्या कथाकथनाचे दर्जेदार कार्यक्रम खूपच लोकप्रिय होते. आज अभावानेच हे कार्यक्रम होतात. 

नृत्याच्या माध्यमातून कथा  लोकांपर्यंत पोचतात. " कथा कहे  सो कथक " कथक नृत्याचे मूळ ह्या कथाकथनातच दडलेले आहे. अनेक नृत्यशैलीतून विविध चरित्रआणि पौराणिक कथा रसिकांना मंत्रमुग्ध करतात.  

 बाकीच्या आक्रमणामुळे दिवसेंदिवस वाचन संस्कृती लोप पावत आहे असा ओरडा ऐकू येतो. माध्यम बदलले तरी मूळ कथा केंद्रस्थानी आहेच. 

मनुष्यप्राणी मुळातच गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला चघळायला आवडते. दुसऱ्यांच्या गुजगोष्टींत तर सर्वांना  भलताच रस. तिखटमीठ लावून, वर झणझणीत तडका  देऊन गावगॊष्टी वाऱ्यासारख्या  पसरायच्या. आज मोबाईल किंवा फेसबुक वर ह्याच गोष्टी क्षणांत जगभर पसरतात आणि व्हायरल होतात. आमचा एक मित्र भेटायला आला कि दोन तीन तासाची निश्चिन्ती. सगळ्या दुनियेचे विषय त्याच्या पोतडीत सामावलेले असत. मुंबई हिंदीत हातवारे करून, डोळे बारीक करून, हातावर टाळी देत, गडगडाटी हसत तो गप्पात इतकं अडकवून टाकायचा कि वेळ कसा जायचा समजायचेही  नाही.  

महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारी आपली मराठी भाषा.आपला स्वाभिमान जागृत करणारी. तिला  समृद्ध करणे हि तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी. बाकी भाषांचे अतिक्रमण थोपवून तिला प्रवाही ठेवणे हे आद्य कर्तव्य. खरंतर आपल्या श्वासाएव्हढीच महत्वाची आपली भाषा. तिला सन्मानित करणं आपल्याच हातात. पण हे होत नाही. बाकी भाषांचे महत्व व्यवहारांत नक्कीच आहे. पण इतर भाषांच्या आक्रमणापुढे तिची दुर्दशा  होऊ नये हेही खरे.  ह्या गौरव दिनाचे हेच महत्वाचे कारण . पण  केवळ एक दिवस हे करून न थांबता उत्तरोत्तर आपली भाषेची आवड  वृद्धिंगत व्हावी असे प्रयत्न करण्याची आण आपण ह्या निमित्ताने  वाहूया . मराठी पाऊल  पडते पुढे हे सर्वार्थाने सार्थ करूया. 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

२७ /०२/२०२१


Wednesday, February 3, 2021

स्वकर्म कुसुमांची माला

।। श्री शंकर  ।।

                                    स्वकर्म कुसुमांची माला

" बिकट वाट वहिवाट नसावी। धोपटमार्गा  सोडू नको " सर्वसाधारणपणे सामान्य जन  कोणतीही जोखीम न पत्करता साधारण मार्गाचा अवलंब करून जीवन सुखी करण्याचा ( जास्तीत जास्त  साधनसंपत्ती मिळवण्याचा  ) प्रयत्न करतात.  काही असाधारण व्यक्ती मात्र स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी बिकट मार्गानेच वाटचाल करतात, तोच त्यांचा जीवनमार्ग असतो. समाजाचे कल्याण  हेच त्यांचे ध्येय असते.  

कै . त्रिंबक हरी भाटवडेकर ह्यांचे कलाकार सुपुत्र प्रख्यात बासरीवादक कै. कमलाकांत भाटवडेकर ह्यांचे शालिन सुपुत्र " हेमंत भाटवडेकर " ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ह्या अवलियाचा थोडक्यात घेतलेला हा वेध ....   

 खरं तर हे अतिशय अवघड काम... अवघड अशासाठी कि त्यांच्या अथांग व्यक्तिमत्वाचा थांग आज ३८ वर्षे त्यांच्यासमवेत कायम राहूनही मला लागलेला नाही. " मी जन्माला आलो तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही घोटाळ्यात पडला असावा " मिश्किल हसत हेमंत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे त्रयस्थपणे पाहत टिप्पणी करतात. लग्नाआधी दक्षिण ध्रुवावर असलेले हेमंत नंतर स्वाभाविक वृत्तीने उत्तर ध्रुवावर प्रवेश करतात. अर्थात हेमंतच हि प्रांजळ कबुली देतात.   हेमंतच्या व्यष्टी आणि समष्टी धर्मात असलेली मोठी  तफावत हेही ह्याचे मुख्य कारण ...   हे हेमंत खरे कि ते असा प्रश्न पडावा !

  वैयक्तिक आयुष्यात कोणतीही गोष्ट ते गंभीरपणे मनावर घेत नाहीत. स्वतःचा व्यवसाय असो, कि अन्य काही .. . मात्र ह्याच्या बरोबर विरुद्ध स्थिती सामाजिक जीवनात ... अहोरात्र ते कामांत, विचारांत व्यग्र असतात. कठोर परिश्रम घेऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावण्यांत निमग्न असतात. त्यांच्या विशेष बुद्धिमत्तेची चमक ह्या सर्व प्रोजेक्टसमधे बघायला मिळते.

 सोलापूर ग्रामी ०२/०२/१९५७ रोजी जन्मलेले हे बालक जन्मानंतरची ५/६ वर्षे तिथेच वाढले. तिथल्या मातीची अनावर ओढ आजही त्याच्या मनात तेवढीच घट्ट रुजलेली आहे. सर्वच भाटवडेकर कुटुंबीय मुळात क्रीडाप्रेमी आणि कलाप्रेमी ( मुख्यतः संगीतकलेकडे सर्वांचा ओढा ). ती आवड हेमंतच्या नसानसांत आजही भिनलेली आहे. स्वतः कलाकार नसला तरी त्यांच्यात सुप्त रूपांत एका निष्णात कलावंताचे बीज दडलेले आहे. त्यांनी साकारलेले अनेक उपक्रम ह्याची साक्ष देतात. अनेक कलाकारांना, त्यांची कला-क्रीडा  वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारा, त्यांचे तोंड भरून कौतुक करणारा हेमंत ... 


सोलापूर नंतर पार्ल्यात कायम वास्तव्यास आल्यावर मोठ्या एकत्र कुटुंबात राहूनही "एकाकी,अलिप्त " राहणारा हेमंत. एकत्र कुटुंबात ज्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, कदाचित त्यातूनच त्यांचे मन संसारी जीवनांविषयी  सखोल विचारी झाले, उदासीन झाले. स्वतःच्या वाटचालीचा पाया ह्या चिंतनातून  रचला  आणि स्वतःचा वेगळा मार्ग त्यांनी स्वतंत्रपणे तयार केला. 

पार्ले टिळक ह्या प्रथितयश शाळेत आधी विद्यार्थी म्हणून आणि आता संचालक म्हणून शाळेशी असलेले नाते  अधिकाधिक दृढ आणि व्यापक होत गेले.  मॅट्रिक झाल्यावर पुढे बी. कॉम. आणि मग १९८२ साली अतिशय अवघड अशी C. A. ची परीक्षा देऊन अल्पावधीतच C. A. झाले. घरात खरंतर शैक्षणिक वाढीसाठी ( कलेची विशेष आवड  असल्यामुळे )  पोषक वातावरण नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हि पदवी प्राप्त करणारा भाटवडेकर आणि सासरच्या  कुटुंबातील एकमेव सदस्य . 

पारल्यासारख्या ठिकाणी स्वतःचे ऑफिस सुरु करून प्रॅक्टिसला जोरदार सुरुवात  झाली खरी .... पण खऱ्या अर्थाने हेमंत ह्या पोटापाण्याच्या व्यवसायांत कधीच रमले नाहीत.  हा व्यवसाय आजही त्याच सचोटीने  ३८ वर्षे चालू असला तरी त्यांचं कार्यक्षेत्र मुळात वेगळंच ... येणाऱ्या clients ना व्यावहारिक सल्ला देताना त्यांना मात्र लौकिक अर्थाने जीवन व्यवहार सांभाळणे जमले नाही. आज सगळं जग पैशाच्या ( लक्ष्मीच्या ) मागे धावताना हेमंतनी मात्र सरस्वतीची कास धरली आणि हा सरस्वतीपुत्र स्वतःच्या  शाळेच्या( पार्ले टिळक विद्यालय ) प्रांगणात इतका रमला कि शाळेसाठी तन - मन अर्पून  शाळेचा स्तर उंचावण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न सुरु झाले. . विविध  उपक्रम त्यांनी गेल्या अनेक वर्षांत राबविले आणि तेही अगदी निरपेक्षपणे, निःस्वार्थीपणे.  सतत ध्यास शाळेचा मी, माझे स्वास्थ्य ,माझे कुटुंब हा विचारही त्यांच्या मनांत येत नाही. 

शाळेप्रमाणेच पार्ल्यातील "पार्ले हिंदू देवालय मंडळ" ह्या संस्थेचे विश्वस्तपद भूषविताना असेच जीव ओतून अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने केलेले काम. तिथेही दैनंदिन कामकाजात  सुधारणा करून विविध उपक्रम गेल्या काही वर्षांत सुरु  केले आहेत. समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे तळागाळातील जनतेसाठी मदत कार्य सुरु आहे.  हा  सर्व कामाचा व्याप ते शांत राहून अगदी लीलया  पेलतात, कुठेही दिखाऊपणा नाही कि प्रसिद्धीचा हव्यास  नाही. हे सर्व त्यांना कसं काय साधतं हे  मला अद्याप  न उलगडलेलं कोडं आहे.

ह्याच कारण अर्थातच त्यांच्या मधील अनेक सत्व गुण . . " वैराग्य " हा अलंकार त्यांनी  परिधान केला आहे. एक सहप्रवासी म्हणून हेमंतच्या व्यक्तिमत्वात ठळकपणे काही उणीवाही जाणवतात. हेमंत खूप जिद्दी  आहेत . मितभाषी आहेत. स्वतःच्या मनातील विचार शेअर करायला ते विशेष उत्सुक नसतात.  त्यांच्या मनाचा तळ शोधणं ,विचारांचा अंदाज येणं खूप  कठीण  असते. 

  तरुण वयातच हेमंत त्यांच्या सासऱ्यांचे (कै .विष्णू पांडुरंग किंजवडेकर) पारमार्थिक अनुकरण करते झाले. " विष्णुसहस्र  नामाची " अखंड  साधना, सद्गुरूंच्या वचनावर  असलेला त्यांचा दृढ  विश्वास. सामाजिक जीवन आणि परमार्थ ह्याचा उत्तम समतोल साधताना हित / अहिताची जाणीव ठेवून शांततेच्या मार्गाने जीवन सफलतेचा प्रवास करत आहेत. अर्थात सफलतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी.  

ज्ञानेश्वरीतील  एक ओवी सुपरिचित आहे. " जयाचे ऐहिक धड नाही । तयाचे परत्र पुससी काई ।। " ध्येयनिष्ठ कर्ममार्गामुळे हेमंतनी त्यांची पुढची गती आधीच निश्चित केली आहे आणि म्हणूनच त्यांचे ऐहिक त्या ईश्वरानेच सांभाळले ह्या विचाराने मन भरून येते ( योगक्षेमं वहाम्यहं )  हाच त्यांच्या कार्याचा मिळालेला प्रसाद आहे असे वाटते. 

कोमल कायेप्रमाणेच मनानेही अतिशय भावनाप्रधान, संवेदनशील असलेले हेमंत. कोणताही उत्तम कलाविष्कार  अनुभवताना त्यांचे नेत्र अविरत पाझरतात. हे सर्व कार्य करताना अनेक मान -अपमान सहन करावे लागतात. कौतुकाचा शब्द अभावानेच वाट्याला येतो. काही वेळा पदरी निराशाच येते. त्यांच्या कोमल, दुखऱ्या  मनावर हळुवार फुंकर घालण्याचे काम मग माझे असते. त्यांच्या एवढ्या मोठ्या कार्यात माझा एवढाच काय तो सहभाग. 

 वाढत्या वयाबरोबर समाज कार्याची एव्हढी मोठी जबाबदारी पेलताना त्यांचा जीव काही वेळा थकून जातो. लोकांच्या अपेक्षांचा भार सहन करणे कठीण होते. अतिश्रमाने शरीर साथ देत नाही. " प्रीतीचा लाभलेला हा कल्पतरू ", त्याचा प्रेमाने, मायेने सांभाळ करण्याची  जबाबदारी  मी आनंदाने स्वीकारते. त्यांची सावली होऊनच राहते. 

स्वकर्म कुसुमांची माला अर्पण करून ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी सतत कार्यमग्न असणारे " कर्मयोगी हेमंत ", त्यांना निरामय आरोग्य लाभावे , त्यांचे इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने बळ द्यावे हीच सदिच्छा त्यांच्या वर्धापनदिनी व्यक्त करते ....  


स्नेहा ... 

०२/०२/२०२१