Friday, May 14, 2021

आमची कुलदेवी : श्री महालसा नारायणी ( Shri Mahalasa Narayani )

                                                       ।। श्री   शंकर  ।।                      


                            आमची कुलदेवी : श्री   महालसा   नारायणी 


 घराच्या बागेत लावलेलं अबोलीचं रोपटं आता छान फोफावलंय. हिरव्या तजेलदार पानापानांतून आपली मान बाहेर काढून हळूच डोकावणारी अबोली! तिचा केशरी रंग मनाला मोहविणारा. सकाळी सकाळी तिच्या जवळ गेलं कि भरभरून उमललेली फुलं... अबोला सोडून आपल्याशी बोलू लागतात. देठापासून विलग होऊन ही फुले माझी ओंजळ भरून टाकतात. अबोलीचा गजरा, भरगच्च काळ्या केसांवर शालीन सौन्दर्यवतीने माळलेला  तिच्या नैसर्गिक सौन्दर्यात भर घालणारा...आत्ताच्या काळांत दुर्मिळ पण तरीही मला आवडणारे हे  दृश्य ...  मी त्यांत हरवून जाते... . 

रोज सकाळी अबोलीचा हार गुंफताना मी थेट गोव्यात पोहोचते. खरं तर मे महिना आणि गोवा...  आमचं  अगदी अतुट नातं. गोव्यातली यच्चयावत स्वच्छ, सुंदर, भलीमोठी आकर्षक मंदिरे. दरवर्षी आमच्या कुलदेवीच्या दर्शनाच्या निमित्ताने गोव्याची वारी ठरलेली. सध्या दोन वर्षं आलेल्या परिस्थिजन्य संकटामुळे हि वारी जरी टळली तरी "शब्दांच्या वारीने" मी अगदी थेट आमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरात पोहोचले. 

फेसाळलेल्या शुभ्र,धवल,समृद्ध सागरकिनारे लाभलेल्या, गोव्याच्या लाल मातींत, नारळी-पोफळींच्या आगारात, निसर्ग सौन्दर्याच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, म्हार्दोळ. ह्या परमपवित्र धर्मक्षेत्रांत आमच्या कुलदेवीचे "महालसा नारायणीचे" कायम वास्तव्य आहे. देवीचे हे जागृत देवस्थान.इथे आल्यावर आपुलकीच्या नात्याने माहेरी आल्यासारखी मनाची अवस्था   होते. लेकरू होऊन ह्या जगन्मातेला उराउरी भेटण्याची आस दाटून येते. 

मुख्य  प्रवेशदारातून प्रवेश करतांनाच मंदिराचा विशाल  परिसर आपण आपल्या नजरेत सामावण्याचा प्रयत्न करतो. देवळाबाहेर बसलेल्या माळकर्णीकडे असलेल्या ताज्या, टवटवीत, विविधरंगी पुषमालांकडे आपण आकर्षित होतो. अबोली, मोगरा,सोनचाफा, बकुळ, सुरंगी ह्यांचे हार, त्याबरोबरीनेच हिरव्यागार, भरगच्च तुळशीच्या माळा किती घेऊ...  असा मोह होतो. ह्या संमिश्र दरवळाने आपले अंतरंगही सुगंधी होते. ह्या परिमळाने भारलेला मनरूपी भुंगा  दर्शनाच्या ओढीनं मंदिरात प्रवेश करण्यास उत्सुक असतो. देवीच्या चरणांवर नतमस्तक व्हायला हातातील   फुलेही  किती आतुर असतात आणि आपण ही फुले आणि इतर पूजासाहित्य देवीला अर्पण करूनच  तर देवीशी सख्यभाव जोडतो नाही !

मंदिराभोवतीच्या प्रांगणातील भलामोठा पितळी ज्ञानदीप  हे ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य. हा ज्ञानदीप, दीपमाळ आणि उंचच उंच गरुडस्तंभ वरपर्यंत न्याहाळातच आपण देवळाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश करतो. द्वारपाल आपले स्वागत करायला उत्सुक असतात. मधलं दालन ओलांडून आपण पुढच्या सभागृहांत पोहोचतो. लांबूनच आपल्या देवीची मूर्ती समयांच्या मंद, सौम्य प्रकाशात दिसू लागताच अनन्य  भावाने तिला शरण जातो. सकाळच्या प्रसन्न वातावरणांत देवीची पूजा,अभिषेक चालू असताना मंदिरातील त्या वातावरणांत अगदी समरस होतो. दर्शनाला आलेल्या भक्तांची एकच लगबग सुरु असते. हे दृश्य टिपत असतानाच आपल्या मनांत देवीचा नामजप, स्तोत्र इ.आवर्तने सुरु होतात. आपला अभिषेक, पूजा झाल्यावर गुरुजी मंदिराच्या आतल्या भागांत,गर्भगृहांत आपल्याला बोलवून घेतात. देवीचा अधिक निकट सहवास मिळाल्याचा आनंद मनांत दाटून येतो. आपल्या कुटुंबासाठी मग गुरुजी देवीला साकडं घालतात. कोकणी हेल काढून देवीपुढे घातलेले गाऱ्हाणे, आपल्या सगळ्या अडचणी आता नक्की दूर होणार ह्या भावनेने आपण निःशंक होतो. हात जोडून मनोभावे तिची प्रार्थना करतो. त्या भारलेल्या वातावरणांतून पाय खरं तर बाहेर निघतच नाही. 

साक्षांत विष्णूचा अवतार म्हणजे देवी " महालसा  नारायणी " परब्रम्ह स्वरूपिणी ..

शाळीग्राम शिलेवर स्थित महालसा  देवीची  मूर्ती सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. भगवान विष्णूचे हे मायारूप. अमृतमंथनातून निर्माण झालेले अमृत दैत्यांना न मिळता फक्त देवांना मिळावे ह्या हेतूने विष्णूने हे रूप धारण केले. हे मोहिनी रूप अलौकिक सुंदर आहे. चेहेऱ्यावर मंद हास्य विलसत आहे. दैत्यांच्या निर्दालनासाठी हातात खड्ग, त्रिशूल धारण केले आहे. कौशल्याने कारभार सांभाळणारी "धुरंधर" अशी ही देवी. देवीचे सकाळी कन्यारूपांत, माध्याह्नकाळी नवयौवन रूपात तर सूर्यास्तसमयीं वृद्ध सौभाग्यवती स्त्रीरूपांत दर्शन होते. विविध वस्त्र प्रावर्णानी  आणि अलंकारांनी वेगवेगळ्या रूपांतील देवीचे अविष्कार मनमोहक असतात. चंपाषष्ठी आणि  इतर महत्वाच्या दिवशी देवीची विशेष अलंकारसेवा करून पूजा बांधली जाते. 

भक्तांच्या सेवेने प्रसन्न होऊन शरण आलेल्या भक्तांचे सर्व क्लेश, रोगबाधा ही जगन्मोहिनी  हरण  करते, सुखसौभाग्य देऊन, भुक्ति-मुक्ती प्रदान करते तिच्या भक्तीने ज्ञानाची प्राप्ती होते. त्यासाठी लागतो तो अनन्य भाव

दुपारच्या आरती नंतर मिळणारे भोजन,देवीचा प्रसाद म्हणजे अमृतमयी  चव. वाफाळलेला गरम भात, आमटी, अननसाची कढी, गोड पायस... अहाहा... मन अगदी तृप्त होतं . मंदिराभोवतीच असणाऱ्या धर्मशाळेत क्षणभर विसावून संध्याकाळच्या पालखीसेवेसाठी पुन्हा हजार व्हायचे. देवीला प्रिय असलेला रविवार हा देवीच्या सेवेचा मुख्य दिवस. त्या दिवशी संध्याकाळी निघणाऱ्या देवीच्या पालखीत सहभागी होणं हा एक आनंद-सोहोळाच असतो. विविध प्रकारच्या फुलांनी, माळांनी सजवलेली पालखी, त्यांत हातांत ढाल तलवार ह्या आयुधांनी लढवय्या रूपांत विराजमान झालेली देवीची तेजस्वी मूर्ती. वाद्यांच्या गजरात ही  पालखी मंदिराबाहेर एक प्रदक्षिणा घालते. भान हरपून टाळ  मृदूंगाच्या  गजरात  भक्तजन ह्या पालखी प्रदक्षिणेत सहभागी होतात. वाटेत मधेमधे थांबून भजनसेवा, गायनसेवा अर्पण करतात. हा सर्व अनुपम्य सोहोळा ह्याची देही, ह्याची डोळा अनुभविणे म्हणजे इहलोकीवरील स्वर्गसुखच. पालखी सेवेत सामील झाल्यामुळे भक्तिभाव उदित होऊन मनाला सुख ,शांती,प्रसन्नता लाभते. विशेष प्रसंगी किंवा उत्सवाच्या निमित्ताने  मंदिराबाहेरील  ज्ञानदीप काही भक्त इच्छित फ़लप्राप्तीनंतर प्रज्वलित करतात. रात्रीच्या गडद अंधाऱ्या पार्श्वभूमीवर उजळून निघालेला हा "ज्ञानदीप" आपल्या अंतःकरणातील तेजाची ज्योतही प्रज्वलित करतो आणि अज्ञान अंध:काराचा काही अंशाने विनाश होतो. पौर्णिमेच्या धवल चंद्रप्रकाशात मंदिराचा सोन्याचा गोल घुमटाकार  मोठ्ठा कळस न्हाहून निघतो, हे दृश्य बघताना होणारा आनंद सुद्धा मनीमानसी  दीर्घ काळ रेंगाळणारा. 

पालखीनंतर होणारा आणखी एक प्रसंग अनुभवण्यासारखा. तो  म्हणजे देवीच्या पालखीतील गुच्छाचा लिलाव. बोली लावून जास्तीत-जास्त बोली लावणाऱ्या भक्ताला हा पुष्पगुच्छ मिळतो. आरती-प्रसादानंतर देवीला गाऱ्हाणे घालतात मग त्या दिवसाची सांगता होते. कुलदेवीची अल्प का होईना सेवा घडली हा आनंद मनात साठवत, तिच्या आशीर्वादाचे पाथेय बरोबर घेऊन परतीची वाट नाईलाजाने धरावी लागते. संसारातील  पुढच्या वाटचालीसाठी बळ मिळावे म्हणून देवीची प्रार्थना करून परतीचा प्रवास सुरु होतो.  

आपल्या कुलदेवीचे दर्शन, पूजन, उपासना तसेच  कुलधर्म, कुलाचाराला अनुसरुन रितीरिवाजांचे यथाशक्ती पालन करणे प्रचंड ऊर्जादायी आहे.ही यात्रा नित्यनेमाने घडल्यास भक्तांचे नक्कीच कल्याण होते.  .  

शब्द-दिंडीच्या माध्यमातून ही सेवा कुलदेवीच्या चरणकमळाशी समर्पित करताना, मनांत दडलेल्या प्रत्यक्ष दर्शनाची अभिलाषा पूर्ण व्हावी म्हणून त्या सर्वशक्तिमान "नारायणीला" साकडे घालते. 

                        या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता   ।

                        नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


स्नेहा भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई 

अक्षय्य तृतीया शके १९४३ ( १४/०५/२०२१)

sneha8562@gmail.com