Tuesday, April 28, 2020

|| Jai Jai, Jai Shankar ||



                                                      
           ll   श्री शंकर  ll

                                              
|| जय जयजय शंकर ||


आज वैशाख शुद्ध पंचमी. आत्ताच श्री शंकराचार्य चरित्र पोथीच्या पारायणाची समाप्ती झाली.सद्गदित होऊन मी नमस्कार केला आणि आचार्यांचा जीवनपट डोळ्यासमोर साकार झाला.  
                   

आचार्यांचे सर्व चरित्र अतिशय अद्भुत आहे, साधारण बाराशे वर्षांपूर्वी केरळ राज्यांत, कालडी ग्रामांत, पूर्णा नदीच्या तटावर आचार्यांचा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकर महादेवच जणू शिवमणी आणि अंबा मातेच्या पोटी जन्माला आले. तत्कालीन परिस्थतीत ऐहिक सुखाला हपापलेल्या समाजामध्ये कर्मकांडाला महत्व प्राप्त झाले होते, नास्तिकतेचा पुरस्कार याच कालावधीत अतिशय प्रभावीपणे केला गेला. नाना पंथ धर्म या काळात उदयाला आले, या सर्वांचे तत्वज्ञान वैदिक धर्माविरुद्ध होते. वैदिक धर्माचा ऱ्हास होत होता आणि समाज अवनतीच्या मार्गाने चालला होता. आणि म्हणूनच शंकराने हा अवतार घेतला असे मानले जाते. त्यांचे नामकरणही "शंकर" असेच करण्यात आले. पुढे आद्य शंकराचार्य म्हणून सर्व जगामध्ये ते मान्यता पावले.

लहान वयातच शंकरला पितृवियोगाला सामोरे जावे लागले. शंकर
चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं 
अगदी जात्याच बुद्धिमान होता.
त्यामुळे सर्व शास्त्रांचे  अध्ययन लहान वयातच झाले. ते मातृभक्त होते. मातृसेवेहून दुसरे मोठे पुण्य नाही असे ते मानीत असतआईसाठी त्यांनी पूर्णा नदीचा प्रवाह वळवून अगदी घराजवळ आणला असं म्हणतात.

श्री शंकराचार्यांचा जन्म वैदिक धर्माची पुनर्स्थापना करून त्याचे गतवैभव त्याला प्राप्त करून देणे आणि त्यायोगे जगदोध्दार करणे यासाठी झाला होता. त्यासाठीच वयाच्या आठव्या वर्षी आईला राजी करुन संन्यास घेण्यासाठी ते घराबाहेर पडले. नर्मदातीरावर त्यांना त्यांचे गुरु गुरुगोविंदपद भेटले आणि त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. गुरूंनी त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली आणि पुढील आयुष्याची दिशा दाखवली.

त्यानंतर आचार्य भारत भ्रमणासाठी सज्ज झाले.काश्मीर पासून अगदी दक्षिणेपर्यंत त्यांनी वैदिक धर्माचा प्रसार आणि विकास व्हावा म्हणून सर्व आयुष्य खर्ची घातले. चार दिशांना चार मठांची स्थापना केली. ह्या  मठांच्या स्थापनेमुळे सामाजिक समरसता संपादून, भारताला एका तत्वात एकत्र जोडता आले. संसारापासून पूर्ण अलिप्त राहून त्यांनी वैदिक धर्म प्रसारासाठी स्वतःला  वाहून घेतले. स्वतःचे अद्वैत मत प्रतिपादन केले. ब्रह्मसूत्र, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, दर्शने ह्यासारखे विदवत्तापूर्ण ग्रंथ लिहिले.

आचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाला ( अहं ब्रम्हास्मि ) आणि  ( ब्रह्म सत्यंजगत मिथ्या ) मायावादाला समाजातील इतर प्रवाहांकडून खूप विरोध झाला. बौद्ध ,जैन,मीमांसक,सांख्य ह्या प्रतिपक्षांनी त्यांच्या मतावर जोरदार टीका केली. त्यांच्यात वारंवार शाब्दिक लढाया झाल्या. पण आचार्यांनी सर्व वैदिक धर्म विरोधी मतांचे खंडन करून वैचारिक क्रांती घडवून आणली.

आचार्यांच्या पूर्ण जीवन चरित्रात अनेक चमत्कार घडलेले दिसून येतात. लोकांना त्यांच्या महानतेची जाणीव झाली. जनमानसात त्यांचा दबदबा वाढला , त्यातूनच आचार्यांना धर्मप्रसार करणे शक्य झाले. ते धर्मयोद्धा होते. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या ह्या कार्याचा अनुभव घेता येतो.

आचार्यांचा जीवनकाल अवघा ३२ वर्षांचा आहे. ३२ व्या वर्षी केदारनाथ येथे कैलासगमन केले . 

Life of Shankaracharya - The Adventures of a Poet Philosopher
Four Shakti Peethas 
by Adi Shankaracharya
आपल्यासारख्या सामान्य लोकांना आदी शंकराचार्यांची ओळख त्यांच्या अनेक श्लोक / स्तोत्रांमुळे झालेली आहेच. त्यांनी अनेक अष्टके रचली. भज गोविन्दम, चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं, कनकधारा स्तोत्र, पांडुरंगाष्टक अशी अनेक स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत. ही सर्व स्तोत्रे प्रवाही, रसाळ, अर्थगर्भ तर आहेतच पण त्याला गेयताही आहे. त्यामुळे म्हणतांना एक वेगळाच आनंद मिळतो. अगदी सामान्य लोकांनाही परमार्थाचा शुद्ध, सोपा मार्ग समजावा म्हणून म्हणूनच ह्या स्तोत्रांद्वारे भक्तिभाव, श्रद्धा जनमानसांत रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला त्यांच्याकडून मिळालेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंचायतन पूजा. विविध पंथांमुळे निर्माण झालेला उपासनाभेद टाळता यावा आणि त्यातून निर्माण होणारे तंटे सोडवावेत म्हणून त्यांनी पंचायतन पूजा सुरु करण्यास लोकांना प्रवृत्त केले. हाच समन्वय त्यांनी अनेक ठिकाणी साधला आहे.

साधनेच्या बळावर सत्य सिद्धांत शोधून काढणारे, लोकांना ज्ञान देणारे, सदाचार, सन्नीती ह्यांचा आदर्श असणारे हे प्रेरणादायी चरित्र. 


माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की पिढ्यानपिढ्या हे गुण गात राहावे. सर्व विश्वाचे मंगल करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतार घेतलेले सर्व संत मायेच्या वात्सल्याने समाज घडवीत असतात. आचार्यांप्रमाणेच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास ह्या सर्व संतांनी आजवर केलेल्या तपश्चर्येवरच आज आपण सुसह्य जीवन जगत आहोत.

आचार्यांच्या जयंती दिनानिमित्ताने, आधुनिक महिपती संतकवी दासगणू महाराज ह्यांनी लिहिलेल्या रसाळ, प्रासादिक शंकराचार्य चरित्रामुळे एका अलौकिक, अद्भुत योग्याचा जीवन परिचय करून घेता आला. इतक्या वर्षांनंतरही   शंकराचार्यांचे कार्य अजूनही कसे टिकून आहे या उत्सुकतेपोटी त्यांचे चरित्र आणि वाङ् मय अभ्यासले तर आत्मानंदाची अनुभूती नक्कीच येईल.



स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com


















Monday, April 27, 2020

CHAND HACH RE DIVAS- YAMINI ( छंद हाच रे दिवस - यामिनी



                           ll श्री शंकर ll          

                                                                              
        ll   छंद हाच रे दिवस  - यामिनी  ll


धडधडत Deccan  Queen पुण्याकडे निघून गेली. नक्की सहा वाजले असणार. घरी जायलाच हवेनाईलाजानेच रंगात आलेला खेळ आवरता घेतला. सवंगड्यांचा निरोप घेऊन घराकडे धूम ठोकली, हो नाहीतर मार मिळेल. हातपाय धुवून काकाआजोबांच्या खोलीत गेले.
करड्या नजरेने आजोबानी माझ्याकडे बघितले. नावाप्रमाणेच नरसिंह आजोबा कडक शिस्तीचे होते. "हं, चला करा सुरुवात" परवचा म्हणायला सुरवात झाली. शुभंकरोती कल्याणम पासून रामरक्षेपर्यंत ओळीने सर्व स्तोत्रे ते म्हणून घेत. आजोबा स्वतः विद्वान पंडित होतेसर्व स्तोत्रे मुखोद्गत होती. त्यांच्यामुळे अगदी लहान वयातच आमची बरीचशी स्तोत्रे पाठ झाली होती. ह्या पाठांतराचा शाळेत मला फायदाच होई. कधी ऑफ पीरेडला वर्गात मला हि स्तोत्रे म्हणायची संधी मिळत असे आणि त्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप पडली कि अस्मादिकांची कॉलर एकदम ताठ.

वचनं मधुरं चरितं मधुरं ll
 मधुराधिपते l  अखिलं मधुरं ll
बाबा देवपूजा करताना अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, रुद्र म्हणत. कानावर पडून पडून हि स्तोत्रे पण पाठ झाली. त्या वयात त्याचे महत्व कधी जाणलेच नाही. नुसते तोंडावाटे शब्द बाहेर पडत इतकेच. त्यांत भावनेचा ओलावा नव्हता. परंतु त्या  लहान वयातल्या संस्कारांचं पांतर छंदात कधी झालं ते कळलंच नाही. संस्कृत स्तोत्रे मला आवडू लागली.

यथावकाश मुलींना पार्ल्यातच भिडे बाईंच्या संस्कार वर्गात घातले. तिथे त्यांनी संस्कृत संभाषण आणि विविध स्तोत्रे मुलींना शिकवली. माझ्या वाढत्या वयाबरोबर ह्या स्तोत्रांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. स्तोत्रांचे अर्थ, त्यातील भावोत्कटता आणि रोजच्या व्यवहाराशी त्यांची सांगड ह्याकडे मी विशेष लक्ष द्यायला सुरवात केली. दैनंदिन जीवनात हि स्तोत्रे कशी आचरणात आणता येतात  ह्याचा प्रत्यय येऊ लागला.

पुढे फळणीकर बाईंची भेट झाली. त्या चौथी पर्यंतच शिकल्या होत्या, पण गीतेवर मात्र त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्याकडे  मी भगवद - गीतेची  संथा  घेतली. आपल्या संस्कृतीचा हा अमृततुल्य ठेवा, त्याच्या पठणात आता मी स्वतःला हरवून बसले. सतत तोच छंद लागला. गीतेच्या पाठांतराबरोबरच त्याच्या तत्वज्ञानाचीही गोडी लागली आणि मग वेळ कमीच पडू लागला.

१९९४ सालं तर आमच्या साठी विशेष महत्वाचे ठरले. सद्गुरू वरदानंद भारतींची भेट झाली. त्यांचा भर विष्णुसहस्र नाम स्तोत्रावर होता. त्याचे महत्व खूप होते आणि आता नित्य पठणात त्याचा समावेश होता. दिवसभर तुम्ही कितीही,  कधीही, कुठेही हे स्तोत्रं  म्हणा. त्याला बंधन कुठलेच नाही. पण आम्ही मात्र त्याच्या बंधनात इतके अडकलो कि आता तो आमचा श्वास झालाय. त्यामुळे कधीच एकटेपणा वाटत नाही कि कसला कंटाळा येत नाही. नारायणाचे सतत स्मरण राहते. सहस्रनामाचे उच्चारण म्हणजे चौरस आहार,  जीवनाचा भक्कम आधारच..

काही बायका श्रीसूक्त म्हणताना ऐकले आणि आपल्याला हे यायला हवे, असे मनोमन वाटले. शिवमहिम्न स्तोत्रं हि असेच ऐकून छान वाटले, पण ते हि खूप कठीण असल्यामुळे कोणीतरी शिकवायला पाहिजे होते. माझी हि इच्छा उशिरा का होईना पूर्ण झाली. बाबांनी त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसांत आम्हांला आयुष्यभर पुरेल अशी हि शिदोरी दिली.

असा माझा छंद मला दिवस रात्र वेड लावतो आहे. त्या नित्य पठणाबरोबरच मी सतत नवीन काही शिकण्याचा ध्यास घेते. सध्या सूर्य मंडळ ह्या स्तोत्राने मला झपाटले आहे. मी अगदी त्याच्या प्रेमातच आहे इतके मला ते आवडलंय.शंकराचार्याचीही अशी अनेक स्तोत्रे मनाला भुरळ घालतात. म्हणायला, पाठ करायला अतिशय कठीण असलेली हि स्तोत्रे खूप आशयगर्भ आहेत. आचार्यांनी इतक्या लहान वयात हि कशी रचली असतील ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांत विविधताही खूप आहे.

Study says that meditation can help you stay stressfreeकालानुरूप ह्या माझ्या छंदाला एक नवा आयाम लाभला आहे. कल्पवृक्ष आपल्या सर्व मागण्या पूर्ण करतो त्याप्रमाणे you Tube  वर हवे ते स्तोत्रं उपलब्ध असते. सुब्बालक्ष्मींनी गायलेली विविध स्तोत्रे कधीही डोळे मिटून शांतपणे ऐकताना स्वतःचे अस्तित्व विसरायला होते, इतकी शक्ती ह्यात आहे. संसारातील दुःखे कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताची स्तुती. हि स्तुती  स्तोत्र पठाणाने करता येते.स्तोत्र / श्लोक पठणाने मन शुद्ध होते, एकाग्र होते. भगवंताजवळ पोहोचणे सोपे होते.भक्ती भाव वाढतो. स्तोत्रं पठणामागे जसा भाव असेल त्यानुसार तुम्हाला लाभ होतो.
मन चिंतेत असेल, अस्वस्थ असेल तेव्हा हि ठेव आपल्याला आश्वस्त करते. आज बाहेरच्या भीषण परिस्थितीत मनाचा समतोल साधता येतो तो ह्यामुळेच. हा कठीण काळ स्तोत्रं पठणात कधी आणि केव्हा संपून जातो ते समजतही नाही.

पुढे उतार वयात बाकी सगळी इंद्रिये अकार्यक्षम झाली, तरी मनोमन सामावलेले हे नाम, आपत्काळात आपल्याला उपयोगी ठरेल हा विश्वास नक्कीच आहे.

भवभय हरण करणारा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा दुसरा छंद असू शकेल का ?


Sneha Bhatawadekar
sneha8562@gmail.com




Friday, April 17, 2020

Stay Home




ll   Stay  Home   ll




"धाव रमापते ज्ञानविलासा l पूर्णपरात्पर शांतिनिवासा"

करुणाव्याप्त आर्त स्वर क्षीरसागरात पहुडलेल्या नारायणाच्या कानावर आला. तेव्हढ्यात पृथ्वीमाता 

नारायणासमोर शिष्टमंडळ घेऊन हजर झाली. नारायणाला नमस्कार करून , तिने तिथे  येण्याचे 

कारण सांगितले.

व्यथित झालेली पृथ्वीमाता तिथे घडणाऱ्या घडामोडी सांगत होती. घराला घरपण देण्याऐवजी माणसे मात्र स्वतःचे घर सोडून, दिवस- रात्र कामात व्यस्त असतात. इथे घरे ओस आणि बाकी ठिकाणे माणसांनी भरून वाहत आहेत. रस्ते, वाहने स्टेशन्स, विमानतळ सगळीकडे तुडुंब गर्दी, कोलाहल. नुसता माणसांचा पूर. जरा सुट्टी मिळाली कि लोक weekend एन्जॉय करायला घराबाहेर पडतात. नाटक, सिनेमा, सण- समारंभ , व्यापार पेठा, प्रदर्शने , परदेशवाऱ्या ह्या गोष्टींचे एवढे पेव फुटले आहे कि माणसे स्वतःचे घर सोडून सगळीकडे नुसती फिरतायत. काहीवेळा हे बाहेर पडणे गरजेचे असते, पण बऱ्याच वेळा ही भटकंती फक्त ENJOYMENT म्हणूनच असते. ह्या सगळ्या प्रचंड गर्दीचा ताण माझ्यावर पडतोय.

कोणत्याही गोष्टीचा l अतिरेक तो झाल्या साचा ll

त्याचा आहेच व्हावयाचा l बोजवारा तो केव्हाही ll

ह्यावर काहीतरी उपाय सांगा, भगवान I

अंतर्ज्ञानाने नारायणाने सर्व परिस्थिती जाणली आणि त्याला पृथ्वीची खूप दया आली. आता वेळ

आलेली आहे माणसाचे डोळे उघडायची, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नारायणाने पृथ्वीमातेला 

आश्वस्त केले, तू काळजी सोड आणि परत स्वगृही जा. माणसाचे कर्म तुला ह्या परिस्थतीतून 

बाहेर काढेल. "नारायण, नारायण" म्हणत नारद मुनींनी पृथ्वीवर फेरफटका मारला आणि सगळ्या 

परिस्थितीची पाहणी केली.

इकडे पृथ्वीवर एका विषाणूचे आगमन झाले व बघता बघता तेथील माणसांना त्याची लागण लागली. विषाणूंचा प्रभाव एका देशातून दुसऱ्या देशांत होऊ लागला. संसर्ग वाढत चालला. माणसे हवालदिल झाली. लागण झालेल्यांची संख्या वाढू लागली. लोक मृत्युमुखी पडू लागले. सगळीकडे हाहाक्कार माजला.

I Made A Photo Of Planet Earth With A Mask Because Of Coronavirusएवंच सर्व अनावस्था l पसरू लागली हां हां म्हणता ll

ह्या परिस्थिती माझारी l रोग बळावती भारी ll

राज्यकर्ते जागे झाले. माणसांवर कठोर निर्बंध लादले गेले. सगळीकडे LOCKDOWN करण्यात आला. प्रवासी साधने बंद झाली. जनजीवन, उद्योगधंदे सारे काही ठप्प झाले. लोकांना परोपरीने घरातच राहण्याचे आदेश दिले गेले. माणसांना त्याशिवाय आता पर्यायच नव्हता. मॉल, नाट्यगृहे, सिनेमा थिएटर, बस, गाड्या, मेट्रो, अगदी सगळे ठप्प. अहो इतकेच नाही तर सण, उत्सव सगळ्या कार्यक्रमांवर बंदी, आणि बिचारे देवळातले देव ही देवळात एकटेच उभे...

असे म्हणतात कि ब्रह्माच्या ठिकाणी “ एकः अहं बहू स्याम ” अशी स्फुरणरूप इच्छा उत्पन्न झाली आणि तेथून सृष्टीचा प्रारंभ झाला. हीच भावना सर्व माणसांमध्ये असल्याने तो एकटा राहू शकत नाही. एकटेपणाचा त्याला कंटाळा येतो. Sharing करण्यासाठी कोणी तरी असावे असे त्याला वाटते आणि त्यातूनच पसारा वाढत जातो.

मूल जन्माला आले कि सुरवातीला फक्त कुटुंबाबरोबरच असते. तिथेच हळूहळू मोठे होते. शाळेत जायला आई- वडील प्रोत्साहित करतात आणि मग त्याचे समाजाशी नाते जुळायला लागते. पुढे महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, व्यवसाय ह्यामुळे घरापलीकडे इतर सगे सोयरे, मित्र परिवार, colleagues  असा परीघ आणखी वाढू लागतो. समाजाशी नाते अधिकाधिक घट्ट होते.

आजच्या बदलत्या काळांत तंत्रज्ञान एव्हढे विकसित झाले आहे कि सोशल मीडिया चे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढले आहे. TV, Computer, Mobile, Internet, Whats App ह्या साधनांमुळे, वेगळ्या माध्यमांतून , माणूस समाजामध्ये कनेक्ट होतोय. पण वस्तुस्थिती अशी आहे कि, ह्या सर्व पसाऱ्यात तो स्वतःला आणि नातेवाईकांना दुरावत चाललाय. कदाचित हे सर्व सुधारावे म्हणूनच आजची परिस्थिती निर्माण झाली असावी.

Home Furnishings & Home Goods | Kohl's
आपण इकॉनॉमिक्स मध्ये कायम शिकत आलोय कि " MAN  IS A SOCIAL ANIMAL "  पण आज ह्याच समाजापासून विलग होऊन पुन्हा त्याला त्याच्या घरट्यात जायला, तिथेच राहायला भाग पाडलंय, एका विषाणूने. अगदी मुख्यमंत्रीपंतप्रधान सगळ्यांना पुन्हा पुन्हा  सांगावं लागतंय, STAY HOME . सतत काही ना काही कारणानें बाहेर धावणाऱ्या समाजाला पुनश्च एकवार घरांत, बंधनात डांबण्यात आलंय. स्वतःच्या घरांत तुम्ही कसे सुरक्षित आहात, कुटुंबाबरोबर तुमचा वेळ कसा घालवू शकता, फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करू शकता, ह्याच्या टिप्स देण्यासाठी सर्वजण सरसावले आहेतआहे कि नाही गम्मत ?

ह्या निमित्ताने सतत धावणारे गतिमान जग, थोड्या काळापुरते विसावलंय. घरा-घरांत माणसे आपल्या कुटुंबाच्या बरोबर एकरूप होतायत, कुटुंबप्रेम अनुभवतायत, स्वास्थ्य जपतायत, गृहिणीच्या हातच्या सुग्रास अन्नाची चव चाखतायत, कधी स्वतःचं पाक-कौशल्य अजमावतायत, स्वयं शिस्तीचे पालन करतायत. बाहेर सुद्धा Social Distancing ची मर्यादा पाळली जातेय. नाक्या-नाक्यावरचे अड्डे थंडावले आहेत, CCD , Barista , MacD हे सध्या ओस पडलेत.

" मी" चा via समाज, प्रवास, पुन्हा कुठेतरी मी पाशी येऊन ठेपलाय. एक वर्तुळ पूर्ण होतंय. सतत बाहेर धावणारे मन अंतर्मनात डोकावतंय. स्वतःचा शोध घेतंय.

पृथ्वीने सलग काही दिवस एक असीम शांततेचा अनुभव घेतला. पण इतक्या वर्षाची अंगवळणी पडलेली सवय, तिला ही आता अस्वस्थ वाटू लागले. खूप झाला हा खेळ. लोक ह्या अनुभवानंतर नक्कीच शहाणे होतील. आता त्यांना जास्त त्रास नको. तिने नारायणाशी Video Call वर संपर्क साधला. सगळे दिग्गज आपापल्या ठिकाणी बसून मास्क लावून ह्या मीटिंग मध्ये सहभागी झाले होते, माणसांपासून Social Distancing त्यांनाही हवेच होते. पृथ्वी मातेने सर्व परिस्थितीचा अहवाल सादर केला. "खूप कठोर शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागत आहे, माणसे ह्यातून नक्की धडा घेतील, शहाणी होतील, आता अधिक न ताणता सर्वांना ह्या महामारीपासून वाचवा ”, तिने प्रार्थना केली.

नारायण म्हणाले तथास्तु

वसंत ऋतू मुळे बहरलेली पृथ्वीमाता सगळ्यांसमवेत पुन्हा एकदा गतिमान झाली...आनंदाचे गीत गाऊ लागली .... मुक्तकंठाने नारायणाचे स्तवन करू  लागली...

Tuesday, April 7, 2020

Gauri Trutiya


       

                                                   ll  गौरी  तृतीया  ll


हल्ली सकाळ जरा अंमळ लवकरच सुरु होते. पहाटे पांच वाजताच. बिघडलेल्या परिस्थितीचे सावट मनावर असताना झोप तरी कशी येणार ? रोज सकाळी फिरायला बाहेर जायची सवय, पण त्याला मोडता घालावा लागलाय. विषाणूच्या प्रभावाने रोजची जीवनशैली पूर्ण बदलून गेली आहे.
चहा पाणी झाल्यावर आजच्या दिवसाचे planning . घरात काय सामान उपलब्ध आहे त्यावरच नाश्ता आणि जेवणाचा मेन्यू ठरवायचा. शक्यतो बाहेर न जाण्याची काळजी घेतली आहे.
सहज कॅलेंडर कडे नजर गेली. सध्या आला दिवस पार पाडायचा, अश्या वातावरणामुळे, आज गौरी तृतीया आहे , ह्याकडे लक्ष्य गेलेच नव्हते. चैत्रा गौर आज माहेरपणाला येणार आणि एक महिनाभर राहणार ना इथे. मग काय तिचे कोड कौतुक नको का करायला ? पदर बांधून मी सरसावले. आज तिच्यासाठी सुवासिक मोगरीचा गजरा नव्हता माझ्याकडे. कैरी, हरभरे, ह्यातले काहीच नव्हते आज. काय करू ग गौरी, सध्या घराबाहेर पडायची बंदी आहे ना ? तुझं आदरातिथ्य करायला काहीच नाही घरात.
आज वातावरण ही काहीसे ढगाळ, धुंद - कुंद. सूर्य ही जरा रुसलेलाच. वारे वाहत होते. बाहेर  गच्चीत डोकावले. कुंडीतली फुले वाऱ्यावर डोलत होती. केशरी अबोली, गुलाबी - पांढरी सदाफुली , लाल चाफा, कण्हेरी. फुले काढण्यासाठी मी बाहेर गेलेकोकिळेचे कूजन चालू होते. वसंत ऋतू खरा तर किती आनंद घेऊन येतो. सर्व सृष्टीला, चराचराला आनंदी करतो. पण आज मनात नेहेमीचा आनंद, उत्साह नव्हता.
पूजेसाठी फुले, पाने घेऊन मी घरात आले. सडासंमार्जन करून त्यावर " चैत्रांगण " रेखाटले. माहेरी आलेली धाकटी लेक, गाड्या बंद असल्यामुळे सासरी जाऊ न शकलेली, साखर झोपेत होती. लांबूनच तिला साद घातली, गौरी , ए  गौरी.  सध्या आराम चालू असल्यामुळे , आईने हांक मारून झोपेतून उठवल्यामुळे ती माझ्यावर  रागावलीच.

"अगं आज माहेरी जेवायला यायचं हं ". मी तिला आमंत्रण   दिले. ती जरा गोंधळलीच. आता मात्र मी जोरदार तयारीला लागले. चालती बोलती गौर यायची होती ना माहेरी जेवायला ?


चैत्रांगण | Maayboliदेवपूजा करताना मखरांत अन्नपूर्णेची स्थापना केली. तिला आवाहन केले. हे गौरी महिन्याभरासाठी तू आपल्या माहेरी आलीयेस. आनंदाने राहा ग इथे. जमेल तसं कोडकौतुक करीन. छान पाहुणचार करीन. आर्ततेने तिची प्रार्थना केली.
स्वैपाकाला लागले. देवीसाठी नैवेद्य करायचा होता . वरण भात, डाळिंबी उसळ, गवल्याची खीर, पुरण, भजी आहे त्यातच छान बेत जमून आला. देवीला नेवेद्य अर्पण केला. तिची  मनापासून प्रार्थना केली. हे दुर्गार्तिनाशिनीआमच्या सगळ्या बांधवांवर आलेले हे संकट, लवकरात लवकर दूर कर, आमच्या दुःखाचे हरण कर आई.
दूरदेशी असलेल्या मोठ्या लेकी आणि जावयांचे क्षेमकुशल असावे म्हणून तिला पुन्हा हात जोडले.
जेवणानंतर सगळे तृप्त झाले. वामकुक्षी नंतर संध्याकाळचा बेत. डाळ - पन्हे. आज आंब्याची नाही तर वाटली डाळ आणि तय्यार बाटलीतले पन्हे, खोबऱ्याची खिरापत.
समईच्या मंद प्रकाशात देवीच्या चेहेऱ्यावर एक आगळे समाधान दिसत होते आणि आहे त्या कठीण परिस्थितीत आजचा दिवस आनंदाने साजरा करता आला त्याचे समाधान माझ्या अंतःकरणात होते.
चला श्रीराम आता वाट पाहत असेल आपली. सायंप्रार्थना करायची आहे. रामोपासनेचा संकल्प पुरा करायचाय.   सलग गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत नऊ दिवस. इतक्या वर्षात न जमलेली साधना आता हातून घडतेय.  आम्ही दोघे , मुलगी आणि बरोबरीने ८०+ आई आणि सासूबाई ह्यांना बरोबर घेऊन तीन पिढ्या एकत्र बसून उपासना करतोय. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण आणि उत्साह आहे .

इच्छा असूनही एरवी न साधला जाणारा संवाद साधला जातोय. बाहेर बरंच काही बिघडलंय , पण घरा- घरांत बरंच काही घडतंय, हेही नसे थोडके ....


बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्यात सुद्धा आपले रीतिरिवाज जसे जमेल त्याप्रमाणे पण मनापासून आणि सर्वांबरोबर साजरे करण्यातच आपली संस्कृती, परंपरा ह्यांची ठेव जपली जाते नाही का?  

शब्दस्नेह