Sunday, June 28, 2020
Ye Dil Mange More...( ये दिल मांगे मोअर )
Saturday, June 20, 2020
Prasid Mam Bhaskar ( प्रसीद मम भास्कर )
आज २१ जून, वर्षांतला सर्वांत मोठ्ठा दिवस. मित्रा, आज तुझा सहवास आम्हाला जास्त वेळ लाभणार. या दिवसाचे हे महत्व लक्षांत घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय योगदिवस जगभर साजरा करतो.
उद्यापासून तू दक्षिणायनात प्रवेश करणार. दिवस लहान आणि रात्र मोठी होणार. सहा महिन्यांनी तू पुनः उत्तरायणांत प्रवेश करशील. त्यावेळी आम्ही संक्रांत आणि रथसप्तमीचा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो.
हे नारायणा, तुझे तेजोबिंब सकाळच्या प्रहरी दश-दिशांना उजळवीत क्षितिजाची सीमा पार करून वर येते तेव्हा होणारा आनंद आगळाच असतो. जणू काही मायेचं ( तिमिर ) अस्तित्व लोप पावते आणि परमेश्वराचे सत्य स्वरूप याची देही, याची डोळा पाहता येतं.
खरं तर आपली भेट रोज ठरलेली. पण तरीही रामप्रहरी तू येण्याची चाहूल लागताच डोळे तुझ्या आगमनाकडे लागतात. किती तुझ्या स्वागताचा थाट! भूपाळी, ओव्या... माऊली सकाळी सकाळी जात्यावर बसून ह्या ओव्या गात असत... ह्या गोड ओव्या सकाळच्या प्रसन्नतेत भर घालत.
सात घोड्यांच्या रथांवर बसून स्वारी अवतीर्ण होते, तेव्हा मन प्रसन्न होते. ह्या रथाला एकच चाक आहे. रथाचा सारथी पांगुळा आहे. ह्या रथाला कोणताही आधार नाही. भूमी नाही आणि आकाशही नाही. अधांतरीच हा रथ धावत असतो. "केयूरवान मकरकुंडलवान किरिटी हारी हिरण्मय वपुरधृत शंखचक्र:" असे तुझे रूप. सहस्र किरणांच्या, सहस्र शाखांमधून तू प्रगट होतोस.
अरुणोदय होताच रुबाबदार पावलं टाकत अवघे आकाश पादाक्रांत करतोस तेव्हा हे आरक्तवर्णी, आल्हाददायी रूप मन प्रसन्न करते. तिमिर हरुनी देई प्रकाश, देई अभय... ते कोवळं, लडिवाळ रूप नजरेत बंदिस्त करे करे पर्यंतच किती रंग -रूप पालटतोस. दिवसभरात वेगवेगळी रूपं धारण करतोस, आणि संध्याकाळी परत एकदा आरक्तवर्ण. त्यावेळचं तुझं रूप बघायलाही सगळ्यांनाच आवडतं. पण सकाळी तुझ्याकडे बघून वाटणारा उत्साह संध्याकाळी मात्र मन उदास करतो. कातरवेळी मन जुन्या आठवणींनी भरून येते. मधल्या वेळेत तुझं रूप कर्तव्य प्रखर, सन्मार्गाचा मार्ग दाखवणारं. पण दुपारी तेजाच्या उग्र रुपापुढे मात्र कोणी डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही तुझ्या. तुझा प्रकाश इतका निर्मळ, पावन, पारदर्शी, आम्ही सत्याला ही तुझ्या प्रकाशाची उपमा देतो.
![]() |
विधात्याने सृष्टी निर्माण केली तेव्हाच ह्या नभामध्ये तुझं आणि चंद्राचे सुबक झुंबर छताला लावले. ज्यायोगे तुझ्यामुळे दिवसा प्रकाशमान झालेले जग रात्री शांतपणे चंद्राच्या निळ्या प्रकाशात विश्रांती घेऊ शकेल.
चंद्र, सूर्याना केवळ ग्रह न मानता मानवाने त्यांना देवत्व ही बहाल केलेआहे. "आदित्य" हिंदू धर्माची मुख्य देवता. जणू ब्रह्माचे चैतन्यरुपी मूर्त स्वरूप. नवग्रहांपैकी हा स्वयंप्रकाशी ग्रह आपल्याला आकाशांत सहज बघता येतो. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका आहे त्यांना हे परमेश्वराचे सगुण रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येते. सूर्यालाही जगाचा डोळा म्हटले आहे. " नमः सवित्रे जगदेकचक्षुषे ". एवढेच नाही तर जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, ब्रह्म, विष्णू, महेश रूपांत असणारा हा सूर्यच आहे.
सौर सूक्त, सूर्यमंडल स्तोत्रांत
तुझ्या ह्या दीप्तिमान, सतेज रूपाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
ह्या विशाल, तेजस्वी प्रभामंडल असणाऱ्या रत्नमंडित रूपाची पूजा आम्ही करतो. तुझं श्रेष्ठ तेज प्राप्त व्हावे अशी इच्छा करतो. देव, ब्राह्मण, संतमहात्मे तुझ्या पूजनात दंग असतात. तू ज्ञानाने परिपूर्ण आहेस, अनादी आहेस आणि अगम्य आहेस हे ज्ञानी जाणतात. भू, भुवः आणि स्व: ह्या तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझ्या तेजामुळे हे तिन्ही लोक प्रकाशित होतात.
हे सूर्या तुझ्या उपासनेमुळे ज्ञान
प्राप्त होते. पापांचा, व्याधींचा
नाश होतो. शरीरसंपदा आणि ऐहिक वैभव प्राप्त होते. सूर्य नमस्कार ही प्राचीन भारतीय
परंपरा आजही टिकून आहे. अकाल मृत्यू हरणं, सर्वव्याधी विनाशनं, अशी ह्या सूर्यनमस्काराची महती सांगितली आहे.
तुझी १२ नांवे ही अर्थपूर्ण आहेत.ही विष्णुंचीच विविध रूपे आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने विभूती योगांत, मी स्वतः ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य आहे, असे सांगितले आहे."आदित्यनामहं विष्णुरज्योतिषां रविरंशुमान" सर्व प्रकाशमान वस्तूत भगवंताचे हे रूप सर्वश्रेष्ठ आहे. .
अशा तेजस्वी रूपाची उपासना सकाळच्या वेळी केली तर पूर्ण दिवस आनंदात, उत्साहात पार पडतो. काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. नकारात्मक विचार नाहीसे होतात. आणि अर्थातच व्यक्तीचे जीवनमान सुधारते, त्याला मान सन्मान, यश प्राप्त होते. म्हणूनच तुला मित्र हे नाव असावे.
सूर्यवंशात जन्माला आलेल्या श्री रामांचे चरित्र तुझ्यासारखे तेजस्वी आहे.
समर्थ रामदास स्वामींनी सूर्य उपासना, गायत्री पुरश्चरण अविरत बारा वर्षे
केले. त्या अनुष्ठानामुळे
झालेले त्यांचे तेज:पुंज, शक्तिशाली रूप मनावर प्रभाव टाकते. जनसामान्यांचा उद्धार करणारे त्यांचे कार्य डोळे दीपवून टाकते.
शंकराचार्य म्हणतात: आत्मस्वरूप तेजाचे स्मरण केल्यामुळे अज्ञानरूपी अंधार नाहीसा होऊन, ज्ञानरूपी सूर्यप्रकाशामुळे स्वस्वरूपाचे ज्ञान होईल आणि बुद्धी आनंदी राहील सूर्याला उदय-अस्त आहे, त्यालाही ग्रहण लागते. पण ज्ञानसूर्याला उदय अस्त नाही. उपासनेमुळे आत्मज्ञान होणे हीच खरी पहाट.
सद्गुरूंचे प्रखर रूपही सूर्याप्रमाणेच असते. ज्ञानाचे अंजन शिष्याच्या डोळ्यांत घालून सद्गुरू अज्ञानाचा नाश करतात. सद्गुरूंना सूर्याची यथार्थ उपमा दिली आहे.
सूर्याची उगवती दिशा, पूर्व दिशेला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या,ही जगाची रीत आहे. हे जाणून व्यवहार केले तर दुःख पदरात पडत नाही.
सूर्यप्रकाशाचे वरदान लाभल्यामुळे आपले
जीवन आनंदी झाले आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे सौर ऊर्जेचा (Solar Energy) वापर
दैनंदिन जीवनांत मोठ्या प्रमाणांवर केला जाऊ लागला आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीवर मिळणाऱ्या तेजाचा आणि प्रकाशाचा मुख्य स्रोत "सूर्य" म्हणजे तूच. अग्नितत्वामुळे आपले जीवन विकसित होते, वनस्पती, प्राणिमात्र ह्या सर्वांनाच ही ऊर्जा आवश्यक असते. सर्व चराचराचा हा अन्नदाता. सृष्टीचे जीवनचक्र सूर्यामुळेच अखंड चालू राहते.
रविवार हा तुझा वार. नवीन सप्ताहासाठी लागणारी ऊर्जा सूर्य उपासना करून मिळवावी म्हणूनच रविवारच्या सुट्टीचे प्रयोजन असावे. प्रत्यक्षांत मात्र हा दिवस आळसात, उशिरा उठूनच वाया जातो.
अंधःकार रुपी दुःखाचा विनाश होऊन प्रकाश रुपी सुखाचा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो म्हणूनच तुझी प्रार्थना …….
असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय
।।
स्नेहा हेमंत भाटवडेकर
विलेपार्ले ( पूर्व ) , मुंबई
sneha8562@gmail.com
Monday, June 8, 2020
Jewel Of Mysore ( Visit to Heritage Site )

Heritage City असल्याने त्याविषयी मनांत उत्सुकताही होतीच. हॉटेलच्या समोरच असलेला कोर्टाचा विस्तीर्ण परिसर मोठमोठ्या हिरव्या वृक्षांनी वेढलेला होता. नवीन शहराचे दर्शन घेत पुढे जात असतांना अहाहा ... गुलमोहोर आमची वाट पाहत उभाच होता. मातीचा लालभडक रंग आणि वेगळ्या लाल छटेचा गुलमोहोर. गर्द हिरवी पाने. वळणदार काळभोर रस्ते. वाट इथे स्वप्नातील ... रस्त्याच्या दुतर्फा अदबीने उभे असलेले ते गुलमोहोर. हे वृक्ष हि ह्या शहराची विशेष ओळख. .ते दृश्य आजही नजरेसमोरून हटत नाही. म्हैसूर शहराचा हा भाग खूपच आवडला.
Monday, June 1, 2020
Soubhagya Dayini Ganga ( सौभाग्यदायिनी गंगा )

Wednesday, May 27, 2020
Aum Namoji Vitthala ॐ नमोजी विठ्ठला
|| श्री शंकर ||
ॐ नमोजी
विठ्ठला
सकाळची
प्रसन्न वेळ.घंटेचा नाद सभागृहांत घुमतो. सूर्याची चमचमणारी कोवळी
किरणे अलगद मंदिराच्या प्रवेशद्वाराशी थबकतात.बाहेर लागूनच उभा असलेला सर्वसाक्षी पिंपळ आपल्या पानांची सळसळ
थांबवून सज्ज होतो आणि सर्व भाविक सभागृहात शिस्तबद्ध रीतीने आसनस्थ होतात.अगदी वेळेत ,एकसुरात प्रातःस्मरणाला सुरवात होते.गेली अनेक वर्षे
अखंडपणे सुरु असलेली हि परंपरा. नांदेड जवळील उमरी पासून काही अंतरावर असलेले गोरठा. ह्या छोट्याश्या खेडेगावांतली मंडळी बहुतांशी अक्षर ओळखही नसलेली, शाळकरी मुलं, नित्यनेमाने सकाळी इथे येऊन दासगणू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन , प्रातःस्मरणाने आपल्या दिवसाची मंगलमय
सुरवात करतात आणि मगच कामाला लागतात.
आधुनिक महिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत कवी दासगणू महाराजांची हि कर्मभूमी. आणि आता महाराजांची वस्त्र समाधी तिथे आहे.ह्या खेड्याचे भाग्य थोर म्हणूनच इथे संतपरंपरा रुजली, वाढली आणि त्याचा सुगंध आजही आसमंतात दरवळतो आहे.आपल्या प्रसादमय, भक्ती रसाने चिंब भिजलेल्या काव्याने महाराजांनी जनमानसात भक्तिप्रेमाची गुढी उभारली. भक्ती- सामर्थ्याने प्रेरित असलेली हि चळवळ आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.
विठ्ठलाच्या
नावाचा गजर होतो आणि महाराजांनी रचलेल्या रसाळ स्तोत्रांची मालिकाच सुरु होते.
घनगंभीर आवाज सभागृहांत निनादत राहतो. आपण हि त्या प्रवाहात कधी मिसळून जातो समजत
नाही.
आता
पांडुरंग स्तोत्राला सुरवात होते. मंगलाचरण
होऊन, सद्गुरू
आणि संतसज्जनाचे आशीर्वाद घेऊन महाराज विठ्ठलाला साद घालतात.
हे
चराचरव्यापक उदारा , पांडुरंगा , रुक्मिणीपती ...
महाराजांच्या डोळ्यासमोर पांडुरंग स्तोत्र रचताना
पंढरपूरचा विठ्ठल तर होताच ,त्याचबरोबर परमेश्वराचे व्यापक रूप ते ह्या पांडुरंगात
पाहत होते.
मत्स्य
कच्छ,वराह
नरहरी | वामन
,परशुराम
रावणारी |
कृष्ण
,बौद्ध
,कलंकी
या परी | नाना
रूपे धरिलींस ||
महाराज
वर्णन करतात , भक्तांच्या रक्षणासाठी युगांनयुगे विविध अवतार धारण करून , वेगवेगळ्या लीला करणारा तूच.
पुढे
ते म्हणतात ...
नाना
मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात | परी अवघ्यांचे सार सत्य एक तूच अससी कि ||
शैव
असो किंवा वैष्णव हे पंथ दिसताना वेगळे दिसले तरी त्यामध्ये सामावलेला तूच
आहेस.अद्वैत सिद्धांत महाराजांनी इथे अगदी सहजपणे मांडलेला आहे.
विठ्ठल
,परमेश्वराचा
हा "नववा अवतार" भक्तांचा उद्धार करण्यासाठीच झालेला आहे. तरी महाराज म्हणतात, "जगदारंभापासून भक्त तुझे गाती
गुण", यातून त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म
म्हणजेच त्याचे सगुण रूप " पांडुरंग" अभिप्रेत आहे.
संपूर्ण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेला हा पंढरपुरी
निवास करणारा चित्तचोर. ज्यांनी ज्यांनी आपल्या अनन्य भक्तीने
त्या पांडुरंगावर प्रेम केले त्या भक्तांसाठी हा धावून जातो.
ह्या
लडिवाळ भक्तांची नांवे तरी किती सांगावीत ? दामाजीपंत,नरसी मेहेता, बोधले बुवा किंवा जनाबाई ,कान्होपात्रा.भगवंताशी आपुलकीच्या नात्याने जोडल्या गेलेल्या आपल्या भक्तांचा तारणहार हाच. निजभक्तांच्या रक्षणासाठी हाच कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे.
हा
विठ्ठल आहे तरी कसा ?
“आब्रह्मस्तंबपर्यंत तूच एक रुक्मिणीकांत " चराचरांत
व्यापलेला ,घटाघटांत सामावलेला विविध रूपांत वावरणारा तो हाच. आकाशासारखे
अमर्याद,विशाल असे हे परब्रह्म प्रत्यक्षात जरी निर्गुण असले तरी जडमूढ
जीवांसाठी ते सगुण झाले." रूप पाहता लोचनी ,सुख झाले हो साजणी “
त्याच्या रूपाचे वर्णन करताना शब्द अपुरेच पडतात,
![]() |
| ते हे रुपडे मनोहर | गळा घवघवीत तुळसीहार || |
हा विठ्ठल जणू मदनाचा पुतळाच.मनोमन विठ्ठलाचे हे
देखणे रूप मनःपटलावर कोरले जाते. शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध हि भुतांची तन्मात्रे.त्याचे
प्रतीक म्हणजेच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला. त्या तुलसीदलांचा सुवास आसमंत भारून टाकतो.आपल्या मनाचा गाभाराही
व्यापून टाकतो. मूर्तीत प्रगटलेलें चैतन्य भक्तांची चेतना जागृत करते.
आता
साक्षात हा विठ्ठल समोर उभा ठाकलाय, पण त्याची पूजा करू तरी कशाने ? सगळ्या निसर्गावर मालकी तर त्याचीच. मग माझे बोलणे, हिंडणे- फिरणे सर्व काही त्याच्याच पायाशी
अर्पण करतो.माझी प्रत्येक कृती हि त्याच्याच प्रेरणेने झाली आहे. विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले
महाराजांचे मन सतत त्याचा धावा करतेय.माझ्या गुणदोषांसकट माझा स्वीकार कर,म्हणून महाराज त्या विठू माऊलीला आर्ततेने हाक मारतात. महाराज " अक्षर
रुपी" वाङ्मयसेवा " अक्षर " विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला
समर्पित करतात.
अर्थात
माऊलीच ती. भक्ताचा भाव जाणून इच्छित फळ त्याला देतेच.संसार तापाने पोळलेल्या
सामान्य जनांना हवे असेल ते सर्व ह्या विठ्ठलाची भक्ती आणि ह्या स्तोत्राचे पठण केल्यास प्राप्त होते.फक्त हवा प्रामाणिकपणा,श्रद्धा , निष्ठा. तो परमेश्वर मग तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो.
महाराजांनी
सुमारे एकशेदहा वर्षांपूर्वी रचलेले हे पांडुरंग स्तोत्र. ह्या स्तोत्राचे मनोभावे केलेले पारायण तुमच्या
देहबुद्धीचा नाश करून त्या वैकुंठनायकाची भेट नक्की घडवील असा विश्वास महाराज
व्यक्त करतात .
हे
स्तोत्र त्यातील शब्द जिव्हाळ्यामुळे भाविकांना आकर्षित करते.दिवसभर त्यातील
शब्दांचे गुंजन मनांत चालू राहते.वेदांत तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत इथे प्रगट
होते. अवीट गोडीचे हे स्तोत्र सामान्य भक्तालाही आपले वाटते.
माझ्यासारख्या प्रापंचिक गृहिणीला महाराजांचे शब्दवैभव,तत्वज्ञान,काव्याची ओघवती भाषा,त्यातील प्रसाद गुण,लालित्य सर्वच मोहात पाडते.आजही ते स्तोत्र म्हणताना नित्यनूतनच भासते.
ह्या
भक्तिरसात डुंबण्यासाठी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ….
पारायण हीच वारी | करा अत्यादरे निर्धारी |
भक्तिपताका स्कंधावरी | घेऊनिया भाविक हो ||
पुंडलिक
वरदा हरी विठ्ठल....



