Monday, May 22, 2023

 

 || श्री शंकर ||

जपून ठेवलेली सुगंधी आठवण

 

आठवणी हे माणसाला लाभलेलं एक वरदान ! ह्या गत स्मृतींच्या आधारानेच तर जीवन चालू राहते. आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून उंच उंच झोके घेते. सर्व कर्तव्ये निभावल्यावर उराशी जपायच्या त्या मधुर सुंदर आठवणी.पुढची वाटचाल सुगंधी करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या ह्या आठवणी.

स्मृतींच्या उद्यानात मी एकटीच बसले होते.स्वतःच्याच मनाशी संवाद साधत उत्तरायणात आलेला निवांतपणा जबाबदाऱ्यांची हलकी झालेली बंधने ...भरपूर मोकळा वेळ . आताशा  ह्या उद्यानात वारंवार माझं येणं होतं...कधी बालपणीचे दिवस आठवतात आई -बाबा आणि धाकटा भाऊ ह्याच मर्यादेत असलेलं उबदार घर, सौख्यदायी ! , नवथर यौवन.. शाळा-कॉलेजमधले रम्य दिवस ,कधी सोनेरी यश तर कधी अपयशाचे कडू घोट गिळत करीअरची  सुरवात होऊन जम बसेपर्यंतच जमलेला विवाह.. मुलगी सुयोग्य स्थळी पडली हो म्हणत नातेवाईकांनी उधळलेली स्तुती-सुमने !एकमेकांच्या साथीने केलेला प्रवास ...मुलांची किलबिल.. चिवचिवाट .जात्याच अतिशय हुशार ,मेरिट मध्ये आलेल्या दोघी मुली,त्यांचेही उत्तम शिक्षण आणि आता विवाहानंतर आपल्या संसारात मग्न !आता शांत  झालेलं  घरटं...किती आठवणींचे पदर गुंफलेत हे घरटे विणताना ...कधी ऊन पाऊस ,कधी सुख-दुःख , मान -अपमान ...सगळे आघात सहन करत मनात जपून ठेवलेल्या आठवणींचा गोफ ...मन ह्या आठवणींचा धांडोळा घ्यायला आतुर असतं... अगदी मनाच्या डोहात खोल तळाशी डोकावून हाताशी काय लागतंय त्याचा अंदाज बांधत..मनाच्या अल्बम मधील एकेका फोटोवर स्थिरावतं….

ह्या उद्यानात काळ - वेळेचं बंधन नसतंच. बागेत प्रवेश केल्यावर मला आकाशाचा निळा रंग मोहवून टाकतो. हवेची झुळूक मनाला सुखावते, शरीरावर गोड शिरशिरी उमटते,झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडतात आणि मनालाही तजेलदार करतात .हिरवळीची हिरवाई डोळ्यांना थंडावते ,रंगीबेरंगी फुलांचे रंग मनाला मोहवून टाकतात. पारिजातक , रातराणी ह्या फुलांचा गंध वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मनालाही उल्हसित करतो फुलावर बसलेली मनमोहक फुलपाखरे माझं लक्ष वेधून घेतात हि चंचल फुलपाखरे मग एकदम आसमंत व्यापून मुक्तपणे संचार करतात.मी ह्या फुलपाखरांमध्ये माझ्या मनाचे रंग गुंफते.अलवारपणे त्यांना पकडायला धावते.चिमटीत पकडता येतील ती फुलपाखरे कसली ? ह्या उधळलेल्या रंग -गंधात मग आठवणींचा एकेक कप्पा उलगडत जातो. पारिजातकाची इवली इवली कोमल नाजूक फुले आपोआपच झाडापासून वेगळी होऊन अलगद जमिनीवर पडतात. मला माहेरची आठवण करून देतात.डोळ्यातल्या आसवानी मग बागेतलं सर्व वातावरणच धूसर होतं.

१९९० साल ...माझे वडील सेवानिवृत्त झाले त्यांच्या सद्गुरूची भेट घ्यायला ते थेट हिमालयात पोहोचले.तिथून परत येताना माझ्यासाठी एक भेट घेऊनच आले.मोठ्या अक्षरांचे गीतेचे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. हृषीकेश इथे असणाऱ्या गोरखपूर प्रेस मधूनच हे पुस्तक त्यांनी आणले होते.त्यावर त्यांच्या सद्गुरूची स्वाक्षरी आणि सद्गुरूचे आशीर्वाद सोबत होते .केव्हढी मोठी भेट !!! त्याचे महत्व कळण्याचे ते वय अर्थातच नव्हते. आता निवृत्तीनंतर मी तुला एवढेच देऊ शकतो .त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या." बाबा ,तुमच्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही ,आजपर्यंत मला भरपूर काही दिलेत, वाईट कशाला वाटून घेता ? “मी बाबांची माझ्यापरीने समजूत घातली. हा संवाद खरं तर एवढ्यावरच थांबला.ती एक आठवणच राहिली.बाबांचा तो चेहेरा मनावर कायम कोरला गेला.

ह्या पुस्तकाच्या रूपाने पुढचा प्रवास सुरु झाला जो खरं तर मलाही अनपेक्षित होता.गीतेची संथा देणाऱ्या फळणीकर बाईंची भेट झाली. त्यांच्याकडून पूर्ण गीता शिकल्यावर ती नित्य पठणात आली. गीतेचे पाठांतर सुरु झाले ,पारायणे झाली पुढे त्याचा अर्थबोध..त्यानिमित्ताने विचार, चिंतन मनन...ह्या गीतेने अगदी पार तिच्या बंधनात अडकवूनच टाकलं मनाचा गाभारा केवळ सुगंधितच नाही तर पवित्रही केला.

हळू हळू गीतेच्या आधारे काही लेखन झाले. अनपेक्षित प्रसिद्धी लाभली.ज्यांना शिकायची आवड आहे त्यांना गीतेचे माहात्म्य सांगायला ,जमेल तसा  प्रसार करायला सुरुवात .पुस्तकाच्या अवती-भवती माझा मन -मोगरा बहरू लागला.दारी लावलेले इवलेसे रोप आता छान बाळसे धरलेय त्याने...ह्या रोपाच्या मुळाशी असते बाबांचे माझ्यावरील निरपेक्ष प्रेम, जिव्हाळा,सुगंधी आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात सांभाळून ठेवलेल्या....त्या पुस्तकाला मी मनोमन वंदन करते ..

गीतेच्या तत्वज्ञानाचा आधार जीवनाला लाभला कि मन स्वाभाविकपणे स्थिरावते. शांत होते. शरीर निवृत्तिपथावरून चालू लागले कि हे तत्वज्ञान आपली चांगली सोबत करते.मन स्थितप्रज्ञ व्हायला सुरवात होते.आणि मग वानप्रस्थ सुखकर होतो. आठवणीच्या सुगंधाबरोबरच अवचिता परिमळू वाढू लागतो.

वर जाणारा झोका पुन्हा खाली येतोच.तसेच आपले आयुष्य. सगळ्याच आठवणी काही सुगंधी असतात असे नाही कटू आठवणींनी मनाचा तोल ढासळतो.उद्यानात रुतणारे काटे पायाला जखम करण्यापूर्वीच मी घाईघाईने हे " स्मृती उद्यान " बंद करते. आणि गीतेच्या वाचनाला प्रारंभ करते.ती चिरंतन सुगंधी आठवण मनोमन जपण्याचा प्रयत्न करते.सुगंधी आठवणींची बरसात व्हावी म्हणून मी त्या सर्वसमर्थ ईश्वराकडे प्रार्थना करते..

 

सौ स्नेहा हेमंत भाटवडेकर

Email : sneha8562@gmail.com

 

 

  

Wednesday, August 24, 2022

Sarata Shravan सरता श्रावण

                                                                   ।। श्री   शंकर  ।।

   सरता श्रावण 

" निघतो गं " तो जवळ येऊन हळूच कानाशी कुजबुजला. 

" अरे इतकी कसली ती निघायची घाई ? " मी काकुळतीने विचारले. 

थांबायचं ना थोडं , अजून पुरती गळाभेट झाली तरी कुठे ?

मन अजून भरलं नाही , तुझं रूप हृदयांत पुरतं ठसलं हि नाही !

नटखट कृष्णासारखा तुही असा फसवशील ,नव्हतं रे वाटलं. 

तू असता तो ही जवळ आहे  असं वाटायचं .. त्याच्या भक्तिरसात मन गुंतून जायचं .. 

" अगं वेडे ! विसरलीस एवढ्यात आपल्या भेटीगाठी ? "

शिव मंदिरातील सोमवारी होणाऱ्या रुद्राभिषेकात भेटतच होतो की आपण ... 

मंगळवारी फुगड्या एकत्रच खेळलो आपण ... 


शुक्रवारी जिवतीची पूजा पूजिली आपण ,

नागोबाला दूध पाजताना, नारळीपौर्णिमा साजरी करतांना ,भावाच्या हातावर राखी  बांधताना...

जन्माष्टमी साजरी होताना भक्तिप्रेमात गुंतलो ,कृष्णाच्या बाललीलांत हरवूनही गेलो ... 

सण ,व्रतं ,वैकल्यं साजरी करताना आपली सांस्कृतिक परंपरा जपताना विविध रूपं दाखवली मी तुला. त्या निमित्ताने नातेवाईक ,मित्रमंडळी एकत्र जमतात. नाहीतरी हल्ली पूर्वी सारख्या भेटी-गाठी राहिल्यात कुठे ?

निसर्गाच्या  हिरव्याकंच विलोभनीय रुपांतूनही भेटलो ना मी तुला कैकवेळा ...इंद्रधनुष्यातील सप्तरंग दाखविले मी तुला ... हीच तर माझी विविध रूपे ... भाळलीस माझ्या रुपावर कित्ती वेळा ? 

अरे पण ह्या सगळ्याची ओढ दाटते ना मनांत ? जिव्हाळा लावून आता का ही  परतीची भाषा ? "श्रावणमासीं हर्ष मानसीं " म्हणत गुंतलो ना आम्ही तुझ्यात ..... तुझ्या सरसरणाऱ्या धारांत अनुभवले चार सुखाचे क्षण ,भक्तिप्रेमात निवांत झाले मन... 

 पाणावलेल्या माझ्या पापण्यांवर अलगद मोरपीस फिरवताना, माझी समजूत घालताना म्हणाला,

आता आलाय मातृदिन. तेही माझेच तर रूप. " न परं मातृदैवतं  " खरं ना ! सारे सण उत्सव  तिच्या पायाशीच तर  नांदतात .... आणि ती तर सदैव अवती भोवतीच असते की लेकरांच्या... 

अगं ! तो बघ  " तो "  यायला निघालाच आहे.  तुम्ही त्याच्या सेवेत गुंतलात की माझ्याकडे लक्षं कोणाचं ?ऊन पावसाच्या खेळांत ,रिमझिम बरसणाऱ्या धारात तो मिश्कीलपणे हसत होता .

टाळ -मृदूंग ,ढोल ताशे ह्यांचा  आवाज आसमंतात निनादू लागला ... 

सरता श्रावण जाता जाता क्षितिजांवर गुलाल  उधळीत होता... 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com


Wednesday, January 26, 2022


                                                                         ।। श्री शंकर ।। 

प्रिय आई ,

न सांगता ,सवरता   अचानक निघून जाताना ,मनाला चटका लावून गेलीस. मनातल्या तुझ्या आठवणी .प्राजक्ताच्या फुलांसारख्या टपटप पडतायत सभोवार ... हळुवार काव्यांत गुंफून  साधतेय तुझ्याशी संवाद . पोचतील  का ग माझे भाव  आता तुझ्या अंतःकरणात   ?

***************************************************************************

                                                                                          श्रीमती सुलेखा विष्णु किंजवडेकर 
' थकलीस गे माय ? ' एकदम आभाळात जाऊन विसावलीस ?

मातृत्वाची शाल तिथून आता आमच्यावर पांघरलीस ।।

सासर - माहेर वत्सलतेच्या धाग्याने तू जोडलेस ,

संसारातील कुलधर्म ,कुलाचार कसोशीने सांभाळलेस ।।

अव्यक्तातून व्यक्त झालीस ,शांतपणे बरसत राहिलीस ,

हिमालयाच्या सावलीत स्वतःचे अस्तित्वही विसरलीस ।।

पतीसमवेत कुटुंबाची / गुरूंची सेवा मनोभावे केलीस ,

' पतिव्रता " धर्माने पुण्याई तू जोडलीस ।।

ना कोणी परके ,सगळ्यांनाच मानलेस  आपले ,

सर्वांच्या आवडीनिवडीचे मर्म चाणाक्षपणे हेरलेस ।।

' सुगरण ' तू ! तुझ्या हातच्या चवीला काय  देऊ उपमा  ?

पाककौशल्याने तुझ्या तृप्त केलीस सर्वांचीच रसना  ।।

उतारवयांत नाम ,जप ,साधनेत , मनापासून  रमलीस 

मुलांच्या संसारातून ' अलगद ' निवृत्तही  झालीस ।।

शांत ,संयत ,समाधानाने व्यतीत केलेस जीवन ,

योग्य वेळी गुरुचरणी समर्पिलेस तन- मन ।।

चंद्रासम  तुझे  अस्तित्वही शीतल ,मनोहर !

चंद्रभागेच्या जलौघासम ,आता  मन झाले   अनावर ।।

' माय -बाप ' विठ्ठल ! माऊली च्या रूपांत विटेवर ! 

आतुरतेने डोळे भरून वाट पाहिलीस का रे भक्तवर ?

माझे माहेर पंढरी ! पंढरी ! ओढ उरांत दाटली ,

माऊलीची आर्त हाक ,खोल डोहांत उमटली ,खोल डोहांत उमटली .... 


तुझीच ताई .... 


स्नेहा भाटवडेकर 

२८/०१/२०२२

sneha8562@gmail.com



Sunday, August 15, 2021

मधुर - माधुरी ( Madhur - Madhuri )

।। श्री शंकर ।। 

मधुर  - माधुरी 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. भारतीय मनामनांत स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळांतील कडू गोड आठवणी ह्या निमित्ताने जाग्या होत असतील. अनेक व्यक्तींच्या बलिदानाने देशाला मिळालेले  हे स्वातंत्र्य  ७५ वर्षं अबाधित ठेवण्यात भारतीय लष्कराचे महत्वाचे योगदान आहे.  ही  गोष्ट अतिशय अवघड. आपले भारतीय जवान कर्तव्यपूर्ती साठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. ही अवघड जबाबदारी पार पाडताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. घरादाराचा त्याग करावा लागतो. पण देशप्रेमाच्या भावनेने हे कर्तव्य ते लीलया पार पाडतात . 

भारतीय वीरांबरोबरच अनेक वीरांगना  सैन्यांत त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःची प्रापंचिक कर्तव्ये पार पाडत असतानाच,देशसेवेचे व्रत ही मोठ्या जबाबदारीने निभावून नेत  आहेत. आपल्या सर्वासाठी ही कौतुकाची अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब  आहे.

अशाच एका कर्तृत्वशालीन लष्करी उच्च पदाधिकारी महिलेचा हा अल्प परिचय ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्याचा हा छोटासा  प्रयत्न. 

आधी AFMC मधे वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सेनेचे खडतर प्रशिक्षण, पदव्युत्तर शिक्षण घेऊन  M .D . ( बालरोगतज्ञ ) ही  पदवी संपादन. मग Nephrology तील  विशेष प्रशिक्षणासाठी परदेशांत वास्तव्य.  हा दीर्घ, कठीण प्रवास अतिशय जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केला. त्याच कॉलेज मधे विद्यार्थी प्रिय  प्राध्यापक , संशोधक, डीन हा प्रवास आणि मग लेफ्टनंट जनरल ह्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास. गेली ४० वर्षं सातत्याने हा खडतर प्रवास करूनही चेहेऱ्यावर असलेले मधुर हास्य तसेच जपणाऱ्या.  आज सेनेतून निवृत्त झाल्यावरही पुढच्या कारकिर्दीसाठी तेव्हढ्याच उत्साहाने सज्ज असणाऱ्या नावाप्रमाणेच मधु -मधुर   ले. जनरल माधुरी कानिटकरांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.  ह्या सर्वोच्च पदापर्यंत पोचणाऱ्या त्या भारतांतील तिसऱ्या महिला तर महाराष्ट्रातील हा मान  मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. त्यांना मिळालेले तीन स्टार्स दिमाखात मिरवणाऱ्या, ह्या माधुरीताईंच्या कर्तृत्वाने आकाशातील स्टार्स चे तेजही फिके पडावे.  

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नुकत्याच आभासी माध्यमांतून झालेल्या एका गप्पांच्या मैफिलीत ह्या "तेजस्विनी" ला जवळून ऐकता आले. तिचे विचार ,अनुभवविश्व समजून घेता  आले. तिच्या हिंमतीचे , जिद्दीचे दर्शन घडले.

 आपल्या आजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील आजीच्या  कर्तृत्वाचा त्या अगदी अभिमानाने उल्लेख करतात. 

ह्या गप्पांच्या निमित्ताने त्यांच्या सहजीवनाचा, मातृत्वाचा, कर्तव्यकठोर लष्करी अधिकाराचा, एक शिक्षिका  म्हणून विद्यार्थ्यांबरोबर असलेल्या नात्याचा उलगडत गेलेला प्रवास खूप काही शिकवून गेला. हुशारी,सौन्दर्य,शालीनता ह्या मृदू व्यक्तिमत्वामागे असलेला एक अतिशय धाडसी, सेवाभावी, देशभक्ताचा चेहरा, ह्या दोन्ही गोष्टीचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वाला खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेला. उच्च पदावर असूनही पाय भक्कमपणे जमिनीवर रोवलेले, दिलखुलास आणि सदाबहार अशा ह्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे प्रकाशमान झाले. ह्या यंग आजीच्या स्मितहास्याने गप्पांचा सर्व माहोल अगदी जिवंत झाला. 

त्यांच्या बरोबर झालेल्या संवादातून त्यांचे फुललेले परिपक्व सहजीवन खूप काही सांगून गेले. आर्मी मधेच त्यांचे पती कार्यरत असूनही दोघांची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे फार कमी काळ एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. पण राजीवजींच्या पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे, प्रोत्साहनामुळे त्याही विकसित होत राहिल्या आणि राजीवजींच्या पावलावर पाऊल  ठेऊन ले. जनरल झाल्या. त्यावेळी  राजीवजींची लष्करी कॅप  परिधान करताना झालेला आनंद आत्ताही  त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत होता. राजीवजीं विषयी बोलताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारे स्नेहभाव त्यांच्या नात्यातील मार्दवाची साक्ष देतात. भारतीय सैन्यात ह्या पदावर पोचलेले हे एकमेव जोडपे. त्यांचे साहचर्य आम्हांला आदर्शभूत असणारे  .

जीवनांत अनेक कठीण प्रसंग आले पण आहे त्या परिस्थितीचा हसत हसत स्वीकार करायच्या वृत्तीमुळे त्यांचे निर्मळ हसू कायम फुललेले राहिले.जिथे पोस्टिंग असेल तिथे नवनवीन कलागुण त्या आत्मसात करत राहिल्या. मग ते नृत्य असेल.सायकलिंग किंवा horse riding . सुखोई विमानातून प्रवास असेल. एकदा त्या जिद्दीला पेटल्या कि मग माघार नाही.   मुलांना त्यांच्या वाढत्या वयांत पाहिजे तेव्हा वेळ देता आला नाही हे सांगताना त्यांच्यातली माता संवेदनाशील होते.पण त्याच वेळी लष्करांतील जोडल्या गेलेल्या विस्तारित परिवाराचा , त्यांच्या सहकार्याचा  त्या आवर्जून उल्लेखही  करतात. किती,किती गोष्टी ? त्यांची रोमहर्षक  जीवनकहाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.

कोणत्याही उच्च ध्येयाप्रती तुमच्या मनांत आस्था असेल तर जिद्दीने आणि चिकाटीने तुम्ही त्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकता हा आत्मविश्वास माधुरीताईंमुळे आपल्या मनांत जागृत होतो.  

मनात येतं ,आपण खरंतर किती आरामशीर ,सुरक्षित आयुष्य जगतो ! तरीही परिस्थिति वर सतत करवादत राहतो. आनंदाचे क्षण उपभोगायचे सोडूनआपलेच दुःख कुरवाळत बसतो. अशा कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट नजरेसमोर ठेवून, एखादे पाऊल  तरीआपल्या देशाप्रती  पुढे पडले तर ह्या महिलांच्या कार्याला आमच्या सिव्हिलिअन्स कडून केलेला खरा  सलाम असेल. 

मॅडम आता MUHS ( Maharashtra University of Health Science ) ह्या संस्थेच्या डीन म्हणून सूत्रे हाती घेत आहेत. ही "सौदामिनी" ज्या क्षेत्रांत पाय  ठेवेल तिथे विजेसारखी तळपेल ह्यांत शंका नाही. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी अनंत शुभेच्छा .


Courtsey : डॉ .उपेंद्र किंजवडेकर ( M.D.Peditrician )


स्नेहा भाटवडेकर ( snaha8562@gmail.com)

१५ ऑगस्ट २०२१ 

Sunday, June 27, 2021

ठेविले अनंते *(Thevile Anante)

                                                                    

                                                                ।। श्री शंकर ।।

                                                            ठेविले अनंते 


            Morning Walk साठी  कपडे आणि शूज ची खरेदी करून मी घरी आले. चला ! आता नियमितपणे सकाळी मस्त फेरफटका मारायचा.राधिकाशी फोन वर वेळ ठरवली. संसाराच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या.आता आपले छंद ,हौस -मौज ह्यांचा विचार करायचा. निवृत्तीनंतर राहिलेली स्वप्ने पुरी करायचे    बेत मनाशी आखत होते. मन आता अगदी realax होतं .

           निसर्ग केव्हढा मोठा कलाकार !आपले मन रिझवणारा !मनाला प्रसन्नता बहाल करणारा !थोड्या दूरवर असलेल्या निसर्गरम्य Airport कॉलनीत फिरायला जाणं म्हणूनच  माझ्या खूपच आवडीचं .मोकळ्या आकाशांत दूरवर दिसणारा एअरपोर्ट चा उंच ट्रॅफिक कंट्रोल टॉवर ,जमिनीवर झेप घ्यायला आतुर असलेली विमाने तर कधी आकाशात उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानांची झेप न्याहाळणे इथे नेहेमीचेच. कॉलनीत असलेली दुमजली छोटी छोटी बंगलेवजा घरे ,वळणदार रस्ते ,स्वच्छ परिसर ,रस्त्याच्या दुतर्फा विविध वेली,झाडे,विविध रंगांची उधळण करणारी फुले ,डेरेदार वृक्षांवर किलबिलणारे तऱ्हे -तऱ्हेचे  पक्षी ,सकाळच्या प्रसन्नतेत भर घालीत.  शांतअगदी मोकळे.रस्ते,त्यामुळे बिंधास्त कसेही फिरा. खरंच आपण मुंबईत आहोत की कुठल्या पिकनिक स्पॉटवर ? येणाऱ्या -जाणाऱ्या ओळखीच्या मंडळींशी Hi ,Hello...कोणाशी गप्पा ,तर कधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा.तिथेच असलेल्या सोमेश्वराच्या देवळात जाऊन दर्शन आणि क्षणभर विसावा.अनेकविध activities तिथे वयोमानानुसार सुरु असायच्या. एक वेगळा उत्साह त्यामुळे अंगात संचरायचा आणि दिवसभर हा तजेला टिकून राहायचा.  दिवसअगदी मस्त चालले होते. छान routine set झाले होते. 

 रोजच्या शिरस्त्यानुसार सकाळी प्रभातफेरीसाठी पावलं कॉलनी कडे वळली.कॉलनीच्या मेन गेट बाहेर "इथे फिरायला बंदी आहे" असा बोर्ड लागलेला  बघितला आणि माघारी फिरले. मन हिरमुसलं. आज दीड वर्षानंतरही गेटवर  बोर्ड तसाच आहे. तिथली प्रभातफेरी बंद झाली आणि उत्साहावर मस्त विरजण. अहो फिरणंच काय ह्या विषाणूने अगदी घरातच डांबून ठेवले की !कसलं realaxation आणि कसलं काय !उलट रोजच्या ताण तणावात जास्तच भर.जीवन पार उलटे सुलटे झाले की ! .ह्या महामारीच्या लाटेने सगळेच रुटीन बदलले.रोजच्या जीवनाचा ताळेबंद जमवताना जीव मेटाकुटीला आला. .

कधीतरी अनपेक्षितपणे जीवनांत असा एखादा turning point येतो.असं काही घडेलअसा विचारही आपण केलेला नसतो. पण विपरीत काही घडले कि मग मात्र गाडी अगदी मार्ग सोडून भरकटते .तिला आवर घालणे कठीण होते. विचारांची दिशा बदलते मग.अपने , पराये होतात. मनाचा तोल ढळतो.   विनाकारणच आपण देवाला /दैवाला दोष देतो. खरं तर काही वेळा हे आपण केलेल्या कर्मांचेच बरे वाईट परिणाम असतात.

शांत ,स्थिर जलाशयावर कोणीतरी दगड भिरकावावा आणि त्यातील पाणी उसळी मारून वर यावं ,तसं काहीसं माझं स्थिरावलेलं  मनही डुचमळत होतं . असं  का ? आपल्याच बाबतीत हे का घडावं ? आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच. मन बेचैन ,उदास होते. 

अचानक एक उद्बोधक कविता वाचनात आली  आणि त्यातला आशय मनांत उमटू लागला . मन हळूहळू शांत स्थिर होऊ लागले.  

" जाही विधी राखे राम । ताही विधि रहिये " विधाता सृष्टीचा रचनाकार . सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच तिचे संगोपन करण्याची जबाबदारीही आलीच. त्यासाठी लागतात ते नियम.समाज योग्य रीतीने चालावा म्हणून नियम संहिता आणि त्याचे पालन करणे खरं तर अनिवार्य .ही  बंधने पाळल्यावरच सुरक्षितता येते. समतोल साधता येतो. " विधी " म्हणजे नियम / कायदा .ह्या कायद्यानुसार गेलात कि सुख शांती मिळतेच.  नियतीचा कायदा सर्वांसाठी सारखा. पण अलीकडे स्वैराचार वाढला, नियमांचे उल्लंघन होऊ लागले. माणसांच्या वागण्याला काही धरबंध उरला नाही. निसर्गावरच अतिक्रमण झाले. बेबंद व्यवहार,हौसमौज ...अर्थातच "अति तेथे माती " ... निसर्गानेच लॉक डाऊन चा बडगा उगारून माणसाला स्थानबद्ध केले. स्वातंत्र्यावर बंधने आली अगदी सरळमार्गी, निष्पाप लोकांचाही बळी  गेला. सुक्याबरोबर ओलंही जळतं ,नाही का ?

         " महालोमे राखे चाहे ,झोपडी में बास  दे ।जिंदगी कि डोर सौप रामजी के हाथ में ।।कवी पुढे म्हणतो ... तुम्ही गरीब,श्रीमंत ,उच्च नीच ,शिक्षित ,अडाणी कसेही असलात तरी राम कर्ता हि भावना ठेवूनच व्यवहार केला तर समाधान लाभते . त्यासाठी परमात्म्याची भक्ती करायला हवी,त्यामुळे दृढ विश्वास निर्माण होईल आणि आहे त्या कठीण परिस्थितीत सुद्धा समाधानी राहता येईल . 

आता हेच उदाहरण बघा ना .... खरं तर ती लावण्यवती .एक राजकुमारी .राजमहालात राहणारी . लौकिकार्थाने तिला कसलीच उणीव नव्हती.पण मीराबाईला होता तो पारलौकिकाचा ध्यास.कृष्णाच्या मधुर भक्तित ती आकंठ बुडली होती.त्यामुळेच सर्व सुख पायापाशी लोळण घेत असूनही तिला मात्र भक्तिरसातच चिंब भिजायचे होते.लग्नानंतर तिचे हे कृष्ण प्रेम तिच्या सासरच्यांना कसे मानवणार ? तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्या भक्तीमार्गात अनेक अडथळे आणण्यात आले. तिला विषाचा  प्याला हि देण्यात आला. पण तिने मात्र तिची अतूट भक्ती काही सोडली नाही. तिच्या ह्या भक्तीने कृष्ण प्रसन्न न होता तरच नवल. तिचा विषाचा प्याला अमृतमयी झाला तिचे संपूर्ण जीवनच तिने कृष्णाला समर्पित केले. अशी अनन्य मधुराभक्ती विरळाच. तिच्या अलौकिक भक्तिमुळेच मीराबाई संत पदाला पोहोचली आणि परमार्थमार्गात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायमचा उमटविला 

त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती संत तुकाराम महाराजांची. अगदी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा विठ्ठल नामाच्या मात्रेने त्यांनी चित्तात कायम समाधान ठेवले. 

 जे काही घडतंय ते रामाच्या इच्छेनेच.संसार करताना हा विचार अवश्य करावाच. त्याचे स्मरण कायम असावे .कवी पुढे म्हणतो , कामरसाऐवजी रामरसाचे  ग्रहण केले ,सत्संगतीचा आश्रय केला रामाशीच सख्यत्व भावाने नाते जोडले तर कितीही बिकट परिस्थितीतही आपण हा भवसागर नक्की समर्थपणे पार करू असा विश्वास मनात निर्माण होतो.

" ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ।।गोंदवलेकर महाराज म्हणतात ,पांडवांना वनवासात राहावे लागले पण त्यांना प्रत्यक्ष परमात्म्याचा,श्रीकृष्णाचा सहवास लाभला. प्रभू श्रीरामांनाही राजमहाल सोडून बारा वर्षे वनवास पत्करावा लागलाच की !

तर मंडळी! असे झाले असते तर बरे झाले असते असे म्हणण्यापेक्षा जे घडले ते माझ्या हितासाठीच घडले, असे म्हणून त्या परमात्म्याप्रती  कृतज्ञता भाव ठेवला तर ? शेवटी तूच कर्ता आणि करविता । शरण तुला भगवंता ... 

सज्जनांचे रक्षण करणे हे तर परमेश्वराचे ब्रीद. समर्थ रामदास म्हणतात" नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी "..मनापासून भक्ती करणाऱ्या साधकाचे तो रक्षण करतोच. नव्हे नव्हे त्यांच्या रक्षणासाठी तो धावून जातो. जिथे समर्पण आहे तिथे भगवंताची करुणा आहे. 

आपले स्वास्थ्य आपल्याच हाती असते अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत " ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असू द्यावे समाधान । हाच आयुष्याचा मूलमंत्र हवा .बरोबर ना ?


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

             


Thursday, June 10, 2021

गंगा दशहरा ( GANGA DASHHARA )

।। श्री   शंकर  ।।

 गंगा दशहरा  

आजपासून सुरु होणाऱ्या गंगा दशहरा (जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी )उत्सवाच्या निमित्ताने नद्यांचे आपल्या जीवनातील जे महत्वाचे स्थान आहे त्याचा थोडक्यात घेतलेला वेध. 

पृथ्वी ,आप,तेज,वायू ,आकाश ही क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जाणारी पंचमहाभूते. ह्या  पंचभूतांचा परस्परांशी ,सृष्टीतील व्यवस्थेशी आणि समस्त मानव जातीशी कायमचा घनिष्ठ संबंध.हे सगळे घटक जीवनावश्यक. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले हे धन मानवाला विपुल प्रमाणात दिले आहे आणि तेही अगदी मोफत. म्हणूनच कदाचित त्याचे महत्व आपल्याला कळत नाही.  

 पंचमहाभूतांपैकी एक " आप " म्हणजेच पाणी म्हणजेच जीवन. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत. आपल्या भारतवर्षांत गंगा,यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी इ. मोठ्या नद्या  पाण्याच्या उप्लब्धतेबरोबरच अनेक दृष्टींनी महत्वाच्या.  गंगा नदी भारतात  प्रथम  क्रमांकाची नदी आहे.  ती अनादी ,अनंत आहे.भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी गंगा हे साक्षात माझेच रूप आहे असे सांगितले आहे. " स्रोतसामस्मि जान्हवी ". 

भारतीय संस्कृतीचं वैशिट्य हेच आहे की निसर्गातील शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  देवत्व बहाल करून त्यांना पूजनीय मानतात. म्हणूनच नदीचे आपल्या जीवनातील महत्व लक्षात घेऊन तिला देवीस्वरूप मानले आहे. गंगा नदी ही  जशी भगवद्स्वरूप आहे  तशीच ती सर्वाना वत्सल मातेच्या रूपांतही दिसते.  ती पवित्र आणि पूजनीय आहेच तशीच माणसाचे पापक्षालन करणारी सुद्धा आहे. तिची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते असाही समज आहे.म्हणूनच गंगेचे महत्व अनन्यसाधारण आहे. 

विष्णूच्या पायापासून निघालेली ही  गंगा भगवान शंकराने डोक्यावर धारण केली आहे. भगीरथ प्रयत्नाने ही  गंगा पृथ्वीवर अवतरली. स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत गंगा विहार करते. म्हणूनच तिला त्रिपथगामिनी म्हणतात. 

गंगा नदीचे शुभ्र धवल स्फटिकाप्रमाणे असलेले पाणी अतिशय निर्मळ आहे .गंगेचा वाहता ओघ नेत्रसुखद असतो. हा प्रवाह बघून मनामध्ये  आनंदाच्या लहरी उमटतात.  गंगेच्या प्रवाहांत चंद्राची शीतलता आहे.  हे पाणी जणू काही अमृतच . राष्ट्रीय महातीर्थ असा गंगेचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता आणि संस्कृतीचा उदय गंगेच्या काठावर झाला आहे.  वेदांची रचना गंगेच्या काठावरच झालेली आहे. अनेक संत आणि सत्पुरुषांनी  गंगेच्या तटावर आपले जीवन व्यतीत केले आहे.


ह्या  मनुष्यजन्मात एकदा तरी  गंगास्नान करावे अशी समजूत जनमानसांत दृढ आहे. ह्या स्नानामुळे पापांचा नाश होतो. जसे पापी लोक पापक्षालन करतात ,तसेच अनेक सत्पुरुषही  गंगेत स्नान करतात. त्यांच्या पुण्यामुळे नदी पुन्हा पावन होते. तिच्या पाण्याचे तीर्थ होते. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ह्या पाण्याचे महत्व सिद्ध झाले आहे. गंगाजल हे एक औषध आहे. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. 

पुराणकथांत गंगेचा उगम कसा ,कधी, कुठे झाला ह्याच्या रोचक कथा आहेत. गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले ते अक्षय्य तृतीयेला असा काही कथांत उल्लेख आहे.काही ठिकाणी वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच गंगा सप्तमीला गंगा नदी पृथ्वीवर  अवतरली असे म्हणतात तर जेष्ठ शुद्ध दशमीला गंगा नदी चा उगम झाला असे म्हणतात. भारतात अनेक ठिकाणी जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी ( गंगा दशहरा ) गंगा उत्सव संपन्न होतो. निसर्गाविषयीची आपली भावना आपण ह्या कृतीतून प्रगट  करतो आणि पूज्यभाव जपतो. 

 गंगेच्या प्रित्यर्थ "गंगा दशहरा" हे व्रत करतात. ह्या व्रताचे पालन केले की दहा पापे नष्ट होतात म्हणून ह्या व्रताला  " दशहरा " म्हणतात. स्नान आणि दानाचे विशेष महत्व ह्या व्रतांत सांगितले आहे. ह्या दिवशी गंगेत दहा वेळा बुड्या मारून गंगास्नान करतात. गंगेच्या पाण्यांत उभे राहून गंगास्तोत्राचे पठण करतात.  मंदिरात आणि  गंगेच्या काठांवर पुष्प ,धूप,दीप ,नवेद्य हे उपचार दहाच्या पटीत अर्पण करून गंगा मैयाचे पूजन करतात. गंगेची आरती करून तिच्या प्रवाहांत दिवे सोडतात. हे सर्व दृश्य अतिशय मनोहारी दिसते.उत्तराखंडात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा गंगोत्सव साजरा केला जातो. ह्याच दिवशी पितृतर्पणही करतात. 

ह्या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मण ,सुवासिनींचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे , दान द्यावे अशीही रीत आहे. १० आंब्यांचे दानही विशेषत्वाने केले जाते. विविध ठिकाणी गंगेची प्रतिमा स्थापन करून तिचे विधिवत  पूजन करतात. दहा दिवस कथा -कीर्तनांचे आयोजन करतात. 

आपल्या दासगणू परंपरेत हा गंगा -दशहरा उत्सव गेली अनेक वर्षे उत्साहानें साजरा होत आहे. प. पू .दादा अनेक वर्षे लोणावळ्याला हा उत्सव साजरा करीत असत. तीच परंपरा प. पू. अप्पानीही चालू ठेवली. हा उत्सव दहा दिवस साजरा होतो. सद्गुरू दासगणू महाराजांच्या गोदा - माहात्म्य ह्या पोथीचे पारायण तसेच कथा -कीर्तनांनी हा उत्सव संपन्न होतो. प. पू .दादांच्या समाधीस पवमान ,अभिषेक होतो. दशमीचे दिवशी श्री जगन्नाथ पंडित  चरित्र सांगितले जाते. कीर्तनानंतर आरती व महाप्रसाद होतो व उत्सवाची सांगता होते. आजही हीच परंपरा अतिशय श्रद्धेने पुढे सुरु आहे. 

दक्षिण तेलंगणात एक प्रसिद्ध महाकवी होऊन गेला. सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेला हा रससिद्ध कवी. त्याचे गंगेवर अतोनात प्रेम होते. " गंगालहरी " ह्या गंगेला समर्पित संस्कृत श्लोकांतून त्याने गंगेची स्तुती केलेली आहे. आपल्या हातून घडलेल्या चुका  गंगामाता समजून घेईल आणि मला आपल्या पदरात घेईल असा  भरवसा  त्याला होता. त्याच्या काव्यातून त्याने जसजशी गंगेची आळवणी केली तसतशी गंगामाई एकेक पायरी वर चढत आली  आणि ह्या तिच्या सुपुत्राला तिने आपल्या उदरांत सामावून घेतले.  गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने गंगा लहरी स्तोत्राचे पठण करून आणि आख्यान रूपाने  ह्या महाकवीची स्मृती जागविली  जाते. 

 .सद्गुरू दासगणू महाराजांचे कार्य गोदातीरावरच बहरले.गोदामायवर त्यांचे अलोट प्रेम.दादांनी प. पू. अप्पाना त्यांच्या जन्मानंतर पाळण्यांत घालून ह्या गोदामातेला अर्पण केले होते.  आणि गोदामातेची ठेव म्हणूनच पुढे त्यांचे  संगोपन केले. गोदेनेच लडिवाळपणे अप्पाना  आपल्या अंगाखांद्यावर वाढवले. अप्पा तिच्याविषयी कृतज्ञता  व्यक्त करताना  तिच्या वत्सलतेचे वर्णन करतात आणि गोदामातेने पदरांत घ्यावे अशी प्रेमळ विनंती करतात. 

" परम दयाघन दुसरी तुजविण नाही ह्या भूवरी ग । उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग "

गोदावरी प्रमाणेच प. पू  अप्पाना गंगेचेही प्रचंड आकर्षण होते.प. पू .अप्पानी जीवनातील विविध टप्पे ह्या गंगेच्या साक्षीने  पार केले.अनेक ग्रंथांचे लिखाण गंगातीरावरच झाले.अनेक वर्षे पारमार्थिक साधना गंगेच्या काठावरच केली.गंगोत्रीला अप्पाना वरद नारायणाचे साक्षांत दर्शन झाले. अप्पा वरद नारायणाचे ध्यान करत गंगातटावर बसले आहेत आणि मुखाने सतत विष्णुसहस्रनामाचा उद्घोष.चालू आहे हा अद्भुत संगम उत्तरकाशीच्या वास्तव्यात आम्हांला अनुभवता आला. चतुर्थाश्रमांतील संन्यास दीक्षा ह्या गंगा किनाऱ्यावरच झाली आणि शेवटी समाधिस्थ होऊन गंगामातेच्या प्रवाहांत  स्वतःचे देह विसर्जन केले.आपले कृतार्थ जीवन नारायणाच्या चरणी समर्पित केले.      

प. पू. दादा व अप्पा दोघांनीही ह्या महानद्यांचे प्रचंड आकर्षण होते. नदीच्या रूपाने सतत प्रवाही आणि विशुद्ध ब्रह्मतत्वाची अनुभूती घेता येते. व्रते आणि उत्सवांच्या निमित्ताने हा शोध आपल्यालाही घेता यावा हीच त्यामागची खरी प्रेरणा. 

"जय संजीवनी ,जननी  पयोदे श्री गोदे भवतापहरी ।"हीच ह्या गंगा दशहरा व्रताच्या निमित्ताने गंगा/गोदा  मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना .... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com


Friday, May 14, 2021

आमची कुलदेवी : श्री महालसा नारायणी ( Shri Mahalasa Narayani )

                                                       ।। श्री   शंकर  ।।                      


                            आमची कुलदेवी : श्री   महालसा   नारायणी 


 घराच्या बागेत लावलेलं अबोलीचं रोपटं आता छान फोफावलंय. हिरव्या तजेलदार पानापानांतून आपली मान बाहेर काढून हळूच डोकावणारी अबोली! तिचा केशरी रंग मनाला मोहविणारा. सकाळी सकाळी तिच्या जवळ गेलं कि भरभरून उमललेली फुलं... अबोला सोडून आपल्याशी बोलू लागतात. देठापासून विलग होऊन ही फुले माझी ओंजळ भरून टाकतात. अबोलीचा गजरा, भरगच्च काळ्या केसांवर शालीन सौन्दर्यवतीने माळलेला  तिच्या नैसर्गिक सौन्दर्यात भर घालणारा...आत्ताच्या काळांत दुर्मिळ पण तरीही मला आवडणारे हे  दृश्य ...  मी त्यांत हरवून जाते... . 

रोज सकाळी अबोलीचा हार गुंफताना मी थेट गोव्यात पोहोचते. खरं तर मे महिना आणि गोवा...  आमचं  अगदी अतुट नातं. गोव्यातली यच्चयावत स्वच्छ, सुंदर, भलीमोठी आकर्षक मंदिरे. दरवर्षी आमच्या कुलदेवीच्या दर्शनाच्या निमित्ताने गोव्याची वारी ठरलेली. सध्या दोन वर्षं आलेल्या परिस्थिजन्य संकटामुळे हि वारी जरी टळली तरी "शब्दांच्या वारीने" मी अगदी थेट आमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरात पोहोचले. 

फेसाळलेल्या शुभ्र,धवल,समृद्ध सागरकिनारे लाभलेल्या, गोव्याच्या लाल मातींत, नारळी-पोफळींच्या आगारात, निसर्ग सौन्दर्याच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, म्हार्दोळ. ह्या परमपवित्र धर्मक्षेत्रांत आमच्या कुलदेवीचे "महालसा नारायणीचे" कायम वास्तव्य आहे. देवीचे हे जागृत देवस्थान.इथे आल्यावर आपुलकीच्या नात्याने माहेरी आल्यासारखी मनाची अवस्था   होते. लेकरू होऊन ह्या जगन्मातेला उराउरी भेटण्याची आस दाटून येते. 

मुख्य  प्रवेशदारातून प्रवेश करतांनाच मंदिराचा विशाल  परिसर आपण आपल्या नजरेत सामावण्याचा प्रयत्न करतो. देवळाबाहेर बसलेल्या माळकर्णीकडे असलेल्या ताज्या, टवटवीत, विविधरंगी पुषमालांकडे आपण आकर्षित होतो. अबोली, मोगरा,सोनचाफा, बकुळ, सुरंगी ह्यांचे हार, त्याबरोबरीनेच हिरव्यागार, भरगच्च तुळशीच्या माळा किती घेऊ...  असा मोह होतो. ह्या संमिश्र दरवळाने आपले अंतरंगही सुगंधी होते. ह्या परिमळाने भारलेला मनरूपी भुंगा  दर्शनाच्या ओढीनं मंदिरात प्रवेश करण्यास उत्सुक असतो. देवीच्या चरणांवर नतमस्तक व्हायला हातातील   फुलेही  किती आतुर असतात आणि आपण ही फुले आणि इतर पूजासाहित्य देवीला अर्पण करूनच  तर देवीशी सख्यभाव जोडतो नाही !

मंदिराभोवतीच्या प्रांगणातील भलामोठा पितळी ज्ञानदीप  हे ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य. हा ज्ञानदीप, दीपमाळ आणि उंचच उंच गरुडस्तंभ वरपर्यंत न्याहाळातच आपण देवळाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश करतो. द्वारपाल आपले स्वागत करायला उत्सुक असतात. मधलं दालन ओलांडून आपण पुढच्या सभागृहांत पोहोचतो. लांबूनच आपल्या देवीची मूर्ती समयांच्या मंद, सौम्य प्रकाशात दिसू लागताच अनन्य  भावाने तिला शरण जातो. सकाळच्या प्रसन्न वातावरणांत देवीची पूजा,अभिषेक चालू असताना मंदिरातील त्या वातावरणांत अगदी समरस होतो. दर्शनाला आलेल्या भक्तांची एकच लगबग सुरु असते. हे दृश्य टिपत असतानाच आपल्या मनांत देवीचा नामजप, स्तोत्र इ.आवर्तने सुरु होतात. आपला अभिषेक, पूजा झाल्यावर गुरुजी मंदिराच्या आतल्या भागांत,गर्भगृहांत आपल्याला बोलवून घेतात. देवीचा अधिक निकट सहवास मिळाल्याचा आनंद मनांत दाटून येतो. आपल्या कुटुंबासाठी मग गुरुजी देवीला साकडं घालतात. कोकणी हेल काढून देवीपुढे घातलेले गाऱ्हाणे, आपल्या सगळ्या अडचणी आता नक्की दूर होणार ह्या भावनेने आपण निःशंक होतो. हात जोडून मनोभावे तिची प्रार्थना करतो. त्या भारलेल्या वातावरणांतून पाय खरं तर बाहेर निघतच नाही. 

साक्षांत विष्णूचा अवतार म्हणजे देवी " महालसा  नारायणी " परब्रम्ह स्वरूपिणी ..

शाळीग्राम शिलेवर स्थित महालसा  देवीची  मूर्ती सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. भगवान विष्णूचे हे मायारूप. अमृतमंथनातून निर्माण झालेले अमृत दैत्यांना न मिळता फक्त देवांना मिळावे ह्या हेतूने विष्णूने हे रूप धारण केले. हे मोहिनी रूप अलौकिक सुंदर आहे. चेहेऱ्यावर मंद हास्य विलसत आहे. दैत्यांच्या निर्दालनासाठी हातात खड्ग, त्रिशूल धारण केले आहे. कौशल्याने कारभार सांभाळणारी "धुरंधर" अशी ही देवी. देवीचे सकाळी कन्यारूपांत, माध्याह्नकाळी नवयौवन रूपात तर सूर्यास्तसमयीं वृद्ध सौभाग्यवती स्त्रीरूपांत दर्शन होते. विविध वस्त्र प्रावर्णानी  आणि अलंकारांनी वेगवेगळ्या रूपांतील देवीचे अविष्कार मनमोहक असतात. चंपाषष्ठी आणि  इतर महत्वाच्या दिवशी देवीची विशेष अलंकारसेवा करून पूजा बांधली जाते. 

भक्तांच्या सेवेने प्रसन्न होऊन शरण आलेल्या भक्तांचे सर्व क्लेश, रोगबाधा ही जगन्मोहिनी  हरण  करते, सुखसौभाग्य देऊन, भुक्ति-मुक्ती प्रदान करते तिच्या भक्तीने ज्ञानाची प्राप्ती होते. त्यासाठी लागतो तो अनन्य भाव. 

दुपारच्या आरती नंतर मिळणारे भोजन,देवीचा प्रसाद म्हणजे अमृतमयी  चव. वाफाळलेला गरम भात, आमटी, अननसाची कढी, गोड पायस... अहाहा... मन अगदी तृप्त होतं . मंदिराभोवतीच असणाऱ्या धर्मशाळेत क्षणभर विसावून संध्याकाळच्या पालखीसेवेसाठी पुन्हा हजार व्हायचे. देवीला प्रिय असलेला रविवार हा देवीच्या सेवेचा मुख्य दिवस. त्या दिवशी संध्याकाळी निघणाऱ्या देवीच्या पालखीत सहभागी होणं हा एक आनंद-सोहोळाच असतो. विविध प्रकारच्या फुलांनी, माळांनी सजवलेली पालखी, त्यांत हातांत ढाल तलवार ह्या आयुधांनी लढवय्या रूपांत विराजमान झालेली देवीची तेजस्वी मूर्ती. वाद्यांच्या गजरात ही  पालखी मंदिराबाहेर एक प्रदक्षिणा घालते. भान हरपून टाळ  मृदूंगाच्या  गजरात  भक्तजन ह्या पालखी प्रदक्षिणेत सहभागी होतात. वाटेत मधेमधे थांबून भजनसेवा, गायनसेवा अर्पण करतात. हा सर्व अनुपम्य सोहोळा ह्याची देही, ह्याची डोळा अनुभविणे म्हणजे इहलोकीवरील स्वर्गसुखच. पालखी सेवेत सामील झाल्यामुळे भक्तिभाव उदित होऊन मनाला सुख ,शांती,प्रसन्नता लाभते. विशेष प्रसंगी किंवा उत्सवाच्या निमित्ताने  मंदिराबाहेरील  ज्ञानदीप काही भक्त इच्छित फ़लप्राप्तीनंतर प्रज्वलित करतात. रात्रीच्या गडद अंधाऱ्या पार्श्वभूमीवर उजळून निघालेला हा "ज्ञानदीप" आपल्या अंतःकरणातील तेजाची ज्योतही प्रज्वलित करतो आणि अज्ञान अंध:काराचा काही अंशाने विनाश होतो. पौर्णिमेच्या धवल चंद्रप्रकाशात मंदिराचा सोन्याचा गोल घुमटाकार  मोठ्ठा कळस न्हाहून निघतो, हे दृश्य बघताना होणारा आनंद सुद्धा मनीमानसी  दीर्घ काळ रेंगाळणारा. 

पालखीनंतर होणारा आणखी एक प्रसंग अनुभवण्यासारखा. तो  म्हणजे देवीच्या पालखीतील गुच्छाचा लिलाव. बोली लावून जास्तीत-जास्त बोली लावणाऱ्या भक्ताला हा पुष्पगुच्छ मिळतो. आरती-प्रसादानंतर देवीला गाऱ्हाणे घालतात मग त्या दिवसाची सांगता होते. कुलदेवीची अल्प का होईना सेवा घडली हा आनंद मनात साठवत, तिच्या आशीर्वादाचे पाथेय बरोबर घेऊन परतीची वाट नाईलाजाने धरावी लागते. संसारातील  पुढच्या वाटचालीसाठी बळ मिळावे म्हणून देवीची प्रार्थना करून परतीचा प्रवास सुरु होतो.  

आपल्या कुलदेवीचे दर्शन, पूजन, उपासना तसेच  कुलधर्म, कुलाचाराला अनुसरुन रितीरिवाजांचे यथाशक्ती पालन करणे प्रचंड ऊर्जादायी आहे.ही यात्रा नित्यनेमाने घडल्यास भक्तांचे नक्कीच कल्याण होते.  .  

शब्द-दिंडीच्या माध्यमातून ही सेवा कुलदेवीच्या चरणकमळाशी समर्पित करताना, मनांत दडलेल्या प्रत्यक्ष दर्शनाची अभिलाषा पूर्ण व्हावी म्हणून त्या सर्वशक्तिमान "नारायणीला" साकडे घालते. 

                        या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता   ।

                        नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


स्नेहा भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई 

अक्षय्य तृतीया शके १९४३ ( १४/०५/२०२१)

sneha8562@gmail.com