Thursday, June 10, 2021

गंगा दशहरा ( GANGA DASHHARA )

।। श्री   शंकर  ।।

 गंगा दशहरा  

आजपासून सुरु होणाऱ्या गंगा दशहरा (जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी )उत्सवाच्या निमित्ताने नद्यांचे आपल्या जीवनातील जे महत्वाचे स्थान आहे त्याचा थोडक्यात घेतलेला वेध. 

पृथ्वी ,आप,तेज,वायू ,आकाश ही क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जाणारी पंचमहाभूते. ह्या  पंचभूतांचा परस्परांशी ,सृष्टीतील व्यवस्थेशी आणि समस्त मानव जातीशी कायमचा घनिष्ठ संबंध.हे सगळे घटक जीवनावश्यक. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले हे धन मानवाला विपुल प्रमाणात दिले आहे आणि तेही अगदी मोफत. म्हणूनच कदाचित त्याचे महत्व आपल्याला कळत नाही.  

 पंचमहाभूतांपैकी एक " आप " म्हणजेच पाणी म्हणजेच जीवन. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत. आपल्या भारतवर्षांत गंगा,यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी इ. मोठ्या नद्या  पाण्याच्या उप्लब्धतेबरोबरच अनेक दृष्टींनी महत्वाच्या.  गंगा नदी भारतात  प्रथम  क्रमांकाची नदी आहे.  ती अनादी ,अनंत आहे.भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी गंगा हे साक्षात माझेच रूप आहे असे सांगितले आहे. " स्रोतसामस्मि जान्हवी ". 

भारतीय संस्कृतीचं वैशिट्य हेच आहे की निसर्गातील शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  देवत्व बहाल करून त्यांना पूजनीय मानतात. म्हणूनच नदीचे आपल्या जीवनातील महत्व लक्षात घेऊन तिला देवीस्वरूप मानले आहे. गंगा नदी ही  जशी भगवद्स्वरूप आहे  तशीच ती सर्वाना वत्सल मातेच्या रूपांतही दिसते.  ती पवित्र आणि पूजनीय आहेच तशीच माणसाचे पापक्षालन करणारी सुद्धा आहे. तिची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते असाही समज आहे.म्हणूनच गंगेचे महत्व अनन्यसाधारण आहे. 

विष्णूच्या पायापासून निघालेली ही  गंगा भगवान शंकराने डोक्यावर धारण केली आहे. भगीरथ प्रयत्नाने ही  गंगा पृथ्वीवर अवतरली. स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत गंगा विहार करते. म्हणूनच तिला त्रिपथगामिनी म्हणतात. 

गंगा नदीचे शुभ्र धवल स्फटिकाप्रमाणे असलेले पाणी अतिशय निर्मळ आहे .गंगेचा वाहता ओघ नेत्रसुखद असतो. हा प्रवाह बघून मनामध्ये  आनंदाच्या लहरी उमटतात.  गंगेच्या प्रवाहांत चंद्राची शीतलता आहे.  हे पाणी जणू काही अमृतच . राष्ट्रीय महातीर्थ असा गंगेचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता आणि संस्कृतीचा उदय गंगेच्या काठावर झाला आहे.  वेदांची रचना गंगेच्या काठावरच झालेली आहे. अनेक संत आणि सत्पुरुषांनी  गंगेच्या तटावर आपले जीवन व्यतीत केले आहे.


ह्या  मनुष्यजन्मात एकदा तरी  गंगास्नान करावे अशी समजूत जनमानसांत दृढ आहे. ह्या स्नानामुळे पापांचा नाश होतो. जसे पापी लोक पापक्षालन करतात ,तसेच अनेक सत्पुरुषही  गंगेत स्नान करतात. त्यांच्या पुण्यामुळे नदी पुन्हा पावन होते. तिच्या पाण्याचे तीर्थ होते. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ह्या पाण्याचे महत्व सिद्ध झाले आहे. गंगाजल हे एक औषध आहे. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. 

पुराणकथांत गंगेचा उगम कसा ,कधी, कुठे झाला ह्याच्या रोचक कथा आहेत. गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले ते अक्षय्य तृतीयेला असा काही कथांत उल्लेख आहे.काही ठिकाणी वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच गंगा सप्तमीला गंगा नदी पृथ्वीवर  अवतरली असे म्हणतात तर जेष्ठ शुद्ध दशमीला गंगा नदी चा उगम झाला असे म्हणतात. भारतात अनेक ठिकाणी जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी ( गंगा दशहरा ) गंगा उत्सव संपन्न होतो. निसर्गाविषयीची आपली भावना आपण ह्या कृतीतून प्रगट  करतो आणि पूज्यभाव जपतो. 

 गंगेच्या प्रित्यर्थ "गंगा दशहरा" हे व्रत करतात. ह्या व्रताचे पालन केले की दहा पापे नष्ट होतात म्हणून ह्या व्रताला  " दशहरा " म्हणतात. स्नान आणि दानाचे विशेष महत्व ह्या व्रतांत सांगितले आहे. ह्या दिवशी गंगेत दहा वेळा बुड्या मारून गंगास्नान करतात. गंगेच्या पाण्यांत उभे राहून गंगास्तोत्राचे पठण करतात.  मंदिरात आणि  गंगेच्या काठांवर पुष्प ,धूप,दीप ,नवेद्य हे उपचार दहाच्या पटीत अर्पण करून गंगा मैयाचे पूजन करतात. गंगेची आरती करून तिच्या प्रवाहांत दिवे सोडतात. हे सर्व दृश्य अतिशय मनोहारी दिसते.उत्तराखंडात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा गंगोत्सव साजरा केला जातो. ह्याच दिवशी पितृतर्पणही करतात. 

ह्या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मण ,सुवासिनींचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे , दान द्यावे अशीही रीत आहे. १० आंब्यांचे दानही विशेषत्वाने केले जाते. विविध ठिकाणी गंगेची प्रतिमा स्थापन करून तिचे विधिवत  पूजन करतात. दहा दिवस कथा -कीर्तनांचे आयोजन करतात. 

आपल्या दासगणू परंपरेत हा गंगा -दशहरा उत्सव गेली अनेक वर्षे उत्साहानें साजरा होत आहे. प. पू .दादा अनेक वर्षे लोणावळ्याला हा उत्सव साजरा करीत असत. तीच परंपरा प. पू. अप्पानीही चालू ठेवली. हा उत्सव दहा दिवस साजरा होतो. सद्गुरू दासगणू महाराजांच्या गोदा - माहात्म्य ह्या पोथीचे पारायण तसेच कथा -कीर्तनांनी हा उत्सव संपन्न होतो. प. पू .दादांच्या समाधीस पवमान ,अभिषेक होतो. दशमीचे दिवशी श्री जगन्नाथ पंडित  चरित्र सांगितले जाते. कीर्तनानंतर आरती व महाप्रसाद होतो व उत्सवाची सांगता होते. आजही हीच परंपरा अतिशय श्रद्धेने पुढे सुरु आहे. 

दक्षिण तेलंगणात एक प्रसिद्ध महाकवी होऊन गेला. सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेला हा रससिद्ध कवी. त्याचे गंगेवर अतोनात प्रेम होते. " गंगालहरी " ह्या गंगेला समर्पित संस्कृत श्लोकांतून त्याने गंगेची स्तुती केलेली आहे. आपल्या हातून घडलेल्या चुका  गंगामाता समजून घेईल आणि मला आपल्या पदरात घेईल असा  भरवसा  त्याला होता. त्याच्या काव्यातून त्याने जसजशी गंगेची आळवणी केली तसतशी गंगामाई एकेक पायरी वर चढत आली  आणि ह्या तिच्या सुपुत्राला तिने आपल्या उदरांत सामावून घेतले.  गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने गंगा लहरी स्तोत्राचे पठण करून आणि आख्यान रूपाने  ह्या महाकवीची स्मृती जागविली  जाते. 

 .सद्गुरू दासगणू महाराजांचे कार्य गोदातीरावरच बहरले.गोदामायवर त्यांचे अलोट प्रेम.दादांनी प. पू. अप्पाना त्यांच्या जन्मानंतर पाळण्यांत घालून ह्या गोदामातेला अर्पण केले होते.  आणि गोदामातेची ठेव म्हणूनच पुढे त्यांचे  संगोपन केले. गोदेनेच लडिवाळपणे अप्पाना  आपल्या अंगाखांद्यावर वाढवले. अप्पा तिच्याविषयी कृतज्ञता  व्यक्त करताना  तिच्या वत्सलतेचे वर्णन करतात आणि गोदामातेने पदरांत घ्यावे अशी प्रेमळ विनंती करतात. 

" परम दयाघन दुसरी तुजविण नाही ह्या भूवरी ग । उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग "

गोदावरी प्रमाणेच प. पू  अप्पाना गंगेचेही प्रचंड आकर्षण होते.प. पू .अप्पानी जीवनातील विविध टप्पे ह्या गंगेच्या साक्षीने  पार केले.अनेक ग्रंथांचे लिखाण गंगातीरावरच झाले.अनेक वर्षे पारमार्थिक साधना गंगेच्या काठावरच केली.गंगोत्रीला अप्पाना वरद नारायणाचे साक्षांत दर्शन झाले. अप्पा वरद नारायणाचे ध्यान करत गंगातटावर बसले आहेत आणि मुखाने सतत विष्णुसहस्रनामाचा उद्घोष.चालू आहे हा अद्भुत संगम उत्तरकाशीच्या वास्तव्यात आम्हांला अनुभवता आला. चतुर्थाश्रमांतील संन्यास दीक्षा ह्या गंगा किनाऱ्यावरच झाली आणि शेवटी समाधिस्थ होऊन गंगामातेच्या प्रवाहांत  स्वतःचे देह विसर्जन केले.आपले कृतार्थ जीवन नारायणाच्या चरणी समर्पित केले.      

प. पू. दादा व अप्पा दोघांनीही ह्या महानद्यांचे प्रचंड आकर्षण होते. नदीच्या रूपाने सतत प्रवाही आणि विशुद्ध ब्रह्मतत्वाची अनुभूती घेता येते. व्रते आणि उत्सवांच्या निमित्ताने हा शोध आपल्यालाही घेता यावा हीच त्यामागची खरी प्रेरणा. 

"जय संजीवनी ,जननी  पयोदे श्री गोदे भवतापहरी ।"हीच ह्या गंगा दशहरा व्रताच्या निमित्ताने गंगा/गोदा  मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना .... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com


8 comments:

  1. फार सुंदर लेख.

    ReplyDelete
  2. आपल्या संस्कृतीत खरंच आजचा gratitude भाव जपला आहे,
    सुंदर वर्णन केलं आहेस .

    ReplyDelete
  3. माहितीपुर्ण लेख. धन्यवाद

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेख. गंगा दशहार उत्सवाचा लाभ आम्हा लोणावळा रहिवासी लोकांना खूप घेता आला. भांगरवाडीतील राम मंदिरात हा उत्सव होत असे. आम्ही त्या वेळी शाळेत जात होतो. आप्पांची कीर्तने, सुरवातीला गंगालहरी श्लोकांचा अर्थ आणि विवेचन, महाराजांची उपस्थिती फार अपूर्व सोहोळा अनुभवला.

    ReplyDelete
  5. माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
    Replies
    1. अत्यंत पवित्र, चित्तवेधक, सुंदर लिखाण !
      गंगा, गोदावरी, भागिरथी,नर्मदा, पूर्णा,कोसी,क्षिप्रा,कावेरी,शरयू, सरस्वती, यमुना आणि परमपूज्य ती.दादा व परमपूज्य ती.आप्पांच्या चरणीं साष्टांग प्रणिपात.!💐💐💐

      Delete
  6. अत्यंत पवित्र, चित्तवेधक, सुंदर लिखाण !
    गंगा, गोदावरी, भागिरथी,नर्मदा, पूर्णा,कोसी,क्षिप्रा,कावेरी,शरयू, सरस्वती, यमुना आणि परमपूज्य ती.दादा व परमपूज्य ती.आप्पांच्या चरणीं साष्टांग प्रणिपात.!💐💐💐

    ReplyDelete
  7. सुरेख लेख.
    सविस्तर माहितीसह.

    प.पू.ती.दादा व ती.अप्पा..विनम्र अभिवादन.

    वरद नारायणाचं साक्षात दर्शन हे खरंच दुर्लभ.
    अन गंगेच्या पात्रात देह विसर्जित करणं.

    साष्टांग प्रणिपात...

    ReplyDelete