Showing posts with label Spiritual Articles. Show all posts
Showing posts with label Spiritual Articles. Show all posts

Saturday, April 19, 2025

नमामी देवी नर्मदे...

                            ।।  श्री शंकर ।। 


                            नमामी  देवी नर्मदे


चैत्र महिन्यातील विशेष पुण्यदायी मानल्या गेलेल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही म्हणजे माझी मैत्रीण स्मिता आणि इतर परिक्रमावासी गुजरात मधील  तिलकवाडा येथे जमलो होतो.बांद्रा बरोडा तिलकवाडा असा प्रवास करून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी ७ वाजता पोचलो. एक दिवसाची ही  परिक्रमा साधारण २१ कि. मी. पायी करायला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ७ ते ८ तास लागतात. ही  परिक्रमा उत्तर तट ते दक्षिण तट आणि पुन्हा उत्तर तटावर येणे अशी वर्तुळाकार असते. 

 सलग आलेल्या सुट्टयांमुळे परिक्रमा मार्गावर खूप गर्दी आहे असे समजल्यामुळे जेवण झाल्यावर परिक्रमेचा संकल्प करून आम्ही अजिबात विश्रांती न घेता  रात्री ११.३० वाजताच परिक्रमेला उत्तरतटावरून  सुरुवात केली. 

वाटेत लागणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेत मजल दरमजल करत  आम्ही आता मैयेच्या किनाऱ्यावर येऊन पोचलो होतो.मैयेचे पात्र मोठे होते. नुकतीच पौर्णिमा झाली होती. आकाशातील  पूर्ण  चंद्राचे प्रतिबिंब नदीत पडले होते. चंद्राची शांत शीतल साथ चालताना मनामध्ये आनंदाच्या लाटा उसळवित होती. चालत होतो तो  रस्ता मातीचा , सरळ आणि मोठा होता. आजूबाजूला बरेच भिक्षेकरी रात्रीची वेळ असूनही भिक्षा मागत होते. मार्गक्रमण  करीत आम्ही नंदीघाटावर पोचलो. तिथे विविध मोठ्या आकारातील  शिवलिंगे खास परिक्रमेच्या निमित्ताने  बनविली होती . अनेक भक्त ह्या ठिकाणी फोटो घेण्यात मग्न होते. इथूनच पुढे आता बोटीने उत्तर तट ओलांडून रामपूरा  इथे म्हणजे दक्षिण तटावर जायचे होते. जवळजवळ अर्धी परिक्रमा मैयेच्या कृपेमुळे पार पडली होती. 

हळूहळू रात्रीचा अंधार विरघळत होता.  सगळा  आसमंत केशरमिश्रित लाल भगवा होऊ लागला  होता . चराचर सृष्टी अरुणोदयाच्या प्रतीक्षेत होती. नर्मदा  मैयेचा उत्तरतट पार करून आम्ही परिक्रमावासी आता माईच्या अगदी निकट आलो होतो.तट परिवर्तन केल्यावर प्रथम स्नान केले. नर्म आणि शर्म असे नर्मदा नदीचे केलेले वर्णन अगदी योग्यच आहे. उदरांत क्रूर आणि अजस्त्र मगरींना  आश्रय देऊनही ती माउली अगदी शांतपणे वाहात  असते. नर्मदा कन्या  रूपांत प्रगट  झाली आहे. तरीही ही  बालिका अवखळ नाही तर धीर गंभीर आहे. 

 माईच्या  स्पर्शाची ऊब अनुभवायला आता आम्ही उत्सुक होतो. किनाऱ्यावरच पथारी  पसरून बरोबर आणलेले पूजेचे सर्व साहित्य मी बाहेर काढले. हळदीकुंकू वाहून मातेची साडी चोळीने ओटी भरली. प्रसाद दाखविला. अलगद तिच्या पात्रांत दीप सोडले. दिव्याची ज्योत प्रज्वलित करताना प्रत्येक दिव्याबरोबर त्या त्या व्यक्तीच्या आठवणीने उर भरून येत होता. हेलकावे खात दिवे लांब वरच्या प्रवासाला निघाले होते. साश्रू नयनांनी मी ते मनोहर दृश्य डोळ्यांत सामावून घेत होते. 

घाटावर अनेक भाविकांची गर्दी झाली होती.कोणालाच वेळकाळाचे भान नव्हते.  सगळेच मय्येचे पूजन करण्यात मग्न होते. सेवेकऱ्यांचे अनेक स्टॉल बाजूला होते आणि परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी चहा , नाश्ता विनामूल्य पुरवत होते. त्यांच्या सेवाभावाला  आणि डोळ्यात तेल घालून स्वतःचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना मनोमन वंदन  करून आता पुढची वाट चालायला सुरवात केली . आधीचे  अंतर माऊलीचा पदर धरून कसे पार झाले ते कळलेही नाही. आता पुढचे काही  अंतर पक्क्या सडकेवरून पार करायचे होते. 

ह्या मार्गावर दुतर्फा हिरव्यागार केळीच्या दाट  बागा नजरेस पडत होत्या.कच्ची केळी , केळफूल आणि केळीची भलीमोठी पाने...केळीच्या वासाने हवेत एक वेगळाच गंध  पसरला होता. कापसाची झाडेही बरीच होती.  अधून मधून तयार झालेल्या कापसाच्या बोन्डातून शुभ्र कापूस बाहेर डोकावत होता.रस्त्यावर अनेक भलेमोठे वटवृक्ष दिसले. अनेक लोम्बणाऱ्या पारंब्या रस्त्याला स्पर्श करत होत्या. ध्यानस्थ ऋषींप्रमाणे हे वटवृक्ष साधनेला बसले आहेत असे वाटत होते.  वाटेत छोटी छोटी  गांवे ,अनेक देवळे आणि आश्रम होते. वाटेवर बसलेल्या  निराधार स्त्रिया लहान मुलांना घेऊन त्या आड वेळीही आमच्याकडे मदतीची याचना करीत होत्या. जमेल तशी मदत करत  आम्ही पुढे पुढे चालत होतो.  टाळ आणि नाम गजरांत  अनेक समूह परिक्रमेची वाट तल्लीन होऊन चालत होते. आता आमच्या  पायांची गती  हळूहळू कमी कमी होऊ लागली. पायातली चेतना हरवल्यासारखे पाय जड झाले होते. पण मनातल्या मनांत भोले - शंकर आणि नर्मदे हर चा जप चालू होता. तोच जप मार्गक्रमण करण्यासाठी बळ देत होते. 

सीताराम बापूंच्या आश्रमात पोचलो तेव्हा तिथे घंटानाद चालू होता.तिथल्या मंदिरात  हनुमानाचे दर्शन घेतले. चहा घेऊन थोडी तरतरी आली आणि पायऱ्या उतरून पुन्हा माईच्या प्रवाहाबरोबर पाऊले पुढची वाट चालू लागली. परिक्रमेचा पुढचा आणि शेवटचा दोन कि.मी.चा टप्पा आता समोर दिसत होता. पण हा अंतिम मार्ग आक्रमित करायला जरा जास्तच वेळ लागला. पलीकडच्या तटावर जाण्यासाठी भव्य कमान भाविकांच्या सेवेसाठी उभारली होती. प्रातःसमयीची आरती घाटावर चालू होती. धूप दीपांचा संमिश्र वास दरवळत होता. बरेच चालल्यामुळे झालेली थकावट  सर्वांच्याच चेहेऱ्यावर दिसत असली तरी परिक्रमा पूर्ण करण्याचा उत्साह आणि जिद्दही  दिसत होती. वयस्कर मंडळींबरोबरच तरुण जोडपी मुलाबाळांसहित सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला. 

दक्षिण तट ओलांडून आम्ही आता पुन्हा तात्पुरत्या  बांधलेल्या पुलावरून  उत्तर तटावर पोचलो होतो.  समोर पायऱ्या पायऱ्यांची डोंगरावरील वाट दिसत होती. पण हे अंतर पार करणे सुद्धा आता कष्टाचे वाटत होते.  'जड झाले ओझे ' स्वतःचेच ओझे वाहून नेणे आता नकोसे वाटत होते. पण मैंयेने दिलेल्या बळावर  आम्ही वासुदेव कुटीर ह्या पवित्र वास्तूत प्रवेश केला आणि रामदास स्वामी स्थापित हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो.तिथेच प. पू .वासुदेवानंद सरस्वती स्वामींचेही दर्शन घेतले.आम्ही इतके दमलो होतो की आता इथून अजिबात हलूच  नये असे वाटत होते. पण थोडी विश्रांती आणि चहा नाश्ता घेऊन परत मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. इथे आल्यावर नर्मदा माईचे प्रतिकात्मक पूजन म्हणजेच  ११ कन्यांचे पूजन केले आणि आमच्या परिक्रमेची सांगता झाली. 

नर्मदा मैंयेच्या कृपेमुळेच सुमारे २१ कि. मी. चा परिक्रमा मार्ग आम्ही आठ तासात पूर्ण केला होता. आणि असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करता आली , ह्याचा आनंद मनात दाटून आला होता. परिक्रमेला निघण्यापूर्वी साशंक असलेले मन आता निश्चिन्त झाले होते. आणि मैयेवरची श्रद्धा दृढतम झाली होती. तिच्याविषयी कृतज्ञता मनात दाटून आली .तिच्या प्रत्येक बिंदूत असलेले शिवतत्व जाणताना , तिचा  शांत प्रवाह  नजरेत साठवतांना ती दुःख निवारण करणारी देवी कित्येकांची आश्रयदाती  आहे हे समजून  मुखातून सहजोद्गार निघाले ... 

 " त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे "

ह्या पुण्यप्रद , मनोहारी तीर्थाची परिक्रमा करताना अनोख्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. इतके अंतर चालण्याची   खरं तर आपली शारीरिक आणि मानसिक पात्रता नसते.  सर्व भार तिच्यावर  सोडून , तिला शरण जाऊन सत्संकल्पाने बिकट वाट सुलभ कधी होते ह्याची जाणीवही तिच्या काठावरून तिच्या सोबतीने  चालताना होत नाही. अंगवळणी पडलेल्या शहरी जीवनाची झूल तिच्या सहवासात गळून पडते आणि तनामनाने आपण फक्त  तिचे होऊन जातो. 

रोजचे जीवन जगताना सुद्धा हेच परमेश्वराचे अस्तित्व , श्रेष्ठत्व आणि कर्तृत्व मान्य करून त्याचा हात धरून जीवनाची परिक्रमा केली तर सगळेच क्लेश मिटतील नाही का ?

जगताचे जीवन सुसह्य करणाऱ्या ह्या नद्यांचे  पावन आशीर्वाद ह्या निमित्ताने घ्यावेत , आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे आणि जीवन आनंदी व्हावे हीच नर्मदा मातेकडे प्रार्थना... 

नमामी  देवी नर्मदे । नमामी  देवी नर्मदे ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

१९/०४/२०२५


Thursday, June 10, 2021

गंगा दशहरा ( GANGA DASHHARA )

।। श्री   शंकर  ।।

 गंगा दशहरा  

आजपासून सुरु होणाऱ्या गंगा दशहरा (जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी )उत्सवाच्या निमित्ताने नद्यांचे आपल्या जीवनातील जे महत्वाचे स्थान आहे त्याचा थोडक्यात घेतलेला वेध. 

पृथ्वी ,आप,तेज,वायू ,आकाश ही क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जाणारी पंचमहाभूते. ह्या  पंचभूतांचा परस्परांशी ,सृष्टीतील व्यवस्थेशी आणि समस्त मानव जातीशी कायमचा घनिष्ठ संबंध.हे सगळे घटक जीवनावश्यक. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले हे धन मानवाला विपुल प्रमाणात दिले आहे आणि तेही अगदी मोफत. म्हणूनच कदाचित त्याचे महत्व आपल्याला कळत नाही.  

 पंचमहाभूतांपैकी एक " आप " म्हणजेच पाणी म्हणजेच जीवन. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत. आपल्या भारतवर्षांत गंगा,यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी इ. मोठ्या नद्या  पाण्याच्या उप्लब्धतेबरोबरच अनेक दृष्टींनी महत्वाच्या.  गंगा नदी भारतात  प्रथम  क्रमांकाची नदी आहे.  ती अनादी ,अनंत आहे.भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी गंगा हे साक्षात माझेच रूप आहे असे सांगितले आहे. " स्रोतसामस्मि जान्हवी ". 

भारतीय संस्कृतीचं वैशिट्य हेच आहे की निसर्गातील शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  देवत्व बहाल करून त्यांना पूजनीय मानतात. म्हणूनच नदीचे आपल्या जीवनातील महत्व लक्षात घेऊन तिला देवीस्वरूप मानले आहे. गंगा नदी ही  जशी भगवद्स्वरूप आहे  तशीच ती सर्वाना वत्सल मातेच्या रूपांतही दिसते.  ती पवित्र आणि पूजनीय आहेच तशीच माणसाचे पापक्षालन करणारी सुद्धा आहे. तिची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते असाही समज आहे.म्हणूनच गंगेचे महत्व अनन्यसाधारण आहे. 

विष्णूच्या पायापासून निघालेली ही  गंगा भगवान शंकराने डोक्यावर धारण केली आहे. भगीरथ प्रयत्नाने ही  गंगा पृथ्वीवर अवतरली. स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत गंगा विहार करते. म्हणूनच तिला त्रिपथगामिनी म्हणतात. 

गंगा नदीचे शुभ्र धवल स्फटिकाप्रमाणे असलेले पाणी अतिशय निर्मळ आहे .गंगेचा वाहता ओघ नेत्रसुखद असतो. हा प्रवाह बघून मनामध्ये  आनंदाच्या लहरी उमटतात.  गंगेच्या प्रवाहांत चंद्राची शीतलता आहे.  हे पाणी जणू काही अमृतच . राष्ट्रीय महातीर्थ असा गंगेचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता आणि संस्कृतीचा उदय गंगेच्या काठावर झाला आहे.  वेदांची रचना गंगेच्या काठावरच झालेली आहे. अनेक संत आणि सत्पुरुषांनी  गंगेच्या तटावर आपले जीवन व्यतीत केले आहे.


ह्या  मनुष्यजन्मात एकदा तरी  गंगास्नान करावे अशी समजूत जनमानसांत दृढ आहे. ह्या स्नानामुळे पापांचा नाश होतो. जसे पापी लोक पापक्षालन करतात ,तसेच अनेक सत्पुरुषही  गंगेत स्नान करतात. त्यांच्या पुण्यामुळे नदी पुन्हा पावन होते. तिच्या पाण्याचे तीर्थ होते. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ह्या पाण्याचे महत्व सिद्ध झाले आहे. गंगाजल हे एक औषध आहे. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. 

पुराणकथांत गंगेचा उगम कसा ,कधी, कुठे झाला ह्याच्या रोचक कथा आहेत. गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले ते अक्षय्य तृतीयेला असा काही कथांत उल्लेख आहे.काही ठिकाणी वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच गंगा सप्तमीला गंगा नदी पृथ्वीवर  अवतरली असे म्हणतात तर जेष्ठ शुद्ध दशमीला गंगा नदी चा उगम झाला असे म्हणतात. भारतात अनेक ठिकाणी जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी ( गंगा दशहरा ) गंगा उत्सव संपन्न होतो. निसर्गाविषयीची आपली भावना आपण ह्या कृतीतून प्रगट  करतो आणि पूज्यभाव जपतो. 

 गंगेच्या प्रित्यर्थ "गंगा दशहरा" हे व्रत करतात. ह्या व्रताचे पालन केले की दहा पापे नष्ट होतात म्हणून ह्या व्रताला  " दशहरा " म्हणतात. स्नान आणि दानाचे विशेष महत्व ह्या व्रतांत सांगितले आहे. ह्या दिवशी गंगेत दहा वेळा बुड्या मारून गंगास्नान करतात. गंगेच्या पाण्यांत उभे राहून गंगास्तोत्राचे पठण करतात.  मंदिरात आणि  गंगेच्या काठांवर पुष्प ,धूप,दीप ,नवेद्य हे उपचार दहाच्या पटीत अर्पण करून गंगा मैयाचे पूजन करतात. गंगेची आरती करून तिच्या प्रवाहांत दिवे सोडतात. हे सर्व दृश्य अतिशय मनोहारी दिसते.उत्तराखंडात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा गंगोत्सव साजरा केला जातो. ह्याच दिवशी पितृतर्पणही करतात. 

ह्या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मण ,सुवासिनींचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे , दान द्यावे अशीही रीत आहे. १० आंब्यांचे दानही विशेषत्वाने केले जाते. विविध ठिकाणी गंगेची प्रतिमा स्थापन करून तिचे विधिवत  पूजन करतात. दहा दिवस कथा -कीर्तनांचे आयोजन करतात. 

आपल्या दासगणू परंपरेत हा गंगा -दशहरा उत्सव गेली अनेक वर्षे उत्साहानें साजरा होत आहे. प. पू .दादा अनेक वर्षे लोणावळ्याला हा उत्सव साजरा करीत असत. तीच परंपरा प. पू. अप्पानीही चालू ठेवली. हा उत्सव दहा दिवस साजरा होतो. सद्गुरू दासगणू महाराजांच्या गोदा - माहात्म्य ह्या पोथीचे पारायण तसेच कथा -कीर्तनांनी हा उत्सव संपन्न होतो. प. पू .दादांच्या समाधीस पवमान ,अभिषेक होतो. दशमीचे दिवशी श्री जगन्नाथ पंडित  चरित्र सांगितले जाते. कीर्तनानंतर आरती व महाप्रसाद होतो व उत्सवाची सांगता होते. आजही हीच परंपरा अतिशय श्रद्धेने पुढे सुरु आहे. 

दक्षिण तेलंगणात एक प्रसिद्ध महाकवी होऊन गेला. सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेला हा रससिद्ध कवी. त्याचे गंगेवर अतोनात प्रेम होते. " गंगालहरी " ह्या गंगेला समर्पित संस्कृत श्लोकांतून त्याने गंगेची स्तुती केलेली आहे. आपल्या हातून घडलेल्या चुका  गंगामाता समजून घेईल आणि मला आपल्या पदरात घेईल असा  भरवसा  त्याला होता. त्याच्या काव्यातून त्याने जसजशी गंगेची आळवणी केली तसतशी गंगामाई एकेक पायरी वर चढत आली  आणि ह्या तिच्या सुपुत्राला तिने आपल्या उदरांत सामावून घेतले.  गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने गंगा लहरी स्तोत्राचे पठण करून आणि आख्यान रूपाने  ह्या महाकवीची स्मृती जागविली  जाते. 

 .सद्गुरू दासगणू महाराजांचे कार्य गोदातीरावरच बहरले.गोदामायवर त्यांचे अलोट प्रेम.दादांनी प. पू. अप्पाना त्यांच्या जन्मानंतर पाळण्यांत घालून ह्या गोदामातेला अर्पण केले होते.  आणि गोदामातेची ठेव म्हणूनच पुढे त्यांचे  संगोपन केले. गोदेनेच लडिवाळपणे अप्पाना  आपल्या अंगाखांद्यावर वाढवले. अप्पा तिच्याविषयी कृतज्ञता  व्यक्त करताना  तिच्या वत्सलतेचे वर्णन करतात आणि गोदामातेने पदरांत घ्यावे अशी प्रेमळ विनंती करतात. 

" परम दयाघन दुसरी तुजविण नाही ह्या भूवरी ग । उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग "

गोदावरी प्रमाणेच प. पू  अप्पाना गंगेचेही प्रचंड आकर्षण होते.प. पू .अप्पानी जीवनातील विविध टप्पे ह्या गंगेच्या साक्षीने  पार केले.अनेक ग्रंथांचे लिखाण गंगातीरावरच झाले.अनेक वर्षे पारमार्थिक साधना गंगेच्या काठावरच केली.गंगोत्रीला अप्पाना वरद नारायणाचे साक्षांत दर्शन झाले. अप्पा वरद नारायणाचे ध्यान करत गंगातटावर बसले आहेत आणि मुखाने सतत विष्णुसहस्रनामाचा उद्घोष.चालू आहे हा अद्भुत संगम उत्तरकाशीच्या वास्तव्यात आम्हांला अनुभवता आला. चतुर्थाश्रमांतील संन्यास दीक्षा ह्या गंगा किनाऱ्यावरच झाली आणि शेवटी समाधिस्थ होऊन गंगामातेच्या प्रवाहांत  स्वतःचे देह विसर्जन केले.आपले कृतार्थ जीवन नारायणाच्या चरणी समर्पित केले.      

प. पू. दादा व अप्पा दोघांनीही ह्या महानद्यांचे प्रचंड आकर्षण होते. नदीच्या रूपाने सतत प्रवाही आणि विशुद्ध ब्रह्मतत्वाची अनुभूती घेता येते. व्रते आणि उत्सवांच्या निमित्ताने हा शोध आपल्यालाही घेता यावा हीच त्यामागची खरी प्रेरणा. 

"जय संजीवनी ,जननी  पयोदे श्री गोदे भवतापहरी ।"हीच ह्या गंगा दशहरा व्रताच्या निमित्ताने गंगा/गोदा  मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना .... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com


Friday, April 23, 2021

Sevu Nenatil Rasa ( सेवू नेणतिल रसा )

।। श्री शंकर ।।


सेवू नेणतिल रसा 

वस्त्र सुंदर केशरी । चपलेपरी तळपे कटि ।रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रवि हिंपुटी ।

शन्ख चक्र गदा करीं कमलासवे अभयास दे । रम्य रूप असे अनंत हृदांत  संतत राहू दे ।।

आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती ह्यांनी त्यांच्या काव्य पंक्तीत रेखाटलेली वरद नारायणाची भव्य आणि रम्य प्रतिमा आपण ध्यानमंदिरांत प्रवेश करता क्षणीच आपल्या हृदयाचा ठाव घेते. निळ्या आकाशाच्या आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या हिमशिखरांच्या पार्श्वभूमीवर अर्धपद्मासनातील ही विराजमान मूर्ती ... आपली नजर अगदी खिळवून ठेवते. हिमशिखरांवरून नारायण भेटीसाठी अनिवार ओढीने धावत आलेला गंगेचा प्रवाह ...ह्या प्रसन्नतेत भर घालतो.आकाशांत उगवलेली चंद्रकोर आपल्या मनालाही शीतलता प्रदान करते. प.पूज्य स्वामी वरदानंद भारती (आपले अप्पा ) ह्यांना पूर्णत्वाने लाभलेला ह्या वरदनारायणाचा आशीर्वाद... त्याची दिव्य प्रभावळ ... त्या तेजोमय प्रकाशात  आपणही  तेजाचा  कवडसा शोधण्याचा प्रयत्न करतो. . किंबहुना ह्या तेजाची अनुभूती भाविकांना घेता यावी ह्यासाठीच हे ध्यानमंदिर. 

नांदेड जवळील गोरटे येथे संतकवी दासगणु महाराजांच्या समाधीला आपण भेट देतो तेव्हां आवर्जून आपली पावले ह्या निःशब्द अशा ध्यानमंदिरांत वळतात. इथली शांत, निर्वात पोकळी ही नारायणाच्याच अस्तित्वाने भारलेली असते. वरद नारायणाची मोहिनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवतानाच आपण त्याच्या चरणकमळाशी नतमस्तक होतो. थोड्या वेळाने भानावर आल्यावर ते अर्धोन्मिलीत नेत्र जणू काही आपलीच ख्यालीखुशाली विचारत आहेत असे वाटून नकळत मनांत संवाद सुरु होतो. हो ! इथे मोठ्या आवाजांत  बोलायला मनाई आहे ना !

सकाळी सातच्या ठोक्याला लगबगीने आवरून ध्यानमंदिराच्या पायऱ्या चढतांना नारायणाला भेटायची केवढी ओढ मनांत दाटलेली असते. शांत वातावरणांत सुरु झालेल्या ध्यानमंदिरातील प्रार्थनेमुळे मनाची प्रसन्नता, उत्साह वाढू लागतो. धीर गंभीर, संथ स्वरातील प्रार्थनेचे पडसाद मनांत उमटू  लागतात. नारायणाच्या नाम- जप आणि ध्यानामुळे  ते सगुण  रूप अंतर्यामी  साकारू लागते. 

मग संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ह्या नारायणाच्या नामाचा महिमा आपल्याला त्यांच्या अभंगातून  समजावून सांगतात. त्यांच्या जनोद्धारासाठी तळमळणाऱ्या हितकर शब्दांच्या जाळ्यात आपण अगदी अलगद अडकतो. तुकाराम महाराजांचा विठ्ठल इथे आपल्याला नारायण रूपांत भेटतो 

नारायण ऐसा सेवूं नेणतिल रसा । जेणें भवव्याध तुटे, दुःख मागुते न भेटे ।।

न लगे काही आटी, बाधा राहू न शके पोटी । कैवल्य ते जोडे कृपा लौकरी घडे ।

जन्म मरण दुःख आटे, जाळे अवघेचि तुटे । तुका म्हणे झाला याचा गुण  बहुताला ।।

ह्या अभंगात तुकाराम महाराज सर्वसामान्य मनुष्याला संसारात दुःख भोगावे लागू नये , यासाठी उत्तम उपाय सांगत आहेत. . महाराज  म्हणतात, नारायणाच्या नामासारखे उत्तम औषध नाही.  पण लोक त्या औषधाचे सेवन करीत नाहीत. प्रेमाने केलेल्या नामस्मरणाने भक्तिरसाचे सेवन केले तर परमेश्वर अधिक संतुष्ट होतो. दुस्तर,अवघड असा हा भवसागर भक्तिमार्गाने अगदी सहज पार करता येतो. संसाराची आसक्ती कमी होऊन, ह्या संसाराशी असलेली नाळ तुटते. प्रत्येकाला सुखाची अभिलाषा असते आणि दुःख वाट्याला येऊ नये म्हणून सर्वजण धडपडत असतात.  नामस्मरणामुळे दुःखाचा मागमूसही तुमच्या जीवनात राहात नाही. प्रारब्ध भोग अटळ आहेत हे जरी खरं असलं, तरी त्या दुःखाची  तीव्रता नामजपामुळे कमी होते. जीवन मृत्यूच्या दुःखद चक्रातून सुटका होते, नारायणाची भक्ती फलद्रुप झाली तर शाश्वत सुखाची, आनंदाची प्राप्ती होते. असा विश्वास महाराजांना आहे. 

परमेश्वर प्राप्ती हे मनुष्यजन्माचे खरे सार्थक. त्यासाठी विविध साधने आहेत. त्यापैकीच एक  नाम / जप साधना. नामजप अगदी साधी सोपी, सहज साधना आहे. त्यासाठी  कोणतीही विशेष खटपट करावी लागत नाही. नामसाधनेत असामान्य शक्ती दडलेली आहे. भावना किंवा वासना हे संसाराचे मूळ आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी. पण हीच वासना ईश्वराच्या ठिकाणी शुद्धसत्त्वात्मक स्वरूपात असते. त्यामुळे सृष्टीची बाधा ईश्वराला होत नाही. नामस्मरणामुळे आपल्या वासना क्षीण होतात. संसार निर्मूळ होतो. म्हणून नामानेच कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती होते असे महाराज सांगतात. 

 ह्या मायाजाळाचा नाश करून जन्म मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर पडायचंय ना ? मग भक्तिरसाला वरा ! ह्या रसमय परिपोषाने तुम्हाला नारायणाची भेट अगदी लवकर आणि नक्की घडेल. महाराज अगदी निःसंदिग्धपणे अज्ञानी जीवांना  त्यांच्या हिताचा मार्ग दाखवत आहेत. 

महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष म्हणजे संत तुकाराम महाराज. महाराष्ट्रातील जनतेच्या मानसिकतेची अचूक नस त्यांना सापडली होती. महाराजांनी ह्या अभंगात अगदी थोडक्यात संपूर्ण जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले आहे. त्यातील शब्द-सामर्थ्याने आपल्याला नेमके काय करायचे आहे त्याचा बोध होतो. संसार कोषातून बाहेर पडण्यासाठी मन आक्रन्दू लागते, वारंवार त्या नारायणाला साकडं घालते. 

तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात  भक्तिरसाचा अनुभव घ्यायला सांगितले आहे.  आपल्या जीवनांत  " शृंगार ,वीर ,करुण ,हास्य ,भयानक, बीभत्स, रौद्र, अद्भुत आणि शांत " असे इतर अनेक रस आहेत  शरीर धारणेसाठी यातील काही रस आवश्यक आहेत. मानवी जीवन अशा विविध रस- रंगांनी  परिपूर्ण झाले  आहे. ह्या रस- रंगांमुळेच जीवनाची लज्जत वाढते. जीवन एकसुरी न होता, रंगीन होते, बहरते. नवरसांमुळे जीवन जगताना अनेकविध  अविष्कार अनुभवता येतात.  पण मिळणारे सुख शाश्वत नसते. शाश्वत सुख / आनंद मिळविण्यासाठी  भक्तिरसाचे प्रेमाने सेवन केले तर   आपले जगणे समृद्ध होते . ह्यातून जीवनाविषयी सखोल तत्वज्ञान, वैचारिक दृष्टी तयार होते. आपले जीवन ह्या सर्व परिस्थितीतून तावून सुलाखून निघते, तेव्हाच ब्रह्म-अनुभव घायची योग्यता निर्माण होते. मनुष्याचा स्वभाव असा आहे कि दुःखातच त्याला ईश्वराची आठवण होते म्हणून कुंतीनेहि नाही का परमेश्वराजवळ त्याची निरंतर आठवण राहावी म्हणून ,आपदा / दुःख मागून घेतले !  इतर रस आपल्याला अनुभवायला मिळतील ती ईश्वरेच्छा आहे असे मानून ते स्वीकारले तर दुःखाची तीव्रता  कमी होते. मग मन संसारापासून आपोआपच अलिप्त होते. देहबुद्धी गळून पडते. मन निर्लेप होऊन भगवंतापाशी स्थिरावते. .कैवल्याचे चांदणे आभाळभर पसरते. 

उपनिषदांत परमात्म्याचे वर्णन " रसो वै सः " असे केले आहे. परमात्मा हा आनंददायी आहे. आनंदाचा महासागराच..कष्टसाध्य प्रयत्नातूनच परमात्म्याची प्राप्ती होते आणि मग मिळणारा आनंद हा अवर्णनीय, चिरंतन असतो. हा आनंद एकदा  प्राप्त केला कि ह्या  जीवनाचे सार्थक होते .  

  " ऐसी कळवळ्याची  जाती " ... संत मंडळी ह्या नरजन्माचे सार्थक कशात आहे हे आपल्याला अगदी कळवळून सांगतात. जनता जनार्दनाला ह्या भवसागरातून  उद्धरून नेण्यासाठीच ते  जन्म घेतात, विविध माध्यमातून लोकांना उपदेश करून त्यांच्या हिताची काळजी सदा सर्वदा वाहतात. संतांचें मन अतिशय निर्मळ, सात्विक विचारांचा वाहणारा शुद्ध ,स्पष्ट झरा. म्हणूनच त्यांचे शब्द हे भाविकांच्या अंतःकरणला स्पर्श करतात.   

संतकवी दासगणु महाराज आणि स्वामी वरदानंद भारती ह्या संतांच्या तपःपूत आचरणातून आणि विविध संतांच्या मांदियाळीतून प्रगट झालेला भक्तिभाव आपण गोरट्यासारख्या तीर्थक्षेत्री अनुभवू शकतो. सर्व संतांच्या विचारसरणीचा समन्वय आपला विचार-विवेक इथल्या वास्तव्यात जागृत करतो. विष्णुसहस्रनामाच्या चौरस आहारामुळे आपला भक्तिमय कोष ही समृद्ध होतो. भक्ती रसाच्या प्रेमपान्ह्याचे पान सर्वसामान्य अज्ञानी जीवांसाठी इथे  मुक्तपणे खुले आहे. आपलंही संचित थोर म्हणून वरद नारायण आपल्याला ह्या रसाची गोडी चाखायला उद्युक्त करतो. 

नारायण ऐसा सेवू नेणतिल रसा ...... पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ....  



स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

चैत्र शु .एकादशी, शके १९४३ ( कामदा एकादशी )

संदर्भ ग्रंथ :

१ )  सार्थ श्री तुकाराम गाथा 

२)   मनोबोध : स्वामी वरदानंद  भारती ( प्राचार्य अनंत दामोदर आठवले )

Saturday, January 23, 2021

संतकवि दासगणू महाराज( SANTKAVI DASGANU MAHARAJ )

                                                                  ।। श्री शंकर  ।।

                                                                                                               पौष शु. एकादशी ,शके १९४२

                                                    संतकवि  दासगणू  महाराज 


संतकवि दासगणू महाराज ह्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील शैलीचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न करून त्यांची स्मृती ह्या लेखातून  जागविली आहे.  

प.पू अप्पांनी भावमुक्तावलीत सद्गुरू प्रार्थनेत, दासगणू महाराजांच्या लेखणीचे महत्व अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केले आहे. हृदयातील भक्तिभाव, अलौकिक बुद्धिमत्ता, सद्गुणांची खाण आणि सदा परमेश्वर चरणाशी लीन झालेला भाव, ह्यामुळेच महाराजांचे सर्व काव्य हे तुळशीच्या मंजिऱ्यांप्रमाणे अतिशय पवित्र आहे. त्यांत्च्या साहित्याचा उगम थेट हृदयांतून झालेला आहे. त्याचा प्रत्यय त्यांचे साहित्य वाचतांना भाविकांना अनुभविता येतो.

प.पू . साईबाबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने दासगणू महाराजांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरवात केली आणि विपुल साहित्याची निर्मिती केली. सर्व संत हे जणू परमेश्वराचा दुसरा अंशच आहेत. अशा अनेकविध परिचित आणि अपरिचित संतांच्या चरित्रांचा वेध अपार मेहनत घेऊन महाराजांनी आपल्या भक्ती लिलामृत आणि भक्तीसारामृत ह्या ग्रंथांत घेतला आहे. 

दादांच्या कीर्तन आणि इतर काव्यातील उत्कटता रसिकांच्या मनाचा ठाव घेते  ती  त्यातील विलक्षण भावामुळेच. म्हणूनच त्यांच्या शब्दांचा परिमळ सतत अवतीभोवती पसरलेला असतो. इतकी अवीट गोडी ह्या सर्व साहित्यात चाखायला मिळते. आणि हे सर्व अगदी सोप्या सहज भाषेत. ह्या प्रसाद गुणामुळेच हे सर्व लेखन आपल्याला अगदी जवळचे वाटते. पांडुरंग स्तोत्र हे ह्या दृष्टीने सर्वांच्याच नित्य पठनात असल्याने परिचयाचे आहे. 

भक्ती रसाबरोबरच करुण  रसाचा परिपोष त्यांनी रचलेल्या  कीर्तनातून अनुभविता  येतो. अनेक वर्षे वारंवार हि कीर्तने ऐकूनही त्यातील समरसता जराही कमी होत नाही हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. शुचिता, वैराग्य, मधुर, सात्विक भाव त्यांच्या व्यक्तिमत्वातील ह्या गुणांचा परिपोष त्यांच्या लेखणीतून झिरपला नाही तर नवलच. 

महाराजांच्या अप्रकाशित वाङ्मयातील पुरवणी खंड जेव्हा मला  वाचनासाठी मिळाला, तेव्हा त्यांतील त्यांनी हाताळलेल्या  विविध साहित्य प्रकारांनी मन अचंबित झाले. कीर्तनातील पूर्वरंगासाठी उपयुक्त अशी उपदेशपर पदे  विविध वृत्तांत  आणि चालीत बांधलेली आहेत. रसाळ आणि भक्तिरसपूर्ण अशी हि पदे वाचायला आणि ऐकायलाही गोड वाटतात. त्याला दिलेल्या चालीही कर्णमधुर आहेत.  ह्या पदांप्रमाणेच फटके, कटाव, पोवाडा अशी विविध काव्य प्रकारांची रचना त्यांनी केली आहे. स्तवने, अभंग, आरत्या ह्यांचीही रचना आढळते. सगळ्या साहित्य प्रकारांत  त्यांच्या शब्द सामर्थ्याचा प्रत्यय येतो. 

वेगळ्या विषयावरील चहाचे अष्टक आपले लक्ष वेधून घेते. " चहा ना  बरा हा महा दुःखकरी । करी हाच उत्पन्न रोगां  शरीरी ।।" ह्या पेयाच्या प्राशनाचे विविध तोटे महाराज आपल्याला सांगतात. लोकांना सद्बुद्धी मिळावी आणि  चहापासून लांब राहावे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना त्यांनी केली आहे. 

ह्याच ग्रंथातील एक पद मला आवडले. त्यातील साध्या सोप्या आशयाने मनाला आकर्षित केले. त्याचे थोडक्यात विवेचन  :

हे पद " फटका " ह्या काव्यप्रकारांत मोडते. एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत लोकांना समजावून सांगणे म्हणजे साहित्यांतून फटकारणे. अनंत फ़ंदी हे ह्या फटक्यांचे जनक. त्यानी रचलेले फटके सुप्रसिद्ध आहेत. ते लोकांना उपदेशपर आहेत. लोकांना अज्ञान  निद्रेतून जागे करण्यासाठी हा  फटका महाराजांनी रचलेला आहे.गाताना हा फटका जोशपूर्ण वाटतो. अवघ्या नऊ कडव्यांत आणि अतिशय थोडक्या शब्दात अतिशय प्रभावीपणे समाज मनाची नस ओळखून लोकांना , व्यवहारांत कसे वागावे, आचरण कसे असावे हे समजावून सांगितले आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला आहे. उत्तम नीतिमूल्यं अंगी बाणवावीत म्हणून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सुक्ष्म  निरीक्षण शक्तीचा प्रत्यय काव्य वाचताना अनुभविता  येतो. लोकांच्या समाजात मिरवण्याचा उपहास करतांना ते स्पष्ट शब्दात म्हणतात,  " मृण्मय देहा  घालुनी कपडे । बैलोबापरी सजू नको ।।

मुळात सज्जन असलेले हे मन अनेक विकारांमुळे स्व स्वरुपापासून दूर जाते. अहंकार, ममत्व, सद्वृत्तीचा विसर, वृथा अभिमान, वाणीवर नसलेले नियंत्रण ह्यामुळे भक्तीमार्गात रमत नाही. दुसर्यांचा द्वेष - मत्सर करण्यांत, निंदा करण्यात, अशुभ चिंतण्यात वेळ विनाकारण वाया जातो. महाराजांना दांभिकपणाची खूप चीड आहे. परमार्थमार्गात साधेपणाने जीवन जगावे असा मोलाचा सल्ला ते साधकांना देतात. 

नरदेहाचे महत्व प .पू .दादांनी वारंवार प्रकट केले आहे. पण ह्या नरदेहाचे खरे सार्थक कशात आहे हे आपल्याला कळत नाही. नरदेह परमेश्वराच्या भक्तीचे प्रमुख साधन आहे.  आपण प्रपंचात नको तेव्हढे गुंतत जातो आणि मग दुःख भोगावे लागते.दासगणु महाराजांसारखे  संत निःस्पृह आणि निस्वार्थी असतात. लोकहिताची तळमळ त्यांना असते. लोकांना भक्तिमार्गाला लावून शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणे, मनाची शक्ती वाढविणे हे काम ते आपल्या साहित्यातून करत असतात. 

" अमोल ऐशा नरदेहाला येऊनि वाया जाऊ नको । दासगणूचा ऐकुनी फटका तसे चालण्या चुकू नको ।। "'

महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासाने " आधुनिक महिपती " हि त्यांना दिलेली पदवी कशी सार्थ आहे हे समजून आपले मन त्यांच्या चरणाशी सहजच  नतमस्तक होते... 

( सोबत मूळ काव्य जोडले आहे .. )





                                                                                                                                   स्नेहा भाटवडेकर 
                                                                                                                                     ९८३३०१७०७४

Wednesday, September 9, 2020

जीवन साधना ( Jeevan Sadhana )

                                                                ।।श्री शंकर ।।

                                                                 जीवन साधना 

 छोटा - मोठा ,जवळचा -लांबचा किंवा देश- परदेशातला, प्रवासाला निघताना आपल्याला तयारी करावीच लागते. जिथे जायचे त्या ठिकाणाची  पूर्ण माहिती करून घ्यावी लागते. 

नेहेमी लागणाऱ्या सर्व वस्तुंबरोबरच,औषधें, जिथे जायचे त्यानुसार काही विशिष्ट गोष्टी हि घ्याव्या लागतात. तिकीट, परवाना ( Passport , Visa ),वेळेचे नियोजन ... सर्व आखणी व्यवस्थित झाली कि प्रवासाचा आनंद मिळतो. ज्या मुक्कामी जाणार ते वास्तव्य हि छान होते आणि आनंदात भर पडते. 

एकदा गंमत झाली. मी प्रवासांत कंगवाच घ्यायला विसरले. तशी साधीशीच गोष्ट. प्रवासांत मला कुठेही कंगवा मिळाला नाही. जिथे गेले तेही अगदी खेडेगाव. त्यामुळे "ना धड वेणी, ना धड फणी", अशा अवस्थेतच दिवस काढावा लागला. सांगितलं एवढ्याचसाठी कि अगदी छोट्याशा गोष्टीने सुद्धा किती अडचण होते ह्याचा अनुभव आला.  पुढच्या वाटचालीच्या  दृष्टीने हे असे प्रसंग खूप  काही शिकवून जातात. 

आपला जीवन प्रवास अगदी असाच असतो. छोटा प्रवास करताना आपण सगळी काळजी घेतो , मग हा तर दीर्घ प्रवास. किती काळजीपूर्वक हे सर्व नियोजन व्हायला हवं, की नाही ?आणि कुठे पोचायचे हे ध्येय ठरवावे लागते.  प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. कठीण प्रसंग आल्यावर अगदी ऐनवेळी धावपळ होते. कोणतेही कर्म करायचे तर त्यासाठी योग्यता, पात्रता असावी लागते. असलेली योग्यता वेळोवेळी मिळवावी लागते, त्यात वाढ करावी लागते. प्रत्यक्ष जीवन व्यवहार करताना जर काही तत्वांचे पालन केले, जीवनशैलीचा योग्य अंगिकार केला, तर पश्चाताप करायची वेळ फार कमी येते. हे सर्व  जीवनसूत्र ,भगवद्गीतेत सापडते. अभ्यासाने ते उलगडत जाते. 

श्रीमदभगवद्गीता हा भारतीय तत्वज्ञानातील एक अद्वितीय ग्रंथ. त्यामधील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश अलौकिक आहे. 

योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणभूमीवर हा उपदेश केला आहे. मोह्ग्रस्त होऊन अर्जुन स्वतःचे कर्तव्य विसरला. किंकर्तव्यमूढ अर्जुनाला श्रीकृष्णांनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली." करिष्ये वचनं तव " म्हणून  अर्जुन पुन्हा सामर्थ्याने युद्धभूमीवर उभा ठाकला. विजयश्री त्याच्या बाजूने खेचून आणली. धर्माचे राज्य प्रस्थापित केले. आणि अधर्माचा नाश केला. 

अर्जुनाला रणभूमीवर युद्ध करायचे होते. आपल्याला मात्र दैनंदिन जीवनात अनेक युद्धप्रसंगांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात," रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " घरांत किंवा समाजात वावरताना मनामध्ये  द्वंद्व चाललेले असते.हे करू का ते करू, योग्य काय अयोग्य काय, ह्याचा निर्णय पटकन घेता येत नाही.  ह्या सर्व प्रसंगात गीतेतील तत्वज्ञान आपल्याला मदत करते, मार्ग दाखवते. जीवनातील ध्येय गाठायला मदत करते. आपल्यासारख्या संसारी लोकांना अचूक मार्गदर्शन गीतेत मिळते. ह्या तत्वज्ञानाचे आचरण केले कि जीवन उन्नत होते. 

त्यासाठी अर्थातच गीतेचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. ज्याला संसारात सुखस्वास्थ्य हवे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे तर मग गीता हवीच. आणि हि ओळख सुद्धा शक्य तितक्या लवकर तरुण वयातच व्हायला हवी. चांगले संस्कार जितक्या लहान वयांत होतील, तेवढे ते लाभदायक ठरतात. त्या वयात ते महत्व कळत नाही, पण नंतर मात्र, अरे हे आपल्याला आधीच कळलं असतं तर, अशी रुखरुख वाटत राहते. 

देह आहे तोपर्यंत कर्म करावेच लागते. कोणीही ह्यातून सुटलेले नाही. ते कर्म नित्य नैमित्तिक असते, विहित असते किंवा प्रासंगिक असते. आपले रोजचे जीवन व्यवहार सोडून काही कर्तव्यकर्म संसार म्हटलं कि आलीच. सणवार , कुळाचार, कुळधर्म हि काही विशेष कर्म, हे सर्व करावं लागतं. हे  करताना जेव्हढी शास्त्रसंमत कर्म करता येतील तेव्हढी  केली तर ते कर्म यथासांग पार पडते. स्वामी चिन्मयानंद म्हणतात " Living the right values of Life is like building a dam across a  river". आचार विचार, नीतिमूल्य ह्यांचं योग्य पालन करावं लागतं. तरच कर्म यथासांग घडतं आणि त्याचे फळंही गोड असतं. 

अर्थात गीतेने फक्त तुमचं कर्म योग्य करा, हेच सांगितलंय ." दैवं चैवात्र पंचमम "तुम्हाला मिळणारे फळ हे तुमच्या दैवावर किंवा प्रारब्धावर अवलंबून असतं. फळाची आसक्ती न ठेवता कर्म करा असा उपदेश भगवंतांनी केला आहे. कर्म करण्यापूर्वी त्या कर्माची योग्य जाणीव निर्माण होणं आणि त्यानुसार आपल्याकडे उपलब्ध साधने कोणती आहेत, आपण कोणत्या दिशेने, कसे प्रयत्न करावेत, ह्या सर्वांचा विचार करावा. 

अगदी आपल्या घरातलं रोजचं उदाहरण घेतलं तरी हे स्पष्ट होईल. स्वयंपाक करताना आपण वेळ, हेतू, उपलब्ध साधनं, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न ह्या सगळ्याचा विचार करतो. अर्थात वर्षानुवर्षे केल्यामुळे हे सगळं अंगवळणी पडलेलं असतं, त्यामुळे त्याची जाणीव होत नाही इतकंच. हे सर्व नियोजन  करून केलेला पदार्थ सगळ्यांच्या पसंतीला पडेल का नाही हे पूर्णतः दैवाधीन असतं. सर्व घटकांचा  उत्तम समतोल साधला गेला कि पदार्थ चांगला बनतोच. त्यातही स्वकर्म काय हे समजून आपण स्वतः ते काम केलं तर सोने पे सुहागा. ज्ञानेश्वर माउलींनी स्वकर्माने केलेली पूजा ईश्वराला फार प्रिय आहे असं सांगितलंच आहे.  स्वकर्म हीच खरी पूजा, वेगळी पूजा करण्याचीही आवश्यकता नाही. 

हे स्वकर्म कसे  : " योगः कर्मसु कौशलम ", कोणतेही कर्म मनापासून, पूर्ण एकाग्र होऊन, निष्ठेने करावे. जमेल तेव्हढ्या कौशल्याचा वापर करावा. म्हणजे ते कर्म उत्तम होते आणि ईश्वरार्पण होते. हि सुद्धा एक साधनाच आहे. 

आपल्या बुद्धीचा प्रभाव कर्मावर होत असतो. आधी केलेल्या कर्मानुसार बुद्धी आचरण करते आणि शुद्ध बुद्धीने चांगले कर्म घडते असे चक्र चालू असते. जन्मजात सत्व, रज आणि तमाचा प्रभाव आपल्यावर असतो. त्यानुसार आपले कर्म घडते. कर्म करताना वाईटाकडून, चांगल्याकडे आणि चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे होणारा प्रवास म्हणजे" साधना " बुद्धी सुसंस्कारीत  झाली कि योग्य वाटचाल होते. म्हणजेच तमोगुणांचा, रजोगुणांचा  प्रभाव कमी होऊन सत्वगुण वाढीला लागतो. बुद्धी सुसंस्कारीत होण्यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, सत्पुरुषांचा सहवास, नामजप इ. साधनांचा वापर उपयुक्त ठरतो. सज्जन व्यक्तींचा आदर्श संसार हाच पुढे परमार्थात परिणत होतो. अशा घरातच वेदांत खरा उमगतो. परमार्थ करायचा म्हणजे संसाराचा त्याग करायचा असं अजिबातच नाही बरं ! तर तो नेटका करायचा. 

उपासनेमुळे बुद्धी हळूहळू स्थिरावत जाते. रागद्वेष, हवे नको, मानापमान, अहंकार हे सर्व लयाला जाण्यास सुरवात होते. अंतःकरणाची प्रसन्नता लाभते. साधनामार्गावरील हा टप्पा गाठला कि आलेल्या निवांतपणामुळे कृतकृत्यता येते. 

श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे : सर्वभावाने ईश्वराला शरण गेले कि ईश्वरी प्रसादाचा लाभ होतो आणि आत्यंतिक शांतता मिळून शाश्वत पद प्राप्त होते. 

आपले जीवन हि एक साधना बनून हि अवस्था प्राप्त व्हावी हि श्रीचरणीं प्रार्थना ... 


संदर्भ : जीवन साधना . ( गीता १८ वा अध्याय )

विवेचन : सद्गुरू स्वामी वरदानंद भारती  ( अनन्त दामोदर आठवले )