Friday, April 23, 2021

Sevu Nenatil Rasa ( सेवू नेणतिल रसा )

।। श्री शंकर ।।


सेवू नेणतिल रसा 

वस्त्र सुंदर केशरी । चपलेपरी तळपे कटि ।रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रवि हिंपुटी ।

शन्ख चक्र गदा करीं कमलासवे अभयास दे । रम्य रूप असे अनंत हृदांत  संतत राहू दे ।।

आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती ह्यांनी त्यांच्या काव्य पंक्तीत रेखाटलेली वरद नारायणाची भव्य आणि रम्य प्रतिमा आपण ध्यानमंदिरांत प्रवेश करता क्षणीच आपल्या हृदयाचा ठाव घेते. निळ्या आकाशाच्या आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या हिमशिखरांच्या पार्श्वभूमीवर अर्धपद्मासनातील ही विराजमान मूर्ती ... आपली नजर अगदी खिळवून ठेवते. हिमशिखरांवरून नारायण भेटीसाठी अनिवार ओढीने धावत आलेला गंगेचा प्रवाह ...ह्या प्रसन्नतेत भर घालतो.आकाशांत उगवलेली चंद्रकोर आपल्या मनालाही शीतलता प्रदान करते. प.पूज्य स्वामी वरदानंद भारती (आपले अप्पा ) ह्यांना पूर्णत्वाने लाभलेला ह्या वरदनारायणाचा आशीर्वाद... त्याची दिव्य प्रभावळ ... त्या तेजोमय प्रकाशात  आपणही  तेजाचा  कवडसा शोधण्याचा प्रयत्न करतो. . किंबहुना ह्या तेजाची अनुभूती भाविकांना घेता यावी ह्यासाठीच हे ध्यानमंदिर. 

नांदेड जवळील गोरटे येथे संतकवी दासगणु महाराजांच्या समाधीला आपण भेट देतो तेव्हां आवर्जून आपली पावले ह्या निःशब्द अशा ध्यानमंदिरांत वळतात. इथली शांत, निर्वात पोकळी ही नारायणाच्याच अस्तित्वाने भारलेली असते. वरद नारायणाची मोहिनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवतानाच आपण त्याच्या चरणकमळाशी नतमस्तक होतो. थोड्या वेळाने भानावर आल्यावर ते अर्धोन्मिलीत नेत्र जणू काही आपलीच ख्यालीखुशाली विचारत आहेत असे वाटून नकळत मनांत संवाद सुरु होतो. हो ! इथे मोठ्या आवाजांत  बोलायला मनाई आहे ना !

सकाळी सातच्या ठोक्याला लगबगीने आवरून ध्यानमंदिराच्या पायऱ्या चढतांना नारायणाला भेटायची केवढी ओढ मनांत दाटलेली असते. शांत वातावरणांत सुरु झालेल्या ध्यानमंदिरातील प्रार्थनेमुळे मनाची प्रसन्नता, उत्साह वाढू लागतो. धीर गंभीर, संथ स्वरातील प्रार्थनेचे पडसाद मनांत उमटू  लागतात. नारायणाच्या नाम- जप आणि ध्यानामुळे  ते सगुण  रूप अंतर्यामी  साकारू लागते. 

मग संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ह्या नारायणाच्या नामाचा महिमा आपल्याला त्यांच्या अभंगातून  समजावून सांगतात. त्यांच्या जनोद्धारासाठी तळमळणाऱ्या हितकर शब्दांच्या जाळ्यात आपण अगदी अलगद अडकतो. तुकाराम महाराजांचा विठ्ठल इथे आपल्याला नारायण रूपांत भेटतो 

नारायण ऐसा सेवूं नेणतिल रसा । जेणें भवव्याध तुटे, दुःख मागुते न भेटे ।।

न लगे काही आटी, बाधा राहू न शके पोटी । कैवल्य ते जोडे कृपा लौकरी घडे ।

जन्म मरण दुःख आटे, जाळे अवघेचि तुटे । तुका म्हणे झाला याचा गुण  बहुताला ।।

ह्या अभंगात तुकाराम महाराज सर्वसामान्य मनुष्याला संसारात दुःख भोगावे लागू नये , यासाठी उत्तम उपाय सांगत आहेत. . महाराज  म्हणतात, नारायणाच्या नामासारखे उत्तम औषध नाही.  पण लोक त्या औषधाचे सेवन करीत नाहीत. प्रेमाने केलेल्या नामस्मरणाने भक्तिरसाचे सेवन केले तर परमेश्वर अधिक संतुष्ट होतो. दुस्तर,अवघड असा हा भवसागर भक्तिमार्गाने अगदी सहज पार करता येतो. संसाराची आसक्ती कमी होऊन, ह्या संसाराशी असलेली नाळ तुटते. प्रत्येकाला सुखाची अभिलाषा असते आणि दुःख वाट्याला येऊ नये म्हणून सर्वजण धडपडत असतात.  नामस्मरणामुळे दुःखाचा मागमूसही तुमच्या जीवनात राहात नाही. प्रारब्ध भोग अटळ आहेत हे जरी खरं असलं, तरी त्या दुःखाची  तीव्रता नामजपामुळे कमी होते. जीवन मृत्यूच्या दुःखद चक्रातून सुटका होते, नारायणाची भक्ती फलद्रुप झाली तर शाश्वत सुखाची, आनंदाची प्राप्ती होते. असा विश्वास महाराजांना आहे. 

परमेश्वर प्राप्ती हे मनुष्यजन्माचे खरे सार्थक. त्यासाठी विविध साधने आहेत. त्यापैकीच एक  नाम / जप साधना. नामजप अगदी साधी सोपी, सहज साधना आहे. त्यासाठी  कोणतीही विशेष खटपट करावी लागत नाही. नामसाधनेत असामान्य शक्ती दडलेली आहे. भावना किंवा वासना हे संसाराचे मूळ आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी. पण हीच वासना ईश्वराच्या ठिकाणी शुद्धसत्त्वात्मक स्वरूपात असते. त्यामुळे सृष्टीची बाधा ईश्वराला होत नाही. नामस्मरणामुळे आपल्या वासना क्षीण होतात. संसार निर्मूळ होतो. म्हणून नामानेच कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती होते असे महाराज सांगतात. 

 ह्या मायाजाळाचा नाश करून जन्म मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर पडायचंय ना ? मग भक्तिरसाला वरा ! ह्या रसमय परिपोषाने तुम्हाला नारायणाची भेट अगदी लवकर आणि नक्की घडेल. महाराज अगदी निःसंदिग्धपणे अज्ञानी जीवांना  त्यांच्या हिताचा मार्ग दाखवत आहेत. 

महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष म्हणजे संत तुकाराम महाराज. महाराष्ट्रातील जनतेच्या मानसिकतेची अचूक नस त्यांना सापडली होती. महाराजांनी ह्या अभंगात अगदी थोडक्यात संपूर्ण जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले आहे. त्यातील शब्द-सामर्थ्याने आपल्याला नेमके काय करायचे आहे त्याचा बोध होतो. संसार कोषातून बाहेर पडण्यासाठी मन आक्रन्दू लागते, वारंवार त्या नारायणाला साकडं घालते. 

तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात  भक्तिरसाचा अनुभव घ्यायला सांगितले आहे.  आपल्या जीवनांत  " शृंगार ,वीर ,करुण ,हास्य ,भयानक, बीभत्स, रौद्र, अद्भुत आणि शांत " असे इतर अनेक रस आहेत  शरीर धारणेसाठी यातील काही रस आवश्यक आहेत. मानवी जीवन अशा विविध रस- रंगांनी  परिपूर्ण झाले  आहे. ह्या रस- रंगांमुळेच जीवनाची लज्जत वाढते. जीवन एकसुरी न होता, रंगीन होते, बहरते. नवरसांमुळे जीवन जगताना अनेकविध  अविष्कार अनुभवता येतात.  पण मिळणारे सुख शाश्वत नसते. शाश्वत सुख / आनंद मिळविण्यासाठी  भक्तिरसाचे प्रेमाने सेवन केले तर   आपले जगणे समृद्ध होते . ह्यातून जीवनाविषयी सखोल तत्वज्ञान, वैचारिक दृष्टी तयार होते. आपले जीवन ह्या सर्व परिस्थितीतून तावून सुलाखून निघते, तेव्हाच ब्रह्म-अनुभव घायची योग्यता निर्माण होते. मनुष्याचा स्वभाव असा आहे कि दुःखातच त्याला ईश्वराची आठवण होते म्हणून कुंतीनेहि नाही का परमेश्वराजवळ त्याची निरंतर आठवण राहावी म्हणून ,आपदा / दुःख मागून घेतले !  इतर रस आपल्याला अनुभवायला मिळतील ती ईश्वरेच्छा आहे असे मानून ते स्वीकारले तर दुःखाची तीव्रता  कमी होते. मग मन संसारापासून आपोआपच अलिप्त होते. देहबुद्धी गळून पडते. मन निर्लेप होऊन भगवंतापाशी स्थिरावते. .कैवल्याचे चांदणे आभाळभर पसरते. 

उपनिषदांत परमात्म्याचे वर्णन " रसो वै सः " असे केले आहे. परमात्मा हा आनंददायी आहे. आनंदाचा महासागराच..कष्टसाध्य प्रयत्नातूनच परमात्म्याची प्राप्ती होते आणि मग मिळणारा आनंद हा अवर्णनीय, चिरंतन असतो. हा आनंद एकदा  प्राप्त केला कि ह्या  जीवनाचे सार्थक होते .  

  " ऐसी कळवळ्याची  जाती " ... संत मंडळी ह्या नरजन्माचे सार्थक कशात आहे हे आपल्याला अगदी कळवळून सांगतात. जनता जनार्दनाला ह्या भवसागरातून  उद्धरून नेण्यासाठीच ते  जन्म घेतात, विविध माध्यमातून लोकांना उपदेश करून त्यांच्या हिताची काळजी सदा सर्वदा वाहतात. संतांचें मन अतिशय निर्मळ, सात्विक विचारांचा वाहणारा शुद्ध ,स्पष्ट झरा. म्हणूनच त्यांचे शब्द हे भाविकांच्या अंतःकरणला स्पर्श करतात.   

संतकवी दासगणु महाराज आणि स्वामी वरदानंद भारती ह्या संतांच्या तपःपूत आचरणातून आणि विविध संतांच्या मांदियाळीतून प्रगट झालेला भक्तिभाव आपण गोरट्यासारख्या तीर्थक्षेत्री अनुभवू शकतो. सर्व संतांच्या विचारसरणीचा समन्वय आपला विचार-विवेक इथल्या वास्तव्यात जागृत करतो. विष्णुसहस्रनामाच्या चौरस आहारामुळे आपला भक्तिमय कोष ही समृद्ध होतो. भक्ती रसाच्या प्रेमपान्ह्याचे पान सर्वसामान्य अज्ञानी जीवांसाठी इथे  मुक्तपणे खुले आहे. आपलंही संचित थोर म्हणून वरद नारायण आपल्याला ह्या रसाची गोडी चाखायला उद्युक्त करतो. 

नारायण ऐसा सेवू नेणतिल रसा ...... पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ....  



स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

चैत्र शु .एकादशी, शके १९४३ ( कामदा एकादशी )

संदर्भ ग्रंथ :

१ )  सार्थ श्री तुकाराम गाथा 

२)   मनोबोध : स्वामी वरदानंद  भारती ( प्राचार्य अनंत दामोदर आठवले )

No comments:

Post a Comment