Saturday, June 5, 2021

आजोळची भेट ( Ajolachi Bhet )

                                ।। श्री शंकर  ।।

                 आजोळची भेट 


" आज कुछ धारदार हो जाये " , लेकीची फर्माइश ... ठीक है ,कोशिश करती हूँ  ... 

लेखणी सरसावली ...काय बरं लिहावं ? चलो शुरू तो करें ...  देखते हैं ... लेखणीची धार अजमावताना माझा मोर्चा वळला मात्र दुसरीकडेच ... 

जमिनीवर हातांनी जोर देतच मी उठले.गुडघ्यांचे कुरकुरणारे सांधे आता तू वरिष्ठ नागरिक झालीस , ह्याची जाणीव करून देणारे !पण हाडीमासी खिळलेल्या सवयी आता थोड्याच बदलणार ? मळलेली वाट सोडणं आता ह्या वयांत तर  खूपच कठीण! हं sss , मी आतल्या आत दीर्घ सुस्कारा सोडला.नारळाचं खोवलेलं एकसारखं ,पांढरं शुभ्र ओलं खोबरं डब्यात भरतानाच मी कौतुक भरल्या नजरेने तिच्याकडे पाहिले . धारदार ती ,पण मी मात्र प्रेमाने एकवार तिच्या पात्यावर हात फिरवला ,स्वच्छ पुसून तिला जागेवर ठेवून दिलं . 

आम्ही नवीन जागेत राहायला आलो आणि काही दिवसांतच कोकणांतून नाना आजोबा आमचे नवीन घर बघण्याच्या निमित्ताने आमच्या कडे राहायला आले. आईच्या माहेरी मीच सर्वात मोठी नात . साहजिकच आजी ,आजोबा ,मामा ,मावश्या सगळ्यांचीच लाडकी. लाड करणारे आजोबा आल्यावर मी खुश झाले. आजोबा तिकडून येताना कोकणचा मेवा नेहमीच घेऊन येत. आमच्या शेतातले लाल तांदूळ,नाचणी,कुळथाचे घरी चुलीवर भाजलेले खमंग पीठ,त्याचा गंध अगदी आरपार आजोबांच्या  बॅगेतील  सगळ्या सामानाला तर यायचाच पण घरातही दीर्घकाळ रेंगाळायचा. फणसाचे तळलेले गरे ,आंब्याची- फणसाची पोळी  आणि आजीच्या/ मामीच्या  हातचे मला आवडणारे खास रव्याचे लाडू,कधीतरी नारळाच्या किंवा कोहोळ्याच्या वडया ,हे पदार्थ इतके चविष्ट कि गावच्या मातीचा कस आणि आजोळच्या मायेचा ओलावा   ... 

एवढं सगळं सामान आजोबानीं आता अगदी त्र्याऐशी च्या घरात असून सुद्धा हौसेने उचलून आणलं.बाकीही कोणाकोणाचे वाटे त्यात असायचे. मग सगळ्यांच्या घरी जाऊन तो खाऊ पोचवणे आणि त्यासोबत खमंग गप्पा मारणे ,हा आजोबांचा वर्षानुवर्षे चाललेला आवडीचा उपक्रम .आजोबांना माणसांची खूपच आवड होती ,त्यांनी नाती जपली होती. त्यांच्याशी  गप्पा मारायला तर त्यांना कोणताही विषय चालायचा. ह्या गप्पांना वेळेचेही बंधन नसायचे."तुझेआजोबा म्हणजे फणस!एक नंबर कोकणी हीरा "माझे सासरे नेहेमी म्हणत.आजोबा बोलायला काहीसे फटकळ पण  सर्वांविषयी आपुलकी , प्रेमभाव जपणारे. आजोबा कोकणातल्या  त्यांच्या घरी यायचे निमंत्रण सर्वांना अगदी आग्रहाने देत. आणि त्यांचा हा प्रेमळ आग्रह कोणाला मोडता येत नसे.पाहुणेमंडळी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य उत्तम करायचे .  

 प्रवासाचा शीण थोडा हलका झाल्यावर आजोबांनी त्यांच्या पोतडीतल्या भेटवस्तू काढायला सुरवात केली." आजोबा , आज सामान जरा जास्तच वाटतंय ,जड ही आहे खूप. काय आणलंत एव्हढं ओझं?कसा प्रवास करता ह्या वयांत एवढे सामान घेऊन?आधी हा तुला खाऊ! खाऊची  पिशवी हातात दिल्यावर एक जाडी-भरडी गोणपाटाची जड पिशवी त्यांनी  माझ्या हातात दिली. त्या पिशवीकडे मी  बघत राहिले. अगं ,तुझ्या नवीन घरासाठी खास भेट घेऊन आलोय. बघ उघडून.काय असेल ह्या  पिशवीत ? माझं कुतूहल चाळवलं .ती पिशवी उघडताच आत निघाली एक धारदार वस्तू. बसायला ऐसपैस पाट ,मोठं लोखंडी पातं अगदी धारदार,तळपणारं .नारळ खोवण्यासाठी मोठी खवणी ...  हि कसली भेट ? खरं तर माझं मन जरा हिरमुसलं . आणि हा एवढा मोठा विळोबा कोकणांत ठीक आहे हो वापरायला !.इथे मुंबईत आमच्या एवढ्या टीचभर जागेत ठेवायचं कुठे हे धूड ? माझ्या  चेहेऱ्यावर उमटलेली नाराजी चाणाक्ष आजोबानी नेमकी हेरली. 

आजोबा माझी समजूत घालू लागले. मागच्याच आठवड्यात अंगणातील जुनं फणसाचं झाड पडलं . अगं ,हे लाकूड पाटासाठी अगदी उत्तम. सुताराला बोलवून मस्त मोठ्ठा पाट करवून घेतला. मग खारेपाटणातून लोहाराला सांगून हे असं खास जाड पातं बनवलं . तुला उपगोगी होईल म्हणून मुद्दाम बनवून घेतली हो , अगदी स्वतः लक्ष घालून. त्या विळीसाठी आजोबांनी घेतलेली मेहनत बघूनच माझा जीव कासावीस झाला. " अगदी छान उपयोगी  आहे भेट " रोज मला तुमची आणि कोकणातली आठवण नक्की येईल. आजोबानाही माझं बोलणं ऐकून बरं वाटलं आणि केलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले . 


सुरवातीला ह्या विळीची सवय व्हायला जरा वेळच लागला.माझी वापरातली पहिली विळी अगदी नाजूक साजूक.बोथट धारेची. नव्या विळीची धार एव्हढी की बोट अगदी कापायचंच .खूप लक्षपूर्वक चिरायला लागे .आज ३० वर्षं झाली पण ही  भेट धारदार असली तरीही मला खूप आनंद देतेय. विळीवर बसून भाजी  चिरताना मी रोजच कोकणांत फेरफटका मारून येते. कोकणातलं आमचं कौलारू टुमदार ,चौसोपी,नीटनेटकं घर,एकाकी ,निवांत ,निसर्गाच्या सानिध्यात पहुडलेलं. आजी -आजोबा ,मामा-मामी ,मामेभावंडं ,कायम आला-गेला पै-पाहुणा ,भरलेलं गोकुळच ,बाजूचा गाई -म्हशींनी भरलेला गोठा,त्या मुक्या जनावरांचीही माया,  परसातला ,लेकुरवाळा फणस ,गच्च लगडलेलं आंब्याचं झाड ,सुगंधाने बहरलेली मागच्या पडवीतली  फुलबाग, आणि हो माझं आवडतं वरच्या रस्त्याच्या बाजूचं सुरुंगीचं झाड .आमच्या घराची ओळख ह्या झाडामुळेच व्हायची ह्या फुलांच्या बहराने. आसमंत दरवळायचा  .सारवलेल्या अंगणातलं तुळशी वृंदावन,त्यासमोर रेखाटलेली रांगोळी ,माजघरातलं पायऱ्या -पायऱ्यांच देवघर आणि गुरुचरित्र पारायणात मग्न असलेली आजोबांची शांत मूर्ती. 

आजोबांनी दिलेल्या ह्या अमूल्य भेटीचं महत्व कळायला मला जरा वेळच लागला. " अहर्निशम सेवामहे "  ही विळी मला अखंड सेवा देतेय.आतापर्यंत एकदाही धार  काढावी लागली नाही की दुरुस्ती नाही. गंजाची पुटं तिच्यावर चढलेली नाहीत. दिवसेंदिवस तिच्यावरचं माझं प्रेम वाढतच आहे. "जुनं ते सोन ", ह्याची प्रचिती देणारी ही भेट !  

" Neighbour's envy, owners' pride "  ही विळी. आमच्या घरी आलेल्या पाहुण्याना ही आकर्षित करते. कुठे मिळाली  हो ही विळी? नाही बाजारातून नाही आणली ती, स्पेशल आहे,आजोळची भेट ..मी कॊतुकाने सांगते. काही नातेवाईक मंडळींनी ही विळी बघून आजोबाना तशीच विळी हवी म्हणून ऑर्डर देऊन, करवून घेतली. 

आजोबांचे माझ्याकडचे ते  शेवटचेच वास्तव्य असेल हेही मला त्यावेळी कुठे माहित होते? आजोबानी अगदी शम्भरी गाठली पण वयोमानानुसार नंतर मुंबईच्या धावपळीत येणे त्यांना जमले नाही .

आज खरं तर खाली बसून चिराचिरी करण,मलाही जरा अवघड जातं .पण ह्या विळीवर बसून चिरण्यातला आनंद वेगळाच.चिरणं ही  कसं अगदी बारीक ,हवं तसं .आणखी एक सिक्रेट , तुमच्या माझ्यातच हं ,हिने मला अगदी फिट N फाईन ठेवलंय . शरीराला छान व्यायाम .   

आजच्या काळांत स्त्रियांना किचन मध्ये वेळेच्या मर्यादेतच सर्व कामं उरकावी लागतात.त्यामुळे  साधनंही तशीच लागतात. पुढच्या पिढीच्या चाकू सुऱ्या ,चॉपिंग बोर्ड बरोबरच मी माझी ही जुनी  ठेव जपतेय . मुलीचा माझा वाद-संवाद नेहेमीचाच ," आई आता कशाला हवीये ती जुनी विळी ?" हसून तो विषय मी तिथेच संपवते "अशी विळी सुरेख बाई ,भाजी ती चिरावी " .ओठावर आलेल्या ओळी गुणगुणतांना सकाळचे किचन वर्क पुन्हा सुरु होते. 

आजोळच्या घराच्या आता आहेत फक्त आठवणी.काळाच्याओघात हे जून-जाणतं घर नामशेष झालं ,पण ह्या विळीच्या रूपाने त्या घराचा एक अंश मी जपतेय हाच आनंद. 

माझ्या आजोळी निर्मळ,सतत खळखळ वाहणारे पाटाचे पाणी होते. ह्या पाण्याची संततधार पडत असायची. ह्या पाण्याची गाज ऐकण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. त्या पाण्याची सोबतही असायची. 

ह्या पाटाच्या पाण्याच्या धारेसारखीच आजोळची प्रेमधारा माझ्यावर सतत बरसू दे,अशी माझ्या आजोळच्या ग्रामदैवताला " आदिनाथाला "मी नेहमी  मनोमन प्रार्थना करते. 


स्नेहा भाटवडेकर ,

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

5 comments:

  1. सुंदर!!
    जुनं ते सोनं!

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन. थेट गावची भेट घडवून आणलीस

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर वर्णन केलं आहे

    अगदी जस च्या तस डोळ्यासमोर उभं राहिलं

    ReplyDelete
  4. पाटा खालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी आजोबांची कोकण भेट तुम्हीही तेवढ्या प्रेमाने जपलीत म्हणून तुमचे ही कौतुक🙏

    ReplyDelete
  5. फारच छान शब्दचित्र

    ReplyDelete