Wednesday, March 10, 2021

ओंजळ ( Onjal )

                                                                ।। श्री शंकर  ।।

                                                          ओंजळ 

परवाच एका कार्यक्रमाला आम्ही दोघे उपस्थित राहिलो होतो. मूळ लता दीदींनी गायलेले सुंदर गीत .  मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतणारे , ज्ञानेश्वर माऊलींचे आर्त ,व्याकुळ करणारे शब्द. नाट्यगृहात गायिका हे गाणे मनोमन, सुरेल  आळवीत होती.  मी मात्र कितीतरी योजने दूर पोहोचलेल्या बाबांचा चेहेरा आठवीत होते. " भेटीलागी जीवा  लागलीसे आस ,  पाहे रात्रंदिवस वाट तुझी "... शब्दाशब्दागणिक मनात आठवण  दाटून आली होती . कित्येक दिवसांत ना भेट , ना बोलणे ... किती आठवणी ...मनांत कोंदाटलेले आर्त ! लेखणी सरसावली ... मनातले भाव उमटू लागले.... 

महाशिवरात्र ! तिथीने बाबांचा जन्मदिवस. आज ८५ वर्षे पूर्ण झाली असती .जन्म महाशिवरात्रीचा असला तरीही नाव मात्र " विष्णु " विष्णु पांडुरंग किंजवडेकर .... नावाप्रमाणेच सर्वांचा प्रेमाने , आपुलकीने  सांभाळ करणारे बाबा ... लहान -थोर सगळ्यांमध्येच समरस होणारे प्रेमळ, रसिक बाबा ... जीवनाचा आनंद स्वतः घेणारे आणि इतरांनाही त्यांत सामावून घेणारे बाबा ...  त्यांच्या प्रेमाचा धाक सगळ्यांनाच असायचा ... 

धार्मिक ,परोपकारी वृत्तीचे बाबा ... दासनवमीच्या उत्सवाला दरवर्षी गोरंट्याला , सद्गुरू दासगणु महाराजांच्या कर्मभूमीत ,बाबांसोबत  एकत्रच जाणे व्हायचे. परतताना बाबा मुंबईला आमच्या घरी ३/४ दिवस मुक्काम करून मगच रोह्याला परत  जात असत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस ( महाशिवरात्र ) आमच्या घरीच साजरा व्हायचा. एकत्र बसून शिवमहिम्नाचे पठण व्हायचे .काही वेळा त्यांचे प्रवचन मोजक्या मंडळींसमोर सादर करायचे. ते हौशी , तर मी त्यांच्यापेक्षा काकणभर अधिक उत्साहाने ह्या  कार्यक्रमाचे नियोजन करीत असे. त्यांच्यामुळे माझ्याही घरांत अशा कार्यक्रमांमुळे  एक वेगळेच चैतन्य प्रगट  होत असे. अगदी अखेरपर्यंत त्यांचा उत्साह अगदी असाच टिकून होता. आज त्यांना जाऊन  १० वर्षं झाली , पण सोफ्यावर बसून नामसाधनेत दंग  असलेली त्यांची मूर्ती डोळ्यासमोरून हालत नाही. बाबा गेले पण कन्येसाठी कल्पवृक्ष लावून गेले. केवळ मलाच  नाही तर अनेक पुत्र आणि कन्यांना त्यांनी आपुलकीने , जिव्हाळ्याने प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवले.बाबांच्या आठवणीने अनेकांचे डोळे  आजही पाणावतात  ,कदाचित आयुष्यात मिळवलेलं खरं धन, श्रीमंती ती हीच. सर्व कुटुंबियांवर ,आप्त-स्नेही, शेजारीपाजारी सर्वांवर बाबांनी  मनापासून प्रेम केले .पुढे सद्गुरूंची ( प.पु स्वामी वरदानंद भारती ) भेट झाल्यावर निष्ठेने त्यांची जमेल तशी सेवा केली .त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पारमार्थिक घडी बसवून ईश्वराला सर्वस्व अर्पण केले.अंबरनाथ चे वास्तव्य सोडून , रोह्यासारख्या नवीन ठिकाणी आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करताना " दासगणू मंडळाची " स्थापना करून अनेकांच्या मनांत भक्तिभाव रुजविला. अनेकांना विष्णुसहस्रनाम , गीता , शिवमहिम्न , श्रीसूक्त शिकविले. नियमितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या ग्रंथांवर अभ्यासपूर्ण प्रवचने  दिली.  त्यांची  चिकाटी , जिद्द ,धडाडी  बघितली  कि मन विनम्र होते.  माझ्यातील  उणिवांची जाणीव प्रकर्षाने होते. 

गंगौघाप्रमाणे त्यांच्या अनेक आठवणी मनाच्या तटावर आदळत  आहेत.कुटुंबावरील प्रेमापोटी त्यांनी आम्हा दोघा भावंडांना उत्तमोत्तम सर्व देण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. कधीच कोणती उणीव भासू दिली नाही. त्यामुळे आमचे  बालपण  अतिशय आनंदात व्यतीत झाले. नुसते लाड नाही तर शिस्तही होती. चांगले विचार आणि संस्कारांचे पाथेयही दिले.प्रत्येक सण  आनंदाचा उपभोग घेऊन कसा साजरा करायचा हे त्यांनीच शिकविले. आजही प्रत्येक सणाला त्यांची  होते. अभ्यासाबरोबरच जीवन व्यवहाराचे धडे त्यांनी दिले. अगदी लहानपणापासून बाजारहाट, पोस्ट , बँक आणि इतर कामे  करायला प्रोत्साहन दिले. पुढील आयुष्यात ह्या सर्व गोष्टींचा खूप फायदा झाला. 

बाबा स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढले. ११ भावंडे , आई-वडील,काका एव्हढा मोठा परिवार. बाबा शेंडेफळ. पण घरातील अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व.अनेकांचा आधार. गावच्या माझ्या ताई , दादाची शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांना आपल्या घरी  घेऊन आले आणि त्यांच्या लग्नापर्यंतची आणि पुढचीही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. कुटुंबात कोणालाही कसलीही गरज असली तरी मदतीसाठी बाबांचा  हात नेहेमीच पुढे असे.  किंजवडेकर कुटुंबाचे सणवार, कुलाचार , कुलधर्म अगदी नेटाने अनेक वर्ष आनंदाने सांभाळले. आईनेही त्यांना मूकपणे त्यांच्या सर्व कार्यात साथ केली. ह्या तुफानाबरोबर प्रपंच करताना  तिची बोटही हेलकावे खात खात पुढे जात राहिली.  बाबांसारखी तिच्यात धडाडी नसली तरीही शांतपणे हा सर्व भार  तिने पेलला. २० वर्षे आमच्या घरात साजरा होणार गणपती उत्सव हा सर्वांच्या आजही स्मरणात आहे. बाबांच्या संकल्पनेतून साजरा होणार हा उत्सव म्हणजे " आनंदपर्व " सर्व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन .अनेकांच्या मनात ह्या उत्सवाच्या आठवणी ताज्या आहेत.. 

शिक्षणाविषयी त्यांना खूप ओढ होती.लग्नानंतर, नोकरी सांभाळून M.A./ M.Com.स्वतःच्या हिमतीवर केले. शिकवायची त्यांना खूप आवड.ते उत्तम शिक्षक होते. आमच्या अभ्यासाबरोबरच आजूबाजूच्या अनेक मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. स्वतः कॉलेज मध्ये शिकवायला सुवात केली. पुढे नातवंडानाही जमेल तेव्हढे मार्गदर्शन केले. अनेकांना नोकरी -व्यवसाय मिळवून देण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. 

सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असत. Rotary Club, कऱ्हाडे ब्राहमण संघ आणि इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी अगदी जीव ओतून काम केले आणि आमच्यासमोरही आदर्श निर्माण केला. काम कोणतेही असो त्या विषयी वाटणारी तळमळ हा त्यांचा स्थायीभाव होता. त्याच ओढीने ते सर्वच क्षेत्रांत काम करीत. त्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा दीर्घकाळ रेंगाळत  राही. आम्हालाही कोणत्याच बाबतीत त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे मीही नाटक , विद्यार्थी परिषद अश्या अनेक आघाडयांवर काम करत राहिले. " Sky is the limit " हा त्यांचा मंत्र होता,जो कायम पुढे जायला प्रेरणा देत असे. 

बाबा एखाद्यावर जितके मनस्वीपणे प्रेम करत ,तेवढेच पटकन ते दुखावलेही जात. मग मात्र त्या व्यक्तीबरोबर संबंध पूर्णपणे तोडून टाकीत. त्यांचे अगदी जवळचे दोन तीन मित्र ह्यामुळे कायमचे दुरावले. माझ्या एका भावाचे लग्न त्यांना त्यांच्या मनातील एका मुलीशी लावायची इच्छा होती. काही कारणाने ते घडले नाही. ते इतके दुखावले कि त्या लग्नालाही मग ते हजर राहीले  नाहीत. अतिशय संवेदनशील असा त्यांचा स्वभाव जपणे हे काही वेळा खूपच अवघड काम असे. प्रत्येकाची काळजी करण्याचा त्यांचा स्वभाव. शेवटपर्यंत मुले , नातवंडे ह्यांची काळजी करता करता त्यांनी स्वतःकडे मात्र दुर्लक्ष केले आणि गंभीर आजारांना निमंत्रण दिले. 

विशुद्ध आनंदाचा निखळ झरा म्हणजे बाबा ... जीवनावर भरभरून प्रेम करणारे...दुसऱ्यांच्या आनंदात तितक्याच आनंदाने सहभागी होणारे  ,जेष्ठत्वाच्या नात्याने कोणत्याही  चांगल्या कार्याला पसंतीची दाद देणारे  ... हे सर्व बाबाच करू जाणे ... 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते आमच्या ओंजळीत दान टाकत राहिले. त्यांच्या दातृत्वाने भरलेली आमची ओंजळ , त्यांच्या नसण्यामुळे मात्र  रिक्त आहे ... बाबा हि ओंजळ भरलेली आहे म्हणून आनंद मानू कि रिक्त आहे ह्याचे दुःख करू ? माझ्या सर्व प्रश्नांची , समस्यांची उत्तरे द्यायला तुम्ही समर्थ होतात. आता उरलेत ते फक्त प्रश्नच . तुमच्यासारखी निरपेक्ष, जिवापाड -माया करणारी व्यक्तिच खरं तर हे मौलिक मार्गदर्शन करू शकते .ती जागा आजही रिक्तच आहे बाबा !

तुम्ही दिलेल्या संस्कारांची शिदोरी  घेऊनच आजपर्यंतची वाटचाल केली.त्यामुळे आज मनाच्या गाभाऱ्यात शांती . सुख, समाधान सर्व काही आहे त्याचे श्रेय  तुमचेच आहे .पण एकच उणीव आहे... 

तुम्हाविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला ... 

पाठीवरी फिरवा हात , याहो बाबा एकच वेळा, याहो  बाबा एकच वेळा... 


तुमचीच ताई ... 

महाशिवरात्री, २०२१ ( ११/०३/२०२१ )

No comments:

Post a Comment