Wednesday, March 24, 2021

Girnar Yatra ( गिरनार यात्रा )

                                             ll श्री शंकर   ll                          

                       गिरनार यात्रा 

मूकं करोति वाचालं, पंगुम लंघयते गिरिम ।

यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं   ।।

सर्व जग हे परमेश्वरी सत्तेने चालते. परमेश्वराची कृपा असेल आणि आपल्या मनांत तेव्हढीच उत्कटता असेल तर अशक्य ही  शक्य होते ह्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. .

 भरतवर्षात निसर्गाचे वैविध्य अनेक ठिकाणी अनुभविता येते. अनेक तीर्थक्षेत्रं ह्या विविधतेचा साक्षात्कार घडवत  असतात. आपण भारतीय खरंच भाग्यवान,अशी अनेक तीर्थक्षेत्रे इथे आहेत. प्रत्येक स्थानाचे काही माहात्म्य आहे.भौगोलिक वैशिष्ट्यही आहे. त्यासाठी स्वतः ह्या क्षेत्रांना भेट द्यायला हवी.

काही यात्रा विनासायास घडतात. काही यात्रा मात्र आपल्या सगळ्याच क्षमतांची कसोटी घेतात. हिमालयातील चारधाम यात्रा ही अशीच एक अवघड यात्रा. काश्मिरमधील अमरनाथ आणि वैष्णोदेवी आणि कैलास मानसरोवर ह्या यात्राही अद्भुत, विलक्षण अनुभव देणाऱ्या. हेच तर खरे जीवनाचे सार्थक अशी अनुभूती देणाऱ्या. ह्या सर्व प्रवासांत तन -मन -धन अर्पावे लागते. 

" देखणी जीवने जी तृप्तीची तीर्थोदके l चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे ll 

कवी बा. भ. बोरकरांच्या नजरेतून एका वेगळ्या तीर्थाचा परिचय आपल्याला होतो. अत्युच्य, ध्येयवादी जीवन जगल्यावर येणारी जी तृप्तता असते त्यामुळे ते जीवनच देखणें  होते. .  

 निसर्गाच्या शक्तीपुढे माणसाचे खुजेपण प्रकर्षाने जाणवते. प्रवासाच्या अथवा तीर्थाटनाच्या निमित्ताने हा निसर्गाचा चमत्कार अनुभविता  येतो. निसर्ग म्हणजेच ब्रह्म. ब्रह्म हा शब्द बृहत आणि महान ह्या शब्दांनी बनला आहे. निसर्गही महान आहे. ब्रह्मज्ञान घडविणारा. म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात शक्य असेल तेव्हढे राहून हा अनुभव घ्यायचा, तीर्थयात्रेच्या निमित्ताने निसर्ग शक्ती आणि ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार अनुभवता येतो. गिरनार यात्रेत निसर्गाचे कणखर रूप बघता येते. ही  यात्रा  खडतरच. ही  बिकट वाट दत्तगुरु " चालविसी हाती धरूनिया " पार करून घेतात आणि आपल्याला सामर्थ्य प्रदान करतात. त्यामुळे मनाचे पंगुत्व नष्ट होऊन आत्मविश्वास  प्राप्त होतो. .  

गुजरात राज्यांतील सौराष्ट्र प्रांतात जुनागढ जवळ  गिरनार हे दत्तक्षेत्र प्रसिद्ध आहे. गिरनार पर्वतरांगांच्या सभोवताली गीरचे घनदाट जंगल आहे. हिंस्र प्राण्यांचा इथे वावर असतो. कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा ह्या जंगलात चालत ( ३५ ते ३८ कि,मी,) परिक्रमा करण्याची संधी प्राप्त होते.

हिमालयापेक्षाही जुना पर्वत रेवतक पर्वत म्हणजेच गिरनार. शिवपुराणांत, स्कंदपुराणात ह्या पर्वताचा उल्लेख आढळतो. प्रभूश्रीराम, पांडव ह्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी अनेक सिद्धयोग्यांच्या तपाने पावन झाली आहे. साधारण १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास ह्या स्थानाला  लाभला आहे. अशा निसर्गरम्य, परमपवित्र  गिरनार क्षेत्री निवास करणे हा एक विलक्षण अनुभव असतो. 


आत्ताच १ मार्चला हा गिरनार पर्वत चढण्याचे भाग्य दुसऱ्यांदा लाभले. आम्ही पहाटे ४.३० वाजता पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दत्तगुरूंना " तुमचे मनासारखे दर्शन होऊन  यात्रा सुफळ, संपूर्ण होऊ दे " अशी  प्रार्थना केली. हनुमानजींचे दर्शन घेऊन यात्रेसाठी  लागणारी  शक्ती प्रदान करावी अशी विनंती केली. 

पहाटेची निरव शांतता. वातावरणांत भरून राहिलेला गारठा.आकाशाचे विभ्रम अनुभवीत, दत्तगुरूंचे नाव घेत  एकेक पायरी चढायला सुरवात होते. थोड्या थोड्या अंतराने  क्षणभर विसावा घेत मजल -दरमजल करत वाटचाल सुरु होते. सुरवातीची वाट ही बऱ्यापैकी सुसह्य. दोन्ही बाजूला असलेली दुकानांची जाग, झाडे, ह्यामुळे रस्ता अंधारातही भीतीदायक वाटत नाही. तीन -साडेतीन हजार पायऱ्यांपर्यंत जैन लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . तिथे नेमिनाथांचे दर्शन घेऊन थोडे ताजेतवाने होऊन पुढच्या दोन हजार पायऱ्या चढून ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबामातेचे दर्शन घ्यायचे.अंबामातेचे दर्शन घेण्यापूर्वी ह्या मधल्या टप्प्यावर पोहोचल्यावर आता पुढे जायचे कि थांबायचे अशी मनाची व्दिधा अवस्था होते..हळूहळू सूर्याची प्रभा ही आकाशात फाकलेली असते. दूरवरची शिखरे आणि वारंवार चढत जाणाऱ्या पायऱ्या मार्गाचे काठिण्य अधोरेखित करत असतात पुढची चढाई करण्यासाठी "सामर्थ्य दे आई ! " अशी प्रार्थना अंबामातेला करायची आणि पुढची अवघड वाट निश्चयपूर्वक चालण्याचा संकल्प मनोमन करायचा. अंबा माता जादूची कांडी फिरविते. अद्भुत शक्तीचा संचार होतो आणि  पुढचे अंतर त्यामानाने लवकर पार होते. वाटेत ह्या  पर्वतशिखरांच्या श्रुंखलेतील ५५०० हजार पायऱ्यांवर सर्वोच्चशिखर असलेले  गोरक्षनाथांचे दर्शन घ्यायचे. गोरक्षनाथांनी तपःसामर्थ्याने दत्तगुरूंना प्रसन्न केले आणि मला तुमच्या पादुकांचे सदैव दर्शन घडू दे अशी प्रार्थना केली .दत्तगुरु आपल्या भक्तावर प्रसन्न झाले. गोरखनाथांची धुनी सर्वात उंचावर ( ३६६६ फूट ) आणि दत्त पादुका त्यामानाने  थोड्या खाली आहेत.

 ९९९९ पायऱ्या चढून  परमगुरु  दत्तात्रयांचे वास्तव्य असलेल्या " गुरुशिखर "  सुळक्यावर चढून जाणे आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेणे हा असाच केवळ अशक्य वाटणारा प्रवास केवळ आणि केवळ " अशक्य ही शक्य करतील स्वामी " ह्याची प्रचिती देणारा.  सलग सहा तास आपण तीव्र चढाच्या पायऱ्या चढत / उतरत असतो आणि बापरे कधी ही वाट संपणार! ह्याचा अंदाज घेत घेत पायऱ्या चढताना  कधी त्या उंचीवर येऊन दत्तगुरुंपुढे नतमस्तक होतो हे कळतही नाही. १०X १९ चौ .फुटात दत्त पादुका (जिथे दत्तगुरूंचा अक्षय निवास असतो), सुबक त्रिमूर्ती, प्राचीन गणेश, हनुमानाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. बसण्यासाठी अगदी बेताची जागा असल्यामुळे अगदी थोडावेळच थांबून  दर्शन घेऊन, तिथले वातावरण मनाच्या गाभाऱ्यात भरून घ्यायचे. तिथला परिमळ अनुभवायचा आणि तुमची इच्छा असेल तर पुन्हा परत येऊ  असे म्हणत अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेत, परतीचा प्रवास सुरु करायचा. एव्हढे श्रम करून वर पोचल्यावर अगदी कमी अवधीच्या दर्शनाने मनाला चुटपूट लागते. मग बाहेरच्या पायरीवर बसून  स्तोत्रपठण  -नाम जप करून पुन्हा पुन्हा ते रूप आठवायचे.   

दत्तगुरूंचे दर्शन घेऊन जड पावलांनी ३०० पायऱ्या खाली उतरून कमंडलू स्थान येथील सोमवारीच प्रज्वलित होणाऱ्या धुनीचे दर्शन घेतले. ५००० वर्षांपूर्वीच्या ह्या धुनीत दत्तगुरु अग्निरूपांत निवास करतात अशी भावना आहे. तेथील स्वादिष्ट प्रसाद भक्षण केला. चढाईच्या अतिश्रमानंतर हा प्रसाद अमृततुल्य वाटतो. परत पायऱ्या चढण्या- उतरण्याचा पाय थकविणारा प्रवास. परतीच्या प्रवासात ह्या वेळी रोप-वे चा अनुभव घेतला. अंबामातेच्या मंदिराबाहेर ही  नवीन,आकर्षक आणि सुखदायी सोय भक्तांसाठी करण्यात आली आहे. 

           " जय गिरनारी " असा घोष करत चालताना आपल्याला सोबत करणारे      "अब थोडाही बाकी है" असा  धीर देतात. काही मौलिक सूचना करतात. त्यांच्याशी चार शब्द बोलताना आपला शीण थोडा हलका होतो. दत्तगुरूंच्या दर्शनाने शांत झालेले मन ,परतीच्या प्रवासांत निवांतपणे आजूबाजूच्या निसर्गाचा अविष्कार अनुभवू शकते.   कठीण राकट  असे हे सुळके ऊन पाण्याला तोंड देत वर्षानुवर्षे तसेच उभे आहेत. पावसांत विहरणाऱ्या ढगांचे दृश्य अनुभविता  येते तर थंडीत धुक्याने वेढलेले निसर्गसोंदर्य वेड लावते. भक्तांच्या उपासनेनुसार त्यांना काही विलक्षण अनुभव आल्याचे काही साधक सांगतात. पौर्णिमा किंवा इतर काही प्रसंगानुरूप  नियमितपणे येणारे काही साधक बघितले कि त्यांची सद्गुरूपाशी असलेली निष्ठा जाणवते. त्या बळावरच हि अवघड यात्रा ते अव्याहतपणे करतात . 

या गडावर निवासाची सोय नाही. अन्य सोयींचाही अभावच आहे.एरव्ही आपल्या घराचे दोन मजले चढ़तानाही धाप लागते.मग ही खडतर वाट चालण्याचे सामर्थ्य कशामुळे प्राप्त  होते? खाली आल्यावर मागे वळून बघतांना  तहान भूक ,शरीरधर्म एव्हढ्या वेळात विसरून आपण इतक्या उंचीवर जाऊन आलो ,ह्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. दहा हजार पायऱ्या चढण्याच्या कठीण परीक्षेत आपण यशस्वी झालो ह्याचे अप्रूप वाटते. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची ही कसोटी असते. ही अवघड परीक्षा दिली कि मग बाकी ठिकाणे  त्यामानाने सोपी वाटतात. 

सरकारतर्फे आता गिरनार क्षेत्रीं हळूहळू सोयी होत आहेत. उडन खटोलाची ( Ropeway) सोय झाल्यामुळे निम्मे अंतर आता कमी श्रमांत आणि वेळेत पार करणे शक्य झाले आहे.पायऱ्यांशिवाय गिरनारला जायचा अन्य मार्ग नाही. त्यामुळे दुकानदारांना आणि बाकी ओझी  वाहून नेणाऱ्यांना रोज पायऱ्या चढण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कष्टकरी लोकांचे पाय चालताना बघितले की वाईट वाटते. पोटाची इवलीशी खळगी भरण्यासाठी माणसाला  किती आटापिटा करावा लागतो ! ४० KG. चे गॅस सिलेंडर १०००० पायऱ्या वर/ खाली वाहून नेणाऱ्यांविषयी मनांत कणव दाटून येते. डोलीवालेही आपला भार उचलून आपल्याला देवदर्शन घडवितात. मनांत प्रश्न येतो इतकी वर्षे ह्या क्षेत्री राहूनही ह्यांचे कष्ट संपत का नाहीत ?

 सुखसाधने मिळविण्यासाठी आपणही असेच कष्ट  सदैव करीत असतो.ध्येयाचे  शिखर गाठेपर्यंत ही चढाई कायम सुरूच असते. सतत भीती आणि दडपणाचा सामना करत ही  वाट आपण चालत असतो. शिखर गाठले की  मग उतारही आलाच. उतारावर  मनाचा ब्रेक उत्तम प्रकारे लावून व्यवहार करावे लागतात तरच तोल सांभाळता येतो. उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करता येते.  

आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंद,समर्थ रामदास ह्या आणि अनेक सत्पुरुषांनी भारतभ्रमण केले ,अनेक तीर्थयात्रा केल्या.  काय असेल ह्यामागचे कारण ?  भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायांत भगवान म्हणतात ,

परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर दैवी गुणांत वृद्धी व्हायला  हवी.

     अभयं सत्वसंशुध्दिर्ज्ञानयोगव्यवस्थिती : l दानं दमश्च यज्ञश्च  स्वाध्यायस्तप आर्जवम ll 

अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी दान,इंद्रियांचे दमन ,यज्ञ म्हणजेच उत्तम कर्माचे आचरण ,भगवंताचे नामसंकीर्तन  ( स्वाध्याय ) आणि तप ( कष्ट सोसणे )ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. 

 तीर्थयात्रेतून हे सर्व साध्य होते. कायिक ,वाचिक आणि मानसिक तपाचा उत्तम समतोल यात्रेतून घडत असतो.  हा अनुभव ह्या गिरनार यात्रेत आला. आत्मस्वरूप प्रदान करणाऱ्या त्या त्रिगुणात्मक शक्तीला मी मनोमन प्रणिपात केला. 

                        ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 



स्नेहा भाटवडेकर , मुंबई 

sneha8562@gmail.com



7 comments:

  1. खूप सुंदर सहज लेखन, थोडक्यात बऱ्याच गोष्टींचा आढावा आल्यासारखा वाटतो. 😊 खूप छान वाटलं वाचून, गिरनार ला जाण्याची ओढ लागली आहे आता 😊👌👌

    ReplyDelete
  2. फार सुंदर लिहिलंय😊

    ReplyDelete
  3. खूप छान प्रवास वर्णन, आम्हीपण ३१ जानेवारी ला जाऊन आलो.आपण जाऊन दर्शन घेऊन आलो एवढ्या पायऱ्या चढ उतार केला यावर विश्वास बसत नाही. जे काही घडले ते त्यांनीच केले आम्ही सर्व महाराजांवर सोपवले. जय गिरनारी तेरा भरोसा है भारी,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. जय गिरनारी. मी तीन वर्षांपूर्वी जाऊन आलेय. विलक्षण अनुभव.

    ReplyDelete
  5. गिरनार म्हणजे अद्भुत आत्मशक्ती चे स्मरण

    ReplyDelete