Friday, February 26, 2021

मराठी असे आमुची मायबोली ( Marathi Ase Amuchi Mayboli )

।। श्री  शंकर  ।।

मराठी असे आमुची मायबोली 

२७ फेब्रुवारी हा" मराठी राजभाषा दिवस "

परवा एका शाळेत ह्या निमित्ताने  कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. पहिली ते चौथी ह्या वर्गांसाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. मराठी आणि अमराठी  माध्यमांत शिकणाऱ्या  मुलांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.  मुलांचे निरागस बोलणे, हावभाव, कथेत रंगून जाणे आणि मनमोकळा वावर , ह्यामुळे मीही ४ तास त्या वातावरणात अगदी रममाण झाले. मुलांना काही बोध करणे अपेक्षित होते. एवढ्या छोट्या दोस्ताना काय सांगायचे ? एका अर्थी हा मलाच बोध होता. आत्मपरीक्षणाची एक संधीच. 

विचार करताना भाषेचा  एकेक पैलू उलगडू लागला. अतिशय गोड, वळणदार अशी हि आपली मराठी राज्यभाषा आणि मातृभाषा. संस्कृत हि जग्ग्जननि असली तरी मराठी हि आपली माय. आणि मायच्या कुशीतच तर लेकरू निवांत असतं . 

 कोणतीही भाषा आत्मसात करायची म्हणजे सर्वसाधारण चार प्रक्रिया आवश्यक असतात. श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण. ह्या प्रक्रिया ज्या प्रमाणांत आत्मसात होतील तेव्हढी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. ह्या भाषेचा प्राण  म्हणजे" शब्द ."...                                               

कुठेतरी वाचनात आलं, " शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे, शब्द अक्षय्य आहे, शब्द निःशब्द पण आहे " ... 

  आपल्या भाषेचे महत्व म्हणजे त्यातील " शब्द भांडार " अक्षरांपासून शब्द ! अनेक शब्द एकत्रित करून तयार झालेली लडी म्हणजे वाक्य. संगीतात केवळ सात सुरांपासून अनेकविध सुंदर सुंदर राग तयार होतात. मनाला मोहवून टाकतात. तसेच शब्दांचे. शब्द कसे गुंफले जातात त्यावरून त्या लेखकाची श्रीमंती कळते. त्यामागे अर्थात साहित्यिकांची प्रतिभा असते. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ह्यांचा वापर करून चिरकाळ टिकणारी अशी साहित्यलेणी तयार होतात. अर्थगर्भ, रसाळ कविता कमीतकमी शब्दांत मनाचा ठाव घेतात. चिरंतन असणारी ही आपली साहित्य संस्कृती. वाचनामुळे समृद्ध होणारे आपले जीवन. 

ह्याच अनुषंगाने "  कथा " ..ह्या साहित्य प्रकाराचा घेतलेला शोध ... ह्या शोधातून  झालेला बोध  मांडण्याचा अल्पसा  प्रयत्न. 

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हि एक स्वतंत्र कथाच असते. जोपर्यंत  तीरावर असतो तोपर्यंत आपल्याला खोलीचा अंदाज येत नाही पण सहवासाने  प्रत्येक आयुष्याची कथा वेगवेगळं वळण घेते. कधी ह्या कथांच्या मागे लपलेल्या व्यथा दुःखी करतात तर कधी आदर्श जीवनपट नजरेसमोर साकारतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण चरित्रच उदात्ततेचे पैलू दर्शविणारे. काही काल्पनिक व्यक्तिमत्व सुद्धा अजरामर होतात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात साहित्यिक  वि .वा .शिरवाडकरांच्या" नटसम्राट " मधील अप्पा बेलवलकर  हे असेच एक अतिशय गाजलेले पात्र.  

.कथा , गोष्ट ... प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग ...   आबालवृद्धांना भुरळ घालणारी गोष्ट. अगदी जन्मालाआल्यापासून काऊ- चिऊ च्या गोष्टीपासून  आपण ह्या गोष्टीत रमतो ते अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत.  गोष्टीच्या स्वरूपात पालट होतो एवढाच काय तो फरक. कथांचे तरी किती विविध प्रकार. ऐतिहासिक, बोध कथा, नीतिकथा, चातुर्य कथा, शौर्यकथा, युद्ध कथा, प्रेमकथा, रहस्य कथा...  आपल्या वयानुसार आपली कथेविषयीची रुची बदलत जाते. मोठेपणी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब स्टोरी अशी कथांची वर्गवारी होते. पण मूळ कथा तीच. ह्या कथा काही विचार देणाऱ्या, बोध करणाऱ्या. त्यांतील अगदी आजचा पर्यावरण जागृती सारखा विषय सुद्दा ह्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचविता येतो. ह्या कथांतून सांगितलेले सार, तात्पर्य आचरणांत आणण्यासाठीच ह्या कथांचे प्रयोजन. जगण्याचे धडे देणाऱ्या ह्या कथा. अगदी लहान वयात ऐकलेली लाकूडतोड्याची गोष्ट जर आयुष्यभर  अंमलात आणली तरीही पुरे. जी वस्तू आपली नाही त्याचा प्रामाणिकपणे त्याग करायचा ह्यात हि खूप मोठे मूल्य आहे. 

 कथांमधून भाषा विकास साधता येतो. संवादाचे एक उत्कृष्ट साधन म्हणजे  कथा. मुलाप्रमाणेच मोठ्याना  खिळवून ठेवणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या. अनादी काळापासून सांगितल्या जाणाऱ्या रामायण - महाभारतातील कथा ह्या जीवन मूल्यांचे संवर्धन करतात. आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे दर्शन घडवितात. जिजाऊसाहेबांनी शिवबाना घडवले ते ह्या नीतिकथांतूनच. 

 भागवतात श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी वर्णन आहे.पुराणांत अनेक कथांचा समावेश आहे. कीर्तनातून समाज जागृती व्हावी ह्या उद्देशाने तत्वज्ञान सोप्या भाषेत कथांच्या माध्यमांतून पोचवले जाते. सद्गुरू दासगणू महाराज हे अलीकडील संतकवी. त्यांनी अनेक  रसाळ कीर्तनाची निर्मिती केली आणि त्यातून समाजाला बोध केला. त्यांचीच परंपरा  त्यांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद  भारतीनी सुद्धा पुढे चालू ठेवली. 

पूर्वी घरातील मोठी माणसे आजी-आजोबा, ताई-दादा गोष्ट सांगायचे. पुढे हि जागा कॅसेट ने घेतली. छान छान गोष्टीच्या अनेक ऑडिओ कॅसेट मुलांसाठी उपलब्ध होत्या. अगदी घरातील मंडळीच  गोष्टी सांगत आहेत असा भास व्हायचा. काही संस्कार वर्गातून गोष्टी सांगण्याचे उपक्रम सुरु झाले. आधुनिक काळांत छोट्या कुटुंब पध्दतीत  पालक मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ह्या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. साधने बदलली तरीही गोष्टींची आवड मात्र कायम आहे. 

दूरदर्शनवर  लागणाऱ्या कार्टून कथाही अशाच मुलांना वेड लावणाऱ्या. आता मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब इ. विविध आधुनिक साधने अगदी बालगोपाळांच्या हातात सामावलेली असतात कि त्यांना त्याचे व्यसनच लागते. त्यापासून दूर करणे कठीण जाते. अगदी दोन वर्षांपासूनची बालके सुद्धा सतत मोबाईल हातात धरून बसलेली असतात. 

काही वर्षांपूर्वी व.पु.काळे, गिरीजा कीर, माडगुळकर, मिरासदार ह्यांच्या कथाकथनाचे दर्जेदार कार्यक्रम खूपच लोकप्रिय होते. आज अभावानेच हे कार्यक्रम होतात. 

नृत्याच्या माध्यमातून कथा  लोकांपर्यंत पोचतात. " कथा कहे  सो कथक " कथक नृत्याचे मूळ ह्या कथाकथनातच दडलेले आहे. अनेक नृत्यशैलीतून विविध चरित्रआणि पौराणिक कथा रसिकांना मंत्रमुग्ध करतात.  

 बाकीच्या आक्रमणामुळे दिवसेंदिवस वाचन संस्कृती लोप पावत आहे असा ओरडा ऐकू येतो. माध्यम बदलले तरी मूळ कथा केंद्रस्थानी आहेच. 

मनुष्यप्राणी मुळातच गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला चघळायला आवडते. दुसऱ्यांच्या गुजगोष्टींत तर सर्वांना  भलताच रस. तिखटमीठ लावून, वर झणझणीत तडका  देऊन गावगॊष्टी वाऱ्यासारख्या  पसरायच्या. आज मोबाईल किंवा फेसबुक वर ह्याच गोष्टी क्षणांत जगभर पसरतात आणि व्हायरल होतात. आमचा एक मित्र भेटायला आला कि दोन तीन तासाची निश्चिन्ती. सगळ्या दुनियेचे विषय त्याच्या पोतडीत सामावलेले असत. मुंबई हिंदीत हातवारे करून, डोळे बारीक करून, हातावर टाळी देत, गडगडाटी हसत तो गप्पात इतकं अडकवून टाकायचा कि वेळ कसा जायचा समजायचेही  नाही.  

महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारी आपली मराठी भाषा.आपला स्वाभिमान जागृत करणारी. तिला  समृद्ध करणे हि तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी. बाकी भाषांचे अतिक्रमण थोपवून तिला प्रवाही ठेवणे हे आद्य कर्तव्य. खरंतर आपल्या श्वासाएव्हढीच महत्वाची आपली भाषा. तिला सन्मानित करणं आपल्याच हातात. पण हे होत नाही. बाकी भाषांचे महत्व व्यवहारांत नक्कीच आहे. पण इतर भाषांच्या आक्रमणापुढे तिची दुर्दशा  होऊ नये हेही खरे.  ह्या गौरव दिनाचे हेच महत्वाचे कारण . पण  केवळ एक दिवस हे करून न थांबता उत्तरोत्तर आपली भाषेची आवड  वृद्धिंगत व्हावी असे प्रयत्न करण्याची आण आपण ह्या निमित्ताने  वाहूया . मराठी पाऊल  पडते पुढे हे सर्वार्थाने सार्थ करूया. 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

२७ /०२/२०२१


4 comments:

  1. खुप खूप छान...माणूस सर्वप्रथम नेहमी मातृभाषेतच विचार करतो....शिव्या देतो...मनान करतो..चिंतन करतो..

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर.
    अगदी मोजक्या शब्दात सुंदर विचार व्यक्त झाले आहेत.
    मनमोकळे ..प्रांजळ.. हृदया पासून हृदया पर्यंत जाणारे शब्दच खरा स्नेह वाढवतात.
    असा सुंदर विचारांचा स्नेह तू सर्वाना या लेखनातून वाटत आहेस.
    भाषेचे अनेक अलंकार असतात .. अलंकार, उपमा, लय, गत , शब्द भांडार.. काव्य , नाद, .. हे सर्वच भाषेला समृद्ध बनवतात.. लेखन वा काव्य प्रतिभा भाषेला भरजरी बनवतात..
    परंतु भाषेचे खरे सौंदर्य.. तिच्यातून व्यक्त होणाऱ्या विचारांचे .. अस्मितेचे..प्रभावाचे.. आणि .. निर्मल हेतूचे असते..
    सुंदर मनाने केलेले सुंदर लिखाण ..नेहेमीच भावपूर्ण आणि देखणे असते.
    असे सुंदर लिखाण तुझ्या हातून सतत होत आहे.
    असेच ते होत राहावे..बहरावे...ह्याच शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. खूप छान किशोरी

    ReplyDelete
  4. भाषेविषयी सर्वकाही असाच हा लेख! पण सर्व ठिकाणी *हि* हा शब्द र्हस्व का? मराठी हि मायभाषा इत्यादी इत्यादी.....प्लीज बदल ना!

    ReplyDelete