Wednesday, March 17, 2021

आमच्या मावशी ( Tribute to Smt.Asha Joglekar)

                                                   ।। श्री शंकर ।।

       आमच्या मावशी                                                  

डोंबाऱ्याचा खेळ अगदी ऐन रंगात आला होता. छोटी दोन माकडं अप्रतिम अभिनयाने सारा रंगमंच जिवंत करीत होती. जत्रेच्या त्या कथानकात सगळे प्रेक्षक अगदी एकरूप झाले होते. कार्यक्रम संपला. माकडांचा रोल करणाऱ्या त्या छोट्या दोन विद्यार्थिनी रंगमंचावर आल्या आणि टाळ्यांच्या गजरात सर्वानी त्यांचे खूप कौतुक केले. हा SHOW अगदी बारी-सारीक तपशिलासह जिवंत करणाऱ्या " मावशी " मग अदबशीर पावले टाकत रंगमंचावर आल्या आणि सर्वच प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. अतिशय संयत भावाने, विनम्रपणे त्यांनी त्याचा स्वीकार केला. अर्चना नृत्यालयाच्या वार्षिक गुरुपौर्णिमेच्या उत्सवांत सादर झालेला हा कार्यक्रम त्याची चिरंतन स्मृती हृदयांत कोरून गेला. असे अनेक दर्जेदार कार्यक्रम, बॅले मावशींनी त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेने अजरामर केले आणि रसिकांना एका अनोख्या अनुभूतीची सफर घडविली. 

श्रीमती आशा  अनंत जोगळेकर .... 

 कलेची सुंदर अभिव्यक्ती म्हणजे आमच्या " मावशी ".... होय सगळा  परिवार त्यांना मावशी म्हणूनच ओळखतो ... मावशी म्हणजे रुबाब, मावशी म्हणजे सौन्दर्य आणि सात्विकतेचा पवित्र संगम .  मावशी म्हणजेच प्रेमाचा उत्कट अविष्कार...एक जातिवंत कलाकार.. पंडित गोपीकृष्णांच्या आदर्श शिष्या ...  आदर्श गुरु  ... उत्तम कलाकार- विद्यार्थी घडविणारी एक प्रतिभावान संस्था ...किती किती लिहावे ? तरी शब्द थिटेच पडतील असे मावशीचे कर्तृत्व ... 

मावशींच्या खऱ्या कर्तृत्वाची ओळख प्रकर्षाने झाली ती त्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून .. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू ह्यावेळी उलगडत गेले आणि त्यांच्यातील कलाकाराचे तेज आमच्यासाठी  प्रकाशमान होत गेले. कोणताही कार्यक्रम हा सर्व अंगाने परिपूर्णच झाला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी त्यांच्या शिष्यांकडून अतिशय मेहेनतीने त्या बहारदार नृत्यप्रस्तुती करवून घेत आणि सर्वाना मंत्रमुग्ध करत. मुलींनी केलेला कोणताही ढिसाळपणा त्यांना खपत नसे आणि न बोलता केवळ नेत्रकटाक्षाने मुलींना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत. ह्या शिस्तीतच त्यांच्या विद्यार्थिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली  तयार झाल्या. केवळ नृत्यापुरतीच ही शिस्त मर्यादित नव्हती तर त्यांत आईचे संस्कार होते. " माझ्या मुली "कुठेही मागे राहता काम नयेत. हा सतत ध्यास त्यांना होता. मुलींच्या सुरक्षेविषयी त्या कायम जागरूक असत. त्यामुळे क्लासचे कार्यक्रम नेहेमी सकाळी असत. क्लासची पहिली बॅच सकाळी सातची असे आणि त्या स्वतः वेळेपूर्वी क्लासमध्ये हजर असत. त्यामध्ये सातत्य, नियमितपणा, कलेविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांविषयी वाटणारी आत्मियता ह्या सर्वाचा सुंदर मिलाफ असे. 

२००३ साली माझी मुलगी भक्ती हिने अर्चना नृत्यालयात नृत्य शिकण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या काळातील त्या सर्व गोड स्मृती आजही आमच्या मनावर हलकेच मोरपीस फिरवितात. तिला कथक नृत्यातच पारंगत करायचे आणि तेही मावशींच्याच हाताखाली, ह्यावर तिचे बाबा अगदी ठाम होते. त्यासाठी २ वर्षे आम्हाला वाट बघावी लागली. पण प्रवेश नक्की झाला आणि आम्हां दोघांनाही योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तीला शिकता येणार ह्याचा खूपच आनंद झाला. हा आनंद दिवसेंदिवस द्विगुणित होत आहे ह्याचे कारण मावशींनी ज्या तयारीने तिच्यातल्या कलाकाराला घडविले, तसेच कलाकार शिष्य आज भक्ती घडवीत आहे. अगदी मनापासून मावशीचे संस्कार पुढच्या पिढीच्या हातात सोपवत आहे आणि  त्यातून स्वतःला घडवीत उत्तमोत्तम कलाकृती सादर करीत आहे. कलेची ही जोपासना, वृद्धी खूपच आनंददायी  आहे. ह्याचे सर्व श्रेय मावशींच्या मेहेनतीला आहे. 

पालकांच्याही पालक : मावशी --- आम्हा पालकांना मावशी कायम क्लास सुरु असताना क्लास मधेच बसायला सांगत. त्यामुळे मुलांची तयारी कशी होतेय ते कळत असे. त्याप्रमाणे पालकांनी घरीही तशी तयारी करून घ्यावी असा मावशीचा  आग्रह असे.फक्त नृत्य शिकताना नाही तर एरवी वावरताना सुद्धा अगदी उभे राहण्यापासून , चालणे-बोलणे, वागणे, लकबी, खाणेपिणे  ह्या सर्वावर मावशीचे बारीक लक्ष असे आणि योग्य वेळी त्या ही जाणीव मुलांबरोबरच पालकांनाही करून देत. मुलांनी क्लासला दांडी मारलेली त्यांना बिलकुल खपत नसे. कलावंताची कलेवर निष्ठा हवीच म्हणून त्या मुलांना उपदेश करीत असत. अगदी सुरवाती सुरवातीला नृत्यवर्गाचे  हे सर्व वातावरण मलाही  नवीनच होते. त्यात रूळायलाही वेळ लागला. एका कार्यक्रमात भक्तीचा गजरा पडला. तेव्हा मावशींनी प्रेमाने रागवतानाच , कार्यक्रमाला कसे तयार व्हायचे ह्याच्या अनेक बारीकसारीक उपयुक्त टिप्स दिल्या . सिनिअर कलाकारांच्या तुलनेत भक्तीचा perfomance कमी वाटतोय असे म्हटले कि त्या म्हणत, अहो मातीचा गोळा आहे तो. आकार द्यायला वेळ लागणारच. थोडी वर्षे जाऊ देत मग बघा कशी तयार होतेय, हा दिलासा मिळायचा. 

  सुरवातीला मावशींबरोबर  बोलायची मला  खूप भीती वाटत असे. होताच तसा  त्यांचा आदरयुक्त दरारा. एक कलाकार म्हणून मानही होता. त्यामुळे त्यांच्या बरोबर संवाद कमीच साधला जाई. एक दिवस त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली. तुम्ही खूप गंभीर असता, हसत नाही. मग भक्ती तरी कशी हसणार ? नृत्य करायचे म्हणजे चेहेरा हसरा हवा तरच लोकांना आवडेल. तेव्हापासून माझ्यातील आणि त्यांच्यातील अंतर हळूहळू कमी होत गेले आणि नंतर नंतर तर आम्ही अगदी त्यांच्या परिवारातीलच एक सदस्य झालो. अतिशय मायेने आणि आपुलकीने मावशींनी आम्हाला कळात -नकळत खूप गोष्टी शिकविल्या. त्याचे ऋण न फेडता येण्यासारखे आहे. त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा ठसा आजही आमच्या मनावर खोलवर उमटलेला आहे. 

मावशी जश्या परंपरावादी होत्या तशाच परंपरेत अनेक सुधारणाही त्यांनी अतिशय धिटाईने केल्या. एक उत्तम पायंडा त्यानिमित्ताने पाडला. दरवर्षी नृत्यालयाची सत्यनारायण पूजा सांगायला महिला पुरोहितांना त्या आमंत्रित  करीत. पूजेलाही विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यर्थिनीना किंवा त्या वर्षी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला बसायचा मान  मिळे. १ मे च्या दिवशी श्रमदानाने सर्व विद्यार्थिनी क्लास चे वर्ग स्वछ करीत असत. अगदी बारीक-सारीक घटनांतून गुरु शिष्याना  घडवीत असतो. तशी नजर असणे आणि गुरुप्रती मनांत आदर असणे महत्वाचे. 

मावशीचे राहणे अतिशय नीटनेटके. त्यांच्याकडे बघितले कि अगदी प्रसन्न वाटे. बरेचदा  कलाकार लहरी ,आत्ममग्न  असतात. काहीवेळा वागण्यातही काहीसा उद्दामपणा असतो. पण मावशींच्या ठिकाणी ह्याचा लवलेशही नव्हता. अगदी नितळ आणि पारदर्शी स्वभाव .नीतीमूल्यांची जपणूक त्यांच्या वागण्यात असे आणि म्हणूनच त्यांच्या विषयी एकप्रकारचा आदरभाव मनांत दाटून येई . नुसते मावशींचे नाव उच्चारले  तरी समोरची व्यक्ती नतमस्तक होते . उत्तम कलाकार, गुरु आणि व्यक्ती असा नावलौकिक त्यांनी कमावला होता.   मावशीचा जो काही सहवास आम्हा  सर्वाना लाभला त्यामुळे आमचे जीवन समृद्ध झाले. काही व्यक्तिमत्व असतातच  लोभस. त्यांच्या स्नेहाचा परिमल आपले अंतरंग सुवासिक करतो. 

मावशींच्या पश्चात त्यांची सुकन्या आणि  शिष्योत्तमा पंडिता अर्चना जोगळेकर  मावशींचे कार्य समर्थपणे  पुढे नेत आहे . बाकीही अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हा वारसा जोपासत आहेत आणि मावशींविषयी अतिशय कृतज्ञ आहेत. 

बघता बघता वर्षे लोटतात .हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीसुद्धा काळाच्या पडद्याआड जातात पण त्यांची कला चिरंतन असते. वर्षे लोटली तरी काही ऋणानुबंध हे ताजे टवटवीत तसेच राहतात. 

आज १८ मार्च. मावशीचा  पाचवा स्मृतीदिन. ह्या लेखनाच्या माध्यमातून त्यांना विनम्र श्रद्धांजली समर्पित करते . 



स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

18/03/2021


 

4 comments:

  1. प्रत्येक शब्द आम्हाला पण मावशींच्या सर्व कला गुण दाखवून गेला.
    भक्ती चा लोणावळ्याला झालेला कार्यक्रम आठवला,,प्रत्येक हालचाल मोहक कशी, असं मी तुला म्हणाले होते,
    आमच्याकडुन ही स्मृती वंदन

    ReplyDelete
  2. भावना खूप छान मांडल्यायत.मावशींच्या छत्रचामराखाली बहरलेली भक्ती आम्ही पाहिलीय ....तिचाही असाच उत्कर्ष होवो

    ReplyDelete
  3. खूप सुंदर शब्दशिल्प उभा केलेत स्नेहाताई 👏🏻👌🙏🏻 आ.आशा जोगळेकरांविषयी ऐकून होते. आज तुमचा हा लेख वाचून त्यांच्या विषयीचा आदर दुणावला. आणि भक्तीचा कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता निर्माण झालीय.

    ReplyDelete