Sunday, August 2, 2020

Bandh - Mukt ( बंध -- मुक्त )


                                                                  ।। श्री  शंकर  ।।

                                                               बंध -- मुक्त 
                                     

 रक्षाबंधनाचा सण . बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याला एक आगळं वेगळं परिमाण  लाभतं ते रक्षाबंधन आणि भाऊबीज ह्या दोन सणांमुळे. स्त्रीला नेहेमीच माहेरची वाटणारी ओढ आणि भाऊरायाविषयी वाटणारा जिव्हाळा. त्यामुळे आतुरतेने ह्या सणांची वाट ती बघत असते. मनगटावरच्या राखीने आणि ओवाळणीने भाऊ बहिणीला आश्वस्त करतो " मी आहे ना तुझ्या पाठीशी "आणि हे नातं फुलतं, बहरतं. त्यासाठी परस्परांत सामंजस्य, विश्वास असावा लागतो. 

ह्या परंपरेचे मूळ अगदी थेट महाभारतांत सापडते. श्रीकृष्ण आणि द्रौपदी ह्यांच्यातील नाते हे मानलेले असले तरी भावाबहिणीचे होते. सख्यत्वाचे होते. द्रौपदी जेव्हा भर सभेत तिच्यावर आलेल्या संकटाच्या वेळी कृष्णाचा धावा करते, तेव्हा पाठिराखा म्हणून कृष्ण तिचे लज्जारक्षण करतो आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून  द्रौपदी त्याला कंकण बांधते. हीच परंपरा आजही चालू आहे. त्यांच्याच नात्यातला असाच एक हृद्य प्रसंग सर्वांच्याच परिचयाचा आहे. कृष्णाचे बोट कापते आणि रक्ताची धार थांबत नाही तेव्हा द्रौपदी  क्षणाचाही विचार न करता तिचा  भरजरी पितांबर फाडून त्याची चिंधी त्याला बांधते , ह्या प्रसंगाने त्यांच्यातील नाते अधिक दृढ होते. 

"  द्रौपदीसी बंधू शोभे नारायण "

रक्षाबंधनाच्या दिवशी वृंदावनात कृष्णाला राखी बांधण्याची प्रथा रूढ आहे, ज्यायोगे कृष्णाच्या भक्तिच्या बंधनात साधक स्वतःला अडकवून घेतात. 

राष्टीय स्वयंसेवक संघ किंवा प्रजापिता ब्रह्माकुमारी ह्यासारख्या सेवाभावी  संस्था ह्या दिवशी समाजामध्ये स्त्री पुरुषांना राखी बांधतात आणि समाजाशी असलेलं बंधूत्वाचं नातं दृढ करण्याचा  प्रयत्न करतात. 



ह्या निमित्ताने " बंधनावर " थोडासा विचार  ... 

मनुष्य जन्माला आला कि कळत नकळत विविध  बंधनात अडकतो. जन्मापासून कर्म बंधन, मौजी बंधन, विवाह बंधन अशी अनेक  बंधने पाठी लागतात. आई -वडील, भाऊ-बहीण, प्रियकर -प्रेयसी, नवरा-बायको, गुरु-शिष्य अशा नात्यांच्या  बंधनातून आपुलकीचे, जिव्हाळ्याचे बंध निर्माण होतात. 

अलीकडे तरुणाईत प्रचलित असलेला " Friendship Day " ...ह्या मैत्रीच्या नात्यात ते किती गुरफटलेले असतात ते त्या दिवशी हातात बांधलेल्या बँड वरून कळून येतं. अनेकदा हे बंध तात्पुरतेच असतात.  

हे प्रेमाचे बंध जेव्हा दोन्ही बाजूने जपले जातात, निःस्वार्थी असतात तेव्हा खूप आनंद देतात. एकमेकांसाठी देवाणघेवाण करताना किंवा शारीरिक कष्ट करताना यातना जाणवत नाहीत. पण त्यांत फसवणूक झाली, विश्वासाला तडा गेला की मग मात्र हे बंधन जाचक वाटू लागते आणि त्यातून मुक्त होण्यासाठी धडपड केली जाते. 

मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो : -- मनुष्याला बंधनात अडकविणारे / बंधमुक्त करणारे हे मनच असते. मनांत ज्याप्रमाणे विचार येतात त्याप्रमाणे शरीर  सात्विक / राजसी / तामसी कर्म करते. बुद्धी सात्विक असेल तर बंध -मोक्षाचा विचार करते. केलेल्या कर्माच्या अभिमानाने किंवा अहंकाराने माणूस स्वतःच्याच कर्म बंधनात अडकतो. पण जर कर्म निष्काम भावनेने केले,ईश्वरार्पण वृत्तीने केले  तर मात्र ह्या बंधनातून मुक्त होऊन तो मोक्षापर्यंत जाऊ शकतो. कर्मावाचून कोणताही माणूस राहू शकत नाही.मनुष्याच्या वाट्याला आलेली  नैसर्गिक कर्मे  करणे अगदी योग्य आहे पण जर हि मर्यादा ओलांडली गेली तर स्वतःला, कुटुंबाला आणि समाजालाही घातक  ठरते. म्हणूनच शास्त्राची, नीती -नियमांची बंधने घातली जातात. बऱ्याच वेळा हि बंधने पाळणे जड वाटते पण समाज हितासाठी हि बंधने अगदी आवश्यक असतात. 

बंधन म्हटलं कि तिथे कर्तव्य येते, जबाबदारी येते, एकमेकांप्रती दायित्व येतं. बंधनात काही नियम पाळावेच लागतात. मुक्त वावरता येणे कठीण होते.  प्रत्येकाला वयाचे बंधन असते. जातीपातीचे बंधन मानवानेच  निर्माण केले आहे. ज्या देशात राहतो तिथली काही ठराविक बंधने, कायदे पाळून राष्ट्रधर्माचे पालन करावे लागते. 

एक महत्वाचे बंधन " वेळेचे बंधन " ... ठराविक वेळ प्रत्येकाला पाळावीच लागते. एकदा का हा क्षण निसटला कि तो परत येत नाही. अगदी घरातल्या रोजच्या कामांपासून, बाकी सर्व व्यवहारांत हे बंधन पाळले गेले नाही तर कोणतेच काम योग्य रीतीने पूर्ण होत  नाही. 
कलाकारांची कला बंधनातही छान फुलते. कोणत्याही कलाकृतीची एक ठराविक शास्त्रशुद्ध पाया तयार करून त्या आकृती बंधात केलेली मांडणीच शाश्वत असते आणि मनाला आनंद देते. कलाकारांना सूर,ताल ,लय ह्यांचे बंधन पाळावेच लागते. 
मूळात स्वतंत्र असलेल्या पशु पक्षांना माणूस स्वतःच्या हौशीसाठी हट्टाने स्वतःच्या घरांत ,पिंजऱ्यात अडकवतो. कधी त्यांची रवानगी प्राणी संग्रहालयात केली जाते. " तोडी सोन्याचा पिंजरा " अशीच  ह्या बंधनात सापडलेल्या मुक्या प्राण्यांची भावना असते. मोकळ्या वातावरणात झेप घ्यायला ते आतुर असतात . 

माणसाला इच्छा नसली तरीही बंधनावाचून जगता येणे कठीणच. काही बंडखोर व्यक्ति हि बंधने झुगारून देतात आणि स्वतःच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. बंधनाची चौकट मोडणे तेव्हढे सोपे नाही आणि मग समाजाचा रोष ओढवून घेतला जातो. काही वेळा त्या व्यक्तींना वाळीतही  टाकले जाते. 

काही समाजसुधारकांनी समाज कल्याणासाठी विपरीत बंधनांतून लोकांची सुटका केली आणि चांगल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली. ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, बाबा आमटे ह्यांनी प्रचलित बंधनांचा, रूढी परंपरांचा त्याग करून हिमालयाएवढे उत्तुंग समाज कार्य करून दाखविले . 

अनेक संत - महात्म्यांनीही ईश्वराशी जवळीक साधली  आणि ते  कर्मबंधनातून मुक्त झाले   " विसरे मीरा जनबंधना "... संत मीराबाईंनी मधुरा भक्तीने कृष्ण प्रेमाच्याच बंधनात अडकवून घेतले, बाकी सर्व बंधने आपोआपच गळून पडली .  तिच्या  भक्तीने प्रसन्न होऊन  कृष्णाने अगदी सहजपणे त्यांना आपल्यात सामावून घेतले. 

आपण सामान्य लोक संसार बंधनात इतके बांधले जातो की त्यातून बाहेर पडायचा मार्गच  दिसत नाही. तुकाराम महाराजांनी स्वतः  झाडालाच घट्ट विळखा घालून " मला सोडवा ,मला सोडवा " असा आक्रोश करणाऱ्या संसारी पुरुषांवर चांगलीच टीका केली आहे. हा विळखा आपणच सोडवायचा असतो, मोह, मायेला दूर सारून, ममत्वाचा त्याग करून ईश्वराच्या भक्ती प्रेमात रंगून गेले कि ह्या सर्व बंधनांचा माणसाला विसर पडतो खास.
भगवद्गीतेत भगवंत म्हणतात मी उदासीन असतो म्हणून कर्मे मला बाधत नाहीत,अनासक्त होऊन सगळ्या सृष्टीची मी रचना करतो त्यामुळे निर्माता असूनही मी त्या बंधनात अडकून पडत नाही. सर्व प्रकारच्या बंधनापासून अलिप्त अशा " निवृतात्मा " परमेश्वराला ,ज्याच्या केवळ स्मरणाने जन्म - मरण ,आणि संसार बंधनातून मनुष्याची सुटका होते त्या सर्वसमर्थ विष्णुला नमस्कार करून ह्या विचारांना  इथेच विराम देते. 


स्नेहा भाटवडेकर 
sneha8562@gmail.com

4 comments:

  1. बंधन एक व्यापक विचार....त्यात राहून बंधमुक्त होण्याचा मार्ग छान मांडला आहेस

    ReplyDelete