Monday, July 20, 2020

आला श्रावण आला ... ( Ala Shravan Ala ...)

                                                                        ।। श्री शंकर ।।

आला श्रावण आला 


आषाढी एकादशीनंतर टाळ मृदुगांचें बोल आसमंतात  दुमदुमत असतांनाच गुरुपौर्णिमा साजरी होते.

जगद्गुरू व्यासांना वंदन करून, आपल्या सद्गुरुंकडे तिमिररुपी अज्ञान दूर करून ज्ञानाच्या शलाकेने जीवन उजळविण्यासाठी प्रार्थना करतो. जणू काही सद्गुरू आपल्याला पुढील मार्ग दाखवतात आणि " तमसो मा ज्योतिर्गमय " म्हणून दिव्यांच्या अमावास्येला तेजाची पूजा आपण करतो आणि मनोभावे जीवनातला अंधःकार दूर व्हावा म्हणून " दीपज्योती नमोस्तुते " अशी  प्रार्थना करतो  आणि खरोखरच दुसऱ्याच दिवसापासून  एका  उत्साही, चैतन्यमय  पर्वाची धामधूम सुरु होते. 

" रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात "... अहो तो मराठी महिन्यांचा  राजा" श्रावण "हासत- नाचत, आनंदाची लयलुट करत अवतीर्ण होतो. त्याला साथ असते ती पावसाची आणि उन -पावसाच्या खेळाची. पावसात भिजून चमचमणाऱ्या उन्हाची. आकाश आणि पृथ्वीचा सुंदर मिलाफ घडविणाऱ्या इंद्रधनूची. मनभावन हा श्रावण, प्रिय साजण हा श्रावण, अशीच भावना श्रावणाविषयी प्रत्येकाच्या मनांत असते.

  ह्या पवित्र महिन्याचा प्रत्येक दिवसच एक आगळंवेगळं महत्व घेऊन येतो. अनेक सणवार, व्रतवैकल्य, रीतिरिवाज, परंपरा ह्यांचा सुंदर मेळ  साधून तनामनाला रिझवणारा, आनंदाची उभारी देऊन पावसाळी वातावरणाने  आलेली मरगळ दूर करणारा हा नटखट श्रावण.  

श्रवण नक्षत्रांवर सुरु होणारा आणि मुख्यत्वे  शिव आराधनेसाठी समर्पित असा हा श्रावण . 


समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली. त्यातली तेरा रत्ने सर्वानी आपसांत वाटून घेतली. चौदावे हलाहाल { विष }कोण घेणार ? मग ते भगवान शंकरानी प्राशन  केले आणि त्यांच्या कंठाचा दाह होऊ लागला. तो कशानेही शमेना. मग गंगाजलाने त्यांच्यावर अभिषेक केला आणि त्यांचा दाह कमी झाला. श्रावणी सोमवारी हा अभिषेक भक्तगण शिवलिंगावर करतात. बिल्वपत्र वाहतात, शिवपूजा करतात. उपवास करून, शंकराची विविध स्तोत्रे म्हणून त्याला प्रसन्न करून घेतात. नवविवाहिता शिवामूठ वाहतात.
 

"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे  चोहीकडे, क्षणांत येते सरसर  शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे ".... 

पावसाच्या धारांनी सलज्ज पृथ्वी हिरव्यागार पाचूने वेढली जाते. हिरवे हिरवे गार गालिचे डोळ्यांना तृप्त करतात.  पाण्याच्या थेंबांनी तयार झालेल्या महिरपि मनांत मोर पिसारा फुलवतात. स्वप्नांचे पक्षी घिरट्या घालू लागतात आणि नवविवाहितांना एक नवा सूर साद घालू लागतो. सासरच्या नवीन वातावरणांत रुळतानाच  माहेरची ओढ दाटून येते 
आणि मग नागपंचमी, मंगळागौर, जिवतीपूजन अशी सणांची शृंखलाच सुरु होते. हे सर्व स्त्रीत्व जपणारे खास स्त्रियांचे सण. तळहातावरच्या मेंदीबरोबरच जीवनातले रंगही चढू लागतात आणि हा हिरवा ऋतू , ऋतू बरवा होतो. फुलं पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने निसर्गाशी जवळीक साधली जाते. त्या सुगंधाने मनातला दरवळ तृप्त होतो. सख्यांच्या सोबतीने झिम्मा फुगडी खेळली जाते. फेर धरले जातात. गोफ विणले जातात. मनमोकळे सुख दुःखाचे पदर मैत्रिणीसोबत  उलगडले जातात. 
 
मानवी नात्यांतील पूल बांधण्याचा, संवाद साधण्याचा, भावबंध जपण्याचा प्रयत्न नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने केला जातो.
 
" यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ,अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं "
हिंदुधर्मातील दशावतारातील आठवा  अवतार धर्म रक्षणासाठी श्रावण वद्य अष्टमीला मथुरेत जन्म घेतो. 
पूर्णावतार श्रीकृष्णाचा जन्म ऐन मध्यरात्री बारा वाजतां आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. भजन, कीर्तनांना उधाण येते. " कृष्ण गोविंद गोपाल  गाते चले ,मनको विषयोंके विषसे हटाते चले" अशी धून मनामनांत गुंजत राहते. दुसऱ्या दिवशी सगळे गोपजन " गोविंदा आला रे आला " म्हणून  दहीहंडीचा उत्सव थाटात  साजरा करतात. 

घरोघरी श्रावणांत सत्यनारायण पूजाही करण्याचा प्रघात आहे. शैव आणि वैष्णव पंथामध्ये एक प्रकारचा समन्वय ह्यामुळे साधला जातो. 

पावसाळी हवेमुळे पचनशक्तीला आलेलं जडत्व दूर करण्यासाठी अनेक उपवासांचे प्रयोजन ह्याच महिन्यांत आणि सणासुदीचे म्हणून विशेष गोडधोड पदार्थांची रेलचेल पण इथेच. सुग्रास भोजनाचा स्वाद अनेकांची जिव्हा तृप्त करतो. हि चव जिभेवर दीर्घ काळ रेंगाळत राहते.

भारतीय स्वातंत्र्याचा उत्सवही साधारण ह्या श्रावणाच्या आसपासच साजरा होतो. देव- देश आणि धर्माचा हातात हात घालून साजरा केलेला उत्सव आपल्या आनंदात आणखी भर घालतो. देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांना मानवंदना देऊन १५ ऑगस्ट साजरा केला जातो.  

एकंदरच सगळ्यांची मने रिझवणारा हा मधुमास. आधुनिक जीवनशैली हि खरंतर धावपळीची. आज कोणालाही कोणासाठी  वेळ नाही. निसर्ग हा तशाही परिस्थितीत स्वतःच अस्तित्व जपत स्वतः बहरत असतो आणि आजूबाजूच्या लोकांनाही आनंद देत असतो.आपलं मन प्रसन्न करतो. हा आनंद आपणही ह्या परंपरांत सामील होऊन अबाधित ठेऊ शकतो. फक्त आवश्यक असतं मनातल्या भावनांची आणि संवेदनांची जपणूक. 

उतू नको, मातु नको, घेतला वास टाकू नको, अशी शिकवण देणारी आपली भारतीय परंपरा. हि परंपरा जपली कि 
इंद्रधनूचा आसमंतातील गोफ आपल्या आयुष्यात हि सप्तरंगांची उधळण नक्कीच करेल ... 

हासरा नाचरा ,जरासा लाजरा ,श्रावण आला ,श्रावण आला... 




स्नेहा भाटवडेकर 
sneha8562@gmail.com





4 comments:

  1. श्रावण सुन्दर रचना ।

    ReplyDelete
  2. वाह वा!! खरंच निसर्गाची हिरवाई आणि सणासुदीची लगबग सुरु!!!
    पण तुझ्या काव्यमय शब्दात वाचुन मन जास्तच हर्शभरित झाले.
    खूप सुंदर रचना.

    ReplyDelete
  3. किशोरी निसर्ग इतका भरभरून आपल्याला देतो खरच श्रावणात आजूबाजूला नजर टाकली तर हिरवाईचा उत्सव चालू आहे असच वाटत तू त्याच इतक सुंदर वर्णन केल आहेस की मन प्रसन्न झाल

    ReplyDelete