Friday, August 21, 2020

गणपती : एक स्मरणरंजन ( Down The Memory Lane : Celebration of Ganesh Festival )

                                                            ।।  श्री शंकर ।।

                                              गणपती : एक स्मरणरंजन 

माणूस मुळातच उत्सवप्रिय. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातही आपल्या सणासमारंभासाठी आवर्जून वेळ काढून, आनंदाने सण  साजरा करायला तो उत्सुक असतो . घरांत त्या निमित्ताने होणारी तयारी असो, कि गणपती निमित्ताने कोणाकडे जाणे असो, एक वेगळाच उत्साह त्याच्या ठिकाणी अवतरतो . 

ह्या वर्षी सगळ्या परिस्थितीत  आमूलाग्र बदल झालाय. नेहेमीचा उत्साह मावळलाय.माहेरी जायची तयारी नाही.  कि कोणाकडे जाणे येणे नाही 

हा बदल स्वीकारणं अपरिहार्य आहे ,पण प्रत्यक्षांत मात्र मन व्याकुळ झालंय ...गेल्या अनेक वर्षांच्या आठवणी फेर धरून नाचतायतं ...  

 ह्या एकाकी दिवसांत  स्मरणरंजनातूनच ही बीते हूए यादोंकी बारात ... 

माझ्या माहेरी आधी  गणपती बसवला जात नसे. गावीच काकांकडे गणपती असायचा, पण गाव लांब ,आणि शाळा चुकवून जाणे कधीच झाले नाही. इतर मैत्रिणींकडे गणपती असायचा आणि आपल्याकडे नाही ह्या विचाराने त्यावेळी  वाईट वाटायचे. गणपती बाप्पाने माझा रुसवा दूर करायचे बहुधा ठरवले असावे. गावाचे काका आजारी झाले आणि त्यांना सगळी जबाबदारी पेलणे  शक्य नसल्यामुळे, सर्व सण माझ्या बाबांनी स्वतः जबाबदारी घेऊन साजरे करायचे ठरविले. त्यांचा सळसळता उत्साह अजूनही आठवतो. केवढी हौस त्यांना सगळ्याची.  कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी सगळ्यांना ह्या गणपतीउत्सवाची आमंत्रणे जात, त्यांत प्रेमाची धमकीच असायची. एवढे मोठे आमचे कुटुंब. पण बाबांच्या आग्रहाने दिलेल्या आमंत्रणाला  मान देऊन अगदी लांबून लांबून  नातेवाईक ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत. ह्या निमित्ताने शनिवार-रविवार असे जोडून एक स्नेह संमेलन असे. जवळ जवळ ७०-७५ नातेवाईक एकत्र जमत. सगळ्यांची राहायची, जेवणा- खाण्याची , अगदी चोख व्यवस्था.आलेल्या पाहुण्यांचा सर्व कार्यक्रमांत सहभाग असे. एक काका आर्टिस्ट, ते सुंदर मखर बनवीत तर दुसरे काका नेत्रदीपक रोषणाई करत.  तबल्याच्या साथीबरोबर होणारी आरती तासभर देहभान हरपून चढ्या आवाजात  गायली जात असे. 

त्यातही काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन. सगळ्या बालगोपाल, तरुण मंडळींचा परफॉर्मन्स must.अनेक जणांनी इथे आपली कला सादर करून ,पुढील आयुष्यात ह्याचा खूप फायदा झाल्याचे नेहमीच नमूद केले.  वर्षभरात  विशेष कौतुकास्पद कामगिरी केली असेल तर त्यांचा घरातील सर्वात वयोवृद्ध आजीच्या हस्ते सत्कार . 

धार्मिक प्रथेप्रमाणे पूजा अर्चा, सहस्रावर्तने, मंत्रपुष्प हे सगळं यथोचित व्हायलाच हवे. कुठेही  शॉर्टकट नाही. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही उणीव नाही. प्रेम, आपुलकी, आग्रह अगदी ओथंबलेला आणि सर्वांवर त्याचा सारखाच वर्षाव. मायेचा ओलावा जपताना व्यवहार कधीच आड आल्याचं,किंवा मतभेद झाल्याचे , मला इतक्या वर्षांत जाणवलं नाही. 

आईवर केव्हढी मोट्ठी जबाबदारी असायची ते त्या वयात नाही कळले.  नंतर मी संसारात पडल्यावर तिच्या शांत राहून स्वयंपाक घरांतील  सर्व कामे  नेटाने पार पाडण्याच्या हिंमतीचे कौतुक वाटले. 


ह्या उत्सवाच्या निमित्ताने इतके मोठं कुटुंब एकदिलाने एकत्र यायचं. चाळीस वर्षांनंतरही ही गणेशोत्सवाची  आठवण नेहमीच चर्चेचे  मुख्य आकर्षण असते. कुटुंबातील सर्व  व्यक्तींच्या हा उत्सव म्हणजे मर्मबंधातील ठेव आहे.

खरंतर हा आमचा कौटुंबिक गणपती, पण त्याचं स्वरूप मात्र भव्य -दिव्य, एखाद्या सार्वजनिक गणपती सारखं . नातेवाईकांशिवाय इतर अनेक स्नेहीजन आमच्या गणपतीला आवर्जून भेट देत असत.  

कार्यक्रमांची सर्व तयारी करताना  बाबांच्या तालमीत मीही अगदी तयार झाले.  हा कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनॅजमेण्ट चा ( त्या वेळी असे शब्द सुद्धा माहित नव्हते ) अगदी योग्य वस्तुपाठ होता. आमंत्रणे, खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी, आलेल्या नातेवाईक मंडळींशी संवाद कसा साधायचा , किती म्हणून सांगावे ? अगदी आजही ह्या सर्व गोष्टींचा व्यवहारांत खूप फायदा होतोय.आयुष्यभराची हि शिदोरीच ... 

सलग २५ वर्षे हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा झाला. बाबांनी निवृत्तीनंतर कोकणांत वास्तव्य करायचे ठरवले आणि  ह्या उत्सवाचे स्वरूप बदलले. 

माझ्या मुलींनी हा उत्सव बघायला हवा होता असे मला नेहमी वाटते, त्यांच्यासाठी ह्या आठवणीच आहेत. वर्षभरात काहीतरी चांगलं काम करून कुटुंबीयांची प्रोत्साहनपर थाप पाठीवर पडावी असं खरं तर नेहेमीच वाटे पण मला तशी संधी मिळाली नाही, निदान मुलींचे कौतुक व्हावे असे वाटत असे पण तीही सुप्त इच्छा  मनातच विरून गेली. 

 आता गणपतीसाठी गावी जायला सुरवात झाली . ह्या  दिवसांत सगळीकडे गर्दी, प्रवास कठीण. तरीसुद्धा गणपती आणि माहेरच्या ओढीने जाणे व्हायचे. प्रवासाचा सगळा शीण घरी गेलं की  निघून जायचा आणि उत्साहाने बाप्पाचं स्वागत करायचं. गावच्या वातावरणाचा वेगळा उत्साह मनावर स्वार व्हायचा.आनंद मनांत काठोकाठ भरलेला असायचा . 

ह्या वर्षी ह्या आनंदाला आपण मुकणार म्हणून मन भरून आलं . इतक्या वर्षाचा मनावर  झालेल्या संस्कारांचा विसर पडणे कठीणच. 

 आणि मग मनानेच मला समजावलं ... अगं तो गणपती सुख देणारा ,तुझ्या दुःखाचं हरण तोच करणार ... त्याच्या पूजेअर्चेत मन रमले कि तो आनंद देणारच आहे.

सर्वं जगदिदंत्वत्तोजायते,सर्वं जगदिदंत्वयिप्रत्येति , त्वं भूमिरापोनलोनिलोनभः , अथर्वशीर्षांत गणपतीचं गुणवर्णन करताना म्हटलंच आहे, सर्व जगात तो व्याप्त आहे, मनातली भक्ती आपण कुठेही असलो तरी त्याच्यापर्यंत  पोचतेच. त्याचा प्रत्यय येतोच  .. मन एकदम शांत शांत झाले ..     

त्याचं स्वागत इथे घरीच उत्साहाने करायचे असा मनाशी शुभ संकल्प करून मी जोरदार  तयारीला लागले. मन आनंदाने त्याची आळवणी करू लागलं ,सर्वत्र  नाद निनादू लागला ....

मंगलमूर्ती  मोरया ,गणपती बाप्पा मोरया ...  


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

sneha bhatawadekar sneha8562@gmail.com

10:19 PM (2 minutes ago)



2 comments:

  1. उत्तम लेख लिहिला आहेस सर्व पूर्व स्मृतींना उजला मिळाला तुझं मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलं आहे. सगळ्यांच्या मनातलं 👌

    ReplyDelete