Tuesday, August 18, 2020

mainkar kaka - ek athwan (माईणकर काका - एक आठवण )


 | | श्री शंकर | |


आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे. आजचे लिखाण आहे आईसाठी तिच्या मुलीकडून आणि निमित्त आहे मातृदिनाचे. 

हल्ली आपल्यावर असलेला पाश्चत्य संस्कृतीचा पगडा बघता mothers day मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र भारतीय परंपरेत महत्त्व आहे ते श्रावण अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या मातृदिनाचे. 

आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही...

आईने मला काय दिले हे शब्दात सांगता येणार नाही कारण माझ्या अस्तित्वाचा  प्रत्येक पैलू तिने घडवलेला आहे, अगदी काळजीपूर्वक आकार दिला आहे... लहानपणापासूनच कळतनकळत तिच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण मी करत गेले, शिकत गेले, प्रेरणा घेत गेले..  

सध्याच्या lockdown मध्ये आईने तिची लिखाणाची आवड जोपासली आणि विविध विषयांवर लेखन चालू केले. तिच्याकडून आलेल्या प्रेरणेने मीही माझ्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे ...

हे लेखन आई वर नाही किंवा लेखनाचा विषय आई हा नाही.. तर हा मनावर प्रभाव पडलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध आहे...

 

१४ ऑगस्ट ची सकाळ... सकाळीच एक बातमी कानावर आली. तबला क्षेत्रातील विचारवंत पंडित सुधीर माईणकर यांचे निधन झाले. बातमी कळली आणि मनात विचारांचे काहूर माजले.

माईणकर काकांशी माझी ओळख अगदी अलीकडची, गेल्या वर्ष दीड वर्षातली. माझे लग्न ठरले आणि माझा होणारा नवरा चिन्मय व माईणकर काकांचा चांगला परिचय होता. काही वर्षांपूर्वी काकांच्या लिखाणाच्या कामात त्यांना मदत करण्याच्या निमित्ताने चिन्मयचे काकांकडे जाणे झाले व गुरु शिष्याचे नाते कधी तयार झाले कळलेच नाही. चिन्मयच्या मनात होते की आपल्या होणाऱ्या बायकोची काकांशी भेट घडवावी आणि पुढील प्रवासासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही चारकोपला त्यांच्या राहत्या घरी गेलो. एवढ्या मोठ्या गुरूंकडे भेटायला जायचे मनावर खूप  दडपण होते मात्र काकांशी भेट झाली आणि मनातली भीती अगदी पळून गेली. इतकं प्रेमळ व्यक्तिमत्त्व. त्यांनी माझी इतकी आपुलकीने चौकशी केली, कथक नृत्यसंबंधी त्यांचे किस्से ऐकवलेच शिवाय संसारोपयोगी काही कानमंत्र देखील दिले. विचारांची शिदोरी घेऊनच आम्ही दोघं घरी परतलो.

पुढे तब्येत बरी नसतानाही काका आमच्या लग्नाला आले व आम्हाला शुभाशीर्वाद दिले.

एका प्रोजेक्ट संदर्भात काकांचे 'तबला वादन में निहित सौंदर्य' हे पुस्तक वाचनात आले व त्यावेळेस काकांच्या पांडित्याची खरी ओळख पटली. भाषा व तबला यांचा सखोल अभ्यास करून त्यावरील त्यांचे चिंतन थक्क करणारे होते. त्यानंतर कला विहार मासिकातील काकांचे इतर लेखही वाचले.

काकांची सगळ्यात स्मरणात राहील ती आठवण म्हणजे लोणावळा खंडाळा महोत्सवाची. सप्टेंबर मध्ये लोणावळा खंडाळा महोत्सवात माझा एकल नृत्याचा कार्यक्रम होता. ग्रीन रूम मध्ये घुंगरू बांधताना announcement कानावर पडली कि पंडित सुधीर माईणकर कार्यक्रमाला हजार आहेत. माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. काकांसमोर माझी कला प्रस्तुत करायला मिळणार होती. कार्यक्रम छान झाला. कार्यक्रमानंतर नेमकी काकांची भेट घेता आली नाही. आपण त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलावे का असे सारखे मनात येत होते आणि दोन दिवसांनी काकांनी स्वतःहून मला फोन केला व माझ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. खासकरून चक्रीच्या बोलांची तारीफ केली. इतक्या बारकाईने त्यांनी माझा कार्यक्रम पाहिला व त्यावर अभिप्राय दिला हे माझे मोठे भाग्य.

आज त्यांचे वयोमान आणि आजारपण यामुळे शरीराने ते आपल्यासोबत नाहीत. कितीही वय झाला तरी माणूस आपल्यासोबत राहावं, आपल्याला सोडून जाऊ नये अशी मनाची वेडी आशा असते पण प्रकृतीचा नियमच तो, आलेला जायचा. काका देहानी नसले तरी त्यांच्या विचाराने कायम आपल्या सोबत राहतील. त्यांच्या प्रत्येक बंदिशी वाजवताना चिन्मयला त्यांचे स्मरण होईल व त्या ऐकताना मला काकांची आठवण होईल.

काकांच्या आठवणीत हे लेखन त्यांना समर्पित.


.०८.२०२०


1 comment:

  1. आज मात्रु दिनाच्या दिवशी मुलीने आपल्या पुढे एक पाऊल आपण चाललेल्या वाटेवर टाकावे आणि त्याचा खोलवर ठसा उमटावा ह्यापेक्षा अधिक आनंद कोणता ?
    स्नेहा

    ReplyDelete