Sunday, July 5, 2020

भक्ति मार्ग प्रणेतारं ( Bhakti Marg Pranetaram... )

                                                                       Image result for swami vardanand bharti image
                                                                               ।। श्री शंकर ।।

                                                     
भक्ति मार्ग प्रणेतारं 





भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।

आज गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंना वंदन करून हि" अक्षर सेवा " त्यांच्या चरणाशी अर्पण करते. 

परमेश्वर प्राप्तीचे चार मार्ग सांगितले आहेत : कर्म,भक्ती,ज्ञान ,योग ... 
भक्तिमार्ग हा आपल्या सारख्या सर्वसामान्य साधकांसाठी सर्वांत सोपा मार्ग
.संतकवि दासगणु म .म्हणतात :
                         कलियुगाचे ठायीं । भक्तीस प्राधान्य आहे पाहीं ।
                         या भक्तीनेंच अवघे कांहीं । होय प्राप्त मानवा ।।
दासबोधांत समर्थ रामदास स्वामींनी भक्तिमार्गावर विस्तृत भाष्य केले आहे. भक्ती म्हणजे काय आणि विविध मार्गांचा अवलंब करून भक्ती कशी करावी ?

श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं । अर्चनं वंदनं दास्यम सांख्यमात्मनिवेदनं ।।

नवविधा भक्तीचे हे नऊ प्रकार ज्यायोगे परमेश्वराची भक्ती करून त्याला आपलेसे करून घेता येते. 

आमचे सद्गुरु अप्पा म्हणजेच प. पू . स्वामी वरदानंद  भारती ( पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले ) हे ह्या नवविधा भक्तीच्या आचरणातील आमचे आदर्श.चारही आश्रमांत त्यांनी  यथार्थपणे वास्तव्य केले .  भक्तिमार्गाचा अवलंब  केला.त्यांच्या उत्कट भक्तीने   प्रत्यक्ष  वरद  नारायणाने त्यांना दर्शन दिले.  ,शेवटी स्वेच्छा समाधी घेऊन जीवन कृतार्थ केले. जे फारच विरळा असते आणि त्यांच्या  शिष्य परिवाराला अनुकरणीय मार्ग दाखविला. 

अप्पांचा नवविधा भक्ती सोपान थोडक्यांत मांडायचा हा प्रयत्न. 
१) श्रवण भक्ति  : 
                        नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे  महिमे 
                         नाना दानांचे  महिमे । ऐकत जावे ।।
वयाच्या विशीत असतांना अप्पा नास्तिक होते . दासगणु  महाराजांशी सनातन धर्मावर अनेक वाद विवाद होत. पुढे मात्र त्यांचे मतपरिवर्तन झाले. विचारांची आणि वाचनाची दिशा बदलली. दादांनाच त्यांनी गुरुस्थानी मानले. पुढे 
आजोबा ते प्रत्यक्ष सद्गुरू हे दादांशी ( प.पू. दासगणू महाराज ) असलेले आपुलकीचे आणि सर्वस्वाचे नाते दृढ झाले.  अप्पानी दादांची अनेक रसाळ कीर्तने ऐकली. तरुण वयातच त्यांना श्रवण ,वाचनाचा नाद लागला. अप्पांचा ग्रंथसंग्रह सुद्धा प्रचंड मोठा होता. आणि प्रत्येक ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता. 
पारमार्थिक वाटचालीत वैचारिक बैठक पक्की  होण्याची  श्रवण भक्ति हि पहिली पण महत्वाची पायरी. 
 स्वा. सावरकर ह्यांच्या  विचारांचा,व्याख्यानांचा  पगडा त्यांच्या तरुण मनावर पडला  आणि देशप्रेमाची तळमळ त्यांना लागली.
  
२) कीर्तन भक्ति : 
                         सगुण  हरिकथा करावी । भग्वत्कीर्ती वाढवावी 
                         अखंड वैखरी वदवावी । यथायोग्य ।।
अध्यात्म मार्गांत ईश्वराचे भक्ती युक्त कीर्तन करणे याइतके महत्वाचे कार्य दुसरे नाही असे अप्पा म्हणत. 
तरुण वयांत अप्पानी कीर्तने करायला सुरवात केली. कीर्तनांत भक्तिरसाला उधाण येई. निरूपणात ते राजकीय ,सामाजिक,नैतिक ,धार्मिक,अध्यात्मिक विषयांवर परखड विवेचन करीत. 
अप्पांची तत्त्वमीमांसेची बैठक पक्की असल्यामुळे त्यांची कीर्तने विद्वत्ता प्रचुर असत. दादांची आख्याने ते करीतच पण लोकमान्य टिळक,राजा दाहीर अशी अनेक कीर्तने स्वतः रचून तीन चार तास श्रोत्यांना ते ह्या भक्तिरसात चिंब भिजवून टाकत आणि स्वतः हि हरिस्मरणांत एकरूप होत असत. 
                           भगवंतांस  कीर्तन प्रिय । कीर्तने समाधान होय 
                            बहुत जनासी उपाय     । हरिकीर्तनें कलियुगी ।। 
ह्याचा प्रत्यय त्यांच्या कीर्तनभक्तिने दिला. 
३) विष्णोस्मरणं :
                            स्मरण देवाचे करावे । अखंड नाम जपत जावे 
                            नामस्मरणाने पावावे । समाधान  ।।
नामस्मरण करून परमेश्वराचे स्तवन करावे अशी हि म्हटलं तर भक्तिमार्गातील सहज सोपी पायरी. पण पूर्व संचित असेल तरच हे साधते हा आपला अनुभव." भक्तीचें मुख्य लक्षण । श्रीहरीचें नामस्मरण ।।"
विष्णुसहस्रनाम स्तोत्रावर अप्पांचे अतोनात प्रेम. सतत मुखांत हे स्तोत्र असे.  विष्णुसहस्र नामाचे महत्व ओळखून त्याचे अखंड  पाठ केले. त्यांनी स्वतः नमूद केले आहे कि विष्णुसहस्र नाम स्तोत्राला त्यांच्या साधनेत प्राधान्य होते आणि  केवळ ह्या स्तोत्र पठणानेच  त्यांना त्यांचे ध्येय गाठता आले. 
वेळोवेळी त्यांच्या शिष्य परिवारालाही ह्या स्तोत्राचे  दिवसांतून १२ पाठ करावेत  हाच उपदेश मुख्यत्वाने  केला. 
४) पादसेवन  :
                          पादसेवन तेचि जाणावे । कायावाचा मनोभावे 
                           सद्गुरूंचे पाय सेवावे    । सद्गती कारणे  ।।
सद्गुरुपदी अनन्यपण असेल तरच हि भक्ती साधते. गुरूंचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याप्रमाणे यथाशक्ती आचरण म्हणजेच  पादसेवन. परमेश्वर आणि सद्गुरू ह्यांच्यासाठी तन,मन,धन वेचणे हीच खरी सेवा.  . 
प.पु. दासगणु  महाराज हेच अप्पांचे गुरु. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच अप्पांनी परमार्थ मार्गातील प्रवास केला. त्यांच्या वरील  निष्ठेमुळेच परमार्थ मार्गातील अत्त्युच्च शिखर त्यांना गाठता आले.छात्रबोध ह्या प्रकरणांत दादांनी अप्पाना घडविण्यासाठी उपदेश केलेला आहे. जो सर्वानाच ह्या परमार्थ वाटचालीत उपयुक्त आहे. 
दादांविषयी अप्पा  म्हणतात ... सन्मार्गदीपकं नाथं प्रसन्न पावनं शुभं । अनंत वरदं नित्यं वंदे दासगणूम गुरुं ... 
५) अर्चन भक्ति : 
                          कुळधर्म सोडू नये ।उत्तम अथवा मध्यम करीत जावे ।।
अप्पांनी वैयक्तिक कौटुंबिक परंपरा , कुळधर्म ,कुळाचाराचे यथायोग्य पालन केले. वैदिक ब्राह्मणांना योग्य दक्षिणा देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार केला.  इतकेच नाही तर दासगणू परिवारात त्यांनी अनेक उत्सव ,महोत्सव उत्साहाने सुरु केले आणि उत्तम नियोजनाने ते यथासांगपणे  पार पाडले .
साधकावस्थेत स्वतःच्या परोत्कर्षासाठी जे जे आवश्यक ते सर्व त्यांनी आचरिले. अनेक तीर्थयात्रा केल्या. आसेतु हिमाचल भारतभ्रमण केलेच,नेपाळला जाऊन पशुपतिनाथाचे दर्शन घेतले.गंगा आणि गोदावरी ह्या नद्यांना त्यांनी मातेसमान मानले. त्यांच्या तटाकी वास्तव्य केले. गोदा  परिक्रमा केली.  सिंधू नदीविषयी त्यांना आत्यंतिक जिव्हाळा होता. सिंधुस्नानाने ते अतिशय हर्षित  झाले.मानस सरोवराची खडतर यात्रा केली. आत्यंतिक प्रेमाने भारतमातेचे दर्शन घेतले. 
                          नाना तीर्थक्षेत्रांस जावे । तेथे त्या देवाचे पूजन करावे 
                            नाना उपचार अर्चावे । परमेश्वरासी  ।।

६) वंदन भक्ति  :
                             करावे देवासी नमन । संत साधू सज्जन नमस्कारित जावे ।।
संत सत्पुरुषांविषयी विमम्र भाव अप्पांच्या अंतःकरणात सदैव होता. हा भाव असला कि नमस्काराचे महत्व पटते.परमेश्वराच्या चरणाशी सदैव नत तर ते असतंच पण  आपल्या पेक्षा वयाने, ज्ञानाने जेष्ठ व्यक्तींना वंदन करण्यात ,लिन होण्यात ,त्यांचे आशीर्वाद घेण्यास अप्पा नेहमीच उत्सुक असत.अतिथीं विषयी आत्यंतिक आदर त्यांच्या मनांत असे .  हिमालय यात्रेत अशा अनेक साधू सत्पुरुषांना वेळोवेळी मुद्दाम  भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वंदन अप्पानी केलेले आहे. फलाहारी बाबांचा उल्लेख त्यांनी अनेक ठिकाणी केला आहे. नमस्कार श्रेष्ठ आहे आणि नमस्काराने वरिष्ठाना आपलेसे करून घेता येते हे ते जाणून होते. 
७) दास्य भक्ति : 
                           ऐसे दास्य करावे देवाचे । येणेंचि प्रकारे सद्गुरूंचे ।।
अप्पा नेहमीच स्वतःचा उल्लेख गणूदासदास असा करत असत. वरद  नारायण आणि दादा ह्यांची दास्यत्व पत्करून उत्कट सेवा त्यांनी केली. दादांच्या निधनानंतर गोरट्याला आश्रमाची स्थापना केली आणि त्यांचे कार्य पुढे चालू ठेवलेच आणि ते वृद्धिंगत केले.दासगणु प्रतिष्ठान स्थापन केले.  आजही ती परंपरा टिकून आहे ह्याचे श्रेय अर्थातच अप्पांच्या योग्य  नियोजनात आहे. 
८)  सख्य भक्ति :
                           देवाच्या सख्यत्वाकारणे । आपुले सौख्य सोडून देणे 
                            अनन्य जीवेंप्राणें । शरीर तेही वेचावे ।।
अप्पानी स्वतःचा प्रपंच नेटका केला.त्यांच्या गरजा  अतिशय कमी होत्या. चैनीला स्थान नव्हतें .  प्रपंचातील सर्व जबाबदारी पार पाडल्यावर त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला.सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला. उत्तरकाशीला गंगा नदीच्या तटावर वास्तव्य केले." पडाव्या जिवलगांसी तुटि " ह्या उक्तीनुसार एकांतवासात राहून पूर्ण वेळ त्यांनी भगवद्भभजन पूजनात मन रमविले .अंतरंगात परमेश्वराविषयी निस्सीम ओढ होती. वरद  नारायणाने त्यांना दर्शन दिले .  त्यांचे जीवन कृतार्थ झाले.  पुढे अप्पानी संन्यास  दीक्षा सुद्धा घेतली. 
                             देवासी जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावे तेणे रीती 
                              येणे करता भगवंती । सख्य घडे नेमस्त ।।
इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांच्या सख्याची  तीव्रतेने आठवण येते. वरद नारायणाशी अप्पांची अशीच सख्य भक्ती दृढ झाली होती.  
९) आत्मनिवेदन : 
                              आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी । नवविधामध्ये विशेष भक्ती नववी ।।
हि भक्तीची शेवटची पायरी आणि अंतिम ठिकाण. हि भक्ति घडली तर जन्म - मरण चुकते. अढळ ,अविनाशी अशी सायुज्य मुक्ती प्राप्त होते. 
अप्पा नारायणाशी मनांतील सर्व भाव व्यक्त करीत.त्याचाशी संवाद साधीत .  सर्व वैभव भोगून आता त्यांचे डोळे नारायणाकडे लागले आहेत. त्याने त्यांना हृदयाशी धरावे म्हणून त्यांचा जीव व्याकुळ जाहला आहे. अशावेळी ते आर्तपणे नारायणाला हाक मारीत आहेत. आता चित्त जडो सदा तव पदी हे नाथ नारायणा .... 
आपला देह व्याधीने क्षीण झाला आहे ह्याची जाणीव होताच त्यांनी नारायणाला प्रार्थना करून देह्त्यागासाठी अनुमती मागितली. 
अप्पानी अनेक उत्तमोत्तम ग्रंथ साधकांना मार्गदर्शन व्हावे ह्या हेतूने लिहिले.अखेरच्या काळांत  त्यांच्या शिष्य परिवाराला एका पत्राद्वारे बोध केला.. 
मी म्हणजे ना शरीर । मी मद -ग्रंथांचा संभार 
त्याचे वाचन चिंतन । यथाशक्ती आचरण  ।।
शेवटच्या क्षणापर्यंत अप्पानी स्वतःचा देह धर्मकार्यासाठी वेचला,राष्ट्रभक्तिही साधली  आणि समाधी अवस्था सिद्ध केली. हा प्रसंग अलौकिक होता. जो साधणे हे केवळ विभूतिमत्वांनाच साधते. 
आधी केले मग सांगितले ह्या उक्तीनुसार स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजविला . साधकापासून ते साध्यापर्यंत प्रवास करून मोक्षत्वापर्यंत कसे पोचता येते ह्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे अप्पांचे जीवन चरित्र. 
ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ..मी सद्गुरुंना मागणे मागते ... 
आता पदी एक विनती ... 
तुम्ही दाविल्या ,पथी  त्या भल्या  अनुसरुनिया । जडावे चित्त हरीपायी  रहावे  सदा तुम्ही हृदयीं .... 

Image result for swami vardanand bharti image

No comments:

Post a Comment