Wednesday, October 21, 2020

गोंधळाला या ...(Gondhalala Ya....)

                                                         ।। श्री शंकर ।।

                                                       गोंधळाला या ...

षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो I घेऊन दिवट्या हस्ते गोंधळ घातला हो II 

उदे अंबे उदे   उदे अंबे उदे ।। ... 

हे शब्द कानावर पडले कि वातावरणांत  एक वेगळाच उत्साह संचारतो.. हृदयात मावणाऱ्या भक्तिरसाचा उदय  होतो... भवानी मातारेणुकादेवीकरवीरनिवासिनी अंबामाता ... देवींची विविध रूपे डोळ्यासमोर उभी राहतात. वात्सल्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेली हि देवीची रूपे म्हणजे जगन्मातेचीच रूपे..

नवरात्रांत ह्या विविध रूपांची आराधना करून त्या आदिशक्तीला आपण प्रसन्न करून घेतो. बहुजन समाजात भूमातेचा/ निसर्गाची पूजा म्हणून  साजरा केला  जाणारा हा उत्सव आता अधिक व्यापक झालाय. देवी म्हणजेच प्रकृती / आदिमाया / आदिशक्ती. विविध अंगाने केली जाणारी तिची  उपासना . पूजे -अर्चेबरोबरच, नामजप , स्तोत्रपठण, होमहवन ह्या साधनांनी हि उपासना अधिकच बहरते . 

महाराष्ट्राला लोककलांची  समृद्ध परंपरा लाभली आहे. वासुदेव, भारूड, जोगवा, गोंधळ असे अनेक प्रकार देवदेवतांच्या उपासनेसाठी योजिले जातात. त्या देवतेला प्रसन्न करून घेतले जाते. ह्यातीलच एक प्रकार " गोंधळ "

ग्रामीण भागांत आजही प्रचलित आणि लोकप्रिय असलेला गोंधळ. अंगात लांब घोळदार अंगरखा, गळ्यांत कवड्यांची माळ, डोक्यावर पगडी, साथीला हातात तुणतुणे, जवळ प्रकाशाची वाट दाखवणारी दिवटी. देवीचे उपासक असणारे हे गोंधळी, देवीची स्तुती, स्तवन करतात. कुलदेवीच्या उपासनेसाठी हा गोंधळ प्रामुख्याने असला तरी इतर देवतानाही आमंत्रित केले जाते.  साथीदारांबरोबर घातलेला हा गोंधळ खूप रंजक असतो. अनेक घरांमध्ये प्रथेप्रमाणे, कुलाचार म्हणून किंवा कार्य समाप्तीनंतर ह्या कार्यक्रमाचे आयोजन  केले जाते. गोंधळाचा बाज एकंदरच भारदस्त असतो. भक्तिरसाबरोबरच वीररसाचा परिपोष इथे दिसतो. ऐकताना आपण ह्या कथानाट्यात  बुडून  जातो. त्यामुळे स्फूर्ती मिळते, उत्साह वाढतो. 

लहान मूल दुसऱ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी गोंधळ घालते. स्वतःच्या मागण्या पुऱ्या व्हाव्या म्हणून आईकडेच हट्ट करते. तीच गोष्ट भक्तांची. त्यांना आईचे वात्सल्य हवे तर ते गोंधळ घालतात. मग त्यांचे लाड पुरवले नाही तर ती आई कसली ?

मनामनांत असलेला गोंधळ, अस्थिरता  कमी होऊन संसारातील नश्वरता जाणून, परमार्थातील शाश्वत मार्गाकडे नेणारा  ... संसार आणि परमार्थाची सांगड घालणारा  ... अंबेचा  गोंधळ ... भक्तिमार्गातील गोंधळ 


असाच भक्तीचा गोंधळ संतकवी दासगणु महाराजानी घातलाय. त्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठोबालाच मातेच्या रूपांत बघून गोंधळाच्या माध्यमांतून तिची आळवणी केली आहे. मातेच्या वत्सलतेचा वर्षाव व्हावा म्हणून तिची स्तुती केली आहे. 

महाराज म्हणतात, ह्या बयेने  त्रिभुवनांत  ठाण  मांडले  आहे, आपल्या  त्रितापांचें  हरण करण्यासाठीतिला शरण जाऊन तिच्या भक्तिरसात रंगून जायला हवे. पंढरपूरस्थित हि बया सगुणरूपाने विटेवर उभी राहून, कटीवर हात ठेवून आपल्या भक्तवरांची वाट पाहत युगानुयुगे उभी आहे.

ह्या बयेनेच  महाराजाना नरसिंह रूपांत दर्शन दिले त्या उग्र रूपाचे  वर्णन इथे केले आहे. " सवा हात लळलळे जीभ तो वन्ही तृतीय लोचनी " ते अक्राळविक्राळ  रूप  प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर   प्रगट होते.

भक्त प्रल्हादने स्तवन करून आपल्या उत्कट भक्तीने  त्या नरसिंहाला शांत केले ह्या पुराणकथेचा उल्लेख केला आहे . 

दशावतारातील वामन अवतार, राम अवतार आणि कृष्णावतारांतील विविध कथांमधून ब्रह्माच्या  सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन महाराजांनी  केले आहे. " ती हि विठाई मनी इच्छी शबरीच्याउष्ट्या फळा " अगदी मोजक्या शब्दात महाराज त्यांच्या  काव्यातून कथांचा हा  विस्तृत पट आपल्या समोर उभा करतात. महाराजांच्या लेखणीचे हे  सामर्थ्य त्यांच्या सर्व वाङ्मयांत प्रत्ययाला येते. 

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वर्णन करताना दासगणु  महाराज म्हणतात "संत शिरोमणी साधू देहूकर, अहो तुकाराम महाराज! तयाचे गुण वानू कुठवर ? "अनेकविध संतांनी आपल्या दैवी गुणांनी ह्या मातेचा गोंधळ घालून तिची कृपा संपादन केली आहे.. तिला आपल्या हृदय मंदिरात बंदिस्त केले आहे.  त्यांच्या  चरित्रात  हि अनन्य भक्ती पहायला  मिळते . 

आपल्यासारख्या साधकांना अतिशय वात्सल्याने महाराजांनी पारमार्थिक वाटचाल कशी करावी , त्याचे   मार्गदर्शन केले आहे. सुंदर रूपकाच्या माध्यमांतून हा भक्तिमार्ग कसा अनुसरावा त्याचे वर्णन केले आहे. षड्रिपूंचा बळी द्यायला हवा. दृढ निश्चयाचा अंगरखा, सद्गुणांचे तुणतुणे, आशेचे तेल, वैराग्याचा पोत, किर्तीरुपी संबळ, पायात निरिच्छेची घुंगुरे बांधून हि वाटचाल केली तर परमशांतीचा लाभ होईल. 

विठूमाऊलीने दृढ आलिंगन द्यावे म्हणून महाराजांचा जीव व्याकुळ झाला आहे ती आस त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होते. .त्यासाठी मातृहृदयातील वत्सलतेला त्यांनी आवाहन केले आहे. तिच्याच कृपेने  मायेचा पट  दूर सारून ह्या प्रकृतीच्या पल्याड असलेल्या एकमेवाव्दितीय पुरुषाचे दर्शन व्हावे म्हणून महाराज गोंधळ घालत आहेत. 

नवरात्रीच्या निमित्ताने ह्या तेजाची/शक्तीची  उपासना घडावी, ऊर्जा मिळावी, कृपा संपादन व्हावी म्हणून  --चला चला ...आईचा गोंधळ घालूया .. भक्तिरसात रंगून जाऊया .. .. उदे अंबे उदे.. उदे अंबे उदे.

 

स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

 


Wednesday, October 14, 2020

नाते विश्वबंधुत्वाचे ( Vishvabandhutva )

                                                 || श्री शंकर ||

                           नाते विश्वबंधुत्वाचे  


११ सप्टेंबर १८९३ हा दिवस जगाच्या इतिहासातील एक संस्मरणीय दिवस. शिकागो येथील धर्मसभेत भिन्न भिन्न धर्माचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी एका विराट सभेच्या निमित्ताने एकत्र जमले होते. ह्या सभेत स्वामी विवेकानंदानी श्रोत्यांना संबोधित करताना " माझ्या बंधुनो आणि भगिनींनो "असे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधीच्या हृदयाचा ठाव घेणारे ते शब्द होते ....ह्या शब्दांची मोहिनी आज १२७ वर्षांनंतरही जनमानसावर कायम आहे. स्वामींचे नाव विश्वबंधुत्वाशी जोडले गेले ते कायमचेच. त्या शब्दांचे एवढे सामर्थ्य कशात होते ?.  

स्वामींच्या शब्दात निष्कपट प्रेम होते. करुणा होती. प्रेमभावनेची आकांक्षा असलेल्या जनतेला त्यांच्या विचारांनी प्रेरित केले. हिंदू धर्माचा प्रभाव सर्वावर पडला. आपले भारतीय  तत्वज्ञान थोर आहे आणि विवेकानंदानी त्याचा प्रचार केल्यामुळे त्याचे महत्व विशेष प्रस्थापित झाले.

स्वामी रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे अध्यात्मिक गुरु. विश्वप्रेमाची मूळ संकल्पना हि रामकृष्णांची. त्यांचीच विचारपताका विवेकानंदानी सातासमुद्रापार फडकवली. भारतभ्रमण करताना स्वामीजींना आपल्या देशबांधवांचे दैन्य, दारिद्र्य बघितले. त्यांचे संवदेनशील मन ह्यामुळे व्यथित झाले. रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी ह्या बांधवांसाठी सेवाकार्याची सुरवात केली. आणि विश्वबंधुत्वाचा पाया रचला. आपले तत्वज्ञान केवळ पोथ्यापुराणात न ठेवता स्वतः आचरण करून ते राष्ट्रवादाशी जोडले.

योगीजनांना समदर्शीं  तत्वामुळे सगळीकडे एकाच तत्वाची अनुभूती येते. सगळ्याप्रती सारखा भाव त्यांच्या अंतःकरणात असतो. संतांच्या आचरणातून हा प्रत्यय आपल्याला येतो. समाजाच्या उद्धाराची तळमळ त्यांना असते. त्यांचे हृदय वात्सल्याने काठोकाठ भरलेले असते. तळागाळातील लोकांबरोबर बंधुत्वाच्या नात्याने ते जोडले जातात. त्यांचे कल्याण व्हावे ह्या एकाच हेतूने ते कार्यरत असतात. विवेकानंदांच्या चरित्रातील अनेक प्रसंग ह्या दृष्टीने उद्बोधक आहेत. आपल्याला प्रेरणा देणारे आहेत.


श्रीमद्भगवद्गीतेत बंधुत्वाची व्याख्या केली आहे. बंधू म्हणजे भाऊ एवढा मर्यादित अर्थ नसून आप्त, नातेवाईक ह्या सर्वाशी ज्या बंधनाने आपण जोडले जातो ते म्हणजे बंधुत्व. त्या नात्यात प्रेम, आपुलकी, जबाबदारी, कर्तव्य, सर्व काही आले. आप्तस्वकीयांची देखभाल आपली जबाबदारी ह्या नात्याने आपण प्रेमाने करतच असतो,.आजकाल स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीप्रती स्नेह, आदर, सेवाभाव ह्या गोष्टीही दुर्मिळ होत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वतःच्या परिवाराबाहेर जाऊन बंधुभाव जोपासणे हि तर फारच अवघड गोष्ट आहे.  

बंधुत्वाचा  विस्तार जेव्हा कुटुंबाच्या पलीकडे होतो तेव्हा त्याचे स्वरूप आणखीन व्यापक होते. समाजाभिमुख होते. आजही काही व्यक्ती प्रेमभावनेने बंधुत्वाची जोपासना समाजासाठी करीत आहेत. ह्यासाठी विश्वबंधुत्वाचा अर्थ तुमच्या आचरणात पूर्णतः झिरपलेला असावा लागतो.

गीतेच्या सहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी ह्या व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. भगवान म्हणतात शत्रू, मित्र, पुण्यवान, पापी ह्या सर्वाशी हा माणूस समबुद्धीने वागतो. त्यांच्यात भेद करत नाही. अनासक्त, निष्काम, निर्लोभी आणि निस्वार्थी मनुष्यच समाजासाठी आपले कर्तव्यकर्म चोख रीतीने पार  पाडत असतो.

सर्वसामान्य माणसाला अंतःकरणातील राग द्वेष, आसक्ती, चीड, संताप ह्यामुळे सगळ्यांशी सारखेपणाने वागणे जमत नाही. आपली बुद्धी स्वार्थप्रवण  असते. हे बंधुत्वाचे नाते जपणे आपल्यासारख्याना अवघड वाटते.

याला काही अपवाद असतातच. काही व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गरजूना मदत करीत असतात. अगदी छोट्या छोट्या कृतीतूनही हा भाव जोपासता येतो. दुसऱ्यांचे दुःख हलके करता येते. काही सामाजिक संघटना तर विविध आपत्तीच्या काळांत अशी जबाबदारी स्वीकारून समाजोपयोगी कामे तन -मन -धन वेचून निस्वार्थीपणे करतच असतात. महामारीच्या ह्या आपत्तीत संघाच्या कार्यकर्त्यांनी जे अमूल्य योगदान केले आहे त्याला तोड नाही.

समाजातील अशाच हीन- दीन, पतित लोकांसाठी कळवळणारे अतिशय कोमल हृदय असणारे साने गुरुजी आपल्या काव्यात म्हणतात ' समस्ता बंधू मानावे । जगाला प्रेम अर्पावे ।। " त्यांचे हे शब्द आपल्या मनाचा ठाव घेतात .

" आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः " आपणच आपले बंधू ( आप्त / मित्र ) असतो किंवा शत्रू असतो. स्वतःच्या आत्म्याशी बंधुत्व भाव जोडून आपणच आपला उद्धार केला पाहिजे. समाजाशी नाते जोडताना आपल्या हृदयस्थित परमेश्वराला विसरून कसे चालेल ? वरवर सोपे वाटले तरी आचरण्यास अतिशय कठीण असे हे तत्वज्ञान आहे.

बंधुत्वाची भावना जोपासली गेली तर जीवनातील अनेक ताणतणाव कमी होतील. स्त्रियांकडे बघायची दृष्टी बदलली तर त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील. दहशतवादासारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत.

ईश्वराला आपण " लोकबंधु " म्हणतो. सर्वांचा आधार ,हितकर्ता तो लोकबंधु. जगाच्या कल्याणासाठी त्या विश्वात्मक ईश्वराची प्रार्थना करूया.

बंधुत्वाची प्रेरणा देणाऱ्या सर्व शक्तींना अभिवादन करतानाच हे नाते जपण्याचा मनोमन निश्चय करूया.


स्नेहा भाटवडेकर

sneha8562@gmail.com



Wednesday, September 9, 2020

जीवन साधना ( Jeevan Sadhana )

                                                                ।।श्री शंकर ।।

                                                                 जीवन साधना 

 छोटा - मोठा ,जवळचा -लांबचा किंवा देश- परदेशातला, प्रवासाला निघताना आपल्याला तयारी करावीच लागते. जिथे जायचे त्या ठिकाणाची  पूर्ण माहिती करून घ्यावी लागते. 

नेहेमी लागणाऱ्या सर्व वस्तुंबरोबरच,औषधें, जिथे जायचे त्यानुसार काही विशिष्ट गोष्टी हि घ्याव्या लागतात. तिकीट, परवाना ( Passport , Visa ),वेळेचे नियोजन ... सर्व आखणी व्यवस्थित झाली कि प्रवासाचा आनंद मिळतो. ज्या मुक्कामी जाणार ते वास्तव्य हि छान होते आणि आनंदात भर पडते. 

एकदा गंमत झाली. मी प्रवासांत कंगवाच घ्यायला विसरले. तशी साधीशीच गोष्ट. प्रवासांत मला कुठेही कंगवा मिळाला नाही. जिथे गेले तेही अगदी खेडेगाव. त्यामुळे "ना धड वेणी, ना धड फणी", अशा अवस्थेतच दिवस काढावा लागला. सांगितलं एवढ्याचसाठी कि अगदी छोट्याशा गोष्टीने सुद्धा किती अडचण होते ह्याचा अनुभव आला.  पुढच्या वाटचालीच्या  दृष्टीने हे असे प्रसंग खूप  काही शिकवून जातात. 

आपला जीवन प्रवास अगदी असाच असतो. छोटा प्रवास करताना आपण सगळी काळजी घेतो , मग हा तर दीर्घ प्रवास. किती काळजीपूर्वक हे सर्व नियोजन व्हायला हवं, की नाही ?आणि कुठे पोचायचे हे ध्येय ठरवावे लागते.  प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. कठीण प्रसंग आल्यावर अगदी ऐनवेळी धावपळ होते. कोणतेही कर्म करायचे तर त्यासाठी योग्यता, पात्रता असावी लागते. असलेली योग्यता वेळोवेळी मिळवावी लागते, त्यात वाढ करावी लागते. प्रत्यक्ष जीवन व्यवहार करताना जर काही तत्वांचे पालन केले, जीवनशैलीचा योग्य अंगिकार केला, तर पश्चाताप करायची वेळ फार कमी येते. हे सर्व  जीवनसूत्र ,भगवद्गीतेत सापडते. अभ्यासाने ते उलगडत जाते. 

श्रीमदभगवद्गीता हा भारतीय तत्वज्ञानातील एक अद्वितीय ग्रंथ. त्यामधील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश अलौकिक आहे. 

योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणभूमीवर हा उपदेश केला आहे. मोह्ग्रस्त होऊन अर्जुन स्वतःचे कर्तव्य विसरला. किंकर्तव्यमूढ अर्जुनाला श्रीकृष्णांनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली." करिष्ये वचनं तव " म्हणून  अर्जुन पुन्हा सामर्थ्याने युद्धभूमीवर उभा ठाकला. विजयश्री त्याच्या बाजूने खेचून आणली. धर्माचे राज्य प्रस्थापित केले. आणि अधर्माचा नाश केला. 

अर्जुनाला रणभूमीवर युद्ध करायचे होते. आपल्याला मात्र दैनंदिन जीवनात अनेक युद्धप्रसंगांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात," रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " घरांत किंवा समाजात वावरताना मनामध्ये  द्वंद्व चाललेले असते.हे करू का ते करू, योग्य काय अयोग्य काय, ह्याचा निर्णय पटकन घेता येत नाही.  ह्या सर्व प्रसंगात गीतेतील तत्वज्ञान आपल्याला मदत करते, मार्ग दाखवते. जीवनातील ध्येय गाठायला मदत करते. आपल्यासारख्या संसारी लोकांना अचूक मार्गदर्शन गीतेत मिळते. ह्या तत्वज्ञानाचे आचरण केले कि जीवन उन्नत होते. 

त्यासाठी अर्थातच गीतेचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. ज्याला संसारात सुखस्वास्थ्य हवे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे तर मग गीता हवीच. आणि हि ओळख सुद्धा शक्य तितक्या लवकर तरुण वयातच व्हायला हवी. चांगले संस्कार जितक्या लहान वयांत होतील, तेवढे ते लाभदायक ठरतात. त्या वयात ते महत्व कळत नाही, पण नंतर मात्र, अरे हे आपल्याला आधीच कळलं असतं तर, अशी रुखरुख वाटत राहते. 

देह आहे तोपर्यंत कर्म करावेच लागते. कोणीही ह्यातून सुटलेले नाही. ते कर्म नित्य नैमित्तिक असते, विहित असते किंवा प्रासंगिक असते. आपले रोजचे जीवन व्यवहार सोडून काही कर्तव्यकर्म संसार म्हटलं कि आलीच. सणवार , कुळाचार, कुळधर्म हि काही विशेष कर्म, हे सर्व करावं लागतं. हे  करताना जेव्हढी शास्त्रसंमत कर्म करता येतील तेव्हढी  केली तर ते कर्म यथासांग पार पडते. स्वामी चिन्मयानंद म्हणतात " Living the right values of Life is like building a dam across a  river". आचार विचार, नीतिमूल्य ह्यांचं योग्य पालन करावं लागतं. तरच कर्म यथासांग घडतं आणि त्याचे फळंही गोड असतं. 

अर्थात गीतेने फक्त तुमचं कर्म योग्य करा, हेच सांगितलंय ." दैवं चैवात्र पंचमम "तुम्हाला मिळणारे फळ हे तुमच्या दैवावर किंवा प्रारब्धावर अवलंबून असतं. फळाची आसक्ती न ठेवता कर्म करा असा उपदेश भगवंतांनी केला आहे. कर्म करण्यापूर्वी त्या कर्माची योग्य जाणीव निर्माण होणं आणि त्यानुसार आपल्याकडे उपलब्ध साधने कोणती आहेत, आपण कोणत्या दिशेने, कसे प्रयत्न करावेत, ह्या सर्वांचा विचार करावा. 

अगदी आपल्या घरातलं रोजचं उदाहरण घेतलं तरी हे स्पष्ट होईल. स्वयंपाक करताना आपण वेळ, हेतू, उपलब्ध साधनं, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न ह्या सगळ्याचा विचार करतो. अर्थात वर्षानुवर्षे केल्यामुळे हे सगळं अंगवळणी पडलेलं असतं, त्यामुळे त्याची जाणीव होत नाही इतकंच. हे सर्व नियोजन  करून केलेला पदार्थ सगळ्यांच्या पसंतीला पडेल का नाही हे पूर्णतः दैवाधीन असतं. सर्व घटकांचा  उत्तम समतोल साधला गेला कि पदार्थ चांगला बनतोच. त्यातही स्वकर्म काय हे समजून आपण स्वतः ते काम केलं तर सोने पे सुहागा. ज्ञानेश्वर माउलींनी स्वकर्माने केलेली पूजा ईश्वराला फार प्रिय आहे असं सांगितलंच आहे.  स्वकर्म हीच खरी पूजा, वेगळी पूजा करण्याचीही आवश्यकता नाही. 

हे स्वकर्म कसे  : " योगः कर्मसु कौशलम ", कोणतेही कर्म मनापासून, पूर्ण एकाग्र होऊन, निष्ठेने करावे. जमेल तेव्हढ्या कौशल्याचा वापर करावा. म्हणजे ते कर्म उत्तम होते आणि ईश्वरार्पण होते. हि सुद्धा एक साधनाच आहे. 

आपल्या बुद्धीचा प्रभाव कर्मावर होत असतो. आधी केलेल्या कर्मानुसार बुद्धी आचरण करते आणि शुद्ध बुद्धीने चांगले कर्म घडते असे चक्र चालू असते. जन्मजात सत्व, रज आणि तमाचा प्रभाव आपल्यावर असतो. त्यानुसार आपले कर्म घडते. कर्म करताना वाईटाकडून, चांगल्याकडे आणि चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे होणारा प्रवास म्हणजे" साधना " बुद्धी सुसंस्कारीत  झाली कि योग्य वाटचाल होते. म्हणजेच तमोगुणांचा, रजोगुणांचा  प्रभाव कमी होऊन सत्वगुण वाढीला लागतो. बुद्धी सुसंस्कारीत होण्यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, सत्पुरुषांचा सहवास, नामजप इ. साधनांचा वापर उपयुक्त ठरतो. सज्जन व्यक्तींचा आदर्श संसार हाच पुढे परमार्थात परिणत होतो. अशा घरातच वेदांत खरा उमगतो. परमार्थ करायचा म्हणजे संसाराचा त्याग करायचा असं अजिबातच नाही बरं ! तर तो नेटका करायचा. 

उपासनेमुळे बुद्धी हळूहळू स्थिरावत जाते. रागद्वेष, हवे नको, मानापमान, अहंकार हे सर्व लयाला जाण्यास सुरवात होते. अंतःकरणाची प्रसन्नता लाभते. साधनामार्गावरील हा टप्पा गाठला कि आलेल्या निवांतपणामुळे कृतकृत्यता येते. 

श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे : सर्वभावाने ईश्वराला शरण गेले कि ईश्वरी प्रसादाचा लाभ होतो आणि आत्यंतिक शांतता मिळून शाश्वत पद प्राप्त होते. 

आपले जीवन हि एक साधना बनून हि अवस्था प्राप्त व्हावी हि श्रीचरणीं प्रार्थना ... 


संदर्भ : जीवन साधना . ( गीता १८ वा अध्याय )

विवेचन : सद्गुरू स्वामी वरदानंद भारती  ( अनन्त दामोदर आठवले )