Wednesday, April 28, 2021

ऋण मैत्रीचे

                                            ।। श्री शंकर ।।

                                  ऋण  मैत्रीचे  


प्रिय १९७६ बॅच ,

सन १९६१ ते  २०२१ ....  आताआपण सर्वच वरिष्ठ नागरिक झालो (आपणअजूनही हे खरं मानायला तयार नाही , तरीही ) , आपल्या जीवन प्रवासातील  पुढचा टप्पा , उत्तरायण , सुरु झालंय  . ...ह्या निमित्ताने सर्वांशीच   हितगुज करतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही  देते. 

अंबरनाथ: आटपाट नगरांतील आमचं  एक छोटंसं गांव . गाव जरी छोटं ,तरी कर्तृत्वाने  मोठं . आकाशाच्या देवाची , शिव शंकराची वर्षानुवर्षे आपल्याला लाभलेली कृपादृष्टी ... आमचा अंबरनाथकरांचा अभिमान असलेलं प्राचीन लेणं ,पुरातन हिंदूसंस्कृतीचा वारसा जोपासणारं" शिवमंदिर  "... ... आमच्या गावाच्या नावलौकिकात भर घालणारे विमको कंपनी सारखे अनेक प्रसिद्ध  कारखाने.   आमच्या ह्या गावाला निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला... एखाद्या  हिलस्टेशन सारखं सौन्दर्य ... नागमोडी, उंचसखल रस्ते,हिरवाई ,आमराई ,टुमदार बैठी घरे ... मर्यादित लोकवस्ती ,त्यामुळे शांतता ... गर्दी -गोंधळ कमीच ... आणि हो ... सगळ्यांत महत्वाचं म्हणजे साधी- भोळी माणसं .अगदी त्या भोळ्या शंकरासारखीच ... परस्परांतील जिव्हाळा जपणारी ... सच्या दिलाची ... अनौपचारिक नात्यागोत्यांनी बांधलेली .  

ह्याच गावातील आमची शाळा " महात्मा गांधी विद्यालय " भाग्यवशात आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी .. शाळेची केव्हढी प्रशस्त इमारत ,मोठे क्रीडांगण ,भव्य खुले नाट्यगृह ,शाळेच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने त्या मॊठ्या स्टेजवर  केलेली नाटक ( इंग्रजी च्या देशपांडे मॅडमनी एक इंग्लिश नाटक बसवलं होतं ,त्यात मी सतीश अत्तरदे आणि मला वाटतं किशोर देशपांडे ह्यांनी काम केलं होतं ,निम्मे संवाद इंग्रजीत बोलायचे असल्याने बहुतेक आम्ही विसरलोच ).विद्यार्थ्यांच्या समूह प्रार्थनेत " बलसागर भारत होवो " चे पटांगणात घुमणारे सूर ,पी .टी ./खेळाचा तास ( खेळांत मी अगदी ढ ) विद्यार्थ्यांच्या ज्ञानांत भर घालणाऱ्या अद्ययावत विज्ञान -प्रयोगशाळा, संगीत -शिवणकला( शिवण शिकवणाऱ्या देसाई मॅडम,त्यांचे माझे धागे कधीच जुळले नाहीत, कायम त्यांच्याकडून ओरडाच खाल्ला ) ,चित्रकला ह्याचे स्वतंत्र कक्ष . शाळेच्या भल्यामोठ्या,खुल्या  आवारांत ,आजूबाजूला मोठाले वृक्ष , डुलणारी हिरवी शेते ,उसाचे पांढरे तुरे .. .किती सुंदर होती नाही आपली शाळा !!!.. शाळेचं वातावरण त्यामुळे  प्रसन्न असायचे .  आमच्या सर्व शिक्षक /शिक्षिकाही उत्तम शिकवणाऱ्या ..आणि मुख्याध्यापक  नवांगुळ सर ( आडनावावरुन कायम टर उडवणारी मुले, सॉरी संध्या  )... .शालेय जीवन हा एक आनंददायी अनुभव होता. 

इथेच तर आपण  सर्व एकत्र आलो .. आणि   एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने घट्ट बांधले  गेलो  नाही ?त्या निरागस वयांत कोणाच्याही मनांत  असूया , द्वेष -मत्सर हे भावही नव्हते कधीच  ..त्यामुळे कधी कोणाशी भांडण झालेलेही आठवत नाही .वातावरण अगदी मोकळं-ढाकळं आणि त्यावेळी अभ्यासाचा ताण नव्हता ,आजच्यासारखी जीवघेणी स्पर्धाही नव्हती. .  अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणे ... कधीही ,केव्हाही..आजच्या सारखं फोन करून अपॉइंटमेंट नाही की व्हाट्सअँप मेसेज नाही .मी मंगल आणि आरती .आमराईत झाडाखाली बसून आमचा अभ्यास चालायचा ,निसर्गाच्या शाळेत. ... अगदी अनौपचारिक वातावरणातच वाढलो . मैत्रिणीचे घर तेही  आपलंच दुसरं घर आणि तिच्या घरच्यांशी सुद्धा तेव्हढ्याच गप्पा गोष्टी ...   अशी आपुलकीची नाती. कोणाला काही अडलेले अभ्यासाचे  प्रश्न विचारतांना कधी संकोच वाटतच नसे. त्या न कळत्या वयांत तयार झालेले हे बंध आजही त्याची वीण अगदी तशीच घट्ट.पुढच्या प्रवासांत अनेकांशी मैत्री झाली पण लहान वयांत झालेली ही  मैत्री ,त्यातील आपलेपणा ह्या पुढच्या मैत्रीत  आढळत नाही बहुधा. 

आपल्या सगळ्या मैत्रीणींत , स्मिता देवस्थळी अभ्यासात  खूप हुशार. कायम पहिला नंबर . दहावीलासुद्धा तिने उत्तम गुण मिळवून , तिचा पहिला नंबर सोडला नाही. अतिशय साधी ,नम्र स्मिता.नावाप्रमाणेच तिच्या मुखावर स्मितहास्य विलसत असे ,आजही हे स्मितहास्य संसार आणि करिअर व्यवस्थित सांभाळून अगदी तसेच आहे. तिला कधी जोरात, मोठ्या आवाजांत बोलताना ऐकलेले नाही. अगदी मृदू स्वभाव . आज एका प्रथितयश कॉलेज मधून गणिताची प्राध्यापक म्हणून निवृत्त झाली तरीही स्मिता अगदी तशीच आहे शालेय जीवनांत होती तशीच.

हुशार स्मिताच्या अवती-भोवती आम्ही सर्व मैत्रिणी असायचो . तिच्या सहवासामुळे आमचाही बुध्यांक वाढेल अशी काहीशी माझी भाबडी समजूत होती.  गणित शिकायच्या निमित्ताने आणि एरवी सुद्धा तिच्या घरी कायम जाणे-येणे असायचे.स्मिता अगदी मनापासून आमच्या अभ्यासाच्या अडचणी सोडवायची. स्मिताचे एकत्र ,मोठे कुटुंब .  तिच्या आजी पासून सर्वांशीच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. विद्यार्थी  परिषदेचे  कार्यक्रम त्यांच्या  घराच्या  मोठ्या  गच्चीवरच  होत. त्यामुळे स्मिता आणि  देवस्थळी परिवाराशी आम्हा मैत्रिणींचा कायम संबंध यायचा . माझे  कुटुंबही काही ना काही निमित्ताने संपूर्ण देवस्थळी परिवाराशी  चांगले जोडले गेले होते. आमचे ऋणानुबंध घट्ट होते .  

मी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना  मला गणित विषय खूप अवघड जात होता. मैत्रीच्या नात्याने स्मिताने त्यावेळी मला खूपच मदत केली होती . त्यावेळी तिच्या मार्गदर्शनामुळे मी ही  परीक्षा पास झाले होते.स्मिता , आपल्या नात्यांत कधीच औपचारिकता नव्हती नाही का ? त्यात मैत्री , प्रेमच अधिक  होते. 

शालेय जीवनानंतर पुढचे उच्च शिक्षण,नोकरी व्यवसाय हा जीवनातील महत्वाचा टप्पा आपण ओलांडून आता यंग सिनिअर ची सेकंड इनिंग खेळण्यासाठी " तैयार " आहोत. आजपर्यंतच्याआयुष्यात आपण अनेक आनंदाचे क्षण अनुभवले असतील.तसेच काही दुःखाचे,अडचणींचे  प्रसंगही आले असतील . आता  निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य  शांत , स्थिर असेल अशी आशा आपण करूया. सध्याची प्रतिकूल परिस्थिती काही काळानंतर पूर्ववत  होऊन जीवन लवकरच सुरळीत होईल ,नाही का ?आजपर्यंतची  राहिलेली स्वप्ने पूर्णत्वाला न्यायची   कोणाची तयारी सुरु असेल.स्वप्नपूर्तीच्या वाटेवरच प्राप्त परिस्थितीत स्वतः आनंद मिळवायचा  आणि दुसर्यांनाही आनंदाचं देणं भरभरून द्यायचा प्रयत्न करूया ,झपाट्याने बदलत असलेल्या technology शी नाते अधिक घट्ट करताना  . नव्या पिढीच्या  नव्या तराण्याशी सूर जुळवत आपली वाटचाल चालू ठेवू. आता मिळालेल्या मोकळ्या  वेळेचेही.( व्हाट्स अँप आणि इतर सोशल मीडिया बघून मग जो उरेल तो वेळ )  योग्य  नियोजन करून आयुष्याचे सार्थक करू..   

चला तर मग .... अशा नव्या बदलांना  समर्थपणे सामोरं जाऊन  उर्वरित आयुष्य  सुखासमाधानाने व्यतीत करूया. हो आपले मैत्रीचे नातंही अधिक दृढ करूया. 

कवयित्री शांताबाई शेळक्यांच्या शब्दांत : 

मला वाटते गं नवा जन्म घेऊ । नवे श्वास गुंफू ,नवे गीत गाऊ 

जुना गांव राही कुठे दूर मागे । नव्या पावलांना नवा मार्ग देऊ ।।  नवा जन्म घेऊ... नवा जन्म घेऊ... 


तुमचीच  बालमैत्रीण ,

किशोरी विष्णु किंजवडेकर ( स्नेहा भाटवडेकर )

विलेपार्ले ,मुंबई 

११/०६/२०२१ 


1 comment:

  1. सु रे ख!!!
    जणू काही सर्वांचं मनोगत
    !

    ReplyDelete