Wednesday, February 3, 2021

स्वकर्म कुसुमांची माला

।। श्री शंकर  ।।

                                    स्वकर्म कुसुमांची माला

" बिकट वाट वहिवाट नसावी। धोपटमार्गा  सोडू नको " सर्वसाधारणपणे सामान्य जन  कोणतीही जोखीम न पत्करता साधारण मार्गाचा अवलंब करून जीवन सुखी करण्याचा ( जास्तीत जास्त  साधनसंपत्ती मिळवण्याचा  ) प्रयत्न करतात.  काही असाधारण व्यक्ती मात्र स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी बिकट मार्गानेच वाटचाल करतात, तोच त्यांचा जीवनमार्ग असतो. समाजाचे कल्याण  हेच त्यांचे ध्येय असते.  

कै . त्रिंबक हरी भाटवडेकर ह्यांचे कलाकार सुपुत्र प्रख्यात बासरीवादक कै. कमलाकांत भाटवडेकर ह्यांचे शालिन सुपुत्र " हेमंत भाटवडेकर " ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ह्या अवलियाचा थोडक्यात घेतलेला हा वेध ....   

 खरं तर हे अतिशय अवघड काम... अवघड अशासाठी कि त्यांच्या अथांग व्यक्तिमत्वाचा थांग आज ३८ वर्षे त्यांच्यासमवेत कायम राहूनही मला लागलेला नाही. " मी जन्माला आलो तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही घोटाळ्यात पडला असावा " मिश्किल हसत हेमंत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे त्रयस्थपणे पाहत टिप्पणी करतात. लग्नाआधी दक्षिण ध्रुवावर असलेले हेमंत नंतर स्वाभाविक वृत्तीने उत्तर ध्रुवावर प्रवेश करतात. अर्थात हेमंतच हि प्रांजळ कबुली देतात.   हेमंतच्या व्यष्टी आणि समष्टी धर्मात असलेली मोठी  तफावत हेही ह्याचे मुख्य कारण ...   हे हेमंत खरे कि ते असा प्रश्न पडावा !

  वैयक्तिक आयुष्यात कोणतीही गोष्ट ते गंभीरपणे मनावर घेत नाहीत. स्वतःचा व्यवसाय असो, कि अन्य काही .. . मात्र ह्याच्या बरोबर विरुद्ध स्थिती सामाजिक जीवनात ... अहोरात्र ते कामांत, विचारांत व्यग्र असतात. कठोर परिश्रम घेऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावण्यांत निमग्न असतात. त्यांच्या विशेष बुद्धिमत्तेची चमक ह्या सर्व प्रोजेक्टसमधे बघायला मिळते.

 सोलापूर ग्रामी ०२/०२/१९५७ रोजी जन्मलेले हे बालक जन्मानंतरची ५/६ वर्षे तिथेच वाढले. तिथल्या मातीची अनावर ओढ आजही त्याच्या मनात तेवढीच घट्ट रुजलेली आहे. सर्वच भाटवडेकर कुटुंबीय मुळात क्रीडाप्रेमी आणि कलाप्रेमी ( मुख्यतः संगीतकलेकडे सर्वांचा ओढा ). ती आवड हेमंतच्या नसानसांत आजही भिनलेली आहे. स्वतः कलाकार नसला तरी त्यांच्यात सुप्त रूपांत एका निष्णात कलावंताचे बीज दडलेले आहे. त्यांनी साकारलेले अनेक उपक्रम ह्याची साक्ष देतात. अनेक कलाकारांना, त्यांची कला-क्रीडा  वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारा, त्यांचे तोंड भरून कौतुक करणारा हेमंत ... 


सोलापूर नंतर पार्ल्यात कायम वास्तव्यास आल्यावर मोठ्या एकत्र कुटुंबात राहूनही "एकाकी,अलिप्त " राहणारा हेमंत. एकत्र कुटुंबात ज्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, कदाचित त्यातूनच त्यांचे मन संसारी जीवनांविषयी  सखोल विचारी झाले, उदासीन झाले. स्वतःच्या वाटचालीचा पाया ह्या चिंतनातून  रचला  आणि स्वतःचा वेगळा मार्ग त्यांनी स्वतंत्रपणे तयार केला. 

पार्ले टिळक ह्या प्रथितयश शाळेत आधी विद्यार्थी म्हणून आणि आता संचालक म्हणून शाळेशी असलेले नाते  अधिकाधिक दृढ आणि व्यापक होत गेले.  मॅट्रिक झाल्यावर पुढे बी. कॉम. आणि मग १९८२ साली अतिशय अवघड अशी C. A. ची परीक्षा देऊन अल्पावधीतच C. A. झाले. घरात खरंतर शैक्षणिक वाढीसाठी ( कलेची विशेष आवड  असल्यामुळे )  पोषक वातावरण नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हि पदवी प्राप्त करणारा भाटवडेकर आणि सासरच्या  कुटुंबातील एकमेव सदस्य . 

पारल्यासारख्या ठिकाणी स्वतःचे ऑफिस सुरु करून प्रॅक्टिसला जोरदार सुरुवात  झाली खरी .... पण खऱ्या अर्थाने हेमंत ह्या पोटापाण्याच्या व्यवसायांत कधीच रमले नाहीत.  हा व्यवसाय आजही त्याच सचोटीने  ३८ वर्षे चालू असला तरी त्यांचं कार्यक्षेत्र मुळात वेगळंच ... येणाऱ्या clients ना व्यावहारिक सल्ला देताना त्यांना मात्र लौकिक अर्थाने जीवन व्यवहार सांभाळणे जमले नाही. आज सगळं जग पैशाच्या ( लक्ष्मीच्या ) मागे धावताना हेमंतनी मात्र सरस्वतीची कास धरली आणि हा सरस्वतीपुत्र स्वतःच्या  शाळेच्या( पार्ले टिळक विद्यालय ) प्रांगणात इतका रमला कि शाळेसाठी तन - मन अर्पून  शाळेचा स्तर उंचावण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न सुरु झाले. . विविध  उपक्रम त्यांनी गेल्या अनेक वर्षांत राबविले आणि तेही अगदी निरपेक्षपणे, निःस्वार्थीपणे.  सतत ध्यास शाळेचा मी, माझे स्वास्थ्य ,माझे कुटुंब हा विचारही त्यांच्या मनांत येत नाही. 

शाळेप्रमाणेच पार्ल्यातील "पार्ले हिंदू देवालय मंडळ" ह्या संस्थेचे विश्वस्तपद भूषविताना असेच जीव ओतून अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने केलेले काम. तिथेही दैनंदिन कामकाजात  सुधारणा करून विविध उपक्रम गेल्या काही वर्षांत सुरु  केले आहेत. समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे तळागाळातील जनतेसाठी मदत कार्य सुरु आहे.  हा  सर्व कामाचा व्याप ते शांत राहून अगदी लीलया  पेलतात, कुठेही दिखाऊपणा नाही कि प्रसिद्धीचा हव्यास  नाही. हे सर्व त्यांना कसं काय साधतं हे  मला अद्याप  न उलगडलेलं कोडं आहे.

ह्याच कारण अर्थातच त्यांच्या मधील अनेक सत्व गुण . . " वैराग्य " हा अलंकार त्यांनी  परिधान केला आहे. एक सहप्रवासी म्हणून हेमंतच्या व्यक्तिमत्वात ठळकपणे काही उणीवाही जाणवतात. हेमंत खूप जिद्दी  आहेत . मितभाषी आहेत. स्वतःच्या मनातील विचार शेअर करायला ते विशेष उत्सुक नसतात.  त्यांच्या मनाचा तळ शोधणं ,विचारांचा अंदाज येणं खूप  कठीण  असते. 

  तरुण वयातच हेमंत त्यांच्या सासऱ्यांचे (कै .विष्णू पांडुरंग किंजवडेकर) पारमार्थिक अनुकरण करते झाले. " विष्णुसहस्र  नामाची " अखंड  साधना, सद्गुरूंच्या वचनावर  असलेला त्यांचा दृढ  विश्वास. सामाजिक जीवन आणि परमार्थ ह्याचा उत्तम समतोल साधताना हित / अहिताची जाणीव ठेवून शांततेच्या मार्गाने जीवन सफलतेचा प्रवास करत आहेत. अर्थात सफलतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी.  

ज्ञानेश्वरीतील  एक ओवी सुपरिचित आहे. " जयाचे ऐहिक धड नाही । तयाचे परत्र पुससी काई ।। " ध्येयनिष्ठ कर्ममार्गामुळे हेमंतनी त्यांची पुढची गती आधीच निश्चित केली आहे आणि म्हणूनच त्यांचे ऐहिक त्या ईश्वरानेच सांभाळले ह्या विचाराने मन भरून येते ( योगक्षेमं वहाम्यहं )  हाच त्यांच्या कार्याचा मिळालेला प्रसाद आहे असे वाटते. 

कोमल कायेप्रमाणेच मनानेही अतिशय भावनाप्रधान, संवेदनशील असलेले हेमंत. कोणताही उत्तम कलाविष्कार  अनुभवताना त्यांचे नेत्र अविरत पाझरतात. हे सर्व कार्य करताना अनेक मान -अपमान सहन करावे लागतात. कौतुकाचा शब्द अभावानेच वाट्याला येतो. काही वेळा पदरी निराशाच येते. त्यांच्या कोमल, दुखऱ्या  मनावर हळुवार फुंकर घालण्याचे काम मग माझे असते. त्यांच्या एवढ्या मोठ्या कार्यात माझा एवढाच काय तो सहभाग. 

 वाढत्या वयाबरोबर समाज कार्याची एव्हढी मोठी जबाबदारी पेलताना त्यांचा जीव काही वेळा थकून जातो. लोकांच्या अपेक्षांचा भार सहन करणे कठीण होते. अतिश्रमाने शरीर साथ देत नाही. " प्रीतीचा लाभलेला हा कल्पतरू ", त्याचा प्रेमाने, मायेने सांभाळ करण्याची  जबाबदारी  मी आनंदाने स्वीकारते. त्यांची सावली होऊनच राहते. 

स्वकर्म कुसुमांची माला अर्पण करून ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी सतत कार्यमग्न असणारे " कर्मयोगी हेमंत ", त्यांना निरामय आरोग्य लाभावे , त्यांचे इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने बळ द्यावे हीच सदिच्छा त्यांच्या वर्धापनदिनी व्यक्त करते ....  


स्नेहा ... 

०२/०२/२०२१







4 comments:

  1. किशोरी ताई,
    हेमंत च्या व्यक्तीतमत्वाचं चित्र रेखाटणार्या तुझ्या लेखणीच ही तितकंच कौतुक
    सुरेख

    ReplyDelete
  2. Atishay sudar taaee....khup chaan vyakt kelyas bhavana

    ReplyDelete
  3. Very well written & correctly described by you Really great

    ReplyDelete