Wednesday, June 25, 2025

महाकवी कालिदास विरचित : श्यामला दंडक स्तोत्र

       ।।  श्री शंकर  ।।

श्यामला दंडक स्तोत्र 

" षाढस्य प्रथम दिवसे " ... हा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. 

प्राचीन भारतांतील सर्वांत महान कवी आणि नाटककार म्हणून  संस्कृत वाङ्मयांत कालिदासाचे स्थान सर्वोच्च आहे. त्याच्या साहित्यांत सुंदर निसर्ग वर्णन आढळते. तसेच हिंदू पुराण  आणि तत्वज्ञानाचा मिलाफ दिसतो.   शाकुंतल, कुमारसंभवम , मेघदूत  आदी त्याचे साहित्य हे उत्कृष्ट प्रतिभेचे शिखर  आहे. कालिदासाचा  काळ हा चौथ्या - पाचव्या शतकातला आहे. पण त्याच्या साहित्याचा प्रभाव आजही जवळजवळ दोन हजार वर्षांनंतर जनमानसावर  दिसून येतो. 

मंडळी , आज सर्वजण महाकवी कालिदास , कविकुलगुरू  म्हणून त्याचा सन्मान करतात.पण  कालिदासाचा हा साहित्यसम्राटापर्यंत पोचण्याचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता बरं का ! त्याच्या ह्या प्रवासातील अनेक सुरस , रम्य कथा प्रसिद्ध आहेत. 

 धनगर जातीतला कालिदास , ( खरं तर त्याचं मूळ नांव , गांव ह्याची नक्की माहिती उपलब्ध नाही ) अक्षरशत्रू होता. गाईगुरे चरायला नेताना तो रस्त्यावर फिरत असे.  तिथल्या राजाची राजकन्या  फार अहंकारी होती  , तिला तिच्या विद्वत्तेचा खूप गर्व होता  ..  आपल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणाराच पती मला मिळावा अशी तिची अपेक्षा होती . अनेक विद्वानाना सुद्धा ती पती म्हणून  नाकारते. शेवटी प्रधानजी म्हणतात एखादा  अक्षरशत्रूच हिला पती म्हणून मिळावा. कालिदास रानांत गुराखी म्हणून गुरांना चरण्यासाठी नेत  असताना  प्रधानजी त्याच्या जवळ जातात. त्याला राजपुत्राचा पोशाख घालून राजकन्येचा विवाह त्याच्याशी लावून देतात .विवाहापूर्वी राजकन्या कालिदासाची परीक्षा घेते.  कालिदास मानेनेच राजकन्येच्या प्रश्नांची हो / नाही उत्तरे देतो  , त्याची बरीचशी   उत्तरे नेमकी बरोबर येतात . राजकन्येला वाटते  हा खूप हुषार  ,व्यासंगी आहे.विवाहानंतर तिला कळून चुकतं की आपला पती निरक्षर आहे.त्याला " साहित्य " म्हणजे काय हेही माहित नाही. हे समजताच राजकन्या त्याची खूप निर्भत्सना करते. आणि राजमहालातून  त्याला बाहेर काढते. कालिदास हा अपमान सहन करून  तिथून निघून  जातो. तो थेट कालीमातेचे मंदिरात पोचतो. तिथे तो तिची दीर्घ काळ  घोर उपासना करतो . जोपर्यंत देवी संतुष्ट होत नाही तोपर्यंत तो स्वतःला तिथे कोंडून घेतो.  त्याची श्रद्धा आणि निष्ठा बघून कालीमाता त्याच्यावर अतिशय प्रसन्न होते. कालीमाता त्याला विचारते, तुला काय हवं ? कालिदास अतिशय नम्रपणे म्हणतो , मी निरक्षर आहे.तू सरस्वती रूपाने  माझ्या जिव्हाग्री  वसती कर .  सरस्वती त्याची इच्छा पूर्ण करते. वाणीचा विलास करणारी " वाग्विलासिनी " त्याच्यावर कृपेचा वर्षाव करते. कालीचा  उपासक म्हणून ते  - कालीचा सेवक - काली दास - कालिदास " नांव धारण करतात  . तिच्या कृपेला पात्र ठरल्यावर कालिदास  तिचे  स्तुतीपर कवन  रचतो. तेच  " श्यामला दंडक " स्तोत्र .

 आजच्या दिवसाचे औचित्य साधून ह्या स्तोत्राचा  थोडा परिचय करून देत आहे.  हे स्तोत्र अतिशय नादमय , रसाळ , अनुप्रासयुक्त आहे.अनेक उपमा आणि रूपकांचे प्रयोग  महाकवी कालिदासांनी इथे  केले आहेत.  .  

मी गेल्या वर्षी प्रथमच  हे स्तोत्र  ऐकले .  त्या स्तोत्राची मोहिनी जबरदस्त होती. हे स्तोत्र मोठे आहे.  संस्कृत भाषा आणि कालिदासाचे शब्दसामर्थ्य. त्यामुळे  म्हणायला अवघड. एकेक पल्लेदार वाक्य म्हणताना श्वास रोखून  धरावा लागतो. ( Breathless ) पण तरीही  हे स्तोत्र नियमितपणे  म्हणण्याचा प्रघात ठेवला आहे . 

दंडक हा एक छंद आहे. त्यात १० मात्रl  असतात. काही वेळा ओळीत २६ पेक्षा जास्त अक्षरे असतात. लयबद्ध , प्रभावशाली असा हा छंद आहे. स्तोत्र पठाण करताना त्या नादब्रह्मात आपणही  तल्लीन होतो. 

स्तोत्रांतील पहिल्या ४  चरणांत देवीचे नमन केले आहे.  देवीच्या विभिन्न रूप आणि गुणांचे यथार्थ  वर्णन केले आहे. विश्वाच्या सर्व वस्तुमात्रात असलेले तिच्या  अस्तित्वाचे , सर्वसर्वात्मिके , वर्णन आहे . शेवटी तिचा जयजयकार करून तिची कृपा संपादन व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे.  अशी ह्या स्तोत्राची ढोबळ रचना. 

सरस्वती देवीचे सौंदर्य , तिची शक्ती , तिची कृपा ह्याचे अतिशय समर्थ शब्दांत  वर्णन केले आहे. श्यामला म्हणजे नीलवर्णी अशी ही  देवी कदंब वनांत वास करते. पृथ्वी हेच तिचे आसन आहे. नीलमण्याप्रमाणे तिचे मुख सुंदर , तेजस्वी आहे. ती शुकप्रिया आहे. तिच्या कपाळावर कस्तुरी तिलक आहे. हातात कमलपुष्प आहे. तिची दंतपंक्ती म्हणजे जणू चमेलीच्या पुष्पांची मालाच .तिचे कटिसूत्र कामदेवाच्या धनुष्यापेक्षाही अधिक  उजवे आहे.. आकर्षक आणि लयबद्ध  अशी तिची चाल  ,( चांदणे उधळीत जाशी चालता  तू चंचले .. ह्या काव्यपंक्तींची आठवण इथे होते ) . अशा अनेक उपमा इथे मुक्तहस्ताने उधळल्या आहेत. पठण करताना ते काव्य अतिशय मधुर आणि रंजक वाटते. वानगीदाखल त्यांतील  काही ओळी उद्धृत केल्या आहेत ... 

" सर्वसिद्ध्यात्मिके कालिके मुग्धमन्दस्मितोदारवक्त्रस्फुरत् पूगताम्बूलकर्पूरखण्डोत्करे ज्ञानमुद्राकरे सर्वसम्पत्करे पद्मभास्वत्करे श्रीकरे, कुन्दपुष्पद्युतिस्निग्धदन्तावलीनिर्मलालोलकल्लोलसम्मेलन स्मेरशोणाधरे चारुवीणाधरे पक्वबिम्बाधरे " 

शारदा  ही संगीत , कला , ज्ञानाची देवी .. ती वीणा , पुस्तक धारिणी आहे. शीतलता , शांतता प्रदान करणारी आहे.  समस्त कलांची मूर्ती आहे. तीनही लोकांत ती पूजनीय आहे. इंद्र, यक्ष , गंधर्व ,ऋषी , तपस्वी, साधू तिची पूजा करतात. सर्वाना क्रियाशील करण्याचे सामर्थ्य  तिच्यात आहे. 

" पंचबाणात्मिके " पंचबाण धारण करणारी ( शब्द, स्पर्श, रूप ,रस गंध ह्या पांच तन्मात्रा ) ही जगन्मातृका . अखिल विश्वाची  ही जननी.ही  प्रेमदेवता आहे. मन्मथ आणि रतीदेवी  वसंत ऋतूच्या आगमनसमयी हिची पूजा करतात.   

कलावंतांना सुयश प्राप्त करून देणारी ही  विश्वमोहिनी आहे.  संसारी लोकांच्या सर्व कामना पुरविणारी, त्यांना धन- सुख प्रदान करणारी देवता. 

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ह्या वाग्विलासिनीचे सौंदर्य त्यांच्या नमनाच्या  ओव्यांमध्ये प्रकट केले आहे. माऊली म्हणतात : ती सृजनाची देवता आहे. वाणीविलास करणारी , वाणी नियंत्रित करणारी , चतुर आणि सहज क्रीडा करणारी आहे. 

संतकवी दासगणू महाराजांनी तिची कृपा झाली असता  " मुकाही वदे  वेदांत गहन " असे सरस्वतीचे वर्णन केले आहे. 

तिची कृपा प्राप्त झाल्यावर कालिदासाचे व्यक्तिमत्व किती प्रभावी झाले हे आपण जाणतोच.

 तेलंगणा प्रांतातील " बासर " येथील सुप्रसिद्ध शारदेच्या प्रागंणात काही दिवसांपूर्वी माझ्या काही गीताव्रती सख्यांबरोबर  हे स्तोत्र पठण करण्याची संधी मिळाली. त्या स्तोत्राची शक्ती, दिव्यत्वाची अनुभूती घेता आली.

ह्या दिव्य शक्तीचा अनुभव घेऊन आपले जीवनही क्रियात्मक आणि कलात्मक व्हावे अशी ,शरदांतील पूर्णबिंब चंद्राप्रमाणे विकसित मुख असलेल्या , परब्रह्मस्वरूपिणी शारदा  मातेला मनोभावें  प्रार्थना :
सर्वसर्वात्मिके ! हे जगन्मातृके , पाही मां  , पाही मां , पाही मां ... 
 देवी तुभ्यं नमो । देवी तुभ्यं नमो । देवी तुभ्यं नम: ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई 

आषाढ शु. प्रतिपदा शके १९४७ 


https://vignanam.org/samskritam/shyamala-dandakam.html

( स्तोत्राची लिंक दिली आहे. )  

1 comment:

  1. शारदास्तुती आवडली.कालिदासदिनाचे महात्म्य सांगत दिलेली शामलादंडक स्तोत्राची माहिती बहुमोल वाटली.धन्यवाद.

    ReplyDelete