Wednesday, June 25, 2025

महाकवी कालिदास विरचित : श्यामला दंडक स्तोत्र

       ।।  श्री शंकर  ।।

श्यामला दंडक स्तोत्र 

" षाढस्य प्रथम दिवसे " ... हा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. 

प्राचीन भारतांतील सर्वांत महान कवी आणि नाटककार म्हणून  संस्कृत वाङ्मयांत कालिदासाचे स्थान सर्वोच्च आहे. त्याच्या साहित्यांत सुंदर निसर्ग वर्णन आढळते. तसेच हिंदू पुराण  आणि तत्वज्ञानाचा मिलाफ दिसतो.   शाकुंतल, कुमारसंभवम , मेघदूत  आदी त्याचे साहित्य हे उत्कृष्ट प्रतिभेचे शिखर  आहे. कालिदासाचा  काळ हा चौथ्या - पाचव्या शतकातला आहे. पण त्याच्या साहित्याचा प्रभाव आजही जवळजवळ दोन हजार वर्षांनंतर जनमानसावर  दिसून येतो. 

मंडळी , आज सर्वजण महाकवी कालिदास , कविकुलगुरू  म्हणून त्याचा सन्मान करतात.पण  कालिदासाचा हा साहित्यसम्राटापर्यंत पोचण्याचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता बरं का ! त्याच्या ह्या प्रवासातील अनेक सुरस , रम्य कथा प्रसिद्ध आहेत. 

 धनगर जातीतला कालिदास , ( खरं तर त्याचं मूळ नांव , गांव ह्याची नक्की माहिती उपलब्ध नाही ) अक्षरशत्रू होता. गाईगुरे चरायला नेताना तो रस्त्यावर फिरत असे.  तिथल्या राजाची राजकन्या  फार अहंकारी होती  , तिला तिच्या विद्वत्तेचा खूप गर्व होता  ..  आपल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणाराच पती मला मिळावा अशी तिची अपेक्षा होती . अनेक विद्वानाना सुद्धा ती पती म्हणून  नाकारते. शेवटी प्रधानजी म्हणतात एखादा  अक्षरशत्रूच हिला पती म्हणून मिळावा. कालिदास रानांत गुराखी म्हणून गुरांना चरण्यासाठी नेत  असताना  प्रधानजी त्याच्या जवळ जातात. त्याला राजपुत्राचा पोशाख घालून राजकन्येचा विवाह त्याच्याशी लावून देतात .विवाहापूर्वी राजकन्या कालिदासाची परीक्षा घेते.  कालिदास मानेनेच राजकन्येच्या प्रश्नांची हो / नाही उत्तरे देतो  , त्याची बरीचशी   उत्तरे नेमकी बरोबर येतात . राजकन्येला वाटते  हा खूप हुषार  ,व्यासंगी आहे.विवाहानंतर तिला कळून चुकतं की आपला पती निरक्षर आहे.त्याला " साहित्य " म्हणजे काय हेही माहित नाही. हे समजताच राजकन्या त्याची खूप निर्भत्सना करते. आणि राजमहालातून  त्याला बाहेर काढते. कालिदास हा अपमान सहन करून  तिथून निघून  जातो. तो थेट कालीमातेचे मंदिरात पोचतो. तिथे तो तिची दीर्घ काळ  घोर उपासना करतो . जोपर्यंत देवी संतुष्ट होत नाही तोपर्यंत तो स्वतःला तिथे कोंडून घेतो.  त्याची श्रद्धा आणि निष्ठा बघून कालीमाता त्याच्यावर अतिशय प्रसन्न होते. कालीमाता त्याला विचारते, तुला काय हवं ? कालिदास अतिशय नम्रपणे म्हणतो , मी निरक्षर आहे.तू सरस्वती रूपाने  माझ्या जिव्हाग्री  वसती कर .  सरस्वती त्याची इच्छा पूर्ण करते. वाणीचा विलास करणारी " वाग्विलासिनी " त्याच्यावर कृपेचा वर्षाव करते. कालीचा  उपासक म्हणून ते  - कालीचा सेवक - काली दास - कालिदास " नांव धारण करतात  . तिच्या कृपेला पात्र ठरल्यावर कालिदास  तिचे  स्तुतीपर कवन  रचतो. तेच  " श्यामला दंडक " स्तोत्र .

 आजच्या दिवसाचे औचित्य साधून ह्या स्तोत्राचा  थोडा परिचय करून देत आहे.  हे स्तोत्र अतिशय नादमय , रसाळ , अनुप्रासयुक्त आहे.अनेक उपमा आणि रूपकांचे प्रयोग  महाकवी कालिदासांनी इथे  केले आहेत.  .  

मी गेल्या वर्षी प्रथमच  हे स्तोत्र  ऐकले .  त्या स्तोत्राची मोहिनी जबरदस्त होती. हे स्तोत्र मोठे आहे.  संस्कृत भाषा आणि कालिदासाचे शब्दसामर्थ्य. त्यामुळे  म्हणायला अवघड. एकेक पल्लेदार वाक्य म्हणताना श्वास रोखून  धरावा लागतो. ( Breathless ) पण तरीही  हे स्तोत्र नियमितपणे  म्हणण्याचा प्रघात ठेवला आहे . 

दंडक हा एक छंद आहे. त्यात १० मात्रl  असतात. काही वेळा ओळीत २६ पेक्षा जास्त अक्षरे असतात. लयबद्ध , प्रभावशाली असा हा छंद आहे. स्तोत्र पठाण करताना त्या नादब्रह्मात आपणही  तल्लीन होतो. 

स्तोत्रांतील पहिल्या ४  चरणांत देवीचे नमन केले आहे.  देवीच्या विभिन्न रूप आणि गुणांचे यथार्थ  वर्णन केले आहे. विश्वाच्या सर्व वस्तुमात्रात असलेले तिच्या  अस्तित्वाचे , सर्वसर्वात्मिके , वर्णन आहे . शेवटी तिचा जयजयकार करून तिची कृपा संपादन व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे.  अशी ह्या स्तोत्राची ढोबळ रचना. 

सरस्वती देवीचे सौंदर्य , तिची शक्ती , तिची कृपा ह्याचे अतिशय समर्थ शब्दांत  वर्णन केले आहे. श्यामला म्हणजे नीलवर्णी अशी ही  देवी कदंब वनांत वास करते. पृथ्वी हेच तिचे आसन आहे. नीलमण्याप्रमाणे तिचे मुख सुंदर , तेजस्वी आहे. ती शुकप्रिया आहे. तिच्या कपाळावर कस्तुरी तिलक आहे. हातात कमलपुष्प आहे. तिची दंतपंक्ती म्हणजे जणू चमेलीच्या पुष्पांची मालाच .तिचे कटिसूत्र कामदेवाच्या धनुष्यापेक्षाही अधिक  उजवे आहे.. आकर्षक आणि लयबद्ध  अशी तिची चाल  ,( चांदणे उधळीत जाशी चालता  तू चंचले .. ह्या काव्यपंक्तींची आठवण इथे होते ) . अशा अनेक उपमा इथे मुक्तहस्ताने उधळल्या आहेत. पठण करताना ते काव्य अतिशय मधुर आणि रंजक वाटते. वानगीदाखल त्यांतील  काही ओळी उद्धृत केल्या आहेत ... 

" सर्वसिद्ध्यात्मिके कालिके मुग्धमन्दस्मितोदारवक्त्रस्फुरत् पूगताम्बूलकर्पूरखण्डोत्करे ज्ञानमुद्राकरे सर्वसम्पत्करे पद्मभास्वत्करे श्रीकरे, कुन्दपुष्पद्युतिस्निग्धदन्तावलीनिर्मलालोलकल्लोलसम्मेलन स्मेरशोणाधरे चारुवीणाधरे पक्वबिम्बाधरे " 

शारदा  ही संगीत , कला , ज्ञानाची देवी .. ती वीणा , पुस्तक धारिणी आहे. शीतलता , शांतता प्रदान करणारी आहे.  समस्त कलांची मूर्ती आहे. तीनही लोकांत ती पूजनीय आहे. इंद्र, यक्ष , गंधर्व ,ऋषी , तपस्वी, साधू तिची पूजा करतात. सर्वाना क्रियाशील करण्याचे सामर्थ्य  तिच्यात आहे. 

" पंचबाणात्मिके " पंचबाण धारण करणारी ( शब्द, स्पर्श, रूप ,रस गंध ह्या पांच तन्मात्रा ) ही जगन्मातृका . अखिल विश्वाची  ही जननी.ही  प्रेमदेवता आहे. मन्मथ आणि रतीदेवी  वसंत ऋतूच्या आगमनसमयी हिची पूजा करतात.   

कलावंतांना सुयश प्राप्त करून देणारी ही  विश्वमोहिनी आहे.  संसारी लोकांच्या सर्व कामना पुरविणारी, त्यांना धन- सुख प्रदान करणारी देवता. 

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ह्या वाग्विलासिनीचे सौंदर्य त्यांच्या नमनाच्या  ओव्यांमध्ये प्रकट केले आहे. माऊली म्हणतात : ती सृजनाची देवता आहे. वाणीविलास करणारी , वाणी नियंत्रित करणारी , चतुर आणि सहज क्रीडा करणारी आहे. 

संतकवी दासगणू महाराजांनी तिची कृपा झाली असता  " मुकाही वदे  वेदांत गहन " असे सरस्वतीचे वर्णन केले आहे. 

तिची कृपा प्राप्त झाल्यावर कालिदासाचे व्यक्तिमत्व किती प्रभावी झाले हे आपण जाणतोच.

 तेलंगणा प्रांतातील " बासर " येथील सुप्रसिद्ध शारदेच्या प्रागंणात काही दिवसांपूर्वी माझ्या काही गीताव्रती सख्यांबरोबर  हे स्तोत्र पठण करण्याची संधी मिळाली. त्या स्तोत्राची शक्ती, दिव्यत्वाची अनुभूती घेता आली.

ह्या दिव्य शक्तीचा अनुभव घेऊन आपले जीवनही क्रियात्मक आणि कलात्मक व्हावे अशी ,शरदांतील पूर्णबिंब चंद्राप्रमाणे विकसित मुख असलेल्या , परब्रह्मस्वरूपिणी शारदा  मातेला मनोभावें  प्रार्थना :
सर्वसर्वात्मिके ! हे जगन्मातृके , पाही मां  , पाही मां , पाही मां ... 
 देवी तुभ्यं नमो । देवी तुभ्यं नमो । देवी तुभ्यं नम: ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई 

आषाढ शु. प्रतिपदा शके १९४७ 


https://vignanam.org/samskritam/shyamala-dandakam.html

( स्तोत्राची लिंक दिली आहे. )  

Saturday, April 19, 2025

नमामी देवी नर्मदे...

                            ।।  श्री शंकर ।। 


                            नमामी  देवी नर्मदे


चैत्र महिन्यातील विशेष पुण्यदायी मानल्या गेलेल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही म्हणजे माझी मैत्रीण स्मिता आणि इतर परिक्रमावासी गुजरात मधील  तिलकवाडा येथे जमलो होतो.बांद्रा बरोडा तिलकवाडा असा प्रवास करून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी ७ वाजता पोचलो. एक दिवसाची ही  परिक्रमा साधारण २१ कि. मी. पायी करायला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ७ ते ८ तास लागतात. ही  परिक्रमा उत्तर तट ते दक्षिण तट आणि पुन्हा उत्तर तटावर येणे अशी वर्तुळाकार असते. 

 सलग आलेल्या सुट्टयांमुळे परिक्रमा मार्गावर खूप गर्दी आहे असे समजल्यामुळे जेवण झाल्यावर परिक्रमेचा संकल्प करून आम्ही अजिबात विश्रांती न घेता  रात्री ११.३० वाजताच परिक्रमेला उत्तरतटावरून  सुरुवात केली. 

वाटेत लागणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेत मजल दरमजल करत  आम्ही आता मैयेच्या किनाऱ्यावर येऊन पोचलो होतो.मैयेचे पात्र मोठे होते. नुकतीच पौर्णिमा झाली होती. आकाशातील  पूर्ण  चंद्राचे प्रतिबिंब नदीत पडले होते. चंद्राची शांत शीतल साथ चालताना मनामध्ये आनंदाच्या लाटा उसळवित होती. चालत होतो तो  रस्ता मातीचा , सरळ आणि मोठा होता. आजूबाजूला बरेच भिक्षेकरी रात्रीची वेळ असूनही भिक्षा मागत होते. मार्गक्रमण  करीत आम्ही नंदीघाटावर पोचलो. तिथे विविध मोठ्या आकारातील  शिवलिंगे खास परिक्रमेच्या निमित्ताने  बनविली होती . अनेक भक्त ह्या ठिकाणी फोटो घेण्यात मग्न होते. इथूनच पुढे आता बोटीने उत्तर तट ओलांडून रामपूरा  इथे म्हणजे दक्षिण तटावर जायचे होते. जवळजवळ अर्धी परिक्रमा मैयेच्या कृपेमुळे पार पडली होती. 

हळूहळू रात्रीचा अंधार विरघळत होता.  सगळा  आसमंत केशरमिश्रित लाल भगवा होऊ लागला  होता . चराचर सृष्टी अरुणोदयाच्या प्रतीक्षेत होती. नर्मदा  मैयेचा उत्तरतट पार करून आम्ही परिक्रमावासी आता माईच्या अगदी निकट आलो होतो.तट परिवर्तन केल्यावर प्रथम स्नान केले. नर्म आणि शर्म असे नर्मदा नदीचे केलेले वर्णन अगदी योग्यच आहे. उदरांत क्रूर आणि अजस्त्र मगरींना  आश्रय देऊनही ती माउली अगदी शांतपणे वाहात  असते. नर्मदा कन्या  रूपांत प्रगट  झाली आहे. तरीही ही  बालिका अवखळ नाही तर धीर गंभीर आहे. 

 माईच्या  स्पर्शाची ऊब अनुभवायला आता आम्ही उत्सुक होतो. किनाऱ्यावरच पथारी  पसरून बरोबर आणलेले पूजेचे सर्व साहित्य मी बाहेर काढले. हळदीकुंकू वाहून मातेची साडी चोळीने ओटी भरली. प्रसाद दाखविला. अलगद तिच्या पात्रांत दीप सोडले. दिव्याची ज्योत प्रज्वलित करताना प्रत्येक दिव्याबरोबर त्या त्या व्यक्तीच्या आठवणीने उर भरून येत होता. हेलकावे खात दिवे लांब वरच्या प्रवासाला निघाले होते. साश्रू नयनांनी मी ते मनोहर दृश्य डोळ्यांत सामावून घेत होते. 

घाटावर अनेक भाविकांची गर्दी झाली होती.कोणालाच वेळकाळाचे भान नव्हते.  सगळेच मय्येचे पूजन करण्यात मग्न होते. सेवेकऱ्यांचे अनेक स्टॉल बाजूला होते आणि परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी चहा , नाश्ता विनामूल्य पुरवत होते. त्यांच्या सेवाभावाला  आणि डोळ्यात तेल घालून स्वतःचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना मनोमन वंदन  करून आता पुढची वाट चालायला सुरवात केली . आधीचे  अंतर माऊलीचा पदर धरून कसे पार झाले ते कळलेही नाही. आता पुढचे काही  अंतर पक्क्या सडकेवरून पार करायचे होते. 

ह्या मार्गावर दुतर्फा हिरव्यागार केळीच्या दाट  बागा नजरेस पडत होत्या.कच्ची केळी , केळफूल आणि केळीची भलीमोठी पाने...केळीच्या वासाने हवेत एक वेगळाच गंध  पसरला होता. कापसाची झाडेही बरीच होती.  अधून मधून तयार झालेल्या कापसाच्या बोन्डातून शुभ्र कापूस बाहेर डोकावत होता.रस्त्यावर अनेक भलेमोठे वटवृक्ष दिसले. अनेक लोम्बणाऱ्या पारंब्या रस्त्याला स्पर्श करत होत्या. ध्यानस्थ ऋषींप्रमाणे हे वटवृक्ष साधनेला बसले आहेत असे वाटत होते.  वाटेत छोटी छोटी  गांवे ,अनेक देवळे आणि आश्रम होते. वाटेवर बसलेल्या  निराधार स्त्रिया लहान मुलांना घेऊन त्या आड वेळीही आमच्याकडे मदतीची याचना करीत होत्या. जमेल तशी मदत करत  आम्ही पुढे पुढे चालत होतो.  टाळ आणि नाम गजरांत  अनेक समूह परिक्रमेची वाट तल्लीन होऊन चालत होते. आता आमच्या  पायांची गती  हळूहळू कमी कमी होऊ लागली. पायातली चेतना हरवल्यासारखे पाय जड झाले होते. पण मनातल्या मनांत भोले - शंकर आणि नर्मदे हर चा जप चालू होता. तोच जप मार्गक्रमण करण्यासाठी बळ देत होते. 

सीताराम बापूंच्या आश्रमात पोचलो तेव्हा तिथे घंटानाद चालू होता.तिथल्या मंदिरात  हनुमानाचे दर्शन घेतले. चहा घेऊन थोडी तरतरी आली आणि पायऱ्या उतरून पुन्हा माईच्या प्रवाहाबरोबर पाऊले पुढची वाट चालू लागली. परिक्रमेचा पुढचा आणि शेवटचा दोन कि.मी.चा टप्पा आता समोर दिसत होता. पण हा अंतिम मार्ग आक्रमित करायला जरा जास्तच वेळ लागला. पलीकडच्या तटावर जाण्यासाठी भव्य कमान भाविकांच्या सेवेसाठी उभारली होती. प्रातःसमयीची आरती घाटावर चालू होती. धूप दीपांचा संमिश्र वास दरवळत होता. बरेच चालल्यामुळे झालेली थकावट  सर्वांच्याच चेहेऱ्यावर दिसत असली तरी परिक्रमा पूर्ण करण्याचा उत्साह आणि जिद्दही  दिसत होती. वयस्कर मंडळींबरोबरच तरुण जोडपी मुलाबाळांसहित सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला. 

दक्षिण तट ओलांडून आम्ही आता पुन्हा तात्पुरत्या  बांधलेल्या पुलावरून  उत्तर तटावर पोचलो होतो.  समोर पायऱ्या पायऱ्यांची डोंगरावरील वाट दिसत होती. पण हे अंतर पार करणे सुद्धा आता कष्टाचे वाटत होते.  'जड झाले ओझे ' स्वतःचेच ओझे वाहून नेणे आता नकोसे वाटत होते. पण मैंयेने दिलेल्या बळावर  आम्ही वासुदेव कुटीर ह्या पवित्र वास्तूत प्रवेश केला आणि रामदास स्वामी स्थापित हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो.तिथेच प. पू .वासुदेवानंद सरस्वती स्वामींचेही दर्शन घेतले.आम्ही इतके दमलो होतो की आता इथून अजिबात हलूच  नये असे वाटत होते. पण थोडी विश्रांती आणि चहा नाश्ता घेऊन परत मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. इथे आल्यावर नर्मदा माईचे प्रतिकात्मक पूजन म्हणजेच  ११ कन्यांचे पूजन केले आणि आमच्या परिक्रमेची सांगता झाली. 

नर्मदा मैंयेच्या कृपेमुळेच सुमारे २१ कि. मी. चा परिक्रमा मार्ग आम्ही आठ तासात पूर्ण केला होता. आणि असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करता आली , ह्याचा आनंद मनात दाटून आला होता. परिक्रमेला निघण्यापूर्वी साशंक असलेले मन आता निश्चिन्त झाले होते. आणि मैयेवरची श्रद्धा दृढतम झाली होती. तिच्याविषयी कृतज्ञता मनात दाटून आली .तिच्या प्रत्येक बिंदूत असलेले शिवतत्व जाणताना , तिचा  शांत प्रवाह  नजरेत साठवतांना ती दुःख निवारण करणारी देवी कित्येकांची आश्रयदाती  आहे हे समजून  मुखातून सहजोद्गार निघाले ... 

 " त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे "

ह्या पुण्यप्रद , मनोहारी तीर्थाची परिक्रमा करताना अनोख्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. इतके अंतर चालण्याची   खरं तर आपली शारीरिक आणि मानसिक पात्रता नसते.  सर्व भार तिच्यावर  सोडून , तिला शरण जाऊन सत्संकल्पाने बिकट वाट सुलभ कधी होते ह्याची जाणीवही तिच्या काठावरून तिच्या सोबतीने  चालताना होत नाही. अंगवळणी पडलेल्या शहरी जीवनाची झूल तिच्या सहवासात गळून पडते आणि तनामनाने आपण फक्त  तिचे होऊन जातो. 

रोजचे जीवन जगताना सुद्धा हेच परमेश्वराचे अस्तित्व , श्रेष्ठत्व आणि कर्तृत्व मान्य करून त्याचा हात धरून जीवनाची परिक्रमा केली तर सगळेच क्लेश मिटतील नाही का ?

जगताचे जीवन सुसह्य करणाऱ्या ह्या नद्यांचे  पावन आशीर्वाद ह्या निमित्ताने घ्यावेत , आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे आणि जीवन आनंदी व्हावे हीच नर्मदा मातेकडे प्रार्थना... 

नमामी  देवी नर्मदे । नमामी  देवी नर्मदे ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

१९/०४/२०२५


Tuesday, January 14, 2025

चल, चल मेरे भाई

       || श्री शंकर ||


 चल, चल मेरे भाई 


नवीन कॅलेण्डर  वर्ष येतं ते नवीन संकल्प घेऊनच.वातावरणातील आल्हाददायी गारवा अधिकच उत्साह निर्माण करणारा . त्यात विलेपार्ले सारख्या मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीत ,रविवार ,सुट्टीचा दिवस असला की अनेक कार्यक्रम खुणावत असतात.

विलेपार्ले पूर्व येथे जेष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन आयोजित केलेली असते, पार्ले टिळक शाळेच्या भव्य पटांगणावर " कौशिकीच्या" मधुर स्वर मंडळाचे जबरदस्त आकर्षण असते आणि असेच अनेक रंगतदार कार्यक्रम आपल्या आयुष्यात रंग भरत असतानाच, काही संस्था सामाजिक जाणिवेतून काही उपक्रम लोकहितासाठी राबवतात.

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून , पार्ले पश्चिमेला असलेल्या स्वामी विवेकानंद मार्गावर आयोजित केलेल्या एका " वॉक " ने माझे लक्ष वेधुन घेतले.

" Walk for the social cause " -- to enhance the quality of life in Mumbai...

"Project Mumbai " ह्या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने हा वॉक सकाळी १० वाजता सुरू झाला.एक तासाच्या ह्या वॉकमधे रस्त्यावर चालताना मुंबईकरांना अनेक समस्यांना जे तोंड द्यावे लागते त्यांची नव्याने ओळख झाली.



रस्त्यावर जागोजागी थांबून तिथल्या रस्ते आणि पदपथांच्या बिकट अवस्थेची जाणीव करून देणाऱ्या आमच्या ग्रुप लिडरला पाहून अनेक जण उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे ह्या वॉकमधे सहभागी झाले.

मुंबई उपनगरातील " स्वामी विवेकानंद मार्ग " हा सर्वात लांब रस्ता ( २३.६ कि.मी.) आहे.अतिशय गजबजलेल्या, वर्दळीच्या ह्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक इमारती, ऑफिसेस, दुकाने, मॉल्स तर आहेतच पण शाळा,विद्यालये, महाविद्यालय,देवळे,चर्च ,हॉस्पिटल आहेत.त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयस्कर, रूग्ण इ.ची ये-जा सतत चालूच असते.त्यातच सध्या अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकासाची , रस्त्यांचे कॉक्रिटीकरण इ .  कामेही वेगाने सुरू आहेत.

अशा वेळी गर्दीचे लोंढे चुकवत, रहदारीतून वाट काढत स्वतःच्या जीव कसाबसा वाचवत पादचारी मार्गक्रमण करत असतात .त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या फुटपाथांची अवस्था , रस्त्यांप्रमाणेच दयनीय आहे.अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.पेव्हर ब्लॉक वरखाली झाले आहेत.एका ठिकाणी तर एक मोठे स्कॅफोल्डिंग बिल्डरने अगदी फुटपाथवरच उभे केले आहे. धार्मिक स्थळे , जी एक  संवेदनशील गोष्ट, त्यांनी जागा व्यापली आहे. फुटपाथवरच बसथांबे ही आहेत. ह्या थांब्यावर काही जणांनी स्वतःचा चक्क संसारही थाटला आहे.

रस्त्यावर चालताना किंवा तो ओलांडताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीच दिसत असतात  , पण आपण त्याकडे बघूनही दुर्लक्ष करतो.आहे त्याचा स्वीकार करून पुढे जातो. हे सर्व नित्याचे असल्याने अंगवळणी पडले आहे किंवा हे असेच असणार,आपण सामान्य नागरिक , आपण काय करणार असा विचार करून ह्या गोष्टींना गृहीतच धरले आहे.   रस्त्यावरून चालताना होणाऱ्या अनेक अपघाताच्या घटना (जोपर्यंत आपल्यावर कठीण प्रसंग ओढवत नाही) वर्तमानपत्रांत वाचतो पण  आपण त्याकडे गांभीर्याने बघत नाही.

पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते हा आपला अधिकार नाही का ? त्यासाठी नागरिकांनी प्रशासनावर दबाव आणला तर त्यातून काही चांगला मार्ग निघेल का ? इतर नागरिक ह्या मोहिमेत सहभागी होऊन हा प्रकल्प यशस्वी करु शकतील का ? असे अनेक मुद्दे ह्या वॉकच्या निमित्ताने highlight झाले.

स्वामीजी म्हणतात " We aim to channel our hard work into serving humanity" ... त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दाखविलेल्या प्रकाशवाटा उजळून निघाव्या...हीच प्रेरणा घेऊन ,जबाबदार नागरिक ह्या नात्याने,  मुंबईतील अनेक समस्यांना नुसते सामोरे जाण्याऐवजी त्यावर उपाययोजना करण्याऱ्या संस्थांना आपल्या परीने मदत करणे ही आपलीही जबाबदारी नाही का ? असा विचार  मनाशी बाळगून अशाच उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भेटायचं ठरवून समूहाचा निरोप घेतला.


 सौ.स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले, मुंबई 

१४/०१/२०२५