Saturday, April 19, 2025

नमामी देवी नर्मदे...

                            ।।  श्री शंकर ।। 


                            नमामी  देवी नर्मदे


चैत्र महिन्यातील विशेष पुण्यदायी मानल्या गेलेल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही म्हणजे माझी मैत्रीण स्मिता आणि इतर परिक्रमावासी गुजरात मधील  तिलकवाडा येथे जमलो होतो.बांद्रा बरोडा तिलकवाडा असा प्रवास करून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी ७ वाजता पोचलो. एक दिवसाची ही  परिक्रमा साधारण २१ कि. मी. पायी करायला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ७ ते ८ तास लागतात. ही  परिक्रमा उत्तर तट ते दक्षिण तट आणि पुन्हा उत्तर तटावर येणे अशी वर्तुळाकार असते. 

 सलग आलेल्या सुट्टयांमुळे परिक्रमा मार्गावर खूप गर्दी आहे असे समजल्यामुळे जेवण झाल्यावर परिक्रमेचा संकल्प करून आम्ही अजिबात विश्रांती न घेता  रात्री ११.३० वाजताच परिक्रमेला उत्तरतटावरून  सुरुवात केली. 

वाटेत लागणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेत मजल दरमजल करत  आम्ही आता मैयेच्या किनाऱ्यावर येऊन पोचलो होतो.मैयेचे पात्र मोठे होते. नुकतीच पौर्णिमा झाली होती. आकाशातील  पूर्ण  चंद्राचे प्रतिबिंब नदीत पडले होते. चंद्राची शांत शीतल साथ चालताना मनामध्ये आनंदाच्या लाटा उसळवित होती. चालत होतो तो  रस्ता मातीचा , सरळ आणि मोठा होता. आजूबाजूला बरेच भिक्षेकरी रात्रीची वेळ असूनही भिक्षा मागत होते. मार्गक्रमण  करीत आम्ही नंदीघाटावर पोचलो. तिथे विविध मोठ्या आकारातील  शिवलिंगे खास परिक्रमेच्या निमित्ताने  बनविली होती . अनेक भक्त ह्या ठिकाणी फोटो घेण्यात मग्न होते. इथूनच पुढे आता बोटीने उत्तर तट ओलांडून रामपूरा  इथे म्हणजे दक्षिण तटावर जायचे होते. जवळजवळ अर्धी परिक्रमा मैयेच्या कृपेमुळे पार पडली होती. 

हळूहळू रात्रीचा अंधार विरघळत होता.  सगळा  आसमंत केशरमिश्रित लाल भगवा होऊ लागला  होता . चराचर सृष्टी अरुणोदयाच्या प्रतीक्षेत होती. नर्मदा  मैयेचा उत्तरतट पार करून आम्ही परिक्रमावासी आता माईच्या अगदी निकट आलो होतो.तट परिवर्तन केल्यावर प्रथम स्नान केले. नर्म आणि शर्म असे नर्मदा नदीचे केलेले वर्णन अगदी योग्यच आहे. उदरांत क्रूर आणि अजस्त्र मगरींना  आश्रय देऊनही ती माउली अगदी शांतपणे वाहात  असते. नर्मदा कन्या  रूपांत प्रगट  झाली आहे. तरीही ही  बालिका अवखळ नाही तर धीर गंभीर आहे. 

 माईच्या  स्पर्शाची ऊब अनुभवायला आता आम्ही उत्सुक होतो. किनाऱ्यावरच पथारी  पसरून बरोबर आणलेले पूजेचे सर्व साहित्य मी बाहेर काढले. हळदीकुंकू वाहून मातेची साडी चोळीने ओटी भरली. प्रसाद दाखविला. अलगद तिच्या पात्रांत दीप सोडले. दिव्याची ज्योत प्रज्वलित करताना प्रत्येक दिव्याबरोबर त्या त्या व्यक्तीच्या आठवणीने उर भरून येत होता. हेलकावे खात दिवे लांब वरच्या प्रवासाला निघाले होते. साश्रू नयनांनी मी ते मनोहर दृश्य डोळ्यांत सामावून घेत होते. 

घाटावर अनेक भाविकांची गर्दी झाली होती.कोणालाच वेळकाळाचे भान नव्हते.  सगळेच मय्येचे पूजन करण्यात मग्न होते. सेवेकऱ्यांचे अनेक स्टॉल बाजूला होते आणि परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी चहा , नाश्ता विनामूल्य पुरवत होते. त्यांच्या सेवाभावाला  आणि डोळ्यात तेल घालून स्वतःचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना मनोमन वंदन  करून आता पुढची वाट चालायला सुरवात केली . आधीचे  अंतर माऊलीचा पदर धरून कसे पार झाले ते कळलेही नाही. आता पुढचे काही  अंतर पक्क्या सडकेवरून पार करायचे होते. 

ह्या मार्गावर दुतर्फा हिरव्यागार केळीच्या दाट  बागा नजरेस पडत होत्या.कच्ची केळी , केळफूल आणि केळीची भलीमोठी पाने...केळीच्या वासाने हवेत एक वेगळाच गंध  पसरला होता. कापसाची झाडेही बरीच होती.  अधून मधून तयार झालेल्या कापसाच्या बोन्डातून शुभ्र कापूस बाहेर डोकावत होता.रस्त्यावर अनेक भलेमोठे वटवृक्ष दिसले. अनेक लोम्बणाऱ्या पारंब्या रस्त्याला स्पर्श करत होत्या. ध्यानस्थ ऋषींप्रमाणे हे वटवृक्ष साधनेला बसले आहेत असे वाटत होते.  वाटेत छोटी छोटी  गांवे ,अनेक देवळे आणि आश्रम होते. वाटेवर बसलेल्या  निराधार स्त्रिया लहान मुलांना घेऊन त्या आड वेळीही आमच्याकडे मदतीची याचना करीत होत्या. जमेल तशी मदत करत  आम्ही पुढे पुढे चालत होतो.  टाळ आणि नाम गजरांत  अनेक समूह परिक्रमेची वाट तल्लीन होऊन चालत होते. आता आमच्या  पायांची गती  हळूहळू कमी कमी होऊ लागली. पायातली चेतना हरवल्यासारखे पाय जड झाले होते. पण मनातल्या मनांत भोले - शंकर आणि नर्मदे हर चा जप चालू होता. तोच जप मार्गक्रमण करण्यासाठी बळ देत होते. 

सीताराम बापूंच्या आश्रमात पोचलो तेव्हा तिथे घंटानाद चालू होता.तिथल्या मंदिरात  हनुमानाचे दर्शन घेतले. चहा घेऊन थोडी तरतरी आली आणि पायऱ्या उतरून पुन्हा माईच्या प्रवाहाबरोबर पाऊले पुढची वाट चालू लागली. परिक्रमेचा पुढचा आणि शेवटचा दोन कि.मी.चा टप्पा आता समोर दिसत होता. पण हा अंतिम मार्ग आक्रमित करायला जरा जास्तच वेळ लागला. पलीकडच्या तटावर जाण्यासाठी भव्य कमान भाविकांच्या सेवेसाठी उभारली होती. प्रातःसमयीची आरती घाटावर चालू होती. धूप दीपांचा संमिश्र वास दरवळत होता. बरेच चालल्यामुळे झालेली थकावट  सर्वांच्याच चेहेऱ्यावर दिसत असली तरी परिक्रमा पूर्ण करण्याचा उत्साह आणि जिद्दही  दिसत होती. वयस्कर मंडळींबरोबरच तरुण जोडपी मुलाबाळांसहित सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला. 

दक्षिण तट ओलांडून आम्ही आता पुन्हा तात्पुरत्या  बांधलेल्या पुलावरून  उत्तर तटावर पोचलो होतो.  समोर पायऱ्या पायऱ्यांची डोंगरावरील वाट दिसत होती. पण हे अंतर पार करणे सुद्धा आता कष्टाचे वाटत होते.  'जड झाले ओझे ' स्वतःचेच ओझे वाहून नेणे आता नकोसे वाटत होते. पण मैंयेने दिलेल्या बळावर  आम्ही वासुदेव कुटीर ह्या पवित्र वास्तूत प्रवेश केला आणि रामदास स्वामी स्थापित हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो.तिथेच प. पू .वासुदेवानंद सरस्वती स्वामींचेही दर्शन घेतले.आम्ही इतके दमलो होतो की आता इथून अजिबात हलूच  नये असे वाटत होते. पण थोडी विश्रांती आणि चहा नाश्ता घेऊन परत मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. इथे आल्यावर नर्मदा माईचे प्रतिकात्मक पूजन म्हणजेच  ११ कन्यांचे पूजन केले आणि आमच्या परिक्रमेची सांगता झाली. 

नर्मदा मैंयेच्या कृपेमुळेच सुमारे २१ कि. मी. चा परिक्रमा मार्ग आम्ही आठ तासात पूर्ण केला होता. आणि असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करता आली , ह्याचा आनंद मनात दाटून आला होता. परिक्रमेला निघण्यापूर्वी साशंक असलेले मन आता निश्चिन्त झाले होते. आणि मैयेवरची श्रद्धा दृढतम झाली होती. तिच्याविषयी कृतज्ञता मनात दाटून आली .तिच्या प्रत्येक बिंदूत असलेले शिवतत्व जाणताना , तिचा  शांत प्रवाह  नजरेत साठवतांना ती दुःख निवारण करणारी देवी कित्येकांची आश्रयदाती  आहे हे समजून  मुखातून सहजोद्गार निघाले ... 

 " त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे "

ह्या पुण्यप्रद , मनोहारी तीर्थाची परिक्रमा करताना अनोख्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. इतके अंतर चालण्याची   खरं तर आपली शारीरिक आणि मानसिक पात्रता नसते.  सर्व भार तिच्यावर  सोडून , तिला शरण जाऊन सत्संकल्पाने बिकट वाट सुलभ कधी होते ह्याची जाणीवही तिच्या काठावरून तिच्या सोबतीने  चालताना होत नाही. अंगवळणी पडलेल्या शहरी जीवनाची झूल तिच्या सहवासात गळून पडते आणि तनामनाने आपण फक्त  तिचे होऊन जातो. 

रोजचे जीवन जगताना सुद्धा हेच परमेश्वराचे अस्तित्व , श्रेष्ठत्व आणि कर्तृत्व मान्य करून त्याचा हात धरून जीवनाची परिक्रमा केली तर सगळेच क्लेश मिटतील नाही का ?

जगताचे जीवन सुसह्य करणाऱ्या ह्या नद्यांचे  पावन आशीर्वाद ह्या निमित्ताने घ्यावेत , आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे आणि जीवन आनंदी व्हावे हीच नर्मदा मातेकडे प्रार्थना... 

नमामी  देवी नर्मदे । नमामी  देवी नर्मदे ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

१९/०४/२०२५