Wednesday, October 2, 2024

navratriche nau rang... नवरात्रीचे नवरंग

                                                                 ।। श्री शंकर ।।

                   नवरात्रीचे नवरंग 

उद्यापासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या ( आश्विन शुध्द प्रतिपदा ते नवमी ) 

 सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा ... 

सरस्वती ! नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि । कार्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।

बुद्धीची देवता श्री महागणपती आणि कार्यशक्तीला चालना देणारी ती महासरस्वती ... ह्या आदिशक्तीची विविध रूपे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांत पाहतो. ही निसर्गातील सृजनशक्तीला प्रेरणा देणारी. मातीची घट रूपाने होणारी पूजा ,त्यांत विविध धान्य पेरून  आलेली ती हिरवी रोपं हे आपल्या कृषिप्रधान देशाचं प्रतिनिधित्व करणारी  . 

कुमारिका पूजन ( अप्रगट शक्ति ) अथवा सुवासिनी पूजन ( प्रगट शक्ति ) हा शास्त्रविधी म्हणजे स्त्रीशक्ती अथवा मातृशक्तीचं पूजन. तिच्या विषयी वाटणारा आदर व्यक्त करताना होणारी तिची पूजा. घरासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या ,त्या स्त्रीचे कौतुक व्यक्त करण्याची ही सुयोग्य संधी. त्या आदिशक्ति रूपांत स्त्रीच्या विविध नात्यातील रूपांचे, गुणांचे साधर्म्य  बघायला मिळते. आणि तिची अलौकिक अशी मातृत्व शक्ती, वत्सलता . 

नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे. विविध रंगगंधांनी घरातले वातावरण सुद्धा प्रफुल्लित होते. विविध प्रकारचे  नैवेद्य अर्पण केल्यामुळे षड्रस निर्माण होऊन  आपलीही क्षुधा शांत होते. रसनिर्मिती होते. 

नवरात्रीत नऊ दिवस घरांत आपण अखंड दीपप्रज्वलन करतो. दीप हे तेजाचे प्रतीक. दीप तेवत ठेवल्यामुळे वायूमंडलातील शक्तीतत्त्व लहरींचे घरांत संक्रमण होऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि ह्या जीवाला ' चलते रहो  ' चा संदेश मिळतो.  आपल्या देहाचा अज्ञानरूपी घट नऊ दिवस तेलवात लावून ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून टाकावा ह्यासाठी करायची ही उपासना.ह्या उपासनेमुळे मन शांत ,प्रसन्न आणि स्थिर होतं . देवीची कृपा झाली कि सुख ,शांती आणि समाधान लाभते. हि आदिशक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी आहे. 

 मनामनांत दबा धरून बसलेले षड्रिपू मारून दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवायचा आणि बावनकशी सोनं लुटायचं , सिमोल्लंघन करायचं . आहारविहाराचं पथ्य ह्यावेळी पाळलं की देहाबरोबर मनांत सुद्धा सत्व प्रवृत्ती जागृत होते आणि हे क्षेत्र ( देह ) सुपीक ,सुफल होतं . मग खरा आनंदोत्सव साजरा होतो. 


नऊ दिवस नऊ विविध रंगांची वस्त्रे परिधान करावी का ह्यावरून अलीकडे  बराच उहापोह होत आहे. हे केवळ मार्केटिंग करता पसरवले जात आहे, ह्यांत व्यावसायिक लागेबांधे आहेत  आणि विविध प्रसारमाध्यमे ह्याला जबाबदार आहेत वगैरे वगैरे .अगदी कष्टकरी महिला ते उच्चपदस्थ ,कर्तबगार महिला त्या रंगांची वस्त्रे घालून जाताना दिसतात. त्यानिमित्ताने त्या दिवसाच्या रंगाची साडी परिधान करून वर्तमानपत्रांला आपली छबी पाठवणे आणि अनेकांची छबी तिथे  न्याहाळणे हा स्त्रीवर्गाचा नवरात्रीतील  आवडता उपक्रम. त्यानिमित्ताने वस्त्र - अलंकार उद्योगाची एकंदरच उलाढाल कल्पनेपलीकडे वाढली आहे . एखाद्या स्त्रीने " रंग माझा वेगळा " म्हणत दुसरा रंग निवडला तर अनेकांच्या भुवया उंचावतात असाही अनुभव आहे. 

नवरात्राचा आणि ह्या रंगांचा काही संबंध नाही ,काही मंडळी हे षडयंत्र मुद्दाम रचत आहेत असा  आरोप - प्रत्यारोपांचा खेळ रंगात ह्या निमित्ताने रंगात येतो.  

हल्ली बऱ्याच social  events मध्ये ठराविक रंगांचे कपडे परिधान करावेत अशी आवर्जून प्रेमळ  सूचना असते. आणि बरेच जण त्याला अनुसरून तसा dress code follow करतात. तो समूह अशा सारख्या रंगसंगतीतील पेहेरवामुळे उठून  दिसतो. फोटोना / सेल्फिना  उधाण येते. पती पत्नी सुद्धा twinning करतात. आजच्या जमान्याचा हा trend आहे.

मी माझा अनेक वर्षांचा वस्त्र-रंग परिधानाचा अनुभव ह्यानिमित्ताने इथे शेअर करतेय ज्याचा मला स्वतःला फायदा झाला. 

वीसपंचवीस  वर्षांपूर्वीची ही  गोष्ट असेल. आम्हा मैत्रिणींचा गप्पांचा फड मस्त रंगात आला होता. ग्रह ,तारे ,नक्षत्र, ज्योतिष असे त्या ठराविक तरुण वयांत भुरळ घालणारे विषय. एक मैत्रीण म्हणाली , रोजच्या वारानुसार ,ज्या ग्रहाचा जो  वार असतो , त्या ग्रहाच्या रंगाचे वस्त्र परिधान केले की त्याचा आपल्याला लाभ होतो. उदा. सोमवारी सोम ग्रह - त्याचा सफेद रंग म्हणून  पांढरे  , मंगळ ग्रह लाल असतो ,म्हणून मंगळवारी लाल वस्त्र परिधान केले की ते फ़ायदेशीर होते. काम चांगले होते, दिवस चांगला  जातो ,कामात व्यत्यय येत नाही इत्यादी इत्यादी ... झालं ...अस्मादिकांनी ते  नियमितपणे आचरणांत आणले.अगदी आजही .  ह्याचा  व्यावहारिक फायदा मला नक्कीच झाला. बघा हं ... रोज काय ड्रेस घालायचा हा प्रश्न पडलाच नाही .कारण सात रंगांचे सात कपडे माझ्याकडे होते. त्यामुळे वारांनुसार तो रंग घालायचा , वेळेची बचत. गरजा कमी झाल्या. कारण ठराविक रंगांचे ठराविकच कपडे. अगदी लग्न कार्यांत सुद्धा मी हा नियम अंमलात आणला. आज मी पिवळा ड्रेस घातलाय म्हणजे आज गुरुवार हेही सहजच लक्षांत यायचे. काहीं वेळा मह्त्वाच्या कामाला जातानाही मला ह्याचा चांगला अनुभव आला. 

तर मंडळी ! असे हे माझे रंगसंगती पुराण .नवरात्र जवळ आले की  विविध रंगांच्या कपड्यावरून चर्चेला उधाण येते. मला त्यांत योग्य का अयोग्य ह्या वादांत पडायचे नाही. माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला इतकेच.  कोणाला ह्यात अंधश्रद्धा वाटेलही . माझ्याकडे बघून काहीजणींना माझे तेच तेच कपडे घालणे खटकलेही असेल पण मला तरी माझी ह्यामुळे  मोट्ठी सोय झाली असेच वाटते.

  " अंदाज अपना अपना !!! नाही का .. 

चला तर मग ह्या सणाचा, उत्सवाचा आनंद वादविवाद टाळून  आपापल्या परीने लुटुया. जीवनाचा खराखुरा आस्वाद घेऊया. अंतिम ध्येय शांती आणि समाधान जे दुर्मिळ आहे ते मिळावे म्हणून मनापासून देवीची प्रार्थना करूया. 

या देवी सर्व भुतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

 जगदंब उदयोस्तु उदयोस्तु ।।


स्नेहा हेमंत भाटवडेकर , विलेपार्ले ,मुंबई 

०२/१०/२०२४



4 comments:

  1. खूपच छान... हलका फुलका पण तरीही माहिती पूर्ण लेख... सुंदर..👌👌🙏

    ReplyDelete
  2. खुप सुंदर ..रंग संगती तर खरेच बरेच चर्चा होतात. कोणाला फालतू पणं वाटते. .. पण तुम्ही छान अनुभव सांगितला

    ReplyDelete
  3. नुसता शब्द संग्रह असून चालत नाही... शब्द बटवा योग्य जागी मोकळा करता आला पाहिजे. ते जमलं आहॆ. लेख रंजक झाला आहॆ.

    ReplyDelete
  4. खर पाहिलं तर रंगांचेही शास्त्र असते.स्नेहा तुझा रंगविषयी लेखन आवडले.

    ReplyDelete