Monday, October 14, 2024

मार्ग सुखाचा

 

ll    श्री शंकर  ll

 

         

मार्ग सुखाचा

 

गाडीने नुकतेच कल्याण स्थानक सोडून दादरच्या दिशेने प्रस्थान केले. आळोखेपिळोखे देतच  ती उठली.           लो गरम चाय.. गाडीत विक्रेत्यांची ये जा सुरु झाली होती.तो आवाज , वर्दळ . मुंबईत पाऊल टाकल्यापासून  गजबजाट सुरु ...दोन दिवस किती आनंदात गेले

तिची नजर घड्याळाकडे गेली. सात वाजले की ! तिने खिडकीतून बाहेर डोकावले ...आज सूर्यनारायण हरवले कुठे ? एक क्षण काळ थांबलाय असा तिला भास झाला. दादर आलं तशी ती गाडीतून उतरली पण कशातच लक्ष नव्हतं. मन सैरभैर झालं होतं .असं काय होतंय आज ? तिच्या मनाचा थांग तिलाच लागत नव्हता. 

  तिला आठवलं , आईला फोन करून खुशाली विचारायची आहे. निघताना जरा बरं नाही असं म्हणाली होती.पंढरपूरचा सगळा वृत्तांत सांगायचाय तिला. मी कुठे बाहेरगावी जाणार की माझ्या परतीच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असते. माझा फोन आला की कोण आनंद होतो तिला ...

तिचे विचारचक्र चालूच होते .टॅक्सी ...तिने टॅक्सी थांबवली . तेवढ्यात अचानक भावाचा फोन आला आणि ती भानावर आली..काय ??? ती जोरात ओरडलीच.ह्या अनपेक्षित धक्क्यातून सावरणे खूपच कठीण होते. आईsss ,अगं ,अशी अचानक तू ??  दोन दिवसांच्या आनंदावर असं विरजण पडेल असं मनांत सुद्धा आलं नव्हतं.



लाडक्या विठुरायाला भेटायची ओढ नकळत तिला लागली होती .आयुष्यात पहिल्यांदाच ती पंढरपूरला आली होती. पौर्णिमेचा दिवस. चंद्राचे भलेमोठे पूर्ण प्रतिबिंब चंद्रभागेत पडले होते ..किनाऱ्यावरच असलेले पुंडलिकाचे देऊळ. तिथे जाऊन दर्शन घेताना तिला आईची मनोमन आठवण झाली. प्रत्यक्ष पांडुरंगाला तिष्ठत ठेवून आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक. त्याच वेळी  मंदिरातील घंटानादाने अंतर्बाह्य नादवलय निर्माण झाले. प्रवाहातील द्रोणात सोडलेले हेलकावे खात दूर दूर जाणारे दिवे ती बराच वेळ न्याहाळत होती.त्या ज्योतीशी तिची आत्मज्योत एकरूप झाल्याचं भास तिला झाला. आणि पांडुरंगाचे ते दुरून घेतलेले  तरीही पारणं फेडणारे  दर्शन. वैकुंठपूरी ती हीच. इतका आनंद ,समाधान तिला कधीच लाभलं नव्हतं.

जेमतेम घरी सामान टाकून धावतच ती माहेरी पोचली. पाझरणारे डोळे पुसतच ती घरात गेली. विझून गेलेली आईची नजर तिलाच शोधतेय असा भास  झाला. माझ्याशी  बोलण्यासाठी तिचे ओठ विलग झालेत ? किती शांत चेहरा ! अर्धोन्मीलित डोळे !   क्षीरसागरात पहुडलेल्या विठूरायाचाच भास तिला झाला.आईच्या पायाला तिने मिठी मारली..मात्यापित्याचं छ्त्र हरवलेली ती... आपण आता पोरके झालो…उराशी असलेल हे दुःख तिला सहन होत नव्हतं . 

पंढरपूरला जाऊन भेटलीस ना त्या माऊलीला ? तोच खरा जगताचा आधार. आता पुढची वाटचाल करायची ती त्याच्या सोबतच. सुखाचा शाश्वत मार्ग दाखवण्यासाटी मीच तुला पंढरपूरला पाठवलं होतं ...आईचा आवाज तिच्या कानांत घुमत होता. 

आजन्म आपल्या लेकरांची काळजी वाहणारं अथांग , आभाळभर पसरलेलं ते मातृत्व ...त्या चिरंतन मायेचा साक्षात्कार त्या दुःखद क्षणीही तिला दिलासा देऊन गेला..

 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर

विलेपार्ले पूर्व

१५/१०/२०२४




2 comments: