Tuesday, March 5, 2024

जनीं जाणता पाय त्याचे धरावे

।।  श्री शंकर ।।


जनीं जाणता पाय त्याचे धरावे 


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।

कवि वाल्मीकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।


आज माघ वद्य नवमी , दासनवमी .. सज्जनगड स्थित समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या पुण्यस्मरणाचा हा दिवस. मानवाच्या कल्याणासाठी संत,सद्गुरु आपल्यासारख्या सामान्य जनांना तळमळीने उपदेश करीत असतात. समर्थांनी आपल्या वाङ्मयातून आपल्यासारख्या सामान्य लोकांचे  जीवन भव्य दिव्य ,उदात्त व्हावे ,मनाला शांतता प्रसन्नता लाभावी म्हणून मार्गदर्शन केले आहे. 

मनाचे श्लोक ही त्यांची रचना म्हणजे आपल्या उत्कर्षाकरितां साध्या -सोप्या भाषेत आपल्या मनाला केलेले उत्तम मार्गदर्शनच आहे. आपले मन स्थिरावलेले असेल तरच संसार आणि परमार्थ ह्याची उत्तम सांगड घालता येते.     जन्म - बंधनाच्या फेऱ्यांतून सुटका होणे हेच मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय असते. त्यासाठी मनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे . हे जाणूनच समर्थांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी मनाचे श्लोक रचले. 

मनाच्या श्लोकांची रचना वरवर पाहता अगदी सोपी,सहज.पण त्यात दडलेला भावार्थ हा विचार ,मनन ,चिंतन ,आचरण करण्यासारखा. अगदी शालेय जीवनांत आपण ह्या श्लोकांचे स्पर्धेसाठी पाठांतर करतो.त्यावेळी त्याचा अर्थ त्या बालवयात कळत नाही. आणि पुढे हे श्लोक विस्मरणातही जातात. खरं तर आयुष्यभर ह्या श्लोकांमधील उपदेश व्यावहारिक आणि पारमार्थिक पातळीवर आचरणांत आणणे अगदी आवश्यक. समर्थ स्वतः अतिशय तेजस्वी. तेच तेज त्यांच्या भाषेत प्रगटले आहे. श्लोक ऐकताना , म्हणताना एक जोश, आवेश आपल्यालाही जाणवतो. 

बारा वर्षं तपाचरण करून समर्थांनी लहान वयातच त्यांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांना आपलेसे करून घेतले. ऐहिक संसाराचा त्याग करून परमार्थ मार्गाचा अंगीकार केला. रामरायाने त्यांना जगदुद्धार करण्याचा आदेश दिला. ह्या आदेशाचे पालन करून लोकहितासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचले. आधी कठोर उपासनेने स्वतःला सिद्ध केले .त्यामुळे त्यांच्या शब्दांत ते जाज्वल्य  सामर्थ्य प्रगट होते . 

मनाच्या श्लोकांतील १४१ व्या श्लोकांत समर्थ आपल्याला सांगतात , जनीं  जाणता पाय त्याचे धरावें ... 

जाणता कोण ? ज्ञानी ,संत,सत्पुरुष ,सद्गुरु , आत्मज्ञानी वा साक्षात्कारी पुरुषोत्तम  म्हणजे " जाणता " .... ज्याला सामान्य लोकांच्या हिताची , कल्याणाची तळमळ आहे. अशा व्यक्तिचे पाय धरावे असे समर्थ म्हणतात.                  " धरावे ते पाय आधी आधी " ... म्हणजे त्यांना शरण जा. पूर्ण  शरणागती .त्यांच्या समोर नम्रपणे वागा. अहंकार बाळगू नका. त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. जाणत्या व्यक्तीचा  सल्ला हा नेहमीच मोलाचा ,आपल्या कल्याणाचा . 

आई जशी लेकराचे गुण- दोष बरोब्बर ओळखून असते त्याप्रमाणे जाणत्या व्यक्तीलाही समोरच्या व्यक्तीला त्याच्या कुवतीप्रमाणे कोणता बोध करायचा ते बरोबर  कळते. ही  जाणीव असणारा तो " जाणता ".

ही  जाणती व्यक्ती आपल्या डोळ्यांत अंजन घालते. अंजनाचे वैशिष्ट्य हे की आपली दृष्टी त्यामुळे साफ होते. देहबुद्धीचा निरास होऊन आत्मज्ञान होण्यासाठी जाणत्या माहात्म्याचा अनुग्रह घ्यायला हवा. त्यासाठी आधी त्या महात्म्याचे मोठेपण कळायला हवे. ह्या जाणत्या व्यक्तीला शिष्याचें नेमकेपण माहित असते. त्याचा स्वभाव ,त्याची परमार्थाची आवड ,त्याची कुवत जाणूनच तो मार्गदर्शन करत असतो. ही ज्ञानदृष्टी गुरुकडे असते. ह्या जाणत्या व्यक्तीने सांगितलेली उपासना करताना स्वतःचा " स्व ",अहंकार बाजूला ठेवावा लागतो आणि गुरु म्हणतील तेच योग्य ह्या मार्गाने साधना एकरूपतेने ,निष्ठेने  करावी लागते. " सदा संगती सज्जनाची धरावी " ...संत ,सज्जनांच्या सहवासांत नियमितपणे राहिले की  आत्मस्वरूपाचा शोध लागतो . सत्यदर्शन होते. 

समर्थानी दासबोधातील दशक १८ ,दुसऱ्या समासात  " जाणता " ह्या शब्दावरच लिहिले आहे.   ते म्हणतात ,जाणत्याची संगती धरावी आणि त्याची  सेवा करावी,आपले शरीर त्याच्यासाठी  झिजवावे. जाणत्याचे ज्ञान पाहून आपला अंतरात्मा जाणावा. 

माणसाला नेहेमीच कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. माणूस जरी बुद्धिमान असला तरी नैसर्गिक प्रेरणेने त्याला फार थोडे साधते. माणसाला स्वतःचे श्रेठत्व सिद्ध करण्यासाठी जाणत्याचे पाय धरावेच लागतात. तरच त्याला आपली प्रगती , उन्नती साधता येते. पण ह्या पाय धरण्यात केवळ शिष्टाचार नसावा.तर नम्रता असावी. त्या व्यक्तीविषयी मनांत आदराची भावना असावी. 

पाय हे आपल्या शरीरातील निकृष्ट अंग. आणि डोकं हे उत्तम अंग. जाणत्या व्यक्तीच्या पायाशी आपले मस्तक ठेवणे म्हणजे आपले उत्तम अंग त्यांच्या स्वाधीन करणे. त्यामुळे स्थिरता , तृप्ती लाभते. अर्थात त्यासाठी मनाचा निग्रह हवा. मगच त्या शाश्वत तत्वाची,आनंदाची  प्राप्ती होते. 

भगवद्गीतेत अर्जुनाच्या मनांतील संभ्रम दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यासारख्या थोर योध्यालाही उपदेश केला .  अर्जुनाची नेमकी मनःस्थिती श्रीकृष्णांनी जाणली. त्यानुसार त्याला योग्य मार्गदर्शन केले आणि त्यामुळे अर्जुनाचा मोह नष्ट झाला.तो योगेश्वर श्रीकृष्णांना शरण गेला. 

 शिवाजी महाराजांना आपल्या प्रजेची अचूक जाण होती म्हणूनच त्यांना आदराने आपण " जाणता  राजा " म्हणतो. समर्थच त्यांचे गुरु होते. जाणत्या गुरूंमुळे ते स्वतःही जाणते झाले. 

परमार्थ मार्गांत चरणसेवा ,चरण धरणे, ह्याला खूप महत्व दिले आहे. सद्गुरु चरण हे श्रुतिरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित आहेत.ते वेदान्ताच्या अर्थांचे वक्ते आहेत.त्यांच्या चरणांना गंगोदकाची उपमाही दिली आहे. गुरुचरणांची सेवा हे  तीर्थच आहे.  ह्या चरणांच्या आश्रयाने शिष्याची सर्व पापे दूर होतात ,अज्ञान नाहीसे होते आणि शिष्यही पवित्र होऊन ब्रह होतो. 

पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे चरणकमल धरायला आपण उत्सुक असतो. त्या चरणांना मिठी मारली की ह्या भवसागरातून आपण नक्की तरुन  जाऊ हा विश्वास भक्ताच्या मनांत असतो. तसाच विश्वास जाणत्याच्या पायावर डोकं ठेवताना असला तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हे निर्विवाद सत्यच आहे. 

जय जय रघुवीर समर्थ !!!!


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

दासनवमी  २०२४... 


No comments:

Post a Comment