Wednesday, January 13, 2021

MAKARSANKRAMAN ( गोड गोड बोला ..... )

                                                        ।। श्री शंकर ।।

                                                                                                           मकरसंक्रांती ,१४/०१/२०२१

                                                     गोड गोड बोला ..... 


                              भोगावया मकरराशीस सूर्य आला । तेणे आनंद अवघ्या जगतास झाला ।।

                                                                                                        संतकवि दासगणु महाराज ..

नमस्कार मंडळी ,

२०२१ ह्या कॅलेण्डर  वर्षातला पहिला सण " मकरसंक्रांत " ,वर्षाची  सुरवातच गोड बोलण्याचा संदेश देऊन  होते . व्यवहारांत गोड  बोलूनच कामे होतात ना  ? तर अशा ह्या मकरसंक्रांतीच्या सर्वाना गोड शुभेच्छा . 

हा उत्सव सूर्य देवतेचा. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरवात होते. शेताशेतांत पिके तयार झालेली असतात. हवा मस्त थंड असते. पूर्वजांनी ऋतुमान ,परंपरा आणि धर्म ह्यांची छान सांगड घालून अनेक सण ,उत्सवांची परंपरा निर्माण केली. रोजच्या जीवनमानात बदल आणि त्याबरोबरच धर्म ,आरोग्य ह्यांची जोपासना. भारतात प्रांतानुसार ह्या सणांचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही उद्देश एकच. नात्यातील कटुता कमी होऊन एकी निर्माण व्हावी ,स्नेहवृद्धी  व्हावी. तीळ आणि गुळ हे ह्या स्निग्धतेचे प्रतीक. थंडीच्या दिवसात ,तिळगुळ बल -ऊर्जा निर्माण करणारा .परस्परांना तिळगुळ देऊन नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा .  पोस्टाने घरोघरी तिळगुळ आणि शुभेच्छा संदेश पाठविणारी पूर्वापार परंपरा आज खंडित झाली आहे. पण आमच्या गोरट्याच्या आश्रमांतून न चुकता येणारा तिळगुळ आणि संदेश आमचे गुरुपरिवाराशी असलेले  नाते अधिक दृढ करणारा . अनेक वर्षे सातत्याने चालू असलेली हि परंपरा. 

संतकवि दासगणु महाराज त्यांच्या आर्येत म्हणतात : 

                         गोडी मधुर उपजे । जेवीं या तीळ नी गुळांठायी ।

                         तैसा मत्सर जाता आपणातील । तेच घडुनिया येई ।। 

पुढे ते म्हणतात परस्परांतील प्रेमामुळे सुखाचे भांडारच  लाभते . सुकीर्ती वाढते. 

ह्या पुण्य पर्वात नदीस्नानाचे ,दान धर्माचे ,पूजा- उपासनेचे महत्व सांगितले आहे. महिला ह्या दिवशी सुगडाची पूजा करतात. हळदीकुंकू करून वस्तू लुटतात. अशा रीतीने सामाजिक बंधही दृढ होतात. 


संक्रांतीच्या दिवशी सूर्य  उपासना विशेष फलदायी ठरते . सूर्यनारायणाच्या उपासनेचे अनेक फायदे आहेत. आरोग्य ,तेज,बल वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार ,गायत्री मंत्र उपासना केली जाते.

शारिरीक बलामुळेच जीवनधारणा होते. उन्नती होते. दुर्बल माणसाकडे शक्तीचा अभाव असल्यामुळे ,त्याला कायम अन्याय सहन करावा लागतो. त्याचे समाजाकडून शोषण होते. शारिरीक ,बौद्धिक,आर्थिक,चारित्रिक बळ सूर्य उपासनेमुळेच लाभते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने हा महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो . 

 सृष्टीतील चराचराचे संवर्धन सूर्यप्रकाशामुळे होते. आदित्य हे साक्षांत नारायणाचे रूपच आहे जे आपण स्वतः डोळ्यांनी बघू शकतो." नमः सवित्रे जगदेकचक्षु : " सूर्यनारायण  जगाचा अक्षु ,नेत्र आहे आणि जगाच्या सगळ्या व्यवहारांवर त्याचे लक्ष असते . लोकांना सन्मार्ग दाखविण्याचे काम हा  सूर्य आपला मित्र होऊन करतच असतो. 

महाराजांनी त्यांच्या आणखी एका श्लोकांत ह्या सणाचे महत्व प्रतिपादिले आहे. 

                               आला अजी मकर राशीस हा तमारि ।हा भर्गदेव सविता अशिवा निवारी ।।

                                    सूर्यासवे जशि प्रभा उदयास येते । हे भर्ग चिंतन कधी नच व्यर्थ जाते ।।

अंधःकाराचा तसेच वाईट वृत्तींचा नाश करणारी अशी परमात्म्याची  शक्ति म्हणजे " भर्ग  ". हि शक्ती मनुष्याचे आयुष्य प्रदीप्त ,उज्वल करून त्याला संतुष्ट करते .  आसुरी वृतीचे दमन  करणे, दुर्गुणांचा नाश  करणे मानव कल्याणासाठी हिताचे आहे. गायत्री उपासना आपण सर्वश्रेष्ठ उपासना मानतो. ह्या उपासनेद्वारे ईश्वराचा तेजस्वी ,श्रेष्ठ अंश आपल्यात धारण करून क्षात्रतेज वाढविता येते. 

हे तेज वृद्धिंगत करून अविद्येचा नाश होऊन हळूहळू ज्ञानाचा उगम होतो. ब्रह्मतेजाचा साक्षात्कार होतो. शांततेज वाढते."  नमः शान्ताय तेजसे "  हे शांततेज उग्र तेजाहून प्रभावी असते. शाकुन्तलात महाकवि कालिदासाने म्हटले आहे " शमप्रधानेषु  तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेजः " 

                मकरसंक्रमणाच्या पुण्यदायी पर्वात आपणा  सर्वांचे तेज वृद्धिंगत होवो हि त्या नारायणाला प्रार्थना .... 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com


                       

No comments:

Post a Comment