Thursday, August 8, 2024

बहरला पारिजात दारी

।।   श्री शंकर  ।।


बहरला पारिजात दारी 

पहाट नुकतीच फटफटत होती . पूर्व दिशेने रक्तवर्णी लालिम्याचे मळवट भरले होते. हळूहळू वर येणाऱ्या सूर्याला आलिंगन द्यायला स्त्रीत्वाचे लेणे लेवून ती सज्ज झाली होती. रोजचीच कहाणी , तरीही नव्याने सुरु होणारी ... नवा दिवस ,नवा अध्याय .. आलेल्या दिवसाला सामोरे जाताना पुढे काय घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही  नसते आपल्याला 

सकाळची शांत वेळ निशाला खूप आवडायची. बाहेरच्या जगातला कोलाहल आता  तिला अस्वस्थ करीत असे. तिची बंगलीही अलीकडे  शांत शांत असायची. एकाकीपणाची आणि भयाण शांततेची तिला सवय झाली होती , नाही करून घ्यावी लागली होती. 

घराबाहेर अंगणात तिच्या निगराणीतून फुललेली बागच तिची मनोवृत्ती प्रसन्न करीत असे. पहाटेच्या मंद गारव्यात ,धूसर प्रकाशांत ह्या बागेतून फेरफटका मारताना तिची मरगळ थोडी कमी व्हायची. दवबिंदूचे प्राशन करत हळूहळू उमलणाऱ्या फुलांकडे बघताना तिच्या तृप्त संसाराचे चित्र तिच्या नजरेसमोर साकारत असे. 

नीरजला जाऊन आता वर्षं झाले असेल नाही ... पण निशा ते मानायला तयार नव्हती. घरी दारी ,अंगणात ,बागेत , फुलापानांत ,प्रत्येक वाटेवर,वळणावर तिला नीरजची आठवण यायची. नीरजची आपल्याला साथ आहे आणि त्याच्या संगतीनेच ही  वाटचाल सुरु आहे अशी तिची भावना होती. पण कधीतरी वास्तवाची जाणीव झाली की मग मात्र निशा उदास व्हायची. 

" बहरला पारिजात दारी ,फुले का पडती शेजारी ... "

गाण्याच्या ह्या ओळी निशाच्या मनाला  डसत होत्या. तिचं मन सैरभैर झालं होतं . विचार करून करून डोक्यात गुंता झाला होता. सोन्यासारखा संसार असा एका क्षणांत विस्कटावा हे काही केल्या तिच्या  मनाला पटत नव्हतं . कुठे कमी पडलो आपण ? नीरज ला असा मार्ग निवडताना आपला पूर्ण विसर पडावा ? मग इतके दिवस होतं ते सगळं नाटकंच होतं ? निशा वारंवार हे विचार बाजूला सारायचा  प्रयत्न करत होती. पण कधीतरी पुन्हा सगळा  प्रसंग उसळी मारून वर यायचा. आजही मनाच्या तळाशी ठेवलेल्या आठवणी पुन्हा वर आल्या. सख्खी  शेजारीण असलेल्या आपल्या प्रिय मैत्रिणीबरोबर नीरजची झालेली अनपेक्षित जवळीक . आणि त्याचं तिच्याबरोबर तडकाफडकी निघून जाणं ... तिला झेपलंच नाही हे सगळं .. 

 सकाळची तिची ही आवडती वेळ.श्रावणातला ऊनपावसाचा खेळ सुरु झाला होता. पावसाच्या शिडकाव्याने झाडं  किती तजेलदार दिसत होती . श्रावणात प्राजक्त केव्हढा बहरला होता . फुलांचा सडा पडला होता. अशा प्रसन्न वातावरणांत बागेत फेरफटका मारताना , फुलांचं उमलणं न्याहाळायचं  ,त्यांचा मंद सुवास श्वासात भरून घ्यायचा . 

 पण आज  तिचे पाय जडावलेले होते. तिची उदासी कशानेच कमी होत नव्हती.मनावरची मरगळ दूर होत नव्हती. तशाच मनःस्थितीत ती तिच्या लाडक्या प्राजक्ताजवळ आली आणि तिथेच मटकन बसली. नीरजची कांती ह्या फुलांसारखीच सुकोमल ,तेजस्वी. त्याच्या सहवासांत जाणवणारा प्राजक्तासारखा मंद दरवळ ,सहजीवनांत अनुभवलेले सुंदर क्षण ... पण आता मात्र रिकामी झालेली सुगंधी कुपी ... सगळं धूसर झालंय आता. मनावर पुन्हा मरगळ दाटून आली . 

हिरव्या पर्णसंभारातून पांढरा ,टपोरी उठावदार फुलांचा आकर्षक कशिदा ,आणि मधेच केशराची जडीबुट्टी. ह्या विलक्षण रंगसंगतीत ती हरवून गेली. मंद वाऱ्याच्या लहरींबरोबर गिरक्या घेत घेत ती सोनुली जमिनीच्या कुशीत अलगद विसावत होती. स्वतःला  विसरून भूमातेला शरण जात होती. 

अनावर ओढीने ती त्या फुलांकडे बघत त्यांना निरखत होती. तिच्या मनांत चलबिचल सुरु होती. काहीशा निश्चयाने तिने प्राजक्ताच्या फुलांनी ओंजळ भरली . मनांत मृत्युन्जय मंत्राचा अनाहत नाद कधी सुरु झाला तेही तिला कळले नाही. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीयमाऽमृतात् || ...

झाडापासून अगदी सहजपणे विलग होऊन बंधनातून मुक्त होणाऱ्या त्या फुलांप्रमाणे हातातली ओंजळ वर येणाऱ्या सूर्यनारायणाला समर्पित करताना स्वतःच्या देहाची ओंजळही त्याच्याच चरणकमळाशी तिने रीती केली. प्राजक्ताप्रमाणे तीही त्या मातीशी एकरूप झाली. त्याच्याप्रमाणेच भगव्या विरक्त रूपांत ती अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागली. 

मूकपणे तिचा लाडका प्राजक्त तिला सुमनांजली अर्पित करीत होता. 


सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

०८/०८/२०२४

 .